या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधणारे सिद्धान्त आपण शोधून काढलेले आहेत, असा योगशास्त्राचा दावा आहे. या नियमांचा व पद्धतीचा लक्षपूर्वंक अभ्यास करून कोणीही आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करू शकतो व ते प्रभावी करू शकतो. ही एक व्यवहार्य अशी महत्त्वाची गोष्ट आहे व सर्व शिक्षणाचे रहस्य त्यातच आहे.
जगात सर्वांना उपयोगी पडण्यासारखी ही गोष्ट आहे. स्वत:चे व्यक्तिमत्त्व प्रभावी बनवणे ही गृहस्थ, गरीब, श्रीमंत, व्यापारी, धार्मिक अशा प्रत्येक माणसाच्या जीवनातील फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला ठाऊक असलेल्या भौतिक सिद्धान्तांच्या पलीकडे दुसरे काही सूक्ष्म स्वरूपाचे सिद्धान्त आहेत.
भौगोलिक विश्व, मानसिक विश्व, आध्यात्मिक विश्व अशा निरनिराळ्या स्वतंत्र सत्ता आहेत असा याचा अर्थ नाही. जे काही आहे ते एकच आहे; एकच सत्ता अस्तित्वात आहे. आपल्याला असे म्हणता येईल की अधिकाधिक सूक्ष्म होत जाणारी ही एक वस्तू आहे. सगळ्यात स्थूल भाग या भौतिक विश्वात आहे.
तो अधिकाधिक सूक्ष्म होत जातो. त्याच्या अति सूक्ष्म भागाला आपण ‘शरीर’असे म्हणतो. जे पिंडी तेच ब्रह्मांडी. आपले हे विश्व अशाच प्रकारचे आहे. ते बाह्यत: स्थूल असून अधिकाधिक सूक्ष्म होत गेले आहे व शेवटी ते ईश्वरस्वरूप बनले आहे.
आपल्याला ही गोष्टदेखील माहीत आहे की महान शक्ती ही सूक्ष्मामधे आहे, स्थूलामधे नाही. एखादा मनुष्य फार मोठे वजन उचलताना आपण पाहतो. त्याचे स्नायू फुगतात आणि त्याच्या सर्व देहावर पडलेल्या ताणाच्या खुणा आपल्याला दिसतात.
आपली अशी समजूत होते की स्नायूंमधे खूप शक्ती आहे. परंतु बारीक तंतूंसारखे जे अनेक मज्जातंतू असतात त्यामुळे या स्नायूंना शक्ती प्राप्त होत असते. ज्या क्षणी स्नायूंपर्यंत पोहोचणारा एखादा तंतू तुटतो त्या क्षणी हे स्नायू कार्य करण्यास असमर्थ ठरतात.
हे बारीक तंतू याहीपेक्षा सूक्ष्म अशा वस्तूपासून शक्ती संपादन करतात,ती सूक्ष्म वस्तू पुन्हा तिच्याहीपेक्षा सूक्ष्म अशा वस्तूपासून,विचारापासून शक्ती ग्रहण करते आणि ही प्रक्रिया सतत चालू असते. म्हणून जे सूक्ष्म आहे तेच शक्तीचे अधिष्ठान आहे. स्थूल पदार्थाची हालचाल आपल्याला दिसते, परंतु सूक्ष्म वस्तूंच्या हालचाली आपल्याला दिसत नाहीत.
जेव्हा एखादी स्थूल वस्तू हालते तेव्हा ती आपल्याला हालताना दिसते आणि स्वाभाविकपणेच हालचालीचा संबंध स्थूल वस्तूशी आहे अशी आपली कल्पना होते. परंतु खरे बोलायचे तर सर्व शक्ती ही सूक्ष्मातच आहे.
सूक्ष्मातील गती आपल्याला दिसत नाही. कदाचित याचे कारण असे असू शकेल की ही गती इतकी द्रुत असते की ती आपल्या डोळ्यांना दिसत नाही. परंतु एखाद्या शास्त्रीय संशोधनाद्वारा या सूक्ष्म शक्तींचा जर आपल्याला परिचय झाला, तर ही शक्ती सर्व अभिव्यक्तीचे कारण असल्यामुळे सर्व व्यक्त विश्व आपल्या नियंत्रणाखाली येईल.
तलावाच्या तळापासून एक लहानसा बुडबुडा वर येतो तो वर येत असताना आपल्याला दिसत नाही. तो जेव्हा पृष्ठभागावर येऊन फुटतो तेव्हाच तो आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे विचार बहुतांशी विकसित झाल्यावर किंवा त्यांचे कृतीत रूपांतर झाल्यावरच ते आपल्याला कळतात.
आपण नेहमी अशी तक्रार करतो की आपल्या कृतीवर आपला ताबा राहत नाही, विचारावरही ताबा राहत नाही. पण तो राहणार कसा? जर सूक्ष्म गतीचे, हालचालीचे आपल्याला नियंत्रण करता आले, विचाराच्या मुळाशी जाऊन, विचार विकसित होण्यापूर्वी किंवा त्याचे कृतीत रूपान्तर होण्यापूर्वी जर आपण तो नियंत्रित करू शकलो तरच या सर्वांवर आपण ताबा मिळवू शकू.
ज्या पद्धतीने या सूक्ष्म गतीचे आपल्याला पृथक्करण करता येईल. संशोधन करता येईल, त्या समजून घेता येतील व त्यावर ताबा ठेवता येईल अशी एखादी पद्धती जर आपल्याला उपलब्ध झाली तर या सूक्ष्म शक्तींवर, या सूक्ष्म कारणांवर विजय मिळवून आपणा स्वत:वर नियंत्रण ठेवणे आपल्याला शक्य होईल आणि ज्या माणसाचा स्वत:च्या मनावर पूर्ण ताबा असतो त्याच्या निश्चितच इतरांच्या मनावर ताबा राहू शकतो.
यामुळे पावित्र्य व नितिमत्ता ही सर्वदा धर्मांची उद्दिष्टे मानली गेली आहेत. शुद्ध अंत:करणाचा व सदाचारी मनुष्य स्वत:वर ताबा ठेवीत असतो. सर्वांची मने सारखीच असतात, कारण ती एकाच विश्वमनाचे भाग आहेत. मातीच्या एक ढेकळाचे स्वरूप ज्याने जाणले त्याने विश्वातील सर्व मातीचे स्वरूप ओळखले.
जो स्वत:चे मन ओळखतो व ते ताब्यात ठेवतो त्यालाच प्रत्येक मनाचे रहस्य समजते, आणि त्यालाच प्रत्येक मनावर ताबा मिळवता येतो. या सूक्ष्म कारणांवर जर आपण ताबा मिळविला, तर आपली कितीतरी भौतिक दु:खे दूर होऊ शकतील. या सूक्ष्म गतींवर जर आपण प्रभुत्व मिळविले तर आपली कितीतरी काळजी दूर होईल.
तसेच या सूक्ष्म शक्तीचे जर आपण नियंत्रण करू शकलो, तर कितीतरी प्रकारचे अपयश आपल्याला टाळता येईल. ही आहे सूक्ष्मावर ताबा मिळवण्याची उपयुक्तता. पण याहीपेक्षा त्याचा अधिक उच्च असा दुसरा हेतू आहे.
– स्वामी विवेकानंद
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.