ग्रामीण भागात कसा सुरू करता येईल पर्यटन व्यवसाय


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


बेरोजगारी वाढली आहे, तरुणांना काम नाही ही ओरड खरी असली तरीही ‘ईच्छा तेथे मार्ग’ हेही तेवढंच खरं आहे. आज झोमॅटो, अ‍ॅमेझॉनमध्ये पुष्कळ तरुण डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत आहेत आणि बर्‍यापैकी पैसे कमावत आहेत, हे ताजे उदाहरण आहे.

मोठ्या शहरांमध्येच संधी आहेत आणि ग्रामीण निमशहरी भागात संधी नाहीत, हे म्हणणे ही तितकेसे बरोबर नाही. मी इथे तुमच्यासोबत एका खेड्यातल्या तरुणाशी झालेला संवाद, त्याने हेरलेली उद्योगसंधी, संधीचे केलेले सोने याबद्दल सांगणार आहे.

खाजगी कंपनीत नोकरीत असताना आणि करीत असल्याने देशविदेश फिरलो, पण पर्यटन (यात्रा, सोशल टुरीझम किंवा फॅमिलीसोबत प्रेक्षणीय स्थळे पाहणे) करू शकलो नाही. एखाद्याला हे कारण सांगतोय, असे वाटणे साहजिक आहे, पण खाजगी क्षेत्रात जबाबदारीच्या पोस्टवर काम करणार्‍या लोकांना ही गोष्ट कळू शकेल.

कारण कुटुंबासोबत सिमल्याला जाऊन तासन् तास ग्राहकांचे कॉल्स् अटेंड करायचे किंवा हॉटेलमध्ये बसून लॅपटॉपवर काम करत बसायचे, ई-मेल्सना उत्तरे देत बसायची, ही काय मजा आहे का? पण हीच वस्तुस्थिती आहे.

तुम्ही जर सहलीला, यात्रेला किंवा निसर्गरम्य ठिकाणी फिरायला गेला असाल तर तुम्ही त्या वातावरणाशी तन व मन दोन्हींनी जोडले गेलात तरच मजा आहे, नाही तर ‘आहे उपचारा पुरता’ अशी अवस्था होते आणि तुम्ही तुमच्या कुटुंबाचासुद्धा हिरमोडच करता.

केदारनाथ व बद्रीनाथ

काही दिवसांपूर्वी बद्रीनाथ-केदारनाथ यात्रा करून आलो. या यात्रेदरम्यान एका मुक्कामात एका दिव्यांग तरुणाची भेट झाली. ३२-३३ वय असेल. पोलीओमुळे तो थोडा लंगडत होता. अशा अवस्थेतही तो केदारनाथसारख्या अवघड यात्रेला आल्याचे पाहून मला थोडे आश्चर्य वाटले म्हणून मी त्याला विचारले तर तो म्हणाला, हे माझं पाचवे वर्ष आहे.

  • मी आश्चर्याने म्हणालो – काय पाचवे?
  • तो म्हणाला – हो, मी लोकांना यात्रेसाठी घेऊन येत असतो.
  • मला वाटले की हा चौधरी, केसरी, वीना वर्ल्डसारख्या टुरीस्ट कंपनीत टूर ऑपरेटर असावा, म्हणून विचारले, कुठल्या कंपनीकडून टूर ऑपरेट करता?
  • तो हसला आणि म्हणाला, हा माझा व्यवसाय आहे. मी बस करून लोकांना यात्रेसाठी घेऊन येत असतो. ‘तिरूपती यात्रा कंपनी’ या नावाने आमच्या गावाकडे मी हा व्यवसाय चालवतो. येत्या जुलैमध्ये लोकांना अमरनाथला घेऊन जाणार आहे.

आम्ही लहान असताना खेड्यात गावाकडे, तालुक्यातील लोक एक बस करून तिरूपती यात्रा करत असत. १९७२-७३ साली ९५ रुपयांत तिरूपती बालाजी यात्रा असे पॅम्प्लेट वाचायला मिळत. यात्रा अरेंज करणारी व्यक्ती आजूबाजूच्या चार गावात फिरून लोकांना माहिती देत आणि तिरुपती बालाजीची यात्रा घडवून आणत असत.

माझी उत्सुकता वाढली. शहरात बर्‍याच यात्रा कंपन्या असतात आणि गेल्या काही वर्षांपासून या कंपन्यांचा व्यवसायपण चांगला चालला आहे, त्या तुलनेत ग्रामीण भागातील तरुण हा व्यवसाय कसा करतो, हे मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

तुम्ही नोकरी वगैरे शोधण्याचा, करण्याचा प्रयत्न का केला नाही, की तुम्हाला व्यवसायच करायचा होता?

सुखाची नोकरी करावी, ‘दिन जाव पैसा आव’ हे सगळ्यांना आवडतं.चांगले वाटते. मलाही वाटायचे की आपणपण नोकरी करावी, पण माझ्या अशा अवस्थेकडे, माझ्या शिक्षणाकडे बघून मला फारफार तर एखाद्या संस्थेत चपराशाची नोकरी मिळाली असती.

शिवाय नोकरीसाठी वशीला लावा, भरमसाठ पैसे द्या, पुन्हा अनुदान मिळेपर्यंत फुकट नोकरी करा, तशी आपली आर्थिक स्थिती नव्हती. दुसरे नोकरीत लोक लंगडा-लंगडा म्हणून हेटाळणी करतात हो! सहानुभूती व हेटाळणी हे दोन्ही मला नको होते. म्हणून काही तरी लहानमोठा धंदा करावा असेच माझ्या मनात होते. परंतु थेट यात्रा कंपनीच सुरू करावी, असे तुम्हाला का वाटले असे मी त्याला विचारले.

त्यावर तो म्हणाला, ग्रामीण भागात धंदा म्हटले की किराणा दुकान किंवा आटा चक्की असे व्यवसायच डोळ्यांसमोर येतात, पण या व्यवसायांनाही भांडवल लागते. आपल्याकडे भांडवल नव्हते. ते घरातून घ्यावे अशी घरचीही परिस्थिती नव्हती. त्यामुळे मला धंदाच करायचा होता आणि तोही बिनाभांडवली.

मग हाच धंदा तुम्हाला कसा काय सुचला?

हा धंदा काही सुचला वगैरे नाही, पण कमीशन बेसीसचा, कमी भांडवली किंवा बिनाभांडवलाच्या धंद्याचा शोध अहोरात्र सुरू होता. नशीब म्हणतात ना साहेब, ते असतं बरं का! तुमची ईच्छाशक्ती तीव्र असेल तर दैवही तुमची मदत नक्कीच करते. अगदी तसेच झाले. माझा दूरचा एक पाहुणा पुण्यात एका ट्रॅव्हल कंपनीत टूर ऑपरेटर म्हणून काम करत होता.

तो एकदा मला म्हणाला, चल तुला तिरूपती, श्री शैल्यम् दाखवून आणतो. माझ्याकडे पैसेही नव्हते आणि रिकाम्या खिशाने उगाचच काय देव देव करायचे. तर तो म्हणाला की एक पैसा देऊ नकोस, खायची-प्यायचीही काळजी करू नकोस. मी त्याच्यासोबत गेलो. दहा दिवस यात्रेत त्याने मला हरकाम्या म्हणून वापरले. ऐनवेळी त्याच्या साहाय्यकाने दांडी मारली होती त्यामुळे माझी वर्णी लागली होती.

दहा दिवसात यात्रेचे टप्पे, लॉज, धर्मशाळा, त्यांचे बुकींग, रेट वगैरे सगळी माहिती घेतली. बसच्या ड्रायव्हरशी मैत्री करून बसभाडे वगैरेची माहिती घेतली. तिथल्या लोकांचे नंबर घेतले. परत आल्यावर शांतपणे बसून गणित मांडले आणि मला लक्षात आले की हा धंदा आपण करू शकतो.

तुम्हाला यात्रेसाठी ग्राहत कसे भेटले?

तिरुमाला तिरूपती मंदिर

सुरुवातीला छोट्या छोट्या अडचणी आल्या, पण आयुष्यात सगळंच सोपे नसते. मी गावोगावी फिरून लोकांना भेटलो, त्यांच्याशी बोललो. एक नवीन युक्ती केली. यात्रेत स्वंयपाकपाणी यात्रेला आलेल्या बायकांनी आळीपाळीने करावा, यात्रेचा भाड्यात माणसी २०० सूट. ग्रामीण भागात २०० ही मोठी रक्कम असते. एका आठवड्यात माझी ५६ सीट्सची बस पूर्ण भरली. पैसे गोळा केले. बस बुक केली. बसच्या मालकाला विनंती करून मागच्या खेपेला मैत्री झालेला ड्रायव्हर मागून घेतला.

अनुभवी माणूस सोबत असलेला बरा! काही कमी जास्त झाले तर त्याची ओळख कामी येते. त्याने चांगले सहकार्य केले. वेगवेगळ्या लोकांशी ओळख करून दिली. आपला माणूस आहे मदत करीत जा असा शब्द टाकला. तिरुपतीकृपेने यात्रा निर्विघ्नपणे पार पडली. पहिल्या यात्रेत दहा हजार रुपये सुटले. बालाजी पावला म्हणून नाव ठेवले ‘तिरूपती यात्रा कंपनी’.

हा व्यवसाय कसा वाढवला? ग्राहक कसे वाढवले? कसे टिकवले? पूर्ण वेळ व्यवसाय केला का?

पहिल्या ट्रीपनंतर त्या वर्षी आणखी दोन ट्रीप केल्या. आमचे भाडे इतरांपेक्षा कमीच होते. छोट्या छोट्या सुधारणा केल्या. इतर कंपन्या यात्रेत सकाळी चहा-नाश्ता व रात्री जेवण देतात. बाकी काही हवे असेल तर तुमचे तुम्ही करायचे. बर्‍याच लोकांना संध्याकाळी ४-५ वाजता चहा लागतो, इतर कंपन्या देत नाहीत. आम्ही तो देतो. लोकांना बरे वाटते.

अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपले नाव होते आणि ग्राहक जोडले जातात, वाढतात. या तिन्ही टूर दसर्‍याच्या अगोदर केल्या. दिवाळीच्या महिनाभर आधी मी बसने भीमाशंकर ते काशी विश्वनाथ व्हाया अयोध्या अशा सात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन आलो आणि मग त्या टूरचे प्लानिंग केले.

दिवाळीनंतर ५६ सीटर बस घेऊन सात ज्योतिर्लिंगाची पंधरा दिवसांची यात्रा केली. उत्तर भारताची यात्रा अवघड असते. रस्ते खराब, गुंडगिरी, रात्रीचा प्रवास करता येत नाही, पोलीस, हप्ते वगैरे प्रकार दक्षिण भारतापेक्षा जास्त आहेत. पैसे जास्त खर्चावे लागले, पण चांगले शिकायला मिळाले. दुसर्‍यांदा काहीच अडचण आली नाही.

त्यानंतर मी अष्टविनायक दर्शन करून आलो. अनुभव घेतला. अशा प्रकारे अष्टविनायक यात्रा सुरू केली. पुढे एकट्याने दुसर्‍या यात्रा कंपनीमधून यात्रा करून अमरनाथ, जगन्नाथ पुरी, बद्रीनाथ केदारनाथ यात्रा केल्या, अनुभव घेतला. या यात्रा ग्रामीण व निमशहरी भागातील लोकांना कशा परवडतील अशा दरांचे गणित केले, माझा नफा कमी ठेवला आणि आता आम्ही दरवर्षी या सगळ्या यात्रा करतो.

धंद्यात एखादा धोका किंवा वाईट अनुभव आला आहे का?

ग्राहक म्हणजे यात्रेकरूंकडून आजपर्यंत वाईट अनुभव आला नाही, कारण यात्रेत मी सगळ्यांना सांगत असतो की पुढचे पंधरा दिवस आपण एक कुटुंब आहोत. त्यामुळे भांड्याला भांडे लागले तर राग मानू नका. आपण घरी जाताना कटू आठवणी घेऊन जायचे नाही. बायकांची किरकोळ भांडणे वगळता आजवरच्या सगळ्या यात्रा छान झाल्यात.

प्रवासात अपघाताचा धोका असतोच. त्यासाठी आम्ही ड्रायव्हरला पूर्ण विश्रांती व चांगली झोप मिळाली आहे ही खात्री करून घेतो. शक्य तो रात्री ८ वाजेनंतर प्रवास करत नाही. एका अमरनाथ यात्रेदरम्यान आमच्या एका यात्रेकरूला देवाज्ञा झाली. अशा वेळी आवश्यक त्या सरकारी गोष्टींची पूर्तता करताना आपला कस लागतो, पैसेही खूप खर्च होतात. जीव मेटाकुटीला येतो, पण व्यवसाय म्हटला की हे सगळे गृहीत धरून चालावे लागते.

साहेब, मी नोकरी केली असती तर जास्तीत जास्त महिना ३० हजार रुपये पगारावर निवृत्त झालो असतो, पण आज मी त्यापेक्षा जास्त पैसे कमावतो. हा धंदा म्हणचे आपला ‘वन मॅन शो’ आहे. शिवाय धंदा सिझनल असल्यामुळे गावात किराणा दुकानही सुरू केले आहे. टूरवर असताना बायको, वडील ते सांभाळतात.

केदारनाथ यात्रेत आंध्र, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू या प्रांतातील लोक ही बसेस बांधून अशा यात्रा करत असलेल्या मी पाहिल्या. मोठा हॉल भाड्याने घेतात, स्वंयपाक करतात, आराम करतात. म्हणून मला वाटते की तरुणांनी हा व्यवसाय नोकरीला हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

एस. पी. नागठाणे
7028963255

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?