Smart Udyojak Billboard Ad

कित्येक महिलांना आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवणार्‍या संगीताताई

अनेकजण बिकट आर्थिक परिस्थितीने गांजलेले असतात. यावर मात कशी करावी यासाठी त्यांना दिशा मिळत नसते. काहीतरी करायला हवे, मार्ग मिळायला हवा असे वाटत असते, पण कधी परिस्थिती तर कधी कमी शिक्षण, अशा अनेक कारणांनी विचार मागे पडतात.

अनेक स्त्रिया या घरच्या जबाबदार्‍या सांभाळून घराला आर्थिक हातभार लावू शकतात, पण सुरुवात कुठून करावी हेच कळत नसते. अशा सगळ्यांसाठी ‘वेदांत आर्ट्स अँड प्रॉडक्शन’च्या संगीता गुरव यांची गोष्ट मार्गदर्शक आणि दिशादर्शक ठरू शकते.

स्वत: सुरुवातीच्या काळात मेणबत्ती बनवून विक्री करत पुढे मेणबत्ती आणि विविध छोट्या घरगुती व्यवसायांचे प्रशिक्षण देत त्यांनी स्वत:ची आर्थिक, सामाजिक परिस्थिती बदलली. आपल्यासारख्या हलाखीची परिस्थिती असणार्‍या अनेक महिलांना स्वत:च्या पायावर उभे करणार्‍या संगीता गुरव यांचा व्यावसायिक प्रवास अनेक महिलांसाठी प्रेरणादायक आहे.

त्यांच्या कार्याचा गौरव दीडशेहून अधिक राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थांनी विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करून केला आहे. मुंबईजवळच्या बदलापूर या उपनगरात राहणार्‍या संगीताताई मूळच्या सातारा जिल्ह्यातल्या. लग्नानंतर उल्हासनगरला आल्या.

ते १९८० चे दशक होते. त्यांचे पती कृष्णदेव हे रेल्वेत नोकरीला होते. त्याकाळी सरकारी कर्मचार्‍यांना पगार फार कमी असे. त्यामुळे पगारातील बराचसा भाग घरभाडे देण्यातच जात असे. गरजा पुढे वाढत जाणार यावर कशी मात करावी याचा त्या सतत विचार करत.

केवळ विचार करून काही उपयोग नाही तर कृती महत्त्वाची हेही त्यांना ठाऊक होते. त्यांच्या पतीनी त्यांना प्रोत्साहन दिले आणि त्याकाळी मेणबत्ती उत्पादनाचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. इथूनच त्यांचा प्रवास सुरू झाला आणि मेणबती उत्पादन करता करता त्या प्रशिक्षक झाल्या.

sangeeta gurav badlapur
महिलांना मेणबत्ती बनवण्याचे प्रशिक्षण देताना संगीताताई

स्वत: मेणबत्ती बनवताना त्यांनी अनेक प्रयोग केले. अनेक प्रकार विकसित केले. लोडशेडींगच्या काळात त्यांच्या मेणबत्त्यांना खूप मागणी होती. यासोबत अनेक प्रकारच्या, आकाराच्या रंगीत मेणबत्त्या त्या बनवू लागल्या. त्यांच्या मेणबत्त्यांची गुणवत्ता इतरांपेक्षा सरस असे. जास्त काळ मेणबत्ती कशी जळत राहील यावर त्यांनी काम केले. त्यामुळे त्यांच्या मेणबत्त्यांना नेहमीच चांगली मागणी असे.

या प्रवासादरम्यान काही महिला आणि बचतगटांनी त्यांना मेणबत्ती प्रशिक्षण देण्याची विचारणा केली. इथूनच त्यांची प्रशिक्षक म्हणून सुरुवात झाली. मग त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. त्यांना ‘नाबार्ड’नेही मेणबत्ती प्रशिक्षण वर्ग घेण्याचे निमंत्रण दिले.

संगीताताईंनी अशी निमंत्रणे स्वीकारली आणि धडाडीने निरनिराळ्या ठिकाणी मेणबत्ती प्रशिक्षणाचे वर्ग घेतले. आपल्या वर्गात त्या मेणबत्त्या बनवून दाखवतात. त्यामुळे खरे प्रात्यक्षिक बघायला मिळते.

या प्रवासातील अनुभव प्रेरक आहेत. ठाणे जिल्ह्यातील वाडा या दुर्गम भागातील आदिवासी महिलांना प्रशिक्षणासोबत योग्य मार्गदर्शन करून व्यवसायवाढीसाठी त्यांनी मदत केली. कधी गावची वेसही ओलांडली नसलेल्या या महिला संगीताताईच्या संपर्कात आल्यानंतर पूर्ण बदलल्या.

त्यांची आर्थिक परिस्थिती बदलली.व्यवसायातून पैसा उभा करून मिळणारे सरकारी लाभ घेऊन आपला व्यवसाय अजून वाढवला. मेणबत्तीसोबत कॅटरिंग आणि मंडप डेकोरेशनचे साहित्य भाड्याने देऊन व्यवसायात यश मिळवले. या महिला आर्थिक, सामाजिक, मानसिक आघाड्यांवर सक्षम झाल्या आणि त्या महिला आपल्या कामानेच चक्क ‘मलेशिया’वारी करून आल्या.

कचरा वेचणार्‍या काही महिलांना या कामातून बाहेर पडत अजून चांगले उत्पन्न कसे मिळवायचे याविषयी मार्गदर्शन करताना अनेक संकल्पना सुचवल्या. त्यातीलच एक म्हणजे नोकरदार महिलेची रोजची कसरत असते वेळा सांभाळण्याची. त्यामुळे तिला स्वयंपाकघरातील छोट्या-छोट्या गोष्टीत मदत मिळाली तर तिचा फायदा होईल.

यातूनच निवडलेल्या भाज्या, दळलेली पीठे हे जर तिला उपलब्ध करून देता आले, तर तुमचा आर्थिक फायदा आणि त्यांनाही मदत होईल, हे पटवून दिले. त्यांनीही ही संकल्पना राबवली आणि स्वत:साठी उत्पन्नाचे साधन तयार केले. पैसा, मानसन्मान आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळाली.

एक जोडपे कणकवलीहून संगीताताईंकडे मेणबत्ती प्रशिक्षण घेण्यासाठी आले. मुंबईसारख्या महानगरात येऊन तिथे हॉटेलला उतरून मग प्रशिक्षण पूर्ण करण्याचा त्यांचा कार्यक्रम होता, पण ताईंनी त्यांची परिस्थिती समजून घेतली आणि स्वत:च्या घरीच त्यांची उतरण्याची व्यवस्था केली. त्यांचे आदरतिथ्य केले आणि केवळ प्रशिक्षण खर्च घेतला. आज हे कुटुंब चांगला व्यवसाय करत आहे.

काही सहकारी बँकांनीही आपल्या बचतगट आणि महिला ग्राहकांसाठी त्यांचे प्रशिक्षण आयोजित केले आहे. आजपर्यंत त्यांनी हजारो महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना एक नवा मार्ग दाखवलाय. कणकवली, सावंतवाडीपासून पुणे, कोल्हापूर, गडचिरोलीपर्यंत त्यांचे मेणबत्ती प्रशिक्षण वर्ग झाले आहेत.

sangeeta gurav candle making training

आपल्याकडचे साहित्य देऊन अनेकींना त्यांचा व्यवसाय सुरू करायला प्रोत्साहित करतात. अंध आणि अपंग व्यक्तींना मोफत प्रशिक्षण देतात. स्वत:ची जागा घेऊन त्या ठिकाणी प्रशिक्षण संस्था उभी करणे आणि महिलांना त्याचा फायदा मिळवून देणे हे त्यांचे ध्येय आहे.

मेणबत्ती व्यवसायाशिवाय अजून काय करता येईल याचा त्यांनी अभ्यास केला. आज मेणबत्ती व्यवसाय प्रशिक्षण, पिशव्या बनवणे, फिनाइल बनवणे, परफ्यूम बनवणे, चॉकलेट बनवणे अशा प्रकारच्या उद्योगांचे प्रशिक्षणही त्या महिलांना देतात.

कमी खर्चात हे शिकून आपले उत्पन्न आपण सुरू करू शकतो. अनेक विद्यार्थ्यांना बिकट परिस्थितीने शिक्षणात किंवा इतर ठिकाणी ओढाताण सहन करावी लागते. अशा विद्यार्थ्यांनी जर हे शिकून घेतले तर त्यांना फायदा होईल.

होम डेकोर, गिफ्टींग यासाठी या अशा सेंटेड आणि आकर्षक मेणबत्त्यांना खूप मागणी आहे. केवळ विद्यार्थीच नव्हे तर कोणीही हे शिकून सुरुवात करू शकते. एकट्याने शिका किंवा ग्रुपने यासाठी प्रशिक्षणाची आवड असलेल्या संगीताताई तुम्हाला नक्की मदत करतील.

संगीता गुरव : 9561606609

Author

  • pratibha shailesh rajput

    यांनी पदव्युत्तर पत्रकारितेत पदविका केली आहे. प्रिंट माध्यमांत काही काळ काम केल्यानंतर त्यांनी स्मार्ट उद्योजक हे मासिक सुरू केले.

    View all posts

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

तुम्ही उद्योजक / व्यापारी / व्यावसायिक आहात आणि तुमचीही बिझनेस प्रोफाइल या पोर्टलवर प्रसिद्ध करायची आहे? तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error: Content is protected !!
Scroll to Top