कचरा पेरून १८९ एकर रेताड जमिनीवर नंदनवन फुलवणारा उद्योजक


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


कचरा ही आज शहरांची मोठी समस्या झाली आहे. डंपिंग ग्राउंड कचर्‍याने ओसंडून भरले आहेत आणि या समस्येवर सरकार आणि प्रशासन या दोन्हींमध्ये ठोस समाधान नाही आहे. पण याच समस्येला संधीमध्ये रुपांतरीत करणारा एक उद्योजक मुंबई महानगरीत आहे. त्याचे नाव संजय भायदे.

संजय भायदे हे गेली २८ वर्षे गांडूळ खत निर्मिती, सेंद्रिय शेती आणि घनकचरा व्यवस्थापन या क्षेत्रात कार्यरत आहेत. मुंबईमध्ये समुद्राला लागून असलेल्या अक्सा या गावाजवळ १८९ एकरात फुलवलेले नंदनवन हे महाराष्ट्रासह संपूर्ण देशासाठी एक रोल मॉडेल ठरू शकेल असा प्रकल्प आहे.

संजय हे मूळचे रसासन शास्त्रातील संशोधक. मुंबईमध्ये युडीसीटी कॉलेजमधून केमिकल टेक्नॉलॉजी क्षेत्रात त्यांनी एम.एस्सी. बाय रिसर्च केलं. हृदविकारावर औषधांवर त्यांनी संशोधन केलं होतं. पण ते करताना त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की विदेशी फार्मा कंपन्या कोणतेही स्वस्तातले औषध बाजारात येऊ देणार नाहीत.

त्यानंतर भायदे यांनी आपला मोर्चा शेतीकडे वळवला. कारण ते वर्ष होतं १९९१. तेव्हा जगाला रासायनिक शेतीचे जे तोटे आहेत, ते दिसू लागले होते. मोठमोठी शेतजमिनी ओसाड होताना दिसत होत्या. संजय यांनी जगभरात जी नैसर्गिक किंवा सेंद्रिय शेती केली जाते, त्यावर त्यांनी संशोधन करायला सुरुवात केली. त्यांनी आपलं करिअर सेंद्रिय शेतीमध्ये करण्याचा निर्णय घेतला.

मासानोबू फुकुओका या एका जपानी शेतकर्‍याने लिहिलेल्या मवन स्ट्रॉ रेवॉल्युशनफ या एका पुस्तकाने जगभरातील कृषी क्षेत्रात मोठी क्रांती आणली होती. १९९१ साली संजय यांच्या वाचनात हे पुस्तक आले आणि या पुस्तकाने प्रभावित होऊन संजय यांनी नैसर्गिक शेती या क्षेत्रातच करियर करण्याचे ठरवले.

व्यवसायाची सुरुवात त्यांनी गांडूळ खतापासून केली. संपूर्ण महाराष्ट्रभरात गावागावात जाऊन ते शेतकर्‍यांना भेटायचे. त्यांना मार्गदर्शन करायचे. त्यांना रासायनिक खतांमुळे होणारे नुकसान आणि सेंद्रिय शेतीचे लाभ समजावून द्यायचे. त्याला त्याच्याकडे असलेल्या कचर्‍यापासूनच खत बनवण्याचे छोटे छोटे प्रोजेक्ट ते सुरू करून द्यायचे. महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यांमध्ये संजय भायदे यांनी गांडूळ खताचे प्रकल्प सुरू केले होते.

२००१ साली मुंबईतील समुद्राला लागून असलेल्या अक्सा या गावातल्या लोकांनी संजय भायदे यांना त्यांच्या शेतातली एक समस्या सांगितली. गावाकडे १८९ एकर जमीन होती, पण समुद्राच्या पाण्याने तिची सुपीकता गेली होती आणि ही जमीन बाजूच्या रस्त्यापासून तीन ते चार फूट खोल असल्यामुळे पावसात यामध्ये पाणी साठत होतं.

कचर्‍याची भरणी घालून त्यामध्ये खत आणि माती करण्याची गरज होती. भायदे आणि गावकर्‍यांनी मुंबई महापालिकेकडे त्या जागेत कचरा टाकण्याची मागणी केली. पालिकेने त्यांच्याकडून ट्रान्सपोर्टच्या खर्चासाठी २० लाख रुपयांची मागणी केली. शंभर उंबर्‍याचे छोटे गाव त्यांना कचर्‍यासाठी इतके पैसे देणे शक्यच नव्हते. यावर महापालिकेशी वाटाघाटी करत करत पालिका अवघ्या ३६५ रुपयांत कचरा तिथपर्यंत ट्रान्सपोर्ट करायला तयार झाली.

भायदे यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू झालं. जिथे गवताची एक काडीपण उगत नव्हती अशा जागी पहिल्या पावसातच थोडी थोडी हिरवळ दिसू लागली. गावकर्‍यांनाही हे पाहून हुरूप आला. २००१ पासून २०१२ पर्यंत हे काम सुरू राहील. ५ लाख ट्रकलोड इतका कचरा महापालिकेने इथे टाकला. पालिकेच्या नोंदींप्रमाणे एकूण २ लाख ३२ हजार मेट्रिक टन कचरा त्या ठिकाणी टाकला गेला.

या कचर्‍यापासून तयार केलेली ही जमीन सुपीक झाली. आता या जमिनीवर पल बोरं, लिंबं, पपई, सुपारी, नारळ यांच्या बागा डोलत आहेत. या जागेमध्ये रेन वॉटर हार्व्हेस्टिंग करून तीन पाण्याची तळी निर्माण केली आहेत.

संजय भायदे यांनी निस्वार्थ भावनेने आक्सा गावात १८९ एकर ओसाड जमिनीवर नंदनवन फुलवले. हे सामाजिक भावनेतून केलेले काम असले तरी संजय यांच्या करियरमध्ये हा प्रकल्प एक मैलाचा दगड ठरला.

पुढे २०१८ साली मुंबई महापालिकेने मोठ्या गृहनिर्माण संस्थांना आपल्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी सोपवली. कारण मुंबईतील एकूण पाच डंपिंग ग्राउंडपैकी चार बंद झाले आहेत. आता संजय यांनी घनकचरा व्यवस्थापन सुरू केले.

गावकर्‍यांनी संजयना १० एकर जमीन दिली आहे. त्यावर ते शहरातला कचरा गोळा करून आणतात आणि त्यापासून गांडूळ खत तयार करून पुन्हा त्याच सोसायट्यांना देतात. आठ सोसायट्यांपासून सर्वात करत आज ८९ सोसायट्यांमधून वर्षाचे ३६५ दिवस ते कचरा गोळा करतात.

कचरा गोळा करणारे, त्यावर प्रक्रिया करणारे मजूर आणि कार्यालयीन कर्मचारी असे एकूण २५ जण संजय भायदे यांच्या मसजीव कृषीफमध्ये नोकरी करतात.

मधल्या काळात पार्टनरशिपमध्ये व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न त्यांनी केला, पण त्यात त्यांना कटू अनुभव आले. मेहनतीच्या बळावर त्यात झालेल्या नुकसानातूनही ते बाहेर आले. जीवनाच्या कठीण काळात आपल्या पत्नीने दिलेली साथ आणि कुटुंबाचे पाठबळ हीच ते आपली शक्ती मानतात.

संपर्क : संजय भायदे – 9322532668

Author

  • शैलेश राजपूत

    शैलेश राजपूत हे 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे संपादक आहेत. पत्रकारितेचं शिक्षण झाल्यावर त्यांनी २००७ साली पत्रकारिता क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. २०१० साली त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला.

    व्यवसाय करताना त्यांना ज्या अडचणींना सामना करावा लागला त्याच अडचणी पहिल्या पिढीतील प्रत्येक मराठी उद्योजकाला येत असणार असा विचार करून यावर उपाय म्हणून त्यांनी २०१४ साली उद्योजक.ऑर्ग हे वेबपोर्टल सुरू केले व २०१५ साली स्मार्ट उद्योजक मासिक सुरू केले.

    संपर्क : ९७७३३०१२९२

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?