Advertisement
उद्योग कथा

देशात स्केटिंगचा प्रसार करण्यासाठी कष्ट घेत आहे हा उद्योजक

फक्त रु. ५०० मध्ये 'स्मार्ट उद्योजक' प्रिंट मासिक घरपोच मिळवा.

Book Now: https://imjo.in/Xx7Uq6

Print this Page

नुकतीच एशियन गेम्सची सांगता झाली. त्यात भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. यंदाच्या एशियन गेम्समध्ये स्केटींग या क्रीडा प्रकाराचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला होता. हा क्रीडाप्रकार तुलनेने नवा असल्याने त्यात पदके मिळण्याची संधीही जास्त आहे. स्पोर्ट्समध्ये करिअर करण्याची स्वप्ने बघणाऱ्यांसाठी स्केटींग हा तुलनेने कमी स्पर्धा असलेला गेम आता उपलब्ध झाला आहे. ठाण्याच्या युनिव्हर्सल स्केटींग अॅकॅडमीचे संचालक संकेत काशीकर सामान्य माणसांना अद्याप अपरिचित असलेल्या या क्रीडाप्रकाराचा प्रचार-प्रसार करीत आहेत. स्केटींगचे प्रशिक्षण घेऊन उज्ज्वल करिअर घडवता येऊ शकते. संकेत काशीकर नवेदित क्रीडापटुंना या संबंधीचे सर्व मार्गदर्शन आणि प्रशिक्षण पुरवतात. व्यवसायाने बिल्डर असलेले संकेत काशीकर या गेमवरील आवडीपोटीच युनिव्हर्सल स्केटींग अॅकेडमी चालवतात.

संकेत काशीकर

संकेत काशीकर यांचे माध्यमिक शिक्षण ठाण्याच्या ए.के. जोशी स्कूलमध्ये झाले. त्यांचे बंधू स्वप्निल हे नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये शिकत होते. तिथे स्केटींगसह अनेक मैदानी खेळ खेळण्याची सोय होती. त्यांना नेहमी भेटायला जात असल्यामुळे संकेत यांना स्केटींगची माहिती समजली व त्यात विशेष रुची उत्पन्न झाली. ठाण्यात स्केटींग शिकण्याची सोय सेंट जॉन बाप्टीस्ट स्कूलमध्ये होती. तिथे संकेत काशीकर यांनी सहावीत असल्यापासून स्केटींगचे धडे घेण्यास सुरूवात केली. या खेळातील गती, स्पीड, स्वत:वर नियंत्रण ठेवण्याचे कसब या गोष्टी त्यांना फार आवडल्या. या क्षेत्रातील मास्टर गणेश राव सर यांच्याकडून त्यांना मार्गदर्शन लाभले. स्केटींगमधील सेमी अॅडव्हान्सड व अॅडव्हान्सड हे कोर्सेसही त्यांनी केले. गणेश राव सरांच्या मार्गदर्शनाखाली ते ठाणे जिल्हा व राज्यस्तरावरील खेळाडू आणि ओपन नॅशनल प्लेअर बनले.

शालेय शिक्षणानंतर त्यांनी सिव्हील इंजिनिअरींगमध्ये डिप्लोमा व नंतर बी.ई. ही डिग्री घेतली. पुढे दोन वर्षे नोकरी केली, पण या कालखंडातही ते सतत युटयूब, इंटरनेटवर स्केटींगचे व्हिडीओ बघत. त्यांना स्केटींगचा निरंतर ध्यास लागलेला असायचा.

पुढे ते वडिलांच्या ‘सिद्धीविनायक डेव्हलपर्स’ या बांधकाम क्षेत्रातील कंपनीत वडिलांना मदत करण्यासाठी जोडले गेले. त्यांचा बिल्डींग डेव्हलपमेंट व कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आजही चालू आहे. तो त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. वसई, बोईसर, येथेे त्यांनी अनेक प्रोजेक्टस् पूर्ण केले आहेत, तर काही प्रगतीपथावर आहेत. पण या सर्व काळात त्यांचे स्केटींगवरील प्रेम कायम होते. कन्स्ट्रक्शन व्यवसाय सांभाळत ते वैयक्तिक पातळीवर नियमिक स्केटींग करीत.


Paytm वापरकर्त्यांसाठी बंपर ऑफर

'स्मार्ट उद्योजक' मासिकाची वार्षिक डिजिटल वर्गणी

Paytm वर मिळवा आता फक्त ₹५० मध्ये.


मात्र स्केटींगशी त्यांचा व्यावसायिक व प्रशिक्षक म्हणून संबंध अचानक एका योगायोगाने आला. त्यांचे भूतपूर्व प्रशिक्षक गणेश राव यांनी त्यांना ठाण्यातील एका छोट्या स्केटींग क्लासमध्ये स्केटींग शिकवण्याची ऑफर दिली. स्केटींगची अत्यंत आवड असल्याने संकेत काशीकर यांनी ती त्वरित स्वीकारली. तो क्लास ठाण्यातील रोनक टॉवर या प्रसिद्ध उच्चभ्रू कॉम्प्लेक्समध्ये होता. तिथे पार्कींगच्या जागेत १५-२० मुलांना ते स्केटींग शिकवू लागले. त्यामागे अर्थार्जन हा हेतू नव्हता. गणेश राव यांची अंधेरीला ज्या नावाने स्केटींग अॅकेडमी आहे त्याच म्हणजे ‘युनिव्हर्सल स्केटींग अॅकेडमी’ या नावाने त्यांनी स्केटींग अध्यापनाची नवी इनिंग सुरू केली. त्यांचे कौशल्य इतके चांगले होते की त्यांच्या क्लासमधील विद्यार्थ्यंची संख्या वाढतच गेली. लवकरच लक्ष्मी नारायण रेसिडेन्सी या शेजारच्या कॉम्प्लेक्समध्येही क्लास सुरू करण्याची त्यांना ऑफर मिळाली. हा वसा पुढे वाढतच गेला. निरनिराळ्या ठिकाणी त्यांचे बेसिक आणि अॅडव्हान्स स्केटींगचे क्लासेस सुरू झाले.

आजच्या घडीला लक्ष्मीनारायण रेसिडेन्सी व कोरम मॉल या दोन ठिकाणी त्यांचे बेसिक आणि अॅडव्हान्स स्केटींगचे क्लासेस चालू आहेत. दोन्हीकडे मिळून चारशे विद्यार्थी त्यांच्याकडे शिकतात. स्केटींग अॅकेडमी हाच आता एक व्यवसाय बनला आहे. त्यांच्या पत्नी किमया याही त्यांना यात मदत करतात. गणेश राव सर यांच्याकडून त्यांना मार्गदर्शन व ऐरोलीच्या एका मोठ्या स्केटींग अॅकेडमीचे संचालक संजय सिंग यांचेकडून मोलाचे सहकार्य लाभते. या दोघांचेही ते आभारी आहेत.

संकेत काशीकर आपला कन्स्ट्रक्शन व्यवसाय सांभाळून युनिव्हर्सल स्केटींग अॅकेडमी चालवतात. त्यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील असंख्य खेळाडू आजवर घडवले आहेत. ते आपल्या विद्यार्थ्यांना निरनिराळ्या स्पर्धांना घेऊन जातात.

स्केटींग हा एक गतीमान क्रीडाप्रकार आहे. स्केटींग म्हणजे पायात चाके असलेले बूट घालून पायांच्या व शरीराच्या हालचालींद्वारे गती मिळवून विनासायास पुढे जाणे. स्केटींगसाठी विशेष ट्रॅक लागतो, पण तो नसला तरी काही अडत नाही. बास्केटबॉलचे मैदान, पार्कींगची जागा व अगदी डांबरी रस्त्यावरही स्केटींग करता येते. परदेशात हा क्रीडाप्रकार फार लोकप्रिय आहे. कॅनडात काही लोक स्केटींग करत आपल्या कामाच्या ठिकाणी जातात. तिथे रस्त्यांच्या कडेला सायकलिंग ट्रॅक असतो. त्यावर स्केटींग करीत ते कामाला जातात. त्यामुळे त्यांचे पेट्रोल वाचते.

‘युनिव्हर्सल स्केटींग अॅकेडमी’त संकेत काशीकर बेसिक आणि अॅ़व्हान्सड स्केटींग शिकवतात.त्यात पुढे आर्टीस्टीक जंप, लुप वगैरे अॅडव्हान्स प्रकारही येतात. संकेत काशीकर यांच्या हाताखाली अनेक इन्स्ट्रक्टर आहेत. तेे स्वत: रोज दोन तास ट्रेनिंगसाठी देतात. त्यांनी अनेक नामवंत खेळाडू घडवले आहेत. साहिल करंडे, सुजल करंडे, अद्वैती घरत यांच्यासारखे राष्ट्रीय स्तरावरील क्रीडापटू त्यांनी घडवले आहेत. भविष्यात राष्ट्रीय स्तरावरचे वरचे वीस व राज्यस्तरावरील शंभर स्केटींगपटू घडवण्याचे त्यांचे स्वप्न आहे. दरवर्षी ते उन्हाळ्यात ते प्रशिक्षण शिबिरे भरवतात. त्यात विविध स्पर्धा घेण्यात येतात.

स्केटींग हा फक्त श्रीमंत मुलांसाठीचा क्रीडाप्रकार नाही. स्वस्त दराचे स्केटींग बूटही उपलब्ध असतात. संकेत काशीकर काही होतकरू गरीब विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण व क्रीडासाहित्यही देतात. त्यांच्यामते मुलांशी, पालकांशी संवाद साधत त्याचे कौशल्य विकसित करावे लागते.

स्केटींग हा फक्त क्रीडाप्रकार नाही तर तो एक संपूर्ण व्यायाम आहे. त्याने शरीरयष्टी बनते. स्केटींग करताना गती मिळवण्यासाठी संपूर्ण शरीराची हालचाल करावी लागते. त्याने सर्वांगाला व्यायाम घडतो. स्केटींगने श्वासावर नियंत्रण येते. रक्ताभिसरण सुधारते. हृदयविकाराची भीती राहत नाही. स्केटींग करणाऱ्याच्या पायाचे स्नायू बळकट होतात. स्केटींगमुळे सोशल स्कील्स वाढतात. स्केटींग करणाऱ्यांचे ग्रुप्स बनतात. त्यातून संवाद वाढतो. सध्याची पिढी कॉम्प्युटर गेम्स व आभासी व्हिडीओ गेम्समध्ये रमली आहे. स्केटींग व इतर कोणताही मैदानी क्रीडाप्रकार त्यांना आभासी विश्वातून बाहेर काढतो. वास्तवावर आणतो. जीवनातील स्पर्धेची जाणीव करून देतो. स्केटींगमध्ये एक थ्रिल आहे. गती आहे. भन्नाटपणा आहे. स्केटींगमध्ये अपघात होतात पण ते टाळण्याचे प्रशिक्षण दिले जाते.

२०१८ पासून स्केटींगचा एशियन क्रीडास्पर्धेत समावेश झाला आहे. भविष्यात ऑलिंपिकमध्ये त्याचा समावेश होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे स्केटींगमध्ये उज्ज्वल भविष्य आहे. संकेत काशीकर म्हणतात की, स्केटींगमध्ये व्यवसायाचीही मोठी संधी दडली आहे. मराठी तरुणांनी तिचा लाभ घेतला पाहिजे. स्केटींग हा एक परिपूर्ण व्यायाम आहे. याचे लाभ जनतेपर्यंत पोहोचावेत अशी त्यांची तळमळ आहे. स्केटींग हा क्रीडाप्रकार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवण्यासाठी संकेत काशीकर प्रयत्नशील आहेत.

Contact: Sanket Kashikar – 9833077854
Email: sanket.kashikar@gmail.com
Website:  www.universalskating.com

FREE NEWSLETTER ON WHATSAPP

व्यवसाय आणि उद्योजकतेविषयी माहिती व घडामोडी आपल्या WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ या क्रमांकावर आपले नाव सध्या राहत असलेला जिल्हा व तालुका WhatsApp करा.

Help-Desk
%d bloggers like this: