Udyojak santosh bachchhav interview about scholarship and navodaya vidyalay exams

स्कॉलरशीप परीक्षा आणि नवोदय विद्यालय यांचं विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत असलेलं योगदान

Udyojak santosh bachchhav interview about scholarship and navodaya vidyalay exams

संतोष बच्छाव हे एक असे तरुण शिक्षक आहेत; ज्यांच्यासाठी शिक्षकी हा फक्त एक पेशा नाही, तर उद्याचे भवितव्य घडणारी कुशाग्र पिढी घडवण्याचं मिशन आहे. आपला क्‍लासेसचा व्यवसाय चालवताना त्यांना मुलांच्या मूलभूत समस्या लक्षात आल्या आणि पुढे त्यांनी त्यावरच काम करण्याचा निर्णय घेतला.

आपली मुलं अभ्यासात कितीही हुशार असली तरी त्यांच्यासमोर आदर्श उभे करून प्रेरीत करण्यात आपण कमी पडतोय, ही बाब त्यांनी ओळखली आणि भविष्यातला एक हुशार, कर्तबगार, यशस्वी नागरीक घडवायचा असेल तर त्याला आतापासूनच मेंटॉरिंग करणं गरजेचं आहे हे त्यांनी मनाशी पक्कं केल. म्हणूनच आज ते स्कॉलरशीप, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा अशा आडवाटेने जाणार्‍या संधी मुलांना प्राप्त करून देण्यासाठी धडपडत आहेत. त्यांची ही धडपड जाणून घेऊ त्यांच्याशी साधलेल्या या संवादात…

गणिताबद्दल बर्‍याच मुलांच्या मनात भीती असते. ती कमी करण्यासाठी तुम्ही कशाप्रकारे प्रयत्न करता?

मुलांचा गणित हा विषय पक्का करण्यासाठी ‘अँजेल मॅथ्स’ हे अ‍ॅप विकसित केलं आहे. या अ‍ॅपवर मोफत सराव परीक्षा उपलब्ध केली आहे. हे अ‍ॅप प्ले-स्टोअरवरून डाउनलोड करून कोणताही विद्यार्थी ही टेस्ट सिरीज मोफत देऊ शकतो.

‘अँजेल मॅथ्स’ हे अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

आम्ही मुलांना रोचक पद्धतीने हसतखेळत गणित शिकवतो. एखादं कठीण गणित आलं की मुलं घाबरतात. ते गणित सोडून देतात. यावर आम्ही एक नवी कन्सेप्ट तयार केली आहे तिला नाव दिलं ‘डब्लू.एल.पी.एम.’ म्हणजे ‘वाट लागली, पण मज्जा आली’.

कठीण गणित बघून भीती वाटणं स्वाभाविक आहे, पण आम्ही मुलांना त्यातलं लॉजिक शिकवतो; ज्यामुळे त्या गणिताची फोड करून ते सोडवल्यावर मुलांना मज्जा येते. मग त्यांना अशी कठीण गणित सोडवण्याचीसुद्धा मज्जा येऊ लागते.

तुम्ही शालेय स्कॉलरशीप परीक्षेच्या संदर्भात काम करताय, तर त्याबद्दल सांगा.

स्कॉलरशीप परीक्षेबद्दल लोकांमध्ये जागरुकता कमी आहे. पण आता एक गोष्ट चांगली झाली आहे की सरकारने जी मुलं ही परीक्षा उत्तीर्ण होऊन स्कॉलरशीप मिळवतात, त्याची रक्कम वाढवली आहे. सुरुवातीला वर्षाला फक्त एक हजार रुपये मिळायचे; ते आता पाचवीत पाच हजार आणि आठवीत साडेसात हजार रुपये मिळतात. यातून मुलांचा शैक्षणिक खर्च निघतो.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही स्कॉलरशीपचा प्रसार कसा करता?

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप आणि नवोदय परीक्षा काय असते याची सविस्तर माहिती करून देण्यासाठी आम्ही आमच्या युट्यूब चॅनेलवर दोन व्हिडिओ बनवले आहेत. या परीक्षांचे फायदे, त्याची प्रक्रिया, त्याची तयारी कशी करायची या सगळ्याची संपूर्ण माहिती मुलांना या व्हिडिओतून मिळते.

स्कॉलरशीप परीक्षेचा मुलांच्या विकासात काय परिणाम होतो?

स्कॉलरशीप परीक्षेमुळे मुलांमध्ये विजुगिशू वृत्ती निर्माण होते. भविष्यात यशस्वी होण्याची पायाभरणी या एका परीक्षेतून येते. ते स्वतःला हुशार समजतात. त्यांची सेल्फ इमेज सुधारते आणि आत्मविश्वास निर्माण होतो. या सगळ्या गुणांचा भविष्यात त्यांना खूप उपयोग होतो.

स्कॉलरशीप परीक्षेला बसल्यामुळे मुलांवर अभ्यासाचं ओझ वाढतं का?

स्कॉलरशीपचा अभ्यासक्रम हा शालेय अभ्यासक्रमावर आधारित आहे. फक्त त्याच्यात प्रश्नांची काठीण्य पातळी थोडी जास्त असते. स्कॉलरशीपच्या अभ्यासामुळे शैक्षणिक गणित व इतर विषय सोपे जातात. पाचवीत स्कॉलरशीप दिली की सहावी, सातवीचे गणित सोपे जाते. आठवीत दिली की नववी, दहावीचा गणिताचा पाया मजबूत होतो.

स्कॉलरशीपमध्ये गणित, बुद्धिमत्ता आणि भाषा असे तीन विषय असतात भविष्यातील अनेक स्पर्धा परीक्षांसाठी या तिन्ही विषयांचा मुलांना उपयोग होतो. स्कॉलरशीप ही फक्त हुशार मुलांसाठीची परीक्षा नाही, तर मुलांना हुशार बनवण्यासाठीची परीक्षा आहे.

सध्या एकूण किती विद्यार्थी या परीक्षेला बसतात आणि किती मुलांना स्कॉलरशीप मिळते?

गेल्या वर्षी ८ लाख ६० हजार मुलांनी परीक्षा दिलेली. त्यापैकी वीस टक्के मुलं उत्तीर्ण झाली आणि ३१ हजार मुलांना स्कॉलरशीप मिळाली.

स्कॉलरशीप परीक्षा उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या एवढी कमी का?

परीक्षेचे फॉर्म उशिरा येतात. ऑक्टोबर महिन्यात फॉर्म येतात तेव्हा मुलं सहामाही परीक्षेत व्यस्त असतात. पुढे दिवाळी येते. त्यामुळे मुलांना तयारी करण्यासाठी वेळ कमी मिळतो. हेच जर का फॉर्म जून, जुलै महिन्यात आले तर पुढे मुलांच्या हातात अभ्यासासाठी आठ ते दहा महिने मिळू शकतील.

स्कॉलरशीप परीक्षांची चांगली तयारी होण्यासाठी पालकांनी मुलं इयत्ता चौथीत असतानाच दिवाळीच्या सुट्टीत त्यांची तयारी सुरू केली पाहिजे. म्हणूनच आम्ही या वर्षीपासून दिवाळी सुट्ट्यामध्ये चौथीची फाउंडेशन बॅच सुरू करत आहोत.

तुम्ही स्कॉलरशीप परीक्षेची तयारी कशी करून घेता?

आम्ही मुलांना ऑनलाइन शिकवतो. त्यामुळे महाराष्ट्रातील कोणत्याही कानाकोपर्‍यातून मुलं आमच्याकडून शिकू शकतात. आठवड्यातून दोन ते तीन वेळा आम्ही लाइव्ह लेक्चर होतात आणि मुलांना त्याचं रेकॉर्डिंगसुद्धा उपलब्ध होतं.

तुमच्याकडे शिकलेल्या मुलांच्या अचिवेमेंट्स काय आहेत?

गेल्या वर्षी मयूर यादव हा पुणे जिल्ह्यातील आमचा विद्यार्थी राज्यभरातून ४ लाख मुलांतून पाचवा आला होता. संगम पाटील हा नाशिकचा विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत पहिला आलेला. आतापर्यंत १४० हून अधिक विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये आली आहेत.

स्कॉलरशीप परीक्षेसाठी तुमची फी किती आहे?

वर्षभराचे आम्ही फक्त साडेतीन हजार रुपये फी घेतो.

‘अँजेल मॅथ्स’ हे अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

तुमची फी इतर क्लासेसच्या तुलनेत खूपच कमी आहे. असं का?

याचं कारण की आम्हाला फक्त पैसे कमवायचे नाहीत, तर भविष्यातली पिढी घडवायची आहे. त्याचमुळे आमचं लक्ष हे ग्रामीण भागाकडे जास्त आहे. ग्रामीण भागात स्कॉलरशीप किंवा नवोदय या परीक्षांचे क्लासेस उपलब्ध नाहीत. पालकांना दूर तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी मुलांना घेऊन जावं लागतं. यामध्ये वेळ आणि पैसा दोन्हींचं नुकसान होतं. शिवाय विद्यार्थाला त्रास होतो.

आता जवाहर नवोदय विद्यालयाबद्दल माहिती सांगा.

जवाहर नवोदय ही भारतातली क्रमांक एक शिक्षणपद्धती आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील हुशार विद्यार्थ्यांनाही मुख्य प्रवाहात आणण्यासाठी १९८६ साली राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी ही शिक्षणपद्धत सुरू केली.

प्रत्येक जिल्ह्यात एक जवाहर नवोदय विद्यालय सुरू केलं. प्रवेश परीक्षा घेऊन फक्त ऐंशी मुलांना दरवर्षी यामध्ये प्रवेश दिला जातो. देशभरात एकूण ६५३ नवोदय विद्यालय आहेत. नंदुरबारसारख्या मागास जिल्ह्यात या शाळांची संख्या एकहून जास्त असते. मुंबईसारख्या मेट्रो शहरांमध्ये या शाळा नसतात.

जवाहर नवोदय विद्यालयाचं वैशिष्ट्य काय असतं?

ही निवासी शाळा असते. पाचवीत प्रवेश परीक्षा देऊन विद्यार्थ्यांने यात प्रवेश मिळवला तर सहावी ते बारावीपर्यंतचं शिक्षण त्याला इथे मोफत मिळतं. राहणं, खाणं, शैक्षणिक साहित्य सर्व काही मोफत असतं. तीस ते पस्तीस एकर परिसरात हे शैक्षणिक संकुल वसलेलं असतं. इथले शिक्षकसुद्धा निवासी असतात. नुसतं शिक्षणच नाही तर मुलांच्या सर्वांगिण विकासावर इथे भर दिला जातो.

देशाच्या प्रशासनातील जवळजवळ तीस ते चाळीस टक्के लोकं नवोदय विद्यालयातून असतात. महाराष्ट्र एमपीएससी परीक्षेचा गेल्या तीन वर्षांचे टॉपर हे नवोदयचे विद्यार्थी आहेत.

जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेचं स्वरूप कसं असतं?

गणित, बुद्धिमत्ता आणि भाषा हे तीन विषय असतात. ८० प्रश्नांची परीक्षा होते. प्रत्येक प्रश्नाला सव्वा गुण दिला जातो म्हणजे १०० गुणांची परीक्षा असते. प्रत्येक जिल्ह्यातून सुमारे १८ ते २० हजार विद्यार्थी परीक्षेला बसतात आणि त्यातले फक्त ८० विद्यार्थी प्रवेशासाठी निवडले जातात.

तुम्ही नवोदय परीक्षेची तयारी करून घेण्याकडे कसे वळलात?

लॉकडाऊनच्या आधी मी अशा क्षेत्रांचा शोध घेत होतो की ज्यामध्ये मला फक्त परीक्षाकेंद्रीत शिक्षण द्यायचं नव्हतं तर मुलांच्या आयुष्याला कलाटणी देईल अशा गोष्टींचा मी शोध घेत होतो तेव्हा मी स्कॉलरशीप आणि जवाहर नवोदय विद्यालय या गोष्टींकडे वळलो.

नवोदयच्या पहिल्या बॅचमध्ये सहा विद्यार्थी होते. त्यातली एक विद्यार्थिनीची निवड झाली. तिच्या घरी वीज नव्हती म्हणून ती कल्याणला शिक्षणासाठी आपल्या मावशीकडे आलेली आणि तिचा नवोदय विद्यालयात प्रवेश झाला. या अनुभवातून मला या विषयाची खोली कळली की एक शिक्षणपद्धती मुलाचं आयुष्य किती बदलू शकते. त्यामुळे मी याकडे अधिक गांभीर्याने वळलो. आतापर्यंत आमच्या पन्नास एक मुलांची नवोदय विद्यालयात निवड झाली आहे.

नवोदयची तयारी कशी करून घेता आणि याची फी किती?

पाचवीच्या विद्यार्थ्यांना आम्हीच एकाच फीमध्ये स्कॉलरशीप आणि जवाहर नवोदय दोन्ही शिकवतो. नवोदयचे वेगळे पैसे आकारत नाही.

याव्यतिरिक्त तुम्ही काय काय शिकवता?

याव्यतिरिक्त मी वैदिक गणित आणि माझी पत्नी अबॅकस शिकवते.

तुमच्या शिकवण्यात काय वैशिष्ट्य आहे, असं तुम्हाला वाटतं?

मुलांना गोष्टी आवडतात. म्हणून आम्ही त्यांना गोष्टीरुपात शिकवतो. त्यांना जो शिक्षक आवडत असेल त्याने शिकवलेलं ते मन लावून शिकतात. ही गोष्ट लक्षात घेऊन त्यांच्याशी मैत्री करून हसतखेळत अगदी सिनेमातले डायलॉग वगैरेंचा वापर करून त्यांच्या मनोविश्‍वात प्रवेश करून आम्ही त्यांना शिकवतो. जेणेकरून त्यांची एन्गेजमेंट वाढते. त्यांना आम्ही वेगवेगळ्या प्रेरणादायी गोष्टी सांगून प्रेरीत करतो.

तुमची भविष्याची योजना काय आहे?

५ हजार मुलांना स्कॉलरशीप मिळवून देणं आणि १ हजार मुलांना नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवून देणं हे माझं स्वप्न आहे. आम्ही प्रशासकीय सेवेसाठी फाउंडेशन कोर्स घेऊन येणार आहोत. त्यासाठीचे सराव वर्ग ऑलरेडी सुरू केले आहेत. याद्वारे मुलांना पाचवीपासून स्पर्धा परीक्षांची तयारी करता येईल.

संपर्क : 93211 77114

‘अँजेल मॅथ्स’ हे अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Author

  • shailesh rajput

    हे 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे संपादक आहेत. पत्रकारितेचं शिक्षण घेऊन २००७ साली पत्रकारिता सुरू केली. त्यानंतर २०१० साली त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय करताना त्यांना ज्या अडचणींना सामना करावा लागला त्याच अडचणी पहिल्या पिढीतील प्रत्येक मराठी उद्योजकाला येत असणार, असा विचार करून यावर उपाय म्हणून २०१५ साली स्मार्ट उद्योजक मासिक सुरू केले.

    संपर्क : ९७७३३०१२९२

    View all posts

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

तुम्ही उद्योजक / व्यापारी / व्यावसायिक आहात आणि तुमचीही बिझनेस प्रोफाइल या पोर्टलवर प्रसिद्ध करायची आहे? तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error: Content is protected !!
Scroll to Top