“‘यू कॅन विन’ हे पुस्तक हातात आलं आणि आयुष्यच बदलून गेलं.” संतोष बच्छाव या तरुण उद्योजकाचे हे उद्गार. सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या संतोष यांचे शिक्षण बीएस्सीपर्यंत झाले आहे. कॉलेजच्या पहिल्या वर्षात चार विषयांत नापास झालो. त्याच वेळी घरची आर्थिक घडी विस्कटली होती.
या सगळ्या मानसिकतेत अचानक ‘यू कॅन विन’ हे पुस्तक हातात आलं आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. चाळीस-पन्नास वेळा त्यांनी या पुस्तकाचे पारायण केलं आणि जोमाने अभ्यासाला लागले. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला कॉलेजमधून पहिले आले.
सात वर्षं अनेक प्रथितयश कंपन्यांत मोठ्या हुद्द्यांवर नोकरी केली; पण नोकरीत मन रमत नव्हतं. स्वतःचा स्वतंत्र काही तरी उद्योग-व्यवसाय करावा हे मनाशी पक्कं होतं, त्यामुळे संधी चालून आली असतानाही सरकारी नोकरी एकदाच नव्हे तर दोन वेळा नाकारली.
आपल्याला जसे मार्गदर्शन, प्रेरणा मिळाली तसे इतरांना मिळावे असे त्यांना वाटले आणि इथूनच सुरू झाला संतोष त्यांच्या एंजल एज्युकेशनचा प्रवास. या काळात इतर दोन ते तीन व्यवसाय करण्याची संधी आली; पण त्यांना ते जमले नाही. गणिताची आवड असल्यामुळे यातच काही करता येईल हे तपासले.
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
(वर्षभर महिन्यातून एकदा डिजिटल मासिक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : फक्त ₹२२२ ➡️ SUBSCRIBE
(यापूर्वी प्रसिद्ध झालेले १००+ अंक ई-मेलवर येतील व दर महिन्यातून एकदा ताजा अंक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)नोकरी सांभाळून आवड म्हणून abacus क्लास घ्यायला सुरुवात केली. या काळात एका शाळेने संपर्क केला. हीच संधी हेरून त्यांनी २०१५ साली व्यवसायाचा श्रीगणेशा केला. Abacus, वैदिक गणित या गोष्टींचा मी अभ्यास केला. गणित हा माझा आवडता विषय.
या काळात एक लक्षात आले की वैदिक गणित ही संकल्पना खूप चांगली आहे पण ते आपल्या शालेय शिक्षणाशी जोडलेले नाही. मग मी एक स्वतंत्र अभ्यासक्रम तयार केला ज्याचा फायदा सुरुवातीलाच जवळपास तीन हजार विद्यार्थ्यांनी घेतला.
मला नेहमी समस्येच्या मुळाशी जाऊन काम करायला आवडते त्यामुळे मी बालमानस शास्त्राचा आणि पालकांचा अभ्यास करायला सुरुवात केली. मुलांचे सर्वांगीण विकास करणारे शिक्षण कुठे मिळते हे शोधले आणि यातून मला नवोदय परीक्षेविषयी माहिती मिळाली. मग यावर मी लक्ष केंद्रित केले. त्यासाठी मुलांना मार्गदर्शन सुरू केले.

हा प्रवास खूपच जोमाने सुरू होता. पाच वर्षांत जवळपास पंधरा हजार मुलांना विविध व्याख्याने, कार्यशाळा यांच्या माध्यमातून त्यांनी प्रोत्साहित केले; पण संतोष यांचे स्वप्न आहे की, त्यांना कमीत कमी दहा लाख विद्यार्थ्यांना गणितसोबतच सर्वांगीण शिक्षणासाठी तयार करायचंय.
हे लवकर पूर्ण करायचे असेल तर पुढचा प्रवास डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करणं आवश्यक वाटू लागले. मग यासाठी प्रयत्न सुरू झाले. लॉकडाऊनमध्ये चालू असलेले क्लास बंद झाले. खूप मोठा परिणाम व्यवसायावर झाला. पण याच लॉकडाऊनमुळे एक अशी संधी आली की, त्यामुळे नवे दरवाजे उघडले.
सलील चौधरी यांच्या नेटभेटसोबत आम्ही जोडले गेलो आणि इथूनच पुन्हा नवी दिशा सापडली. आम्ही एकत्रित एक सशुल्क कोर्स घेतला. त्यासाठी १०० हून अधिक मुलांनी संपूर्ण महाराष्ट्रातील बावीस जिल्ह्यातून आणि पाच इतर देशांतून सहभाग घेतला.
यामुळे आमचा उत्साह द्विगुणित झाला. याच धर्तीवर आता आम्ही नवोदय परीक्षेसाठीसुद्धा ऑनलाईन कोर्स सुरू केलाय. ही सुरुवात आताच दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांची झालीय. मुलांशी मैत्री केली आणि त्यांच्या समस्या समजून घेतल्या तर मुलं जास्त जोमाने शिकण्यात रस घेतात.
आम्ही आमच्या मुलांचे एक मंत्रिमंडळ बनवलं आहे. त्यामुळे प्रत्येक मंत्री त्याला दिलेले पद सांभाळतो. उदाहरण द्यायचे तर ऊर्जामंत्री, आरोग्यमंत्री, गणितमंत्री इ. आरोग्यमंत्री सकाळी लवकर सगळ्यांना उठवतील, ऊर्जामंत्री मोटिव्हेट करतील.
अशा पद्धतीने हसत खेळत शिक्षण आम्ही मुलांना देतो. यामुळे त्यांचा सहभाग वाढतो, गती वाढते, मुलांना आवड निर्माण होते. आमच्या ऑनलाईन वर्गाचा मुलांना कंटाळा येत नाही. उलट मुलंच पुढाकार घेवून अनेक गोष्टी करतात. यातून त्यांच्या क्षमताही चांगल्या तयार होतात. काही सेकंदांतच प्रश्न सोडवण्याचे कौशल्यसुद्धा मुले आत्मसात करतात.
या प्रवासात अनेक चढउतार येतात; पण आम्हाला कुटुंब आणि मित्र परिवार यांची अनमोल साथ मिळाली म्हणूनच हा टप्पा आज गाठू शकलोय, असे संतोष सांगतात. जे व्यवसायात उतरू इच्छितात त्यांनी पूर्ण अभ्यास करून व्यवसाय सुरू करावा. व्यवसायाचे योग्य नियोजन, योजना आखून व्यवसायात उतरावे. सोबत मार्गदर्शक असेल तर हा प्रवास थोडा सुखकर होईल.
वाचनाची आवड जोपासणारे संतोष सतत नवीन शिकण्यावर भर देतात. त्यांना कलेची आवडही आहे. या प्रवासात अनेक समस्या येतात; पण त्या आपल्याला अजून मजबूत करतात. आपलीच नव्याने ओळख करून देतात.
संतोष यांना स्वत:ला नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात. ते म्हणतात मी वर्षातून कमीत कमी आठ ते दहा दिवस वेगवेगळे कोर्स करून आपल्या ज्ञानात भर घालत असतो. प्रत्येक उद्योजकाने अभ्यासू असावे. नेहमी नवं काहीतरी शिकावं असे आवर्जून सांगतात.
संपर्क : संतोष बच्चाव – ९३२११७७११४
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.