भारतात प्रथमच दुचाकी देखभालीची घरपोच सेवा देणारा ‘बाइक डॉक्टर’


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


भारतामध्ये प्रथमच दुचाकी दुरुस्तीची कामे ही एखाद्या मोबाइल गाडीमध्ये होणे, ही कल्पना जशी नवीनच आहे तेवढीच ती आश्चर्यकारकही आहे. सर्वाधिक दुचाकी वापरणारा देश अशी आपल्या देशाची ओळख, पण इतक्या मोठ्या या मार्केटकडे आपण पाहतो त्या वेळी त्या विषयाचा असलेला गंभीरपणा म्हणावा तेवढा जाणवत नाही. का बरे या मोठ्या मार्केटचा म्हणावा त्या पद्धतीने विकास होत नाही?

या विषयावर अनेक वेळेला विचार केला असता त्याचे उत्तर असे सापडले की, भारतामध्ये प्रत्येक लहान-मोठ्या कामांमध्ये दुजाभाव करण्याची व्यवस्था झाली आहे आणि म्हणूनच की काय, एखादे काम उच्च दर्जाचे किंवा कनिष्ठ दर्जाचे असे वर्गीकरण केले गेलेले आहे, त्यामुळे उच्चशिक्षित तरुण वर्ग या कामाकडे तेवढ्या उत्स्फूर्तपणे लक्ष घालत नाही.

याचाच परिणाम म्हणून हजारो-करोडोंचा हा व्यवसाय पूर्णपणे दुर्लक्षित झालेला आहे. यामध्ये गरज आहे ती थोड्याशा बदलाची, मग ती आपल्या मानसिकतेची असो वा त्यातील असलेल्या वेगवेगळ्या तांत्रिक आणि काळानुरूप व्यवस्थापनाची. मला नेहमीच असा व्यवसाय सुरू करायचा होता ज्याचे वर्तमानकाळात जरी फार यश नाही दिसले तरी भविष्यकाळात हजारो-करोडोंचे मार्केट होऊ शकेल आणि त्याचा शोध घेताना मला आढळले की, या व्यवसायामधील गुंतवणूक ही फार कमी आहे आणि त्याच वेळेला याचा विस्तार मात्र मोठ्या प्रमाणात होऊ शकतो.

यामधून या व्यवसायाला लागणारी प्रेरणा मला मिळाली. आज फक्त एकट्या पुण्यामध्ये दुचाकीची संख्या ही जवळपास ४५ लाखांच्या घरात जाऊन पोहोचली आहे आणि येथून पुढेही ही संख्या हजारांवर वाढतच जात आहे. त्यामुळे अर्थातच एवढ्या मोठ्या या मागणीला म्हणावा त्या प्रमाणात आणि म्हणावा त्या पद्धतीने पुरवठा होत नाही.

जर आपलेच उदाहरण द्यायचे झाले, तर आपल्याला आपल्या दुचाकी दुरुस्तीची कामे ही वेळच्या वेळी करावी लागतात, पण आपल्याला एक तर आजकालच्या या धकाधकीच्या जीवनात वेळ कमी पडतो, नाही तर त्या पद्धतीची सर्व्हिसिंग मिळत नाही.

संतोष करमरकर

ज्या दुचाकीला दर दोन हजार कि.मी. धावल्यानंतर सर्व्हिसिंग करावी लागते, ती तर अक्षरशः तीन-चार हजार कि.मी. झाले तरी सर्व्हिसिंग करता येत नाही आणि मग त्यामुळेच ते काम काही रुपयांत होणारे असते त्याच कामासाठी भरपूर पैसे मोजावे लागतात, तर हे सर्व टाळण्यासाठी आपण त्यांचा पाठपुरावा करायचा जरी म्हटला तरी सुट्टीच्या दिवसाचा अर्धा वेळ अशा गोष्टींसाठी खर्च करण्याची आपली मानसिकता नसते.

बरं त्यातून वेळ काढलाच तरी आपल्याला आपल्या पद्धतीने हवी तशी सेवा मिळेलच असे नाही. थोडा वेळ विचार केल्यावर आपल्या लक्षात येईल की, हे पूर्ण मार्केट दुर्लक्षित आहे. याच्यामध्ये गरज असलेले नियोजन म्हणावे तसे नाहीच आणि उलट अगदी काहीच टक्के गॅरेजेस अशी आहेत ज्यामध्ये आपल्याला अपेक्षित असलेली सर्व्हिस उपलब्ध होते आणि तिथेसुद्धा त्याच्यासाठी लागणारी सर्व्हिस फी खूप असते

यावर जर उत्तर शोधायचे असेल तर ते म्हणजे ‘बाइक डॉक्टर’. पुण्यामध्ये अगदी छोट्या प्रमाणात सुरू झालेली ही संकल्पना म्हणता म्हणता आता हजारो ग्राहकांना सेवा देते आहे.

आपल्याला आवश्यक असणार्‍या सर्व दुचाकी दुरुस्तीची व्यवस्था असलेली एक VAN खूप कल्पकतेने बनवलेली आहे. त्यामध्ये अगदी दुचाकी वॉशिंगपासून ते अगदी इंजिनच्या कामापर्यंत सर्व गोष्टी या आपल्या घरी येऊन आपल्या डोळ्यांसमोर, आपल्या वेळेनुसार, आपल्याला हव्या त्या ठिकाणी खूप विश्वासाने आणि उच्च गुणवत्तेने आपल्याला पूर्णपणे वाजवी दरात उपलब्ध होतात. त्यानंतर आपल्या दुचाकीची पूर्ण काळजी अगदी फॅमिली डॉक्टरप्रमाणे घेतली जाते.


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


बाइक डॉक्टरच्या कामामध्ये असणार्‍या गुणवत्ता, ग्राहकांना अपेक्षित असणारी सर्व्हिस आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ग्राहकांचा वेळ वाचवणारी टेक्निक म्हणजेच ही नामी कल्पना. या Quality सर्व्हिसमध्ये आणखी भर म्हणजे दुचाकीवर होणारी सर्व्हिसिंग. आता या कल्पनेने ग्राहकांचा वेळ तर वाचेलच, पण अगदी छोट्यातला छोटा प्रॉब्लेमसुद्धा अगदी सहजपणे दूर करता येऊ शकतो, त्यामुळे ‘बाइक डॉक्टर’ ही कल्पना आता घराघरांत पोहोचू लागली आहे.

हल्ली सर्वच गोष्टी ऑनलाइन झाल्याने किंवा इंटरनेटचा वापर वाढत असल्यामुळे आपल्याला हवी असलेली गोष्ट आपण या माध्यमातून मिळवत असतो आणि ग्राहक या सर्व सुविधांचा आनंदही घेत असतात. या सर्व गोष्टींचा विचार करून ‘बाइक डॉक्टर’नेदेखील या सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. उदा. ‘बाइक डॉक्टर’ची वेबसाइट, मोबाइल अ‍ॅपला जेणेकरून ग्राहकाला ‘बाइक डॉक्टर’च्या सर्व्हिसचा सहजतेने उपभोग घेता येईल.

ही कल्पना ऑटोमोबाइल इण्डस्ट्रीमध्ये एक नवीन टेक्नॉलॉजी घेऊन आली आहे ज्याचा सर्वच लोकांनी अगदी निश्चितपणे स्वीकार केलेला आहे आणि तुम्हीच सांगा, या इतक्या सर्व गोष्टी तुमच्यासाठी उपलब्ध असताना का कोणी या सुविधांना नाकारेल? ज्या प्रकारे तुम्ही एका कॉलवर तुम्हाला गरजेच्या असणार्‍या गोष्टी मागवू शकता त्याचप्रमाणे एका कॉलवर तुम्ही तुमची बाइक सर्व्हिस करून घेऊ शकता.

लहानपणी शाळेत असताना सर्वांनीच विज्ञानाच्या तासाला प्रयोगशाळेमध्ये वेगवेगळे प्रयोग केलेले असतील आणि सर्वांनाच ते करत असताना एक वेगळीच मजा जाणवत असते आणि आता ‘बाइक डॉक्टर’च्या माध्यमातून आम्ही ऑटोमोबाइल सेक्टरमध्ये असेच एक आगळेवेगळे समीकरण मांडत आहोत आणि अशी आशा आहे की, हा प्रयोगसुद्धा तुम्ही निश्चितपणे करून पाहाल.

पण ही कल्पना सुचणे आणि त्याचे वास्तवात रूपांतर करणे हे वेगवेगळ्या घटनांच्या आर्थिक परिस्थितीच्या आणि मानवी संसाधनाच्या अशा अनेक बेरजांचे ताळमेळ बसवण्याची कसरत करत हा डोलारा पुढे न्यावा लागला.

त्यामधील एक म्हणजे तुटपुंजी रक्कम असतानासुद्धा संशोधन आणि विकासासाठी वेळोवेळी भांडवल वजा करावे लागले. त्यातलाच एक भाग म्हणजे सुरुवातीच्या काळात पहिली गाडी खरेदी केलेली आणि कन्सेप्टनुसार त्याची डिझाईन बनवली होती, पण त्यामध्ये असे लक्षात आले की, गाडीच्या आतमध्ये दुचाकी सर्व्हिसिंगसाठी घेतल्यानंतर मेकॅनिकला काम करत असताना खूप अडचणी जाणवू लागल्या. त्यामध्ये जागेचा तुटवडा असल्या कारणाने काम करणे कठीण झाले आणि म्हणूनच त्या मोबाइल व्हॅनची पुनर्बांधणी करावी लागली.

अशाच अडचणींमधील आणखी एक उदाहरण द्यायचे झाले तर दुचाकी वॉशिंग करण्यासाठी आवश्यक असणारे पाण्याचे प्रेशर हे सुरुवातीला २ HP इंजिनमधून होताना ते वाटले म्हणून त्याच्याऐवजी 3 HP इंजिन पुन्हा खरेदी करावे लागले. अशी छोटीमोठी उदाहरणे आणि बदल हे वेळोवेळी होत गेले. हा जसा बदल झाला तशाच पद्धतीने कमी किमतीमध्ये ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी दुचाकी मोबाइल व्हेइकलची डिझाईन केली गेली.

त्यानंतर दुचाकीसाठी पाण्याचा आणि कंप्रेसरचा टँक बनवण्यात आला, पण त्याचा आर.टी.ओ.कडून परवाना न मिळाल्याने या व्हेइकलचीसुद्धा रचना बदलावी लागली. असा हा प्रवास करण्यासाठी लागणारे भांडवल नसल्याकारणाने वारंवार मानसिक संतुलन सांभाळत व्यवसाय पुढे पुढे घेऊन जात राहिलो.

या एवढ्या प्रवासामध्ये काही जवळच्या माणसांचा आधाराऐवजी जेवढा त्रास देता येईल तेवढा त्रास देण्याचा वारंवार प्रयत्न होत राहिला; पण आज मागे वळून पाहिल्यानंतर खूप गोष्टी पाठीमागे पडल्या आहेत असे जाणवते आणि अशा या नावीन्यपूर्ण उद्योगाला पुढे घेऊन आणल्याचा आनंद वाटतोय.

आज हजारो ग्राहक ‘बाइक डॉक्टर’ला ‘कॉलिंग व्हॅन’, ‘गॅरेज’, ‘एक कॉल पर घरपर’ अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखू लागले आहेत. काही प्रतिष्ठित लोकांचा उत्स्फूर्तपणे या प्रकल्पाला पाठिंबा मिळाला. जर अजून या संकल्पनेचे यश सांगायचेच झाले, तर काही जणांनी हा प्रोजेक्ट विकत घेण्याचे किंवा भागीदारीमध्ये चालवण्यासाठी काही कोटींची संधीसुद्धा देऊ केली; पण मी ही संकल्पना ‘concept copyright act’ of government अंतर्गत सुरक्षित केली आहे. त्याचे प्रमाणपत्रसुद्धा मिळाले. त्याच पद्धतीने नावाचे ट्रेडमार्कसुद्धा घेऊन हा प्रोजेक्ट जास्तीत जास्त कायद्याच्या दृष्टीने सुरक्षित केली.

ज्या पद्धतीने ह्या संकल्पनेला प्रतिसाद येत होता तो पाहता एका पाठोपाठ नवनवीन स्टार्टअप्स हीच कल्पना घेऊन सर्व देशात येताना दिसू लागले. त्यातीलच एक उदाहरण म्हणून २०१५ ला सुरु झालेली “ड्रिओजॉय” अश्या व इतर बऱ्याच कंपन्यानीही ह्यात पाय रोवायला सुरुवात केली. नुसत्या पुण्यातच किमान पंधरा पेक्षा जास्त स्पर्धक उदयास आले. हे सांगण्याचा उद्देश हाच कि एक अशी कल्पना जी निर्माण झाली आणि हळूहळू वाढू लागली आणि ती आता एक इंडस्ट्री होण्याच्या मार्गावर आहे आणि म्हणूनच ह्यांच्यातून बऱ्याच मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होताना दिसतीय.

ह्या सगळ्या घडामोडी होत असतानाच बऱ्याच गुंतवणूकदार आणि संबंध महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या नेत्यानींसुद्धा हा आगळावेगळा मराठमोळा उद्योग वाढण्यासाठी मदतीचा हात दिला. असे भरपूर प्रसंग आहेत ज्यामुळे हा उद्योग वृद्धिंगत होण्यासाठी प्रेरणा मिळाली.

आज-काल सुरू असलेल्या उद्योगपद्धतीनुसार कल्पना सुरू केलेल्या व्यक्ती एक ब्रँड व्हॅल्यू तयार करून तो ब्रँड विकतात आणि त्याचप्रमाणे २०१६ ह्या वर्षी मायनॉरिटी भागीदारी ठेऊन बाकीचे शेअर्स मी एका चांगल्या किंमतीला विकले. पण म्हणून बाईक डॉक्टरचा प्रवास थांबला नाही मागील एक ते दोन वर्षात त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उद्योग विस्तारला.

आता तीन वर्कशॉप म्हणजेच (ICU), सात दु चाकी गॅरेज म्हणजेच (OPD) आणि दोन व्हॅन म्हणजेच (ICU) इतक्या प्रमाणात गॅरेजेस पुण्यातल्या सर्व भागात विस्तारली आहेत. आता फ्रँचाईसी माध्यमातून पुढील वाटचाल सुरू करण्याच्या मानस आहे.

– संतोष करमरकर
९९७५८६०७५०


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?