Smart Udyojak Billboard Ad

पुरात अख्खा व्यवसाय पाण्याखाली गेला, तरी फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा भरारी घेणार्‍या सारिका बकरे

वर्ष २०१९. स्थळ कोल्हापूर. महापुरामुळे संपूर्ण शहर पाण्यात. अनेक व्यवसाय बुडाले. आठ ते दहा दिवस संपूर्ण आयुष्यभराची कमाई ७ फूट पाण्याखाली होती. आपण काहीच करू शकत नाही ही हतबलता होती. व्यवसायाला वाढवण्यासाठी बँकेचं कर्ज डोक्यावर घेतले होते. ती मशिनरीची गुंतवणूक पाण्याखाली…

खरं तर आभाळ कोसळले होते. सगळेच संपले आता, असा क्षण आयुष्यात आला आणि मग काय पुढच्याच क्षणी मनात आले रडत बसून काय होणार? यावर मार्ग काढलाच पाहिजे. ही नैसर्गिक आपत्ती आपल्याला आपल्या निश्चयापासून ढळू देऊ शकत नाही.

फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा एकदा राखेतून उंच भरारी घेणार्‍या कोल्हापूरच्या ‘श्री प्रोसेस वर्क्स’च्या सारिका सागर बकरे यांची गोष्ट प्रेरणादायक आहे.

‘स्मृतिचिन्ह-पुरस्कार, हस्तकला आणि साइनेज’ बनवण्याच्या क्षेत्रात ‘श्री प्रोसेस वर्क्स’ कार्यरत आहे. ‘श्री प्रोसेस वर्क्स’ हा कौटुंबिक व्यवसाय आहे. २००५ साली सारीका बकरे या व्यवसायाशी जोडल्या गेल्या. त्यांचे पती हे डिझाइनचे काम पाहतात.

sarika bakare e1649143418891सारीका बकरे यांचे सासरे विलास बकरे हे चित्रकार होते. १९७४ साली मुद्रण क्षेत्रात त्यांनी व्यवसायाची सुरुवात केली. पुढे कालौघात त्यात अनेक बदल होत गेले. जेव्हा प्रिंटिंग व्यवसायात बदल होत गेले त्यावेळी विलास बकरे यांच्यापुढे आव्हान होते आता पुढे काय करावे?

यातूनच मग स्मृतिचिन्ह-पुरस्कार या कामाची मुहूर्तमेढ रोवली गेली. जेव्हा हे क्षेत्र नवीन होते त्यावेळी खूप आव्हान होती, पण कामाची गुणवत्ता याबाबत कधीही तडजोड केली नाही. हेच वेगळेपण ‘श्री प्रोसेस वर्क्स’ने जोपासले आहे.

या क्षेत्रात पूर्वी लाकडात स्मृतिचिन्ह बनवले जायचे पुढे हेच काम मेटल, अ‍ॅक्रेलिक, तांबे, चांदी यामध्ये आणले आणि अजून विविध संकल्पना राबवायच्या आहेत. आतापर्यंत ‘श्री प्रोसेस’ने बनवलेल्या मानचिन्हांनी सन्माननीय राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री याचबरोबर चित्रपट, शैक्षणिक, राजकीय, उद्योजक अशा सर्व क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना सन्मानित करण्यात आले आहे.

कोल्हापूर विद्यापीठाचा व डी. वाय. पाटील विद्यापीठ मुंबई व कोल्हापूर, विजापूर विद्यापीठ यांचा दीक्षांत समारंभाचा ज्ञानदंड बनवला आहे. ही काही वांगणीदाखल उदाहरणे झाली. अशी अनेक मानचिन्ह, स्मृतिचिन्ह, पुरस्कारपत्र आतापर्यंत केली आहेत.

कुटुंब आणि सहकारी टीम यांच्या मोलाच्या साथीने आपण पुढे जातोय, असे सारिका बकरे सांगतात. कोविडच्या कठीण काळातही आत्मविश्वास ढळू न देता शांत डोक्याने ही परिस्थिती हाताळतायत. २०१९ च्या महापुरातून स्वत:ला सांभाळता सांभाळत पुन्हा एकदा पूर आला.

पहिल्या वेळेच्या अनुभवातून यावेळी अगोदरच पूर्वकाळजी घेतली होती त्यामुळे सुरक्षित स्थळी सारे हलवले, पण कोरोनामुळे पुन्हा व्यवसाय ठप्प झाला. आता लॉकडाउन उठतोय. हळूहळू सर्व पूर्वपदावर येतेय. पुन्हा एक नवी आशा पल्लवित झाली आहे.

सर्पमित्र असलेल्या सारीकताईंनी पूरपरिस्थितीत अनेक लोकांच्या घरातून साप पकडून सुरक्षित ठिकाणी त्यांना स्थलांतरित केले. लोकांना या कार्यात मदत केली यातून सामाजिक बांधिलकी जपली. तसेच कोरोनाकाळात कोरोना रुग्ण, नातेवाईक तसेच होम आयसोलेट याना टिफिन पुरवण्याचे कामही त्यांनी केले.

‘सत सात्विक फूड्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीच्या त्या संचालिका आहेत. अनेक संस्थांच्या संस्थापक मंडळावर त्या असून त्यांना विविध पुरस्कारांनी आतापर्यंत गौरवले गेले आहे. व्यावसायिकांची जिद्द, दृष्टिकोन कठीण काळात जास्त बळकट होतो.

‘श्री प्रोसेस वर्क्स’सारखे कौटुंबिक व्यवसाय ज्यांची पाळेमुळे खोलवर रुजलीयत ती पहिल्या पिढीच्या उद्योजकांना नक्कीच प्रेरणादायक असतात. खूप शिकवतात आणि टिकून राहण्यास उद्युक्त करतात.

संपर्क – 9130365036

Author

  • pratibha shailesh rajput

    यांनी पदव्युत्तर पत्रकारितेत पदविका केली आहे. प्रिंट माध्यमांत काही काळ काम केल्यानंतर त्यांनी स्मार्ट उद्योजक हे मासिक सुरू केले.

    View all posts

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

तुम्ही उद्योजक / व्यापारी / व्यावसायिक आहात आणि तुमचीही बिझनेस प्रोफाइल या पोर्टलवर प्रसिद्ध करायची आहे? तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error: Content is protected !!
Scroll to Top