Advertisement
उद्योगसंधी

‘अर्बन क्लॅप’सारख्या उद्योगसंधी शोधा

तुम्ही उद्योजक आहात का?

जर असाल, तर 'महाराष्ट्र उद्योजक सूची'मध्ये आजच आपली नोंद करा आणि अगणित लाभ मिळवा.

अधिक माहितीसाठी : udyojak.org/join-udyojak-list/

Print this Page

नोकरीच्या चौकटीत आयुष्य घालविण्यापेक्षा काही तरी नवीन करू, जास्त पैसे कमावू, जलद गतीने प्रगती करू इ. भावनेने ग्रामीण भागातील अनेक तरुण आज शहरांकडे जाण्यापेक्षा ग्रामीण उद्योजकतेला प्राधान्य देत आहेत; परंतु तरीही आज यात त्यांसमोर सर्वात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे मी कोणता उद्योग करू? ह्या प्रश्‍नाचे उत्तर शोधतानाच काही तरी नवीन करण्याची इच्छा मागे पडत जाते व आपल्या आजूबाजूला जे उद्योग सुरू आहेत त्यातीलच एखादा पर्याय ते निवडतात.

नवीन पर्यायांची माहिती करून घेणे त्यांच्यासाठी आज गरजेचे आहे. परंतु आपण जेव्हा कोणता उद्योग करायचा, हा विचार करत असतो तेव्हा दोन मुख्य बाबींचा विचार करणे गरजेचे असते. एक म्हणजे कोणत्या उद्योगाला सध्या मागणी आहे आणि दुसरा व सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या उद्योगाला भविष्यात किती मागणी असेल किंवा आता आहे तितकीच मागणी टिकणार आहे का?

हे दोन मुद्दे डोळ्यासमोर ठेवून ग्रामीण भागातील उद्योग- संधी शोधणार्‍या होतकरूंनी उद्योग निवडावेत. सध्या ‘विविध सोयीसुविधा पुरविणारी कंपनी’ अशा प्रकारची एक उत्तम उद्योगसंधी उदयास येत आहे. मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये आता सुतारकाम, बागकाम, लोहारकाम, कल्हई करणार्‍या व्यक्ती इतके मिळणे दुरापास्त झाले आहे. यांची संख्या खूप कमी झाली आहे; परंतु समाजात यांना खूप मागणी आहे. प्रत्येक व्यक्तीच्या स्वत:च्या जगात यांची गरज भासतेच.

आज या गरजेला हेरून ‘अर्बन क्लॅप’सारख्या उद्योगांनी संधी शोधली आहे. शहरी भागात अशा प्रकारच्या कंपनी विविध प्रकारच्या सेवा पुरवतात. अशाच प्रकारच्या सेवा गावागावातसुद्धा लागतात. अनेक गावांत आज उद्योग करण्यासाठी उत्तमोत्तम उद्योजक तर तयार होत आहेत; परंतु त्यांना लागणार्‍या ज्या विविध सोयीसुविधा आहेत त्या त्यांना मिळत नाहीयेत. या सुविधांमध्ये पाडकरी- माळींपासून इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक अशा अनेकांचा समावेश आहे. हा उद्योग पुढील दोन प्रकारे केला जाऊ शकतो.

एक म्हणजे एखादे क्षेत्र निवडून त्या संबंधित साहित्य पुरविणे. जसे शेती हे क्षेत्र निवडले तर शेतकर्‍यांना भाड्यावर ट्रॅक्टर, इतर अवजारे उपलब्ध करून देणे, खतांचा पुरवठा करणे इ. कमी भांडवल उपलब्ध असेल तर हा उद्योग आपण सुरू करू शकतो. उपलब्ध भांडवलात ज्या सोयी आपण पुरवू शकू त्या सुरू कराव्यात. पुढे आपल्याला जसजसा अनुभव येत जाईल व ज्या प्रकारची मागणी वाढत जाईल त्यानुसार पुढील गुंतवणूक कशात करायची याचा निर्णय आपल्याला घेता येईल. उदा. आपण बागकामाची अवजारे पुरविणे सुरू केले आहे व तेव्हा आपल्याला समजले की, आपल्या गावातील आंब्याची जुनी झाडे खूप उंच वाढली आहेत व आंब्यांचा सीझन जवळ आला आहे. अशा वेळी आपण जर लांब आकाराचे मझेलेफ विकत घेऊन भाड्यावर दिले तर आपल्याला थोड्या काळात जास्त नफा होऊ शकतो.

दुसरे म्हणजे आऊटसोर्सिंग. अर्थात जिथे गरज आहे तिथे मुबलक प्रमाणात व्यक्तींचा पुरवठा करणे. बिझनेस मॉडेल समजायला सोपे जावे यासाठी एक उदाहरण घेऊ. एखाद्या शेतकर्‍याकडे मोठी जमीन आहे, परंतु त्यावर काम करायला व उत्तम पीक घ्यायला त्याला 20 माणसांची दोन महिन्यांसाठी गरज आहे. त्या 20 माणसांना दोन महिने कामावर ठेवून सर्वांना रोजगार देणे हे शेतकर्‍याला कठीण पडते. कारण यात खर्च तर जास्त असतोच, शिवाय त्या लोकांच्या तक्रारी, त्यांची मागणी, काम करण्याच्या पद्धती या सर्वांची काळजी त्या शेतकर्‍यालाच घ्यायला लागते. अशा वेळी आपण जर आऊटसोर्सिंग फर्म काढली व आपल्या हाताखाली काही व्यक्ती ठेवून जिथे गरज आहे तिथे व्यक्तींचा पुरवठा केला तर यातून चांगला नफा मिळू शकेल. आपल्याला केवळ व्यक्तींची अर्थात आपल्या कर्मचार्‍यांची काळजी घ्यायची असेल, व्यक्तींचा रोजगार आपण देऊ व प्रति तास किंवा प्रति व्यक्ती शेतकर्‍याकडून ठरावीक रक्कम घेऊ शकतो. यामुळे शेतकरी त्याच्या मुख्य काम अर्थात उत्तम उत्पादन करण्यावर लक्ष केंद्रित करू शकेल व त्यासाठी एकूण खर्चसुद्धा कमी येईल.

या उदाहरणात गणित लावले तर आपल्याला असे समजेल:

  1. शेतकर्‍याने 20 व्यक्तींना 2 महिने (60 दिवस) कामावर ठेवले, तर प्रत्येकी रु. 100 रोजगार धरल्यास दोन महिन्यांचा खर्च होतो रु.1,20,000/- (20 ु 60ु 100) त्यांचे इतर खर्च, मागण्या तर वेगळ्याच!
  2. आपण जर आऊटसोर्सिंग फर्म काढून दर व्यक्तीमागे केवळ रु.50 प्रति व्यक्ती प्रति दिन घेतले तर शेतकर्‍याचा खर्च सरळ अर्धा म्हणजेच रु. 60,000/- होतो.

याचे शेतकर्‍याला होणारे फायदे:

– वरील गणिताप्रमाणे एकूण खर्च कमी होतो

– योग्य वेळेत योग्य व्यक्ती उपलब्ध असतात; कामासाठी व्यक्ती शोधण्यात वेळ जात नाही

– कर्ज काढून एकहाती सर्व पैसे देण्यापेक्षा काही रक्कम अ‍ॅडव्हान्स देऊन उरलेली रक्कम नंतर (सुगीच्या काळात) देऊ शकतो.

– मुख्य कामांकडे लक्ष केंद्रित करणे शक्य होते.

– साधारण किती व्यक्तींची गरज आहे हे आधीच ठरविल्यामुळे आयत्या वेळी त्यात लक्ष घालावे लागत नाही.

– काम करणार्‍या व्यक्तींच्या बहुतांश समस्या कंपनी सोडवते, शेतकर्‍यांवर ती जबाबदारी पडत नाही.

आता आपल्याला असे वाटत असेल की, शेतकर्‍यांनाच म्हणजेच ग्राहकांना याचा फायदा आहे, आपल्याला यातून नफा कसा काय मिळणार?

– आपल्याकडे ज्या व्यक्ती आहेत त्या बाराही महिने कुठे ना कुठे काम करत असतीलच. हे दोन महिने संपले की दुसर्‍या कुणा ग्राहकाकडे आपल्या व्यक्ती कार्यरत असतील.

– ठराविक काळासाठी सोयी पुरविण्याचे आधीच ठरले असल्याने अर्थात ग्राहकांसोबत काँट्रॅक्ट झाले असल्याने त्या काळात आपण नवीन ग्राहक शोधून नवीन काँट्रॅक्ट् करून ठेवू शकतो.

– योग्य काळात योग्य व्यक्तींचा पुरवठा आपण करत असल्याने त्याचा मोबदला चांगला मिळू शकतो.

– यात सुरुवात कमी व्यक्तींपासून करून पुढे आपला आवाका वाढवत नेणे शक्य आहे.

– विविध पूरक क्षेत्रांतील कामे घेतल्यास उपलब्ध कर्मचार्‍यांच्या बळावर जास्तीत जास्त कामे मिळू शकतील.

– ठरावीक रक्कम अ‍ॅडव्हान्स मिळाल्याने खर्चाचे गणित सोपे होईल.

– आपल्या हाताखालील व्यक्तींना आपण दिवसाचा रोजगार देण्याऐवजी एकत्रित महिन्याचा पगार देऊ शकतो ज्याद्वारे एकूण खर्च कमी होतो.

आता आपण केवळ शेती या क्षेत्राचे उदाहरण घेऊन ही संधी अभ्यासली. याचप्रमाणे प्रत्येक गावात अशी असंख्य क्षेत्रे उपलब्ध आहेत ज्यात आपण या सेवा पुरवू शकतो. जसे अकाऊंटिंग सेवा, स्वच्छता सेवा, वाहतूक सेवा, रिपेअरिंग व मेंटेनन्स सेवा इ. यातील आपल्याला जे क्षेत्र नफा देणारे वाटत असेल त्या क्षेत्रात आपण हा उद्योग सुरू करू शकतो. सुरुवातीला केवळ साधनसामग्री पुरविण्यापासून सुरुवात करून पुढे आपल्या हाताखाली शे-दोनशे व्यक्तीसुद्धा ठेवू शकू!

– शैवाली बर्वे
shaivalibarve@gmail.com

FREE NEWSLETTER ON WHATSAPP

व्यवसाय आणि उद्योजकतेविषयी माहिती व घडामोडी आपल्या WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ या क्रमांकावर आपले नाव सध्या राहत असलेला जिल्हा व तालुका WhatsApp करा.

Help-Desk
%d bloggers like this: