Advertisement
उद्योगोपयोगी

आजारी व्यवसायाला गरज असते अभ्यासपूर्ण बदलाची

फक्त रु. ५०० मध्ये 'स्मार्ट उद्योजक' प्रिंट मासिक घरपोच मिळवा.

Book Now: https://imjo.in/Xx7Uq6

Print this Page

कमी कष्टात, कमी खर्चात, बरेच काही… स्वस्त आणि मस्त सगळ्यांनाच आवडते; पण कमी जणांना तसे करणे जमते. ज्यांना जमते ते चांगला नफा कमावतात. आपल्याला जमेल? प्रयत्न करायला काय हरकत आहे. गोष्टी स्वस्त करण्यासाठी कमी वेळात केल्या, कमी माणसांत केल्या तर त्या जमतात. मी एमएसएमई कन्सल्टंट आहे. त्यामुळे बर्‍याच कंपन्यांमध्ये जात असतो. तिथलीच एक गंमत सांगतो, वेळेसंदर्भात.

मनीष हा एक हुशार इंजिनीअर, पण कामाला लागणारा वेळ आणि कामाला सुरुवात कधी? हे प्रश्‍न कायम. एकदा माझी मीटिंग सुरू झाल्यावर मनीष आला. त्याच्या मॅनेजरने मनीषला प्रचंड झाडलं. मीटिंगनंतर मी मनीषला बोलावले आणि म्हटले, ‘मनीष, तू बदलू शकतोस?’ त्यानंतर पंधरा दिवसांनी मी त्या कंपनीत गेलो. मनीष वेळेवर हजर होता आणि विशेष म्हणजे मनीषने कामाचा आढावा दिला. त्यात बरीचशी कामं पूर्ण आणि बाकीच्या कामांचे वेळापत्रक दिले. मी मनीषला म्हटले, ‘अरे व्वा! हे कसे काय झाले?’

मनीष म्हणाला, ‘सर, काही दिवसांपूर्वी तुम्ही मला एक गोष्ट सांगितली होती गणपती बाप्पांच्या पृथ्वी प्रदक्षिणेची. तेव्हा मी दुर्लक्ष केले; पण आता तीच गोष्ट माझ्या कामास आली. मी काम छान कसे होईल एवढेच बघायचो. ते लवकर आणि चांगले कसे होईल हे बघणेही गरजेचे होते हे मला पटत नव्हते. मला रोज ऑफिसला याला उशीर व्हायचा. याचा मी पहिल्यांदा अभ्यास केला. तुम्ही सांगितल्याप्रमाणे समस्येच्या मुळाशी जाऊन समजण्याचा प्रयत्न केला.

एक उदा. सांगतो सर, मी सकाळी वेळेवर आटपायचो; पण शेवटच्या पंधरा मिनिटांत काही तरी घोळ व्हायचा. त्याचे कारण होते मी मोबाइल आणि पाकीट कुठेही टाकायचो. मग सकाळी शोधाशोध होऊन उशीर व्हायचा. तुम्ही शिकवलेली तंत्रे मी व्यक्तीगत आयुष्यात वापरली. मी मोबाइल, बाइकची किल्ली, पाकीट, हे सगळे एका बॉक्समध्ये ठेवतो. गेला आठवडाभर मी एकदाही उशीर झाला नाही आणि माझ्या कामाचे मी शेड्यूल केले आहे. त्यासाठी तुम्ही सांगितलेले फॉरमॅट वापरले. आता गोष्टी सोप्या आणि सहज झाल्या.


Paytm वापरकर्त्यांसाठी बंपर ऑफर

'स्मार्ट उद्योजक' मासिकाची वार्षिक डिजिटल वर्गणी

Paytm वर मिळवा आता फक्त २० रुपयांत.


मित्रांनो, गोष्टी वेळेवर, योग्य पद्धतीने करायला कमी वेळ, कमी पैसा आणि कमी बुद्धी लागते. ‘कैसा भी करके होनाच मंगता है।’, ‘ते मला माहीत नाही’, ‘मला आधी का नाही सांगितले?’, ‘तुझे हे नेहमीचेच आहे’, अशी वाक्ये तुमच्या दुकानात, कंपनीत, ऑफिसमध्ये, हॉस्पिटलमध्ये, हॉटेलमध्ये बोलली जात असतील, तर गोष्टी सुधारणे शक्य आहे आणि तेही कमी कष्टात आणि कमी वेळात.

मनीषच्या कामातील वर्तणुकीसाठी अनेकांनी वेळोवेळी त्याला झाडले होते; पण मनीषच्या मते त्या कंपनीत मी सुरू केलेली शेड्युलबेस्ड ऑपरेटिंग सिस्टम कामात आली. त्यामुळे सगळ्यांनाच वेळेआधी कामाची लिस्ट मिळू लागली आणि प्रत्येक मॅनेजरच्या कामाला दृष्टी आली. बरीच मंडळी ‘वेळ नाही’ असे सांगतात. काही गोष्टी बघितल्या म्हणजे वेळेचे पूर्वनियोजन, सगळ्या कामांची यादी व वाटप, एमआयएस म्हणजे योग्य प्रमाणात कामाचा आढावा, तर गोष्टी सुधारण्यास सुरुवात होते. तुमच्या व्यवसायात आधी काय करायला हवे, हे तुमचे प्रश्‍न ऐकल्यावर ठरवता येईल व कमी कष्टात आणि कमी वेळेत सुधारणा करता येईल.

प्रत्येक व्यवसायात घडणार्‍या गोष्टी वेगळ्या असल्यामुळे एकच गोष्ट सगळीकडे सारख्या प्रमाणात लागू पडत नाही. एका हॉस्पिटलमध्ये (माझे ग्राहक) डॉक्टरांनी सांगितले, ‘मी महिन्यातून एकदा तरी कोणाला तरी झापतो. मग सगळं नीट चालतं. आम्ही याला व्हॅक्सिनेशन म्हणतो; पण पुन: पुन्हा झापावे लागते यावर काय उपाय?’ मी म्हटले, ‘मुळात झापणे म्हणजे ‘व्हॅक्सिनेशन नव्हे. त्याऐवजी चूक का होते हे पाहू या. झापणे म्हणजे ‘पेन किलर’ आहे. डॉक्टरांना काही महिन्यांनंतर ते पटले आणि आता ‘पेन किलर’शिवाय हॉस्पिटल चालत आहे.

आणखी एक विनोदी गोष्ट मी बर्‍याच कंपन्यांमधून बघितली आहे ती म्हणजे, ‘विरोधाभास!’ याचे एक उदाहरण सांगतो. माझे एक ग्राहक, त्यांच्या सहकार्‍यांना म्हणायचे, ‘सांगितल्याप्रमाणे कर’, ‘डोके वापरून वाट लावायची नाही.’ ‘एवढी अक्कल नाही’, ‘जरा डोके लावून काम कर ना!’ माझ्यासमोर घडलेला किस्सा. मी त्या कंपनीचा मासिक रिपोर्ट पाहत होतो.

नंतर मी रिपोर्टमधल्या कॉलमचा अ‍ॅव्हरेज काढून मागितला. आयटी इंजिनीअर अ‍ॅव्हरेजचा रिपोर्ट काढून आला. हा रिपोर्ट सांगताना मालकांनी नेहमीप्रमाणे सांगितले, ‘सगळ्या कॉलमचा अ‍ॅव्हरेज काढ. डोके वापरू नको. मी रिपोर्ट पाहिला. पहिला कॉलम ‘सीरिअल नंबर’ त्याचाही अ‍ॅव्हरेज काढला होता. आता मालक म्हणाले, ‘थोडं डोकं वापरता येत नाही? बघितलं साठे सर, अशी आहेत आमचे लोक.’

या कंपनीमध्ये कम्युनिकेशनवर रोल प्ले घेऊन एका आठवड्यात सुधारणा दिसून आली. मालकांनाही काही गोष्टी समजून आल्या आणि त्यांच्या सहकार्‍यांनाही. आता डोके वापरायचे की नाही, हे सांगितले जात नाही, योग्य तिथे आणि हवे तिथे योग्य प्रमाणात वापरले जाते.

प्रत्येक कंपनी/व्यवसाय लहान-मोठा व वेगळा असतो. प्रत्येक व्यवसायाच्या व्यथा वेगळ्या, कथा वेगळ्या. तुमच्याही काही अडचणी असतील. मग त्याही सोडवण्याचा प्रयत्न करा. मग काय करायचे, कसे करायचे हे सगळे अवलंबून आहे समोर असलेल्या प्रश्‍नावर आणि व्यवसायाच्या चांगल्या-वाईट गोष्टींवर; पण एक गोष्ट नक्की, जे करायचे ते कमी कष्टात, कमी खर्चात आणि बरंच काही. तुमच्या लक्षात आले असेल की, आपण आतापर्यंत MIS, HR, Operation या विषयांवर बोललो. लघुउद्योजकांना ना या सगळ्याच गोष्टी लागतात आणि त्याही एकत्रितपणे तुम्हालाही हे करता येईल, कमी कष्टात.

आता लघुउद्योजक खूप कष्ट करत आहेत आणि प्रश्‍नसुद्धा खूप आहेत. काहींना विक्री वाढवायची आहे, काहींना ऑर्डर पूर्ण करायच्या आहेत. माणसं मिळत नाहीत. भांडवल कमी पडते. क्वालिटी, डिलिव्हरीमध्ये गडबड होते. या आणि अशा बर्‍याच प्रश्‍नांची उत्तरे हसतखेळत शोधा. प्रश्‍न तुमच्या व्यवसायात आहेत आणि उत्तरंसुद्धा प्रश्‍नाच्या आसपास आहेत.

– महेश साठे
maysathe@gmail.com
९४२२६८२८१४

FREE NEWSLETTER ON WHATSAPP

व्यवसाय आणि उद्योजकतेविषयी माहिती व घडामोडी आपल्या WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ या क्रमांकावर आपले नाव सध्या राहत असलेला जिल्हा व तालुका WhatsApp करा.

Help-Desk
%d bloggers like this: