महिला सक्षमीकरणासाठी बचत गट

‘बचत गट’ आज प्रत्येकाला माहीत असलेली ही संकल्पना म्हणावी लागेल. मागील दहा वर्षात बचत गट ही संकल्पना खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली असे म्हणायला हरकत नसावी. बचत गट ही संकल्पना सर्वसमावेशक आहे, परंतु बचत गट म्हटले की महिला हे जणू समीकरणच झालं आहे.

बचत गटाला मोठं करण्यात महिलांचा सर्वात मोठा वाटा आहे, कारण महाराष्ट्रात बचत गटांच्या माध्यमातून महिला आणि व्यवसाय यांची जणू एक चळवळच उभी राहिली. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात अनेक छोटे मोठे बचत गट आज कार्यरत आहेत. ज्याच्याद्वारे आज तळागाळातील भारतीय स्त्री आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करतेय. ग्रामीण आणि महिला उद्योजकता विकसित करण्यात बचत गटांचा मोठा हात आहे.

स्वावलंबी, आत्मविश्वासपूर्ण आणि स्वत:च्या पायावर उभी राहिलेली स्त्री ही खऱ्या अर्थाने देशाच्या आर्थिक विकासातील योगदानाची साक्ष आपल्याला बचत गटांच्या माध्यमातून देताना दिसते.

आर्थिक सक्षमीकरण ही प्रत्येकीची गरज आहे, परंतु घर आणि संसार यासोबत स्वत:ला उभं करण्यासाठी प्रत्येकीला विशिष्ट वेळ काढून घराबाहेर पडायला जमतंच असे नाही. मग स्वत:च स्वत:च्या अडचणींवर मात करत सहकार्याने ही वाटचाल करता येते.

बचत गट स्थापन कसा करावा असा प्रश्न अनेकांना असू शकतो. खरंतर बचत गट या नावातच त्याचे उत्तर आहे. एकत्रितरित्या बचत करणाऱ्यांचा समूह, गट एकत्रित येऊन एखाद्या गोष्टीची सुरुवात करतो तेव्हा सुरु होतो तो बचत गट. यात गटाचे पैसे गुंतवलेले असतात त्यामुळे सुरुवातीला धडपड आणि प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे.

ध्येय गाठण्यासाठी धीराने काम करण्याची गरज असते. वेळ खर्च करावा लागतो. प्रयत्न नेटाने करावे लागतात, तेव्हाच ध्येय साध्य होऊ शकते. बचत गट स्थापन करण्यासाठी गरज असते विश्वास आणि सहकार्याची.

सुरुवातीला अनेक महिलांना बचत गट या संकल्पनेविषयी प्रश्न असू शकतात, पूर्वग्रह दुषित असू शकतात. अशावेळी गरज असते अशा सर्व शंकांचे समूळ उच्चाटन करणे. असा गट तयार करताना प्रस्थापित गटाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शनासाठी आपण बोलवल्यास त्याचा फायदा होतो.

दहा ते बारा जणी मिळून गटाची सुरुवात करू शकतात. एकमेकांसोबत काही काळ सभा आणि चर्चा यातून अंदाज घेत विश्वासाने पुढे जावे लागते. एकदा नियम, अटी, रुपरेषा ठरली आणि त्यावर एकमत झाले की त्या गटाचा पाया घट्ट होऊ लागतो. यातूनच नव्या संकल्पनांवर एकमत करून व्यवसायाला सुरुवात करता येते.

याची हजारो उदाहरणे आज आपल्याला आपल्या समाजात दिसतील. ग्रामीण भागात अनेक महिलांचे संसार बचत गटांच्या माध्यमातून सुरू झालेल्या व्यवसायांतून उभे राहिले आहेत. लोणचे-पापड, सॅनिटरी नॅपकीन, ज्वेलरी मेकिंग, गारमेंट, शेती, दुग्ध व्यवसाय, कुकुटपालन, मत्स्यपालन अशा विविध प्रकारच्या व्यवसायांची सुरुवात अनेक बचत गटांनी केली आहे.

बचत करणे, कर्ज घेणे, त्यातून उद्योग उभारून कमाई करून कर्जाची परतफेड करणे या बाबी महिलांना समजू लागल्या आहेत. शासनाच्या विविध योजना आणि धोरणांच्या आधाराने बचत गटांच्या माध्यमातून विकसित होणाऱ्या व्यवसायांना फायदा मिळतो.

महिला एकत्र येऊन आपल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांच्याद्वारे विक्रीसुद्धा करू लागल्या आहेत. त्यासाठी सरकारही प्रयत्नशील आहेच. वेगवेगळे मेळे, ग्राहकपेठा, बाजारपेठा उपलब्ध करून देण्याचे माध्यम म्हणून कार्यरत असतात.

व्यवसाय करण्यासाठी हा एक चांगला पर्याय स्त्रीयांसमोर उपलब्ध आहे. ‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ असे म्हणून एकत्रित आल्यास एक चांगले कार्य आपण नक्कीच उभं करू शकू.

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद व्हा आणि अनेक लाभ मिळवा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?