सेन्सेक्स चालला ६० हजार पार… तुम्ही कुठाय?

सेन्सेक्स ६०,००० ला स्पर्श करण्यासाठी पूर्ण तयार आहे. २७००० पासून आतापर्यंतची वाटचाल पाहिली तर एक गोष्ट क्लिअर आहे, की मोठया कंपन्यांनी म्हणजे ए ग्रेड कंपन्यांनी ही रॅली लीड केली आहे. त्यामुळे या कंपन्यांमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक हीच उत्तम असल्याचे दिसते. एक माणूस सगळेच शेअर्स घेऊ शकत नाही. माणसाला आयुष्यात सगळेच मिळते असे नाही, तसेच हे आहे. त्यामुळे “अरे य्यार काल झी एवढा वाढला, मी का नाही घेतला”, असे चुकचुकत नाही राहायचे. असो तर ए ग्रेड काऊंटरनी मार्केट वर खेचले.

मागच्या दोन चार महिन्यातही फ्रंटलाईन काऊंटर किती वाढले आहेत पहा. त्यामुळं पेनी स्टॉकच्या मागे पळण्यापेक्षा याच शेअर्सवर लक्ष केंद्रित का नाही करत? गुणवान बायको घरी असताना बाहेर उनाडक्या करण्यासारखे आहे हे. टाटा मोटर्स, हिंडाल्को, एसबीआय, विप्रो, जिंदाल स्टील, जिंदाल स्टील आणि पावर हे तीनशे ते सहाशेमधले शेअर्स. यामध्ये युनायटेड स्पिरीट एड करा. त्याची मस्त नशा चढली आहे गुंतवणूकदारांना.

ओएनजीसी, एनटीपिसी, कोल इंडिया इंडियन हॉटेल्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, आयटीसी, ताज जिव्हीके हे शंभर ते दोनशेमधले शेअर्स. टाटा कंझ्युमर, एसबीआय लाईफ, एस्बीआय कार्ड, इंडिगो, हिंदुस्तान एरोनॉटिक्स, एसीएल, टेक महिंद्रा हे ८०० ते १५०० मधले शेअर्स. हॅपीएस्ट माईंड आणि टाटा स्टीलही तेंव्हां याच रेंजमध्ये होते ते आज पंधराशेच्या पार आहेत.

इन्फोसिस, एल अँड टी, कोटक, आयआरसिटीसी, आयशर मोटर्स, गोदरेज, एचडीएफसी आणि अर्थात रिलायंस हे १५०० ते ३००० मधले शेअर्स. टीसीएस, टाटा एलेक्सआय, ब्रिटानिया हे चार हजारच्या लेवलचे शेअर्स असे चांगले शेअर्स तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असले पाहिजेत.

यातील काही शेअर्स तुम्ही आधी तुमच्या किटीमध्ये घ्या आणि त्यानंतर तुम्हीं सेकंड लाईन काऊंटरकडे वळा, ज्यात तुम्ही शॉर्ट टर्म किँवा मीडियम टर्म गुंतवणूक कराल. त्यातले काही आज लहान असणारे नक्कीच दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी मोठे होतील, पण त्यांच्याकडे जाण्याआधी आज जे मोठे आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष का?

कधीकधी, व्हॅल्यू शोधण्याच्या नादात चांगलं समोर असतानाही आपण स्वस्त स्वस्त करत बसतो आणि आज महाग वाटणारे अजून महाग होऊन जाते. बजाज फायनान्स मागच्या वर्षी १९०० होता, आज आठ हजार आहे. टी सी एस १९०० होता आज ४००० आहे. लक्षात घ्या, चांगलं स्वस्त मिळत नाही आणि चांगलं दिवसेंदिवस अधिक महाग होत जाणारच आहे. त्यामुळे महाग आहे म्हणून चांगले खरेदी न करण्याचा हट्ट सोडा. यासाठीच दर महिन्याला किमान ठराविक रक्कम गुंतवण्याची शिस्त पाळली पाहिजे. ही शिस्त असावी म्हणून ‘प्रबोधक ५०००’ क्लब आपण सूरू केला.

एवढ्या दोन वर्षात सेन्सेक्स वाढत असताना, आता पडेल, नंतर पडेल असे म्हणत लोकांना घाबरवत राहणारी एक जमातसुद्धा कार्यरत होती. अर्थात त्यात ज्यांचा मार्केटशी काही संबंध नाही अशीही लोकं होती. काही जन्मजन्मंतरीचे नकारात्मक असतात अशी होती. काही खरंच घाबरून मागे राहिले. त्यांच्या नाकावर टिच्चून बैल उधळत गेला. १९९० मध्ये ४,००० असणारा सेन्सेक्स आज ६०,००० आहे.

अर्थव्यवस्थेत काहीच नाही म्हणून गेला का? मागच्या सत्तर वर्षात देशात काहीच घडले नाही म्हणून वाढला का? नुसत्या टिप्सवर वाढला का? हर्षद मेहताने वाढवला का? नाही. भारतीय अर्थव्यवस्थेचे फंडामेंटल तगडे आहेत म्हणून वाढला. आमच्या देशी कंपन्या फार छान घडवत गेल्या स्वत:ला म्हणून वाढला. एकवेळ परदेशी कंपन्या बाहेर काढा. नुसत्या देशी कंपन्या पहा. त्यांनीही मस्त व्हॅल्यू क्रिएट केली आहे. नाही का? त्यावर विश्वास ठेवा.

मार्केट म्हटले की वाढणे कमी होणे आले आणि खरं सांगायचं तर वाढल्यानंतर थोडे खाली येणे चांगले. मार्केटच्या आरोग्यासाठी चांगले असते ते, पण प्रत्येक वेळी प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यात मर्दांगी असत नाही. यासाठीच दर महिना गुंतवणुकीची शिस्त हवी. मार्केट पडो, वाढो आपले एकला चालो रे चालू आहे. असो, सेन्सेक्स साठ हजार वर गेल्याच्या सर्व गुंतवणुकदारांना शुभेच्छा आणि मार्केट आता पडेल, नंतर पडेल म्हणून जे अजून सुकेच राहिलेत, त्यांनी आमच्या देवगडच्या पडेल कॅन्टीनला जाऊन मस्त चहा प्या आणि घरी जाऊन झोपा.

– हर्षद माने
९९६७७०६१५०

शेअर मार्केटविषयी इतर लेख वाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?