आयुष्यभर कष्ट केलेल्या आईला सोन्याचे दिन दाखवणारा शंकर

जगण्याची तीव्र इच्छा तुम्हाला सगळ्या कठीण काळातून बाहेर काढते; जगणे महत्त्वाचे आहे. स्पर्धा करू नका. प्रत्येकाचा प्रवास वेगवेगळ्या टप्प्यांवर सुरू होतो. आजच्यापेक्षा उद्या जास्त चांगला कसा बनेल यावर सतत काम करत राहा, मग कोणी हरणार नाही…

पुण्याचे उद्योजक शंकर चव्हाण यांचे हे वरील विचार प्रत्येकासाठी प्रेरणादायक आहेत. आपण कुठे जन्म घ्यावा हे आपल्या हातात नसले तरी आपला भविष्यकाळ कसा घडवावा हे मात्र आपल्या हातात नक्कीच आहे. मोलमजुरी करणार्‍या एका गरीब कुटुंबात शंकरचा जन्म झाला. बालपण झोपडपट्टीत गेले. महानगरपालिकेच्या शाळेत शिकत असताना वाचनाची गोडी लागली आणि व्यसन, मारामारी अशा गोष्टींपासून ते दूर राहिले.

लहान वयात घरात लागोपाठ मृत्यू पाहिले. त्या धक्क्यातून वडील सावरले नाहीत. पोटच्या मुलीच्या मृत्यूचे दुःख बाजूला ठेवून आई मात्र बाकी मुलांसाठी खंबीरपणे उभी राहिली आणि तिला मदत म्हणून शंकरसुद्धा मिळेल ती कामं करू लागला.

दहावीपर्यंत शिक्षण झाल्यावर घरच्यांच्या आग्रहास्तव शंकर यांनी आयटीआयमध्ये प्रवेश घेतला. मोलमजुरी करणार्‍या कुटुंबातील मुलगा एवढे शिकला याचे घरच्यांना खूप कौतुक होते. पुढे एका कंपनीत नोकरी लागली. साहेबी नोकरी यापूर्वी कधीच कोणी त्यांच्या घरात केली नव्हती त्यामुळे घरच्यांना कौतुक आणि आनंद दोन्ही होते

वयाच्या अठराव्या वर्षीच नोकरी लागली; पण त्यांचे मन रमत नव्हते. जीव घुसमटत होता. शाळेत असताना अग्रेसर असलेला मुलगा बुजत चालला, मन मारून जगत होता; पण वेळच येत नव्हती स्वतःच काही सुरू करायची आणि एक दिवस आला आणि एका छोट्या घटनेने शंकर नोकरी सोडून व्यवसायात उतरला.

नोकरीसोबत शिक्षण सुरू केले त्या वेळी एकदा पूर्वसूचना देऊनही सुट्टी मिळाली नाही. त्यामुळे ही गोष्ट मनाला लागली आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करायचे त्यांनी पक्के केले. स्वतचा छोटासा निर्णयसुद्धा आपण आपल्या मर्जीने घेऊ शकत नाही, ही गोष्ट मनाला सलली.

अजून एक म्हणजे शंकर काही मित्रांसोबत रात्री मसालादूध प्यायला जायचे त्याच्या गाडीचा मसाला दुधाचा धंदा यांच्या पगारापेक्षा चारपट कमाई करून देत होता; तेही केवळ चार तास काम करून. बाहेरून येऊन धंदा टाकणार्‍याकडे कुठे असते आर्थिक पाठबळ; पण तो करतोच की व्यवसाय. मग आपण का नाही? या विचारांनी नोकरी सोडून उद्योगात उतरण्याचा विचार अजूनच पक्का झाला.

नोकरी सोडली, असे घरच्यांना सांगू शकत नाही. त्यामुळे त्यांना सातार्‍याला बदली झाली सांगून एक मित्राच्या मदतीने धंद्याला सुरुवात केली. अत्यल्प भांडवलात जुजबी माहिती गोळा करून मसाला दुधाची हातगाडी सुरू करून व्यवसायात पाऊल टाकले. कोणताही अभ्यास न करता, अनुभवाअभावी सुरू केलेला उद्योग उभा राहण्या ऐवजी कोसळला. नोकरी गेली, उद्योगही बुडाला.

आता एव्हाना कुटुंब, नातेवाईक यांनाही कळले होते की मी नोकरी सोडलीय. त्यामुळे तेही नाराज झाले माझ्यापासून दूर झाले. तरीही मी माघार घेतली नाही. रस्त्यावर हातगाडी टाकून केलेला व्यवसाय चालला नाही आता हॉटेल टाकून पाहू असे ठरवून होती नव्हती तेवढी जमापुंजी यात गुंतवली. यातही अपयश आले.

दोन वर्षं हा संघर्ष चालूच होता. यामुळे पूर्ण कोलमडून पडलो, खूप नैराश्य आले आणि पळवाटा शोधू लागलो. सगळे सोडून दिले. या काळात विचार करायची संधी मिळाली. यातून पुन्हा एकदा स्वतःला संधी द्यायचे ठरवले.

या वेळी मात्र अगोदर जागा नीट शोधली. कॉलेजच्या परिसरात मसालादुधाची पुन्हा गाडी सुरू केली. गाडीच्या प्रेझेन्टेशनवर काम केले. रंगसंगती, प्रकाश वाढवला. दूध बदलले. उत्तम प्रतीचे दूध घेऊ लागलो. सगळ्यात महत्त्वाचे माझा दृष्टिकोन बदलला, सकारात्मकता वाढली. अशी ही दुनियादारी पाहत मोठा झालो म्हणूनच नाव दिले ‘दुनियादारी कट्टा’.

या नावाशी आत्मीयता निर्माण झाली आणि मग मात्र व्यवसायात जम बसू लागला. आता मात्र ‘दुनियादारी कट्टा’ ही फक्त अक्षरे नाहीत, तर ही साडेसात अक्षरे माझ्या आयुष्याचा श्वास आहेत. नुकसान झाले तरी मी त्याला धक्का लागेल असे काही करणार नाही, या आत्मविश्वासाने पुन्हा श्रीगणेशा केला, असे शंकर सांगतात.

माझ्या या संघर्षाच्या काळाने मला खूप काही शिकवले. व्यवसायात फक्त पैसाच नाही तर आत्मसन्मानही हवा. मग पुढचे पाऊल टाकले आणि हॉटेल सुरू केले. आता पोहे, बनमस्का, मसाला दूध, चहा याचा दुनियादारी कट्ट्यावर आस्वाद घ्यायला नक्की या, असे शंकर सांगतात. सोबत कुल्फीची फॅक्टरीपण होती.

कुटुंब व्यवसायात साथ देऊ लागले तर त्याचा व्यवसायाला फायदा होतो. शंकर यांना आई, बायको, भाचा यांची साथ मिळाली आणि त्यांच्यासाठी एक गृहोद्योग सुरू झाला. ते घरून बनमस्का बनवू लागले. बनमस्का हॉटेलवर ठेवला. इतर ठिकाणीही वितरण सुरू केले. सध्या रोज ५०० बन आजूबाजूच्या परिसरांत पाठवतो. हाच आकडा आता २००० वर न्यायचे टार्गेट आहे.

जम बसला आणि आता लगेचच कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाले आणि पुन्हा एक संकट उभे राहिले. पूर्वी मसाला दूध ३५०० कप विकायचो, आता १००० कप वर आलोय. पुन्हा एकदा विचार करायला वेळ मिळाला. चुका सुधारायला वेळ मिळाला. मी या काळात ट्रेडमार्क, कागदपत्रे यांची पूर्तता केली. आपला व्याप किती वाढवावा हेही शिकलो. तोट्यात असलेल्या कुल्फी फॅक्टरीत मी अडकलो होतो.

मी ती बंद केली आणि माझ्या मुख्य व्यवसायावर लक्ष दिले. माझी फॅक्टरी बंद झाली, हॉटेल बंद झाले पण दोन दुकानं चालू होती, मी चालत राहिलो. दोन महिन्यांपूर्वी मी गाळात होतो. आता पूर्ण बाहेर आलो. भरमसाट फ्रँचांइज चालू करणे हे माझे लक्ष्य नाही, तर चालू केलेल्या बंद पडू नयेत हे लक्ष्य आहे.

व्यावसायिकाने जागेची निवड करताना चोखंदळ असावे असे त्यांना वाटते. गर्दीच्या ठिकाणी स्पर्धाचे होते आणि व्यवसायाचे नुकसान होते. त्यामुळे याची काळजी घ्यावी. जिथे उभे राहाल तिथे तुमचे छोटे का होईना; पण साम्राज्य उभारा. माऊथ पब्लिसिटी, तरुण वर्गाची आवड आणि त्यांचा सोशल मीडिया याचाही चांगला उपयोग उद्योगात करून घेतला, असे ते सांगतात. माझी फ्रँचाइज घेणार्‍याचा दुहेरी फायदा आहे, कारण चहा आणि मसाला दूध मिळते. दिवसभर चहा आणि रात्री आठच्या पुढे मसाला दूध. यामुळे दुहेरी फायदा.

शंकर चव्हाण सुरुवातीला ४ हजार कमवायचे. आता ४ लाखांची फ्रँचाईज देतात. हा इथंपर्यंतचा प्रवास अगदी नाट्यमय आहे. ते सांगतात, हे शक्य झाले वाचनाच्या आवडीमुळे. कठीण प्रसंगात पुस्तकांनी साथ दिली. बुद्धीवर खर्च करा म्हणजे प्रगतीपथावर पोहोचाल. आंधळेपणे उद्योगात उतरू नका.

शिका, जमल्यास ज्या व्यवसायात तुम्ही उतरू इच्छिता त्या व्यवसायात काम करून अनुभव घ्या. आपण उद्योग सुरू केला म्हणून उद्योजक होतोच असे नाही. उलट पावलापूर्ती वाट मिळाली तर चालत राहावे, पुढे रस्ता नक्की सापडतो. हा त्यांचा विश्वास नव्याने उद्योगात येणार्‍याला प्रेरणा देईल.

संपर्क : शंकर चव्हाण – 8888163023

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?