Advertisement
उद्योगसंधी

शेअरबाजार एक सुवर्णसंधी

फक्त रु. ५०० मध्ये 'स्मार्ट उद्योजक' प्रिंट मासिक घरपोच मिळवा.

Book Now: https://imjo.in/Xx7Uq6

Print this Page

भारतीय शेअरबाजार हा जगातील एक सर्वात जुन्या शेअरबाजारांपैकी एक आहे. ज्याची सुरुवात सन 1875 साली मुंबई इथे काही व्यापारी आणि दलाल यांनी एकत्र येऊन बनवली. त्याला त्यांनी ‘बॉम्बे स्टॉक एक्सचेंज’ (BSE) हे नाव दिले. त्या काळी हे सर्व लोक एका वडाच्या झाडाखाली एकत्र बसत आणि शेअर खरेदी-विक्रीचे व्यवहार करत. त्यानंतर त्यांना मोठ्या जागेची गरज पडू लागली आणि नंतर एका भव्य अशा इमारतीत त्यांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार करू लागले. या जागेला आज दलाल स्ट्रीट असेही म्हणतात. त्यानंतर 31 ऑगस्ट 1957 साली यांना भारत सरकारचीपण कायदेशीर अनुमती मिळाली.

नंतरच्या काळात जसजसा लोकांचा याकडे कल वाढू लागला. त्यानंतर भारत सरकारने या सर्वाना नियंत्रणात ठेवण्यासाठी 1988 साली ‘सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबी’ची स्थापना झाली.  सन 1992 साली ‘नॅशनल स्टॉक एक्सचेंज’ची (NSE) स्थापना झाली. जी पूर्णत: आधुनिक, स्वयंचलित स्क्रीन आधारित इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग सिस्टीम बनवली ज्याच्यामुळे भारतीय शेअरबाजारामध्ये खूप आमूलाग्र बदल झाले, कारण त्याआधी सर्व व्यवहार हे कागदोपत्री केले जायचे आणि जे खूप जिकिरीचे आणि किचकट काम होते. वेळखाऊपण असे. यानंतर  लोकांचा यांच्याकडे असणारा कल वाढला. येथूनच भारतीय अर्थव्यवस्थेची जागतिकीकरणाचीपण सुरुवात झाली होती. आज आपल्या शेअरबाजाराची जगातील एका सर्वोत्तम वेगवान शेअरबाजारमध्ये गणना केली जाते.

सेबी ही भारत सरकारची एक संस्था आहे जी शेअरबाजारमध्ये सर्वांच्यावर लक्ष ठेवण्याचे काम करते आणि योग्य ते कायदे आणि नियम बनवते. भारतामध्ये 21 एक्सचेंज आहेत, ज्यामध्ये  NSE  आणि BSE सर्वात मोठ्या आहेत ज्यावर सर्वात जास्त शेअर्स व्यवहार केले जातात. BSE ही काही मोठ्या ब्रोकर लोकांनी एकत्र येऊन बनवली आहे आणि NSE ही सरकारी मालकीची आहे ज्यावर सर्वात जास्त व्यवहार केले जातात. MCX आणि NCDEX वर कॉमोडिटीचे व्यवहार केले जातात.

शेअरबाजारमध्ये कंपनीला जर त्यांची शेअर नोंदणी करायची असेल तर त्यांना प्राथमिक समभाग विक्री (IPO) द्वारे प्रायमरी मार्केटमध्ये शेअरविक्री करतात आणि नंतर हे शेअर NSE आणि BSE वर नोंद केले जातात आणि त्यानंतर त्यांची नियमित खरेदी-विक्री केली जाते. यालाच सेकंडरी मार्केट असेही म्हणतात. शेअरबाजारामध्ये कंपन्यांची तुलना त्यांचा बाजार भांडवलानुसार केली जाते. यालाच लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप आणि पेनी कॅप असेही म्हटले जाते. या सर्व कंपन्या त्यांच्या सेक्टरप्रमाणे नोंद असतात. जसे की बँक सेक्टर, IT सेक्टर, ऑटो सेक्टर, फार्मा सेक्टर, FMCG इ.


Paytm वापरकर्त्यांसाठी बंपर ऑफर

'स्मार्ट उद्योजक' मासिकाची वार्षिक डिजिटल वर्गणी

Paytm वर मिळवा आता फक्त ₹५० मध्ये.


या सर्वांमध्ये ज्या चांगल्या कंपन्या असतात त्या निर्देशांकात नोंद केल्या जातात. जसे की BSE चा निर्देशांक हा 30 सर्वोत्तम कंपनींवरून काढला जातो यालाच सेन्सेक्स असे म्हणतात. NSE चा निर्देशांक हा सर्वोत्तम 50 कंपन्यांवरून काढला जातो यालाच निफ्टी किंवा निफ्टी-50 असेही बोलले जाते. निर्देशांकामधे सर्व सेक्टरमधील कंपन्या असतात. याच कंपन्या बाकीच्या कंपन्यांचे प्रतिनिधित्व करतात आणि यावरून आपण दोन्ही निर्देशांकांमधे होणारे चढ-उतार मोजले जातात.

NSE आणि BSE ची निर्देशांक मोजणीची सुरुवात झाल्यापासून आजपर्यंत निर्देशाकांनी खूप मोठी मजल मारली आहे. याच वर्षी निफ्टीने 11,752 आणि  सेन्सेक्सने 38,896 अंकांची ऐतिहासिक वाढ नोंदवली आणि येणार्‍या काळामध्ये अजूनही खूप वाढ होत राहणार आहे. या आजपर्यंतच्या काळामध्ये मार्केटने खूप सारे चढउतारपण पाहिले जसे की हर्षद मेहता आणि केतन पारेख यांचे घोटाळे, टेलिकॉम बबल, 2008 ची जागतिक मंदी अशा वेळी बाजार खूप पडले पण ते तेवढ्याच लवकर सावरले पण.

शेअरबाजारावर खूप सार्‍या घटनांचे परिणाम होत असतात. जसे की कंपनीच्या उत्पन्नात होणारी वाढ-घट, राजकीय आणि जागतिक घडामोडी, कंपनीमध्ये होणारे घोटाळे, तेलाच्या आणि डॉलरच्या किमतीत होणारे चढउतार, जागतिक युद्ध या सर्व घटनांमुळे शेअरच्या किमतीमध्ये आणि निर्देशांकामध्ये खूप सारे बदल होतात.

भारतीय शेअरबाजार जगातील सर्वात जास्त उलाढाल असणार्‍या प्रथम दहा बाजारांपैकी एक आहे. भारतीय शेअर्स बाजाराची जगातील विश्वसनीय शेअर्स बाजार म्हणून ओळख आहे. देशाची आर्थिक महासत्तेच्या दिशेने होणारी वाटचाल, GDP मध्ये होणारी वाढ आणि आपण जागतिकीकरणाचा घेतलेला ध्यास या सर्वांमुळे परकीय वित्तसंस्थांकडून FDI आणि FII च्या द्वारे भारतामध्ये सातत्याने गुंतवणूक वाढवली जात आहे. भारतीय लोकांचा गुंतवणुकीकडे वाढलेला कल आणि या सर्वामुळे म्युच्युअल  फंड आणि इन्शुरन्स कंपन्यांद्वारे दिवसेंदिवस बाजारमध्ये केली जाणारी गुंतवणूक या सर्वांमुळे आपले शेअरबाजार दिवसेंदिवस नवनवीन उच्चांक गाठत आहेत आणि हेच आपल्या प्रगतीचे द्योतकपण आहे.

शेअरबाजाराने आजपर्यंतच्या प्रवासात खूप सारे चांगले परतावे दिले आहेत. जसे की विप्रो, इन्फोसिस, रॉयल एन्गफिएल्ड, MRF आणि अशा खूप सार्‍या कंपन्या आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे आणि अशापण कंपन्या आहेत ज्यात त्यांचे नुकसानपण झाले आहे; पण शेअरमार्केटमध्ये या गोष्टी होत राहणारच. ह्यासाठी आपणास योग्य वेळी एन्ट्री आणि एक्झिट समजली पाहिजे. त्यासाठी शेअरमार्केटचे ज्ञान असणे पण खूप महत्त्वाचे आहे. ह्यासाठी आपण शेअरबाजाराविषयी बेसिक, टेक्निकल आणि फंडामेंटल गोष्टी शिकल्या पाहिजेत आणि योग्य वेळी खरेदी-विक्री केली पाहिजे.

कंपनीच्या शेअरमध्ये होणारे चढउतार हे कंपनीच्या होणार्‍या नफा आणि नुकसान यावरपण आधारित असते. जसे की कंपन्या त्यांचे तिमाही आणि वार्षिक निकाल जाहीर करतात. यामध्ये कंपनीच्या स्थितीची जाणीव होते; त्यांचे पुढचे प्लॅन समजतात तसेच नफा आणि नुकसानपण समजते आणि हे पाहून पण गुंतवणूकदार त्यांच्या शेअरची खरेदी-विक्री करत असतात.

जे गुंतवणूकदार दीर्घ काळासाठी शेअर खरेदी करतात त्यांना त्याचे आणखीन फायदेपण असतात. जसे की कंपन्या दरवर्षी होणार्‍या प्रॉफिटमधून तिच्या गुंतवणूकदारांना तो प्रॉफिट काही प्रमाणात डिव्हिडंडच्या रूपाने वाटतात जो की टॅक्स फ्री असतो तसेच काही कंपन्या तिच्या भागधारकांना बोनस शेअरपण देतात. जेव्हा कंपनी आपले शेअरचे दुभाजन करते तेव्हा तिच्या भागदारकांचे शेअरपण त्या पटीने वाढतात आणि ह्यांच्यामुळे गुंतवणूकदारांना अजून फायदा होण्यास मदत होते. जर आपण 8-10 वर्षांचा विचार केला तर शेअर मार्केटने सरासरी 12-15 टक्क्यांचा परतावापण दिला आहे जो की नक्कीच आशादायी आहे.

जर संपूर्ण देशाचा विचार केला तर भारतीय व्यक्तीचे गुंतवणुकीचे प्रमाण फक्त 4-5 टक्के आहे, जे की जगाचा विचार केला तर अगदीच नगण्य आहे आणि ह्यामध्ये मराठी माणूस तर अगदीच नगण्य आहे. आपण बँकांमध्ये FD करतो, पण आपण बँकांचे शेअर घेण्यास तयार नसतो. आपण कंपन्यांचे प्रॉडक्ट्स रोज वापरतो, पण आपणास त्यांचे शेअर नको वाटतात. कारण अजूनही बरेचसे लोक शेअरबाजाराला एक चांगला गुंतवणूक पर्याय मानत नाहीत, कारण लोकांचे शेअरमार्केटविषयी असलेले गैरसमज व अज्ञान यामुळे लोक याला एक सट्टाबाजार समजतात, परंतु जर आपण पैशाचे व्यवस्थित नियोजन करून गुंतवणूक केली तर आपणपण यामध्ये खूप सारे पैसे मिळवू शकतो आणि शेअरबाजार हा आपल्या उत्पन्नाचे एक दुय्यम साधन बनवू शकतो.

भारतीय शेअरबाजारामध्ये गुंतवणुकीद्वारे पैसे कमावण्याची  अजून  खूप सारी संधी आहे. जर आपण बोलतो की, भारत ही एक आर्थिक महासत्ता होणार तर मग आपल्या देशातील कंपन्यांच्या उत्पन्नात वाढ होणारच, त्यांची ग्रोथपण होणार आणि या सर्वांमुळे आपले निर्देशांकपण नवनवीन विक्रम करत राहणार; पण जर आपल्याला ह्या संधीचा फायदा घ्यायचा असेल तर शेअरबाजार समजून घेऊन योग्य असे मार्गदर्शन घेऊन एक चांगली गुंतवणूक करू शकता आणि आपण जर आज उद्या करत राहिलो तर याकडे बघण्याशिवाय काय पर्याय राहणार नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना आधी स्वतः शिका आणि त्यानंतरच सुरुवात करा.

– शंभूराज खामकर
9822500374

FREE NEWSLETTER ON WHATSAPP

व्यवसाय आणि उद्योजकतेविषयी माहिती व घडामोडी आपल्या WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ या क्रमांकावर आपले नाव सध्या राहत असलेला जिल्हा व तालुका WhatsApp करा.

Help-Desk
%d bloggers like this: