शालेय जीवनातच व्यवसाय शिक्षण देणारी नाशिकची ही शाळा

सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानअंतर्गत राज्यातील ५१४ शासकीय माध्यमिक शाळांमध्ये व्यवसाय शिक्षण दिले जात आहे. यात प्रामुख्याने मल्टी स्किल फाऊंडेशन कोर्स, ब्युटी आणि वेलनेस, स्पोर्ट्स हेल्थकेअर, रिटेल, ऑटोमोबाइल, मीडिया आणि एण्टरटेंनमेंट, ट्रॅव्हल आणि टुरिझम, अ‍ॅग्रिकल्चर, बँकिंग आणि फायनान्स हे दहा अभ्यासक्रम शिकविले जातात.

इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना हे शिक्षण दिले जाते. इयत्ता नववी व दहावीसाठी हिंदी किंवा समाजशास्त्र या विषयाला व इयत्ता अकरावी व बारावीसाठी जीवशास्त्र किंवा राज्यशास्त्र या विषयाला पर्याय म्हणून व्यवसाय शिक्षण हा विषय शिकविला जातो.

या विषयात सत्तर गुणांचे प्रात्यक्षिक व तीस गुणांची लेखी परीक्षा घेतली जाते. इयत्ता दहावी व बारावीमध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत परीक्षा घेतली जाते. कमीत कमी पंधरा व जास्तीत जास्त पंचवीस विद्यार्थी या अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकतात.

वरील दहा अभ्यासक्रमांपैकी कोणतेही दोन अभ्यासक्रम प्रत्येक शाळेत सुरू आहेत. इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमाचे विभाजन लेव्हल १ ते लेव्हल ४ असे केले आहे. चारही लेव्हल यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांस केंद्र सरकारतर्फे प्रमाणपत्र दिले जाते.

या प्रमाणपत्राच्या आधारे व्यवसाय किंवा स्वयंरोजगार सुरू करावयाचा असल्यास सरकारतर्फे पाच लाखांपर्यंत अर्थसाहाय्य दिले जाते. तसेच उच्च शिक्षण घ्यावयाचे असल्यास शासकीय तसेच खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत २५ टक्के व शासकीय तसेच खासगी तंत्रनिकेतनमध्ये १५ टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.

मल्टी स्किल या अभ्यासक्रमांतर्गत पाच विषय शिकविले जातात. त्यात अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान, कार्यशाळा तंत्रज्ञान, ऊर्जा व पर्यावरण, वैयक्तिक आरोग्य व स्वच्छता आणि बागकाम व शेती तंत्रज्ञान या विषयांचा समावेश आहे. शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा, कनाशी, ता. कळवण, जि. नाशिक येथे मल्टी स्किल व ब्युटी आणि वेलनेस हे दोन अभ्यासक्रम शिकविले जातात.

मल्टी स्किल अभ्यासक्रमांतर्गत येणार्‍या अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान या विषयांत अन्नप्रक्रिया संदर्भात वेगवेगळे अन्नपदार्थ कसे तयार करायचे? कॉस्टिंग कशी काढायची? आणि त्याची पॅकिंग व विक्री करून नफा कसा मिळवायचा? याचे प्रशिक्षण दिले जाते.

या अभ्यासक्रमात पापड, लोणची, बिस्किटे, टोमॅटो सॉस, फ्रुटजाम, पाव, शेंगदाणे चिक्की, तीळ चिक्की, तीळ लाडू, पॉपकॉर्न, दाबेली, ओली भेळ, पाववडा, पाणीपुरी, वडापाव, खारे शेंगदाणे आदी पदार्थ कसे तयार करावे याचे प्रशिक्षण दिले जाते.

व्यवसाय प्रशिक्षण देताना फक्त वर्गात फळ्यावर शिकवून किंवा अन्नपदार्थ कसा करावा याचे प्रात्यक्षिक देणे अपेक्षित नाही. म्हणून मनात विचार आला की, मोठ्या प्रमाणात अन्नपदार्थ बनवायचे कसे व त्याची पॅकिंग करून प्रत्यक्ष विक्री कशी करायची? नफा कसा मिळवायचा?

हे जर विद्यार्थ्यांना शिकविले तर ते त्यांना जास्त उपयोगी पडेल. राज्यात सर्वप्रथम मल्टी स्किल या व्यवसाय शिक्षण या विषयांतर्गत एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्नपदार्थ तयार करून व त्यांचे स्टॉल लावून व त्यांची विक्री करून विद्यार्थिनींनी १०० टक्के नफा मिळविला आहे.

उपक्रमाची गरज व महत्त्व: सरकारी तसेच खासगी नोकर्‍यांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. माध्यमिक शाळेतच विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे व्यवसाय शिक्षण उपलब्ध करून दिल्यास त्यामधून निश्चितच व्यावसायिक, उद्योजक तयार होतील हाच हेतू समोर ठेवून शासनाने व्यवसाय शिक्षण योजना सुरू केली आहे. इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षण देऊन त्यांना व्यवसाय करण्यासाठी सक्षम बनविणे हाच या योजनेमागील हेतू आहे.

एकंदरीतच व्यवसाय शिक्षण ही काळाची गरज असून ती राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाने पूर्ण केली आहे. यातूनच भविष्यात नवीन उद्योजक निर्माण होतील यात तिळमात्र शंका नाही. पदार्थ तयार करून स्वतः खाणे यापेक्षा पुढे जाऊन मोठ्या प्रमाणात अन्नपदार्थ तयार करून त्यांची विक्री केल्यास निश्चितच व्यवसाय कसा करावा हे शिकतात. राज्यात प्रथमच अशा प्रकारचा उपक्रम व्यवसाय शिक्षणअंतर्गत मी आमच्या शाळेत राबविला आहे.

अन्नपदार्थांचा स्टॉल लावण्याअगोदर त्याची पूर्वतयारी आठ दिवस आधीपासूनच सुरू केली होती. नियोजनात प्रथम प्रत्येक इयत्तेसाठी कोणता स्टॉल लावायचा याचे नियोजन केले. त्यात नववीच्या वर्गासाठी पॉपकॉर्न व पाणीपुरी; दहावीच्या वर्गासाठी ओली भेळ व पाणीपुरी; अकरावीच्या वर्गासाठी दाबेली व पाणीपुरी असे नियोजन केले. त्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला कामाची वाटणी केली. स्टॉलसाठी आवश्यक असणारा कच्चा माल स्वतः उपलब्ध करून दिला.

अन्नपदार्थ तयार करण्यासाठी लागणार्‍या साहित्याची जमवाजमव केली. अन्नपदार्थ कसे तयार करावे? कसे पॅकिंग करावे? विक्री कशी करावी? आर्थिक व्यवहार कसा करावा? याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना वर्गात दिले गेले. त्या त्या कामासाठी विद्यार्थ्यांचे गट तयार केले. वर्गात त्यांच्या कामाचे प्रात्यक्षिक करवून घेतले.

यात प्रत्येक विद्यार्थ्याला सर्व प्रकारचे प्रशिक्षण सर्वप्रथम दिले जाते. त्यानंतर नेमून दिलेल्या व्यवसायांत तो कार्य करतो. खाली उल्लेखलेल्या सहा विविध व्यवसायाचे सहा रजिस्टर (वही) तयार केले असून त्यात प्रत्येक व्यवसायासाठी दहा विद्यार्थिनींची निवड केली आहे. वहीच्या प्रथम पानावर दहा विद्यार्थिनींची नावे लिहून त्या व्यवसायाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली जाते.

विक्री झाल्यास किंवा एखादे काम केल्यास त्यातून मिळणारी रक्कम वा मोबदला लगेच वहीमध्ये लिहिला जातो. महिन्याच्या शेवटी ३०-३१ तारखेला नफा काढला जातो. त्यांची टक्केवारी कशी काढायची ते शिकविले जाते. रेस्टॉरंटमधील कच्च्या मालासाठी लागलेला खर्च वजा एकूण जमा रक्कम यातून नफा कसा काढायचा हे शिकविले जाते.

पुढील महिन्यात दहा विद्यार्थिनींची दुसर्‍या व्यवसायासाठी त्यांच्या आवडीनुसार निवड केली जाते. असे सहा महिन्यांत खालील सहा प्रकारचे व्यवसाय शिकविले जातात. सर्व विद्यार्थिनी प्रामाणिकपणे सर्व सहाही व्यवसाय करतात. अशा प्रकारे खाली उल्लेख केलेले सहा व्यवसायांचे प्रशिक्षण आमच्या शाळेत दिले जाते. यशस्वी व्यवसाय कसा करावा याचे शिक्षण विद्यार्थिनींना यातून दिले जाते.

व्यवसाय शिक्षण या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना खरे व्यवसायाचे प्रशिक्षण देणे अपेक्षित आहे. मी आमच्या शाळेत असे अनेक नवनवीन उपक्रम राबवीत आहे. त्यात खालील उपक्रम प्रामुख्याने सुरू आहेत.

मल्टी स्किल रेस्टॉरंट: विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी सुरू केलेले रेस्टॉरंट-हॉटेल. यात विद्यार्थिनी नाश्त्याचे पदार्थ जसे की चहा, पाववडा, पोहे, मिसळ, ओली भेळ, समोसे, वडापाव, इडली, उत्तप्पा आदि पदार्थ तयार करून त्यांची विक्री करतात. महिन्याच्या शेवटी महिन्याभरात किती नफा झाला? किती टक्के नफा झाला? याचा हिशोब वहीत नोंदवून तो तपासून घेतात.

मल्टी स्किल जनरल स्टोअर्स: यात विद्यार्थिनी वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेट्स, बिस्किटे, शाम्पू, मेंदी कोन, पेन, डोनेट, क्रिमरोल यांची विक्री करतात. महिनाअखेर नफा-तोटा सारणी तयार करतात.

मल्टी स्किल वर्क शॉप व इलेक्ट्रिकल सेवा: यात विद्यार्थिनी वर्कशॉपमधील साहित्यांचा वापर करून शाळेतील वस्तूंची मेकॅनिकल तसेच इलेक्ट्रिकल दुरुस्ती करतात. उदा. शाळेतील खिडक्यांना पडदे लावणे, तुटलेली पायरी दुरुस्त करणे, ध्वजारोहण ठिकाणी ओटा तयार करणे, रंग देणे, लाकडी बिजागरी, कडी बसविणे, तुटलेले बेंच दुरुस्त करणे, न्यूजपेपर स्टँड लावणे, वर्गात आरसा, घड्याळ, फोटो, पडदे, कॅलेंडर लावणे, इलेक्ट्रिकमध्ये बल्ब, ट्यूब, पंखा बसविणे किंवा दुरुस्ती करणे इत्यादी कामे विद्यार्थिनी योग्य ते मूल्य घेऊन करतात.

मल्टी स्किल वैद्यकीय सेवा: यात विद्यार्थिनी शिक्षकांचा तसेच विद्यार्थिनीचा रक्तदाब तपासून देतात. तसेच वजन करणे, हृदयाचे ठोके मोजणे, शरीरातील ताप चेक करणे, जखमेवर मलमपट्टी करणे आदी कामे करतात. विद्यार्थिनींना सर्व प्रकारचे मानवी रोग, आजार, त्यांची लक्षणे, त्यावरील उपचार, आजार होण्याची कारणे इत्यादी माहिती शिकविली जाते.

मल्टी स्किल शेतीविषयक सेवा: विद्यार्थिनींनी शाळेच्या आवारात जमिनीवर प्लॉट तयार करून, वाफे करून तेथे मेथी, कोथिंबीर, मका, टोमॅटो, लसूण, कांदा, वांगी, भेंडी, गवार इत्यादी पिकांची लागवड करतात. शेतात पीक लागवड करून निंदनी, खुरपणी, पाणी देणे, खत देणे व पिकांची काढणी इत्यादी कामे शिकविली जातात. पीक काढल्यानंतर त्यांची विक्री केली जाते.

मल्टी स्किल को-ऑपरेटिव्ह बँक: वरील सर्व व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्थसाहाय्याची आवश्यकता असते. ती गरज येथील मल्टी स्किल बँक पूर्ण करते. मल्टी स्किल बँक म्हणजे विद्यार्थिनींनी विद्यार्थिनींसाठी सुरू केलेली बँक. या बँकेतील सर्व व्यवहार विद्यार्थिनीच बघतात. सेव्हिंग बँक अकाऊंट उघडणे, पैसे टाकणे, काढणे यांचा फॉर्म कसा भरायचा, चेक कसा लिहायचा इत्यादी प्रशिक्षण येथे दिले जाते.

इयत्ता पहिली ते बारावीच्या सुमारे ७०० विद्यार्थिनी येथील वसतिगृहात राहत असल्यामुळे त्यांच्याकडील पैसे सुरक्षित राहण्यासाठी ते बँकेत ठेवतात. बँकेत जमा झालेल्या निधीपैकी काही निधी वरील व्यवसायासाठी वापरला जातो व व्यवसायात नफा झाल्यानंतर ती रक्कम पुन्हा बँकेत ठेवली जाते.

विद्यार्थिनींनी स्वतःच्या पायावर उभे राहावे, भविष्यात स्वतःचा व्यवसाय सुरू करावा हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. तो सफल होईल यात तिळमात्र शंका नाही. अशा प्रकारचे व्यवसाय शिक्षण शालेय वयातच विद्यार्थ्यांना देणे ही एक काळाची गरज बनली आहे व ती आमच्या शाळेत योग्य ते प्रशिक्षण देऊन पूर्ण केली जाते.

निष्कर्ष / फायदे: शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना व्यवसायाचे प्रशिक्षण दिल्यास त्याचा निश्चितच त्यांना त्यांच्या भावी आयुष्यात फायदा होईल हाच हेतू समोर ठेवून या उपक्रमाची निवड करण्यात आली आहे.

आमच्या शाळेत सध्या इयत्ता नववी ते बारावीच्या ७९ विद्यार्थिनी यात सहभागी झालेल्या आहेत. शाळेतील ७९ विद्यार्थिनींना रेस्टॉरंट, वर्कशॉपमधील कामे, इलेक्ट्रिकलची कामे, वैद्यकीय ज्ञान, शेतीची कामे, बँकेतील सर्व व्यवहारांचे सखोल ज्ञान प्राप्त झाले आहे. व्यवसाय करण्यासाठी लागणारे धैर्य, हुशारी, धाडस, ज्ञान, प्रशिक्षण हे आमच्या विद्यार्थिनींनी आत्ताच पूर्णपणे आत्मसात केलेले आहे.

व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना कोणतीच अडचण येणार नाही एवढे प्रशिक्षण, ज्ञान त्यांनी मिळविले आहे. आमच्या विद्यार्थिनी भविष्यात नक्कीच व्यावसायिक, उद्योजक होतील यात तिळमात्र शंका नाही.

विद्यार्थिनींनी मकरसंक्रांतच्या दोन दिवस अगोदर तीळ लाडू तयार करून ४० पाकिटे तयार केली. प्रत्येक पाकिटाची २० रुपयांना विक्री केली. यात त्यांनी ८०० रुपयांचा व्यवसाय केला. कच्च्या मालासाठी ३०० रुपये खर्च आला होता. या व्यवसायात त्यांनी ५०० रुपये नफा मिळविला. हे बघून त्या म्हणाल्या की, आम्ही भविष्यात संक्रांतीला नक्कीच तीळ लाडू करून त्यांची विक्री करू. यातच व्यवसाय प्रशिक्षणाची यशस्विता अधोरेखित होते.

विद्यार्थिनींनी व्यवसायाचे खरे शिक्षण आत्मसात केले याचा सर्व शिक्षकांना मनस्वी आनंद झाला.

– मधुकर घायदार
(लेखक इंजिनीअर असून शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा नाशिक येथे शिक्षक आहेत.)
संपर्क : ९६२३२३७१३५ / ९८३४००३५३५

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?