
कधी कधी आयुष्यात आलेले अडथळेच आपल्याला अधिक मजबूत करतात. एक स्वप्न, त्यासाठी घेतलेली झुंज आणि हार मानली नाही तर मिळणारे यश याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘श्री इन्फ्रा’. तुषार आणि पुष्कर शेंदारकर या दोन भावांनी केवळ कष्ट, योग्य नियोजन आणि गुणवत्तेवर विश्वास ठेवत उभारलेली ही कंपनी आज इंडस्ट्रीमध्ये एक विश्वासार्ह नाव बनली आहे.
२००७ मध्ये तुषार आणि पुष्कर यांनी पहिली कंपनी सुरू केली. कौशल्य आणि मेहनतीच्या बळावर काही प्रकल्प हाताळले, पण २०१२ मध्ये त्यांना एक मोठा धक्का बसला. काही ग्राहकांकडून जवळपास ४५ लाख रुपये अडकले आणि संपूर्ण व्यवसाय संकटात सापडला.
परिस्थिती अशी आली की २०१५ ते २०१७ दरम्यान तुषार यांना नोकरी करावी लागली. मात्र मनातली उद्योजकतेची ओढ कायम होती. नोकरीत मन लागत नव्हते त्यामुळे पुन्हा एकदा व्यवसाय सुरू करायचा हे मनाशी पक्के झाले.
२०१७ मध्ये पुन्हा एकदा जोखीम घेत तुषार आणि पुष्कर यांनी फक्त दहा हजार रुपयांच्या भांडवलावर ‘श्री इन्फ्रा’ची सुरुवात केली. सुरुवातीला फॅब्रिकेशन आणि फायर फायटिंगमधली लहान लहान कामे हातात घेतली. छोट्या प्रकल्पांमधून मिळालेला अनुभव, प्रामाणिकपणा आणि वेळेत काम पूर्ण करण्याची सवय यामुळे कंपनीला हळूहळू नवे ग्राहक मिळत गेले.
२०१९ हे वर्ष टर्निंग पॉईंट ठरलं. तब्बल १ हजार ५०० टन फॅब्रिकेशनचं मोठं काम आठ महिन्यांत पूर्ण करून ‘श्री इन्फ्रा’ने आपली क्षमता दाखवून दिली. जवळपास १२५ जणांच्या टीमने रात्रंदिवस काम करून हा प्रकल्प वेळेत पूर्ण केला.

‘श्री इन्फ्रा’चे वैशिष्ट्य म्हणजे गुणवत्ता आणि वेळेचं काटेकोर नियोजन. प्रत्येक प्रोजेक्टसाठी मायक्रो-शेड्युल तयार करून त्याचं आठवड्यागणिक आणि दिवसागणिक परीक्षण केलं जातं.
कुठे विलंब झाला, तर कारणं समजून घेऊन लगेच उपाययोजना केली जाते. याशिवाय प्रकल्प सुरू असलेल्या ठिकाणच्या स्थानिक समस्या समजून घेण्यासाठी स्वतंत्र लीगल टीम तयार केली आहे. त्यामुळे इंजिनिअर आणि कामगारांना काम सुरळीतपणे करता येतं आणि प्रकल्प वेळेत पूर्ण होतो.
२०१८ पर्यंत सबकॉन्ट्रॅक्टवर काम करणारी कंपनी २०२१ पासून थेट डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट घेऊ लागली. फॅब्रिकेशन, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, प्लंबिंग याचसोबत २०२० पासून सिव्हिल कन्स्ट्रक्शनमध्येही दमदार काम सुरू झाले. ‘श्री इन्फ्रा’च्या माध्यमातून आजपर्यंत ऐंशीहून अधिक प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहेत. अंबरनाथ, रसायनी, तळोजा, पनवेलसह राजस्थान, गुजरात, दिल्ली या राज्यांमध्येही ‘श्री इन्फ्रा’ने आपली छाप सोडली आहे.
सध्या कंपनीकडे १२ कोटींचं वर्क ऑर्डर बुक असून १५-२० कोटींच्या वर्क ऑर्डर्स निगोशिएशनमध्ये आहेत. डोंबिवली येथून ‘श्री इन्फ्रा’ कंपनीचा कारभार पाहिला जातो. ४५ जणांची इनहाऊस टीम आणि शेकडो कामगारांच्या सहाय्याने ‘श्री इन्फ्रा’ देशभरात काम करते.
डिझाईनिंगमध्ये नवे तंत्रज्ञान स्वीकारत कंपनी सतत अपडेटेड राहते. आवश्यकतेनुसार आधुनिक यंत्रसामग्री वापरली जाते, पण बहुतांश काम हे मनुष्यबळावर आधारित आहे. हाच मानवी स्पर्श ‘श्री इन्फ्रा’ची खरी ताकद आहे.
📘 ‘स्मार्ट उद्योजक’ मासिकाचे वर्गणीदार व्हा
उद्योजकता, व्यवसाय मार्गदर्शन आणि लोकोपयोगी माहिती — थेट घरपोच मिळवा.
६ महिने : ₹४०० । १ वर्ष : ₹८०० । ३ वर्षे : ₹२,०००
👉 आजच वर्गणीदार व्हा!
तुषार शेंदारकर सांगतात, आम्ही फार मोठं भविष्याचं प्लॅनिंग करत नाही. मात्र आजचं काम कालपेक्षा चांगलं करण्याचं आमचं ध्येय आहे. ‘श्री इन्फ्रा’चा २०२६ पासून सरकारी प्रकल्पांमध्ये पाऊल टाकण्याचा मानस आहे. पुढील तीन वर्षांत कंपनीचा टर्नओव्हर ५० कोटींवर नेण्याचं उद्दिष्ट आहे.
‘श्री इन्फ्रा’चा प्रवास हा एका स्वप्नाचा, संघर्षाचा आणि जिद्दीचा प्रवास आहे. ४५ लाखांचे नुकसान, नोकरीतली दोन वर्ष, आणि फक्त दहा हजार रुपयांत पुन्हा केलेली सुरुवात या सगळ्या पायर्या पार करून आज कंपनीने इंडस्ट्रीमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे.
गुणवत्ता, वेळेचं भान आणि ग्राहकांच्या विश्वासावर उभारलेला हा ब्रँड भविष्यात निश्चितच आणखी मोठ्या शिखरांवर झेपावेल. ‘श्री इन्फ्रा’ ही कहाणी आहे कधीही हार न मानणार्या स्वप्नांची!
संपर्क : ९९८७०३९३५१
www.shreeinfragroup.com


