कोरोना काळात अनेक प्रस्थापित व्यवसाय कोलमडले. अनेकांचे व्यवसाय बंद पडले. अनेकांचा आत्मविश्वास धुळीला मिळाला. नव्याने व्यवसायात उतरलेल्या अनेकांच्या पायाखालची जमीनच सरकली. असे सगळे असतानाही काही लोक अडचणीतही संधी शोधतात आणि संकटाना धीराने सामोरे जातात आणि आपले साम्राज्य उभारतात.
जो कठीण काळात टिकून दाखवतो तो यशस्वी होतोच. श्रीकांत बाळासाहेब आव्हाड यांनी आपल्या लहान भाऊ प्रदीप आव्हाड यांच्या सोबतीने ‘लोटस अॅडेसिव्ह इंडस्ट्रीज’ या नावाने पॅकेजिंग इंडस्ट्रीला लागणारा कच्चा माल, गोंद तयार करणारी फॅक्टरी सुरू करून हे सिद्ध करून दाखवलं.
एकत्र कुटुंबात वाढलेले श्रीकांत नाशिक, सिन्नरमधील गोंदे गावचे. श्रीकांत यांचे वडील हे गावचे सरपंच होते. त्यांचा तीस वर्षापासून हार्डवेअरचा व्यवसाय होता. त्यामुळे लहानपणापासून व्यवसायाचे बाळकडू मिळालेल्या श्रीकांतचा कलदेखील व्यवसाय करण्याकडेच होता, पण वडील खूप गरीब परिस्थितीमधून पुढे आले. त्यांचं केवळ सातवीपर्यंत शिक्षण झालेलं होतं. त्यामुळे वडिलांची इच्छा होती की श्रीकांत हुशार आहे तर त्याने खूप शिकावं, चांगल ऑफिसर व्हावं.
श्रीकांत एम.एस्सी. कॉम्प्युटर झाल्यावर युपीएससीची तयारी करण्यासाठी दिल्लीत काही काळ राहिले. श्रीकांतलासुद्धा याची आवड होतीच. त्यामुळे जर आपण उत्तीर्ण झालो तर काही वर्ष सरकारी नोकरी करून मग व्यवसाय करायचा असा त्यांचा मानस होता, पण ते काही जुळून आलं नाही.
व्यवसाय करायचा हे पक्कं होतं, पण वडिलांचा व्यवसाय न करता काहीतरी वेगळं करायची इच्छा होती त्यामुळे शोध सुरू झाला. त्यांच्या माहितीत एक बॉक्स फॅक्टरी होती. फॅक्टरीच्या मालकाशी बोलल्यानंतर समजलं की या कामात गोंदची बर्याच मोठ्या प्रमाणात मागणी असते. श्रीकांतनी याचा अभ्यास केला आणि ‘लोटस अॅडेसिव्ह इंडस्ट्रीज’चा श्रीगणेशा केला.
२०१९ साली फॅक्टरी बांधायचे काम सुरू झाले आणि जानेवारी २०२० मध्ये आपल्या गावातच ‘लोटस अॅडेसिव्ह इंडस्ट्रीज’चे मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू केले. स्वत:च्या मालकीच्या जागेवर ३ हजार ५०० स्क्वेअर फुटवर त्यांची फॅक्टरी उभी आहे. आजूबाजूला असणारी जागा रिकामी असल्यामुळे त्यांना वापरायला भरपूर जागा आहे. साधारण वीस गुंठ्याची जागा फॅक्टरीसाठी आहे.
हे प्रॉडक्ट विविध ठिकाणी वापरले जाते. मार्केटमध्ये जे आऊटर बॉक्सेस असतात, ते बॉक्सेस तयार करताना दोन गोष्टी रॉ मटेरियल म्हणून वापरल्या जातात, एक म्हणजे पेपर रोल आणि दुसरा म्हणजे गोंद (ग्लु). तो गोंद इथे तयार होतो. दोन प्रकारचे गोंद असतात एक पेस्टिंग आणि दुसर करोगेशन. करोगेशन म्हणजे ज्यामध्ये फ्लाईंगलाईन असतात, तो पेपर स्प्रिंगसारखा फ्लाईंग केलेला असतो.
तो पेपर चिटकवण्यासाठी जो गम वापरतात त्याला करोगेशन गम असं म्हणतात. याशिवाय पेस्टिंग गम, पत्रावळीला लॅमिनेशन करण्यासाठी वापरला जाणारा गम याशिवाय पेपर बॅगसाठी लागणारा गोंदसुद्धा ते सप्लाय करतात.
श्रीकांत सांगतात, व्यवसायाची सुरुवातच वैश्विक संकटात झाली. त्यामुळे सुरुवातीपासूनच अडचणींना सामोरे जावं लागलं. या क्षेत्राशी निगडित असं माझ्याकडे काहीच ज्ञान किंवा अनुभव नव्हता. एक जमेची बाजू म्हणजे माझे शिक्षण. मॅन्युफॅक्चरिंगशी माझा संबंध नव्हता. मग एक एक गोष्ट शोधली.
पुण्यातून काही सेकंड हॅन्ड मशीनरी घेतल्या. मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी लागणारं सगळं मटेरियल जमा केल्यावर फेब्रुवारी महिन्यात पहिली बॅच घेतली. अचानक लॉकडाऊन सुरू झाला व नंतर पूर्ण मार्केटच बंद पडलं. सुरुवातीच्या माझ्या दोन-तीन ऑर्डर गेलेल्या होत्या, पण सगळे ठप्प झालं.
संकट सगळ्यांवरच कोसळलं होतं. श्रीकांत नवीन होते. आपल्याच क्षेत्रातील अनेक दिग्गज कंपन्या बंद पडतायत हे ते पाहत होते. आपण नवीन त्यामुळे करायचं काय असा प्रश्न होता, पण या कठीण काळात शांत डोक्याने त्यांनी विचार केला. फॅक्टरी बंद केली तर काम काहीच मिळणार नाही याउलट जर हळूहळू काम चालूच ठेवलं तर क्लाएंट बेस तयार होईल आणि ते त्यांना शक्यही झाले.
लॉकडाऊनचा त्यांना फायदा आणि तोटा दोन्ही झालं, पण व्यवसायाचा जम बसला. फायदा असा झाला की स्वत:च्या जागेवर फॅक्टरी असल्याने त्यांचे दरमहा लागणारे भाड्याचे पन्नास हजार रुपये वाचले होते. काही आजूबाजूच्या कंपन्यांत काम करणारे बाहेरचे कामगार होते ते निघून गेले.
श्रीकांतकडे बाहेरचे कोणी कामगार नसल्याने गावातील लोकांच्या आणि कुटुंबाच्या मदतीने त्यांनी काम चालू ठेवले. मेडिसिन पॅकिंगसाठी बॉक्स आवश्यक होते त्याशिवाय जीवनावश्यक लागणार्या वस्तू पॅक करण्यासाठीसुद्धा बॉक्सची गरज पडत होती. मग त्यांनी अशा बॉक्स कंपन्यांना आपला माल सप्लाय करायला सुरुवात केली.
सर्वसाधारणपणे प्रॉडक्ट प्रथम तपासून बघितलं जातं मग फायनल होतं, पण लॉकडाऊनच्या काळात आजूबाजूच्या सगळ्या फॅक्टर्या बंद पडल्या होत्या, फक्त ‘लोटस अॅडेसिव्ह इंडस्ट्रीज’मधून माल सप्लाय होत होता म्हणून मग डायरेक्ट ऑर्डर यायला सुरुवात झाली. या काळात कंपनी बंद पडली नाही, पण ज्या वेगाने प्रगती व्हायला हवी होती तीही झाली नाही.
याच दरम्यान पंधरा लाखांचं नुकसानही झालं. ज्या फॅक्टरीना माल सप्लाय केला, त्यातल्या काही फॅक्टर्या बंद पडल्या त्यामुळे मालाचे पैसे रिकव्हर झाले नाहीत. झालेल्या नुकसानाचा विचार करत मागे वळून व्यवसाय बंद करण्यापेक्षा जे आहे त्यात पुढे काहीतरी होईल या उद्देशाने काम चालूच ठेवलं.
धंद्यात स्पर्धा खूप आहे, पण प्रतिस्पर्ध्याला मात द्यायची आणि तग धरून राहायचं हेच खरं धंद्यात टिकण्याचं सूत्र. श्रीकांत सांगतात, माझ्यावर दबाव तंत्र वापरले गेले पण मी ठरवलं होतं आपण क्वालिटीवर काम करू. सर्व्हिसला आमच्याकडे खूप जास्त महत्त्व आहे. आम्ही वेळेच्या वेळी डिलिव्हरी करतो. उत्तम क्वालिटीमुळे चांगल्या ऑर्डर मिळू लागल्या आणि त्यातून चांगला प्रॉफिट होऊ लागला. क्वालिटी चांगली असल्याने समोरची पार्टीसुद्धा खुश होते.
आज माझ्यासोबत सहा लोकांची टीम काम करतेय. आम्ही मागच्या वर्षी सव्वा कोटी टर्नओव्हर केला. या वर्षी आम्ही दोन कोटीपर्यंत नेऊ. ‘लोटस अॅडेसिव्ह इंडस्ट्रीज’चे कर्नाटक, पुणे, धुळे, नाशिक, संगमनेर, सिन्नरमधले एमआयडीसी, निफाड, पिंपळगाव, कोपरगाव येथे प्रॉडक्ट जाते.
भविष्यात प्रॉडक्ट एक्स्पोर्ट करायचा त्यांचा मानस आहे. त्यासाठी बांगलादेश, नेपाळ येथे चांगली बाजारपेठ उपलब्ध आहे. याचसाठी पुढच्या पाच वर्षात भारतभर आपलं प्रॉडक्ट पोहचेल असा त्यांचा प्रयत्न आहे. तर यासाठी लागणारी डेडिकेटेड लॅब त्यांच्याकडे आहे. आवश्यक ते रिपोर्ट, इक्विपमेंट, सर्टिफिकेशन आहेत. ‘झिरो इफेक्ट, झिरो डिफेक्ट’साठी झेड सर्टिफिकेशन घेतले आहे. तर आता आयएसओ सर्टिफिकेशन हवे तर त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.
श्रीकांतना सुरुवातीला एकही फॅक्टरीत कसे काम चालते हे पाहता आले नाही, पण या व्यवसायात नव्याने कोणी यायचे असेल तर श्रीकांत त्यांना नक्कीच मदत करतील. सुरुवातीला एक ते दीड करोडच भांडवल गुंतवण्याची तयारी असली पाहिजे. यासाठी कमीत कमी पाच हजार स्क्वेअर फुटची शेड असायला पाहिजे, याशिवाय बॉयलर हा २५ लाख रुपयाचा असतो.
ही इंडस्ट्री केमिकलच्या अंडर येते. शासनही व्यवसाय सुरू करायला प्रोत्साहन देते. महाराष्ट्र शासनाचे पीएसआय (पॅकेज स्किम ऑफ इन्सेटिव्हज) म्हणून एक योजना आहे. त्याच्या अंडर तुम्हाला ३० ते ४० टक्के सबसिडी मिळते. सी.एम.ए.जी.पी च्या अंतर्गत जर तुम्ही गेलात तर तुम्हाला फंड मिळतो. त्यासाठी तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्टचे ज्ञान असण्याची गरज आहे. बँकादेखील तुम्हाला कर्ज देतात. सीजीटीएमएसई योजनेतसुद्धा कर्ज मिळतं.
श्रीकांत यांच्या या व्यावसायिक प्रवासात सुरुवातीपासून भाऊ सोबत होताच. कुटुंबाने सुरुवातीचे भांडवल उभारायला मदत केली. वडिलांच्या अनुभवाचा आणि जोडलेल्या मनुष्यबळाचा फायदा नव्या येणार्या उद्योजकांनी बॉक्स पॅकिंगमध्ये काम केलेल असेल तर खूपच चांगलं.
व्यवसायात येणार्या उद्योजकाला केमिकलचं नॉलेज बर्यापैकी असणे महत्त्वाचा आहे. त्यानंतर त्याने मार्केटचा थोडा अभ्यास करावा की आपल्याकडे ते मार्केट आहे का, ग्राहकाची गरज काय आहे याचा त्याने विचार करावा. दरम्यानच्या काळात लग्न झाले आणि आता पत्नीही या संपूर्ण प्रवासात सोबत आहे.
श्रीकांत यांनी व्यवसायाच्या सुरुवातीला प्रॉडक्टवर लक्ष दिले. घ्या, वापरा आणि डोळे बंद करून विश्वास ठेवा इथपर्यंत त्यांनी त्यावर काम केले आहे. आता ते मार्केटिंगवर लक्ष देत आहेत. डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ऑनलाईन प्रॉडक्ट विकता येते, ऑर्डर घेता येतात. अनेक सप्लायरकडून माल घेता येतो.
तुमच्याकडे डिजिटल प्रेझेन्स असेल तर तुमची कंपनी समोरच्याला समजते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचता. त्यामुळे ‘लोटस अॅडेसिव्ह इंडस्ट्रीज’मध्ये यावर काम चालू आहे.
श्रीकांत यांना व्यवसाय लवकरात लवकर ऑटोमेशनवर आणायचा आहे. एक्सपोर्ट चालू करायचं आहे, बॉक्स व्यवसाय युनिट तसेच याव्यतिरिक्त पैसे कमावण्याचे अनेक सोर्स सुरू करायचे आहेत. बॉक्ससाठी लागणारे केमिकल इनहाऊस बनवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पुढच्या पंधरा वर्षात पाचशे टनांपर्यंत पोहचायचे आहे.
संपर्क : 9717352528