विद्यार्थीदशेतच उद्योगाचा श्रीगणेशा करणारा शुभम

विद्यार्थीदशेत असताना बर्‍याच मुलांना भविष्यात काय करायचंय याची जाण नसते. काही मुलांना दिशाच सापडत नसते, तर काही मुले स्वप्नाळू जगात रमत असतात. काही मोजकीच मुले आपल्या भविष्यातील वाटचालीविषयी गंभीर असतात आणि काय करायचंय याविषयी त्यांच्या समोर चित्र स्पष्ट असते. असाच आपला एक उद्योजक मित्र म्हणजे शुभम ढाकणे.

शुभमला लहानपणापासूनच इलेक्ट्रॉनिक्सची आवड होती. शुभम डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला असतानाच स्वतःच्या कंपनीचा मालक होता. शुभम सांगतो, मी असेच वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाऊन विचारणा करायचो की, कंट्रोल पॅड किंवा स्विच वगैरे काही हवेत का?

असल्यास त्याचा पुरवठा मी करेन. यासाठी त्याने अनेक कॉलेजेसना भेटी दिल्या. त्यातूनच आयडल सोल्यूशन्सचा जन्म झाला. हे सर्व शुभम डिप्लोमाला असतानाच करत होता. मग डिप्लोमा झाल्या झाल्या बीईला अ‍ॅडमिशन घेण्यापूर्वीच त्याने कंपनी सुरू केली.

सुरुवातीला वय लहान असल्यामुळे आम्हाला कोणी सीरियस घ्यायचे नाहीत आणि कामही द्यायचे नाहीत; पण मी हार मानली नाही. खरे तर उद्योग उभारण्यासाठी कोणत्याही प्रकारचे भांडवल हातात नव्हते. मग काय करायचे? तर त्यावर एक उपाय सापडला.

इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिकणार्‍या मुलांना एक प्रोजेक्ट करायचा असतो. मी त्यासाठी मुलांना मदत करू लागलो. या कामातून काही मुले मला आर्थिक मोबदला देत. तो मी व्यवसायात गुंतवत असे. यातूनच मी खर्‍या अर्थाने घडलो.

हे प्रोजेक्ट तयार करताना खूप मोठ्या प्रमाणात कोडिंग करावे लागत असे. त्यात मी तरबेज झालो. अशा प्रकारे या कामाच्या पद्धतीत मी स्थिर झाल्यावर इंडस्ट्रीत उतरलो. २०१८ मध्ये बीईचे शिक्षण पूर्ण झाले आहे आणि माझ्या कंपनीच्या तीन शाखा कार्यरत आहेत.

शुभम हा पुणेकर आहे. पुण्यातच लहानाचा मोठा झाला. त्याचे शिक्षणही पुण्यातच झाले. शुभमचे डिप्लोमाचे शिक्षण हे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अवसरे येथून झाले. शिकत शिकतच शुभमने अनेक प्रकारचे प्रॉडक्ट डिझाइन केले. आज त्याच्या कंपनीत मोबाइल कंट्रोल एलईडी डिस्प्ले, पीसीबी म्यॅन्युफॅक्चरिंग तसेच रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंटचे काम चालते.

आज १५ जणांच्या टीमचे नेतृत्व शुभम करतोय. मंगेश गदादे नावाचा डिप्लोमाचा एक मित्र होता. त्याने पैसे लावले. मग तो आणि मी असे आम्ही कात्रजचे ऑफिस सुरू केले. कात्रज, मंचर अहमदनगर, येथे आमच्या शाखा आहेत. दिवसाला १३०-१४० ग्राहक जोडले जातायत.

ग्राहक समाधानी असल्याने व्यवसाय झपाट्याने वाढतोय. पुढील पाच वर्षांत महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात शाखा उघडण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. याचसोबत पीसीबी मशीन जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात विकायचे आहे. तीन वर्षांत लाखोंमध्ये कंपनीचा टर्नओव्हर आहे.

एकदा असेच एका ठिकाणी एक्झिबिशनमध्ये भाग घेतला होता. त्या ठिकाणी कंपनीविषयीची माहिती सांगणार्‍या पॅम्पलेटवर इंग्रजी नावाच्या स्पेलिंगची टायपिंगची चुक झाली. झाले असे की, IDEAL सोल्युशनस ऐवजी IDLE असे टाइप झाले. या वेळी तिथे खूप मोठंमोठे लोक आले होते.

तिथे खजील व्हावे लागले. काही लोक त्यांच्यावर हसले. व्यवसायात उतरतानाच नावातील हा घोळ त्यांच्यासाठी खूप काही शिकवणारा होता; परंतु या गोष्टीला खिलाडूवृत्तीने घेत शुभमनी टायपिंगची चूक तशीच ठेवली व तेच नाव रजिस्टर केले.

शुभम सांगतो, शेवटच्या वर्षाला असताना एका महिला प्राध्यापकांनी ज्यांना माहीत होते की, आमची एक छोटी कंपनी आहे त्यांनी आम्हाला मुलांसाठी वर्कशॉप घ्यायला सांगितले. आमच्या कॉलेजमध्ये आम्ही ते मोफत केले. त्यानंतर विविध कॉलेजमध्ये अशा प्रकारचे वर्कशॉप आम्ही द्यायला सुरुवात केली. लोकांसमोर आपले प्रॉडक्ट कसे मांडायचे, ऑर्डर कशी मिळवायची, कोणासमोर काय आणि कसे प्रेझेंटेशन द्यायचे अशा अनेक गोष्टी या काळात शिकता आल्या.

शुभम सांगतात, सुरुवातीच्या काळात एका मित्राने एलईडी डिस्प्लेची ऑर्डर दिली. ऑर्डर होती दहा हजारांची. आमच्यासाठी ही ऑर्डर मोठी होती. मेहनतीने आम्ही ती पूर्ण केली आणि ती अचानक रद्द झाली. त्याने ते घेण्यासाठी नकार दिला. सुरुवातीलाच मोठे नुकसान आम्हाला पेलणारे नव्हते.

मग काय करावे, असा विचार करत होतो. त्या वेळी मी तेच प्रॉडक्ट आम्हाला हवे त्या पद्धतीत बदल करून घेतले. आणि बाजारात आणले. लोकांना ते पसंत आले आणि आज त्याच प्रॉडक्टने आम्हाला दोन लाखांची बाजारपेठ मिळवून दिली आहे.


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


आमच्या व्यवसायात पीसीबी जास्त प्रमाण लागते; परंतु त्याची किंमत आम्हाला परवडणारी नव्हती. मग आम्ही पीसीबी बनवणारे मशीन स्वतःच डिझाईन केले आणि पीसीबी मशीन तयार केले. त्यामुळे आमची उत्पादन किंमत कमी झाली, सोबत आमचे नवे प्रॉडक्ट म्हणजेच पीसीबी मशीन तयार झाले. आता आम्ही स्वतःच ते विकतोयसुद्धा.

बाजारात मिळणारे डिस्प्ले हे लगेच खराब होतात. आम्ही त्याचा अभ्यास केला आणि वॉटरप्रूफ आणि मोबाइल ऑपरेटेड डिस्प्ले आम्ही तयार केले. हेच आमचे वैशिष्ट्य आहे. दुकानावरील डिस्प्ले हे पूर्णवेळ बाहेर असतात. त्यामुळे ते लवकर खराब होतात. तसेच त्याचे वजनसुद्धा खूप असते. अशा वेळी त्यावरील नाव बदलणे, अथवा त्यावर आपल्या जाहिराती सतत टाकणे अथवा बदलणे खूपच जिकिरीचे होऊन जाते.

हेच ओळखून आम्ही वॉटरप्रूफ आणि मोबाइल ऑपरेटेड डिस्प्ले बनवले. त्यासाठी आम्ही एक अ‍ॅपसुद्धा तयार केले आहे. यातूनच आमच्या उत्पादनाचा खप जोमाने वाढला. आम्ही ऑफलाइन मार्केटिंगपेक्षा ऑनलाइन मार्केटिंगला जास्त प्राधान्य देतो असे शुभम म्हणतात.

सुरुवातीच्या काळात डिप्लोमा कॉलेजच्या एका प्राध्यापकांनी खूप मदत केली हे ते आवर्जून सांगतात. आम्ही खूपच नवखे होतो त्या वेळी मार्गदर्शनासोबत छोटी छोटी कामेसुद्धा मिळवून दिली, आमच्यावर विश्वास दाखवला. त्यांच्याचसोबत कॉलेजमधील शिकणारे त्या वेळेचे मित्र हेसुद्धा मदत करत.

कधी जास्त काम मिळाले तर मोबदल्याची अपेक्षा न करता निरपेक्ष भावनेने मदत करत. सुरुवातीला वय लहान होते, त्यामुळे काम कमी मिळायचे. मिळाले काम तर अनेक लोक पैसेच बुडवायचे. यावर आम्ही अभ्यास करून पद्धतशीर कामाला सुरुवात केली. व्यवसायासाठी लागणार्‍या कायदेशीर बाबी सुरुवातीपासूनच नीट केल्यामुळे त्यात कोणताही त्रास झाला नाही.

प्रत्येक मुलाच्या पालकांना वाटत असते आपल्या मुलाने व्यवस्थित आयुष्यात स्थिरस्थावर व्हावे. माझ्या घरच्यांचीसुद्धा अशीच अपेक्षा होती; परंतु माझा उद्योगी स्वभाव घरातल्यांना थोडा काळजीत टाकणारा होता. कारण शिक्षण चालू असतानाच माझे हे सर्व उद्योग सुरू होते. त्यामुळे थोडे अभ्यासाकडेसुद्धा दुर्लक्ष होत असे; परंतु हळूहळू त्यांनाही विश्वास वाढू लागला. उद्योग करूच नकोस असा कधीच माझ्या घरून विरोध नव्हता, असे शुभम म्हणतात.

इंजिनीअरिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढतेय हे सत्य आहे. शुभम म्हणतो, मी स्वत: इंजिनीअरिंगचा विद्यार्थी असल्यामुळे मला असे वाटते की, मुलांना योग्य त्या प्रमाणात व्यावहारिक ज्ञान कमी मिळते. त्यांच्यातील स्किल डेव्हलपमेंट म्हणजेच सुप्त गुणांना योग्य पद्धतीत वाव मिळत नाही.

यासाठी आम्ही दरवर्षी पुढाकार घेऊन ‘ट्रान्सफॉर्मेशन’ या नावाने एक उपक्रम राबवतो. या उपक्रमात भाग घेणार्‍या मुलांपैकी अकरा मुलांना आमच्या कंपनीत मोफत प्रशिक्षण देतो. केवळ इलेक्ट्रॉनिक्सची आवड असणारेसुद्धा आमच्याकडील या संधीचा लाभ घेऊ शकतात.

या क्षेत्रात येऊ इच्छिणार्‍या प्रत्येकाला शुभम मदतीसाठी तयार आहे. तो म्हणतो; धाडस करा. घाबरू नका. नफा झाला तर तुमचा, तोटा झाला तर आमचा; पण प्रयत्न करा. मुलं व्यवसायात उतरताना घाबरतात. आम्ही सर्वप्रथम त्यांच्याशी नातं तयार करतो आणि त्यांना आमच्यात सामावून घेतो.

त्यांना शक्य तेवढी मदत आम्ही करतो. यातूनच मग ते आत्मविश्वासाने पुढे येतात. आजघडीला आम्ही स्वतः दोन उद्योजक तयार केलेत. त्यांचे नुकतेच इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण झाले आहे. तांत्रिक माहिती आणि त्याचे ज्ञान व आवड ज्याच्याकडे आहे त्याने जरूर स्वत:चा व्यवसाय करावा.

शुभम ढाकणे : ९५४५१८७७६६


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?