1983 साली दिल्लीच्या इंद्रप्रस्थ मैदानावर अखिल विश्व सिंधी परिषद भरली होती. पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी या परिषदेत बोलताना या समाजाचे कौतुक करून म्हणाल्या होत्या की, निर्वासित म्हणून आलेला सिंधी समाज अवघ्या तीस-एक वर्षात आपल्या उद्यमशक्तीने, आपल्या बळावर उभा राहिला. असे चित्र इतर जगात कुठे दिसले नाही.
भाईसाब ये देखिये, ये लेटेस्ट डिझाइन का माल है, अच्छा ये कलर आपको सूट नही करता तो मफतलाल की ये चीज देखिये.
आईये बहेनजी, ये साडी देखिये। कलही खटाव का नया माल आया है। ये नही, अच्छा तो और फूलवाला डिझाईन को देखों पसंद नही तो मत लो, पर देखने को तो कोई दाम नही
बाजारपेठांतून जाता येता असे सेवाभावी, नम्र शब्द कानावर पडले तर तुम्ही निश्चीत समजा की हे सिंधी व्यापार्यांचे दुकान आहे. सिंधी समाज ग्राहकाला अन्नदाता मानतो. उद्योगधंद्यातील या समाजाची ही एक हातोटी आहे. तो त्यांचा एक स्वभावधर्म आहे.
ते ग्राहकांना मित्र मानतात, म्हणून तर ते ग्राहकांना थंड-गरम पेयही देतात. कोणी म्हणेल, आवळा देऊन कोहळा काढण्याचा हा प्रकार आहे. असे जर असते तर त्यांच्या समाजात, घरात येणार्या कुठल्याही जातीधर्माच्या, गोरगरीब पाहुण्यांना पापड व पाणी देण्याची पद्धत पडली नसती! माणसांना जवळ करणे, माणसे जोडणे, ही त्यांच्या समाजाची शिकवण आहे. मला वाटते त्यांच्या यशाला हे गुणही कारणीभूत असावेत.
यशाचे मानकरी
देशाच्या फाळनीनंतर सिंधी समाज काय होता? निर्वासित, निराधार, पुढारी नसलेला समाज अशीच त्यांची अवस्था होती. आजही एखाद-दुसरा अपवाद वगळता त्यांना पुढारीपण करता येत नाही. कदाचित राजकारण त्यांच्या रक्तात नसावे. परिस्थितीने त्यांना पुढारीपण करता आले नसावे.
पोटापाण्यासाठी विखुरलेल्या त्या समाजाला हे झेपलेही नसते. नोकरी, छोटे-मोठे उद्योग करूनच त्यांना आपली गुजराण करावी लागली आणि मग कुठे त्यांना व्यापार-उद्योगात यश मिळत गेले.
आपल्या देशात मारवाडी, गुजराती आदि व्यापारी समाजाबरोबर आज हा समाजही बरोबरीने आहे असे म्हणावे लागेल. म्हणून तर भारतातल्या श्रीमंत समाजात आज या समाजाची गणना होताना दिसते. रिच, रिचर, रिचेस्ट अशी आज त्याची परिस्थिती आहे. हे परिश्रमानेच त्यांना मिळवता आले.
फाळनीनंतर पाकिस्तानातील सिंध प्रांतातील अंदाजे 13 लाख हिंदूंना आपले घरदार सोडून बाहेर पडावे लागले. त्यांना त्यांच्या भूमीला मुकावे लागले. हा समाज भारतात निर्वासित म्हणून आला आणि देशभर जिथे आसरा मिळेल तिथे राहू लागला.
प्रा. राम पंजवानी यांनी त्या वेळची माहिती सांगताना एका लेखात लिहिले आहे, त्या वेळी मुंबई बंदरात सिंधी निर्वासितांच्या बोटीच्या बोटी भरून येत. त्यांना सात दिवसांचा निवारा दिला जात असे. नंतर रेल्वे वा गाडीचे तिकीट भाडे देऊन तुम्ही देशातल्या कुठल्याही भागात जाऊन, सचोटीने परिश्रम करून पोट भरा असे सांगितले जात असे.
आज तुम्ही निर्वासित आहात, पण भविष्यात पुरुषार्थ साधून परमार्थ मिळवा, असा उपदेश केला जात असे. आज ते भविष्य खरे ठरले आहे असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही.
अजमेर, जयपुर, उल्हासनगर, पिंपरी, भोपाळ, विलासपूर, करपी, इंदोर, कलोर, अहमदाबाद, बडोदा या भागातून आज हा समाज मोठ्या वसाहती करून राहिलेला दिसतो आणि किरकोळ प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान व मध्य प्रदेश या राज्यातल्या जिल्ह्यांतून हा समाज पसरलेला आहे.
विशेषत: दुबई, हाँगकाँग, कोरीया, वेस्ट इंडीज, सिंगापूर या भागात या समाजाने चांगला पुढाकार घेतलेला आढळतो. एकट्या उल्हासनगरमध्ये तीन लाख लोकसंख्येपैकी 1.75 हजार सिंधी समाज आहे. पुण्याजवळील पिंपरी कॅम्पात अंदाजे 50 हजार सिंधी लोक राहतात.
आज हे लोक सुस्थितीत दिसत असले तरी काल हेच लोक अगदी फाळणीपूर्वी गर्भश्रीमंत असलेले लोक व त्यांची मुलेदेखील हातगाडीवर किंवा फूटपाथवर किरकोळ वस्तू विकताना दिसत होती. काहीनी विशेषत: जास्त शैक्षणिक पात्रता असलेल्या काही लोकांनी नोकर्या धरल्या. काहींनी केळी, फळफळावळ, कंगवे, कोल्ड्रिंक्स, पेन, बॉनपेन, स्टोव्ह पीन इ. मालाची लोकलमधून विक्री करून आपले दिवस काढले.
कित्येक चांगल्या घरातल्या महिलांनीही पापड, मसाले, लोणची, शिवण-टिपण करून आपल्या निर्वासित संसाराला आधार मिळवून दिला. म्हणून तर सिंधी समाजात उद्योजकतेचे गुण उजळत गेले आणि आज देशात सिंधी समाजाने औद्योगिक घराण्यांची एक मालिकाच तयार केलेली दिसते. निश्चितच काही विशेष गुण असल्याशिवाय असे होणे नाही.
उद्योगाची मालिका
वेस्टोन, कृष्णा, स्टील्स, ब्लू स्टार, हिंदुजा, वाटूमल, किसनचंद्र चलाराम छटामल, बूश, अडवानी औलिंकॉम, हिरानंदानी, रहेजा, अहुजा, असे कितीतरी मातब्बर लोक आज व्यापार-उद्योग क्षेत्रात चमकत आहेत. अवघ्या 30-35 वर्षाच्या काळात इतके धवल यश कोणत्याही समाजाने मिळवलेले नसावे.
आता दौलतराम मंगतानी यांचेच पाहा ना, वय वर्षे 72 उल्हासनगरमधल्या आपल्या घरी त्यांना गप्प बसवत नाही. त्यांना बहुधा मुंबईतील ऑफिसमध्ये येऊन काम पाहिल्याशिवाय चैन पडत नाही. आज त्यांचा मुलगा विजय काम पाहतो. पण तो नसला तर आणखीनच लक्ष द्यावे लागते.
मंगतानी मूळचे क्वेट्टाचे. 1935 मधील भूकंपात त्यानी फक्त रु. 1,500/- गुंतवून रबराचे शीट व बूच तयार केले होते. पण आज त्यांच्या दोन उद्योग घटकांतून औषधी बाटल्यांची बुचे व रबर कव्हर्स तयार होतात. त्यांच्या हाताखाली काम करून कित्येक लोकांनी आपली कारखानदारी उभी केलेली आहे.
बी.पी. रहेरिया यांचे वय 65 वर्षे. हस्तकलेत काम करीत त्यांनी अप्सरा डॉल्स नावाने स्वत:चा उद्योग आरंभला. लोकमूल मेघनानी, आर. जे. अडवानी, कलानी हे किरकोळ कामे करीत करीतच त्यांची आज फाइव्ह व थ्री स्टार हॉटेल्स आहेत. अडवानी यांचे हे हॉटेल तर प्रसिद्धच आहे. सतराम मोटानी तर फूटपाथवर फाउंटन पेन विकत विकत आता बीनाफ पेन कंपनीचे मालक आहेत.
सिंधी समाज एकदम कारखानदार झाला नाही. त्यासाठी लढला, समाजापुढे नव्या कल्पना आणल्या, म्हणून तर त्यांना आजचे स्थान प्राप्त झाले. उदाहरणादाखल काही कल्पना मांडावयाच्या झाल्यास, त्यांच्या लोकप्रिय हाउसिंग सोसायटीची कल्पना सांगता येईल, ही कल्पना प्रथम सिंधी समाजाने आणली. पहिल्यांदा जेठीबेन सिपाहीमलानी नवजीवन सोसायटी स्थापन केलेली होती.
आज हीच कल्पना सर्व देशभर पसरलेली आहे. आता लोकमूल मेघनानी यांच्या हॉटेल ओपोलोचे पाहा. त्यांच्या हॉटेलातील हॉल विवाहाप्रिर्त्थ भाड्याने देतात. तेव्हा नवदापत्याला तिथे एक दिवसाचा निवास काही चार्ज न लावता आहेरफ म्हणून दिला जातो. तसेच रहेरिया यांच्या दृष्टिकोनातून बघा.
हस्तकला फक्त शोभिवंत वस्तू राहिलेला नसून त्यात सौंदर्य व उपयुक्तता यांचा मिलाफ झालेला आहे. डाळीची पोती खरेदी करून खरेदी भावातच डाळ विकणारा सिंधी व्यापारी बारदानाचे मिळणारे पैसे हाच आपला नफा मानतो. शीघ्र व अधिक उलाढालीमधून कमी नफा घेऊनही सिंधी व्यापारी व्यापार करताना दिसतात. कमी नफा पण उलाढाल अधिक जास्त हे एक गमक आहे. पण अशा प्रकारचे आडाखे सर्वानाच जमतील असे नाही.
राज्यविहीन समाज
सिंधी समाजाचे व्यापार-उद्योगात साम्राज्य मिळवले असले तरी जगात त्यांनी स्वत:चे राज्य उभारले नाही. तशी त्यांची अभिलाषाही नाही. जणू हे लोक स्टेटलेस कम्युनिटीफ वाले आहेत. असे असूनही या समाजाने आपल्या देशातीलच नव्हे रत जागतिक व्यापार-उद्योग क्षेत्रात एक उच्च स्थान गाठले आहे.
या यशामधूनच सिंधी समाजाविषयी काही लोकांमध्ये गैरसमजही झाला असावा. निकृष्ट माल तयार करणे, डुप्लिकेट करण्यात तरबेज, असा त्यांच्याविषयी लोकांचा तर्क आहे. पण वास्तविक पाहता यातले काहीही खरे नाही. असे जर असते तर जगातील व्यापार-उद्योग क्षेत्रात त्यांची छाप पडलीच नसती, हे इतरांनी जाणून घेतले पाहिजे.
राज्यहीन असूनही व्यापार-उद्योग क्षेत्रात जे साम्राज्य उभे केले, त्याचे रहस्य समजून घेतले पाहिजे. त्यांना हे यश मिळविण्यासाठी कुठल्या दैवी शक्तीचा हातभार लागलेला नाही. केवळ या समाजातील उद्यमशीलता, परिश्रम, नम्रता, सतत धडपड व वेळेचा सदुपयोग या गुणांमुळेच त्यांना हे यश मिळालेले आहे.
सिंधी समाजातील मुले शिक्षण करता करता घरातील व्यवसाय पाहतात. किरकोळ खरेदी-विक्रीचा धंदा करतात. वेळेचा सदुपयोग हा त्यांच्यातला एक गुण मानावा लागेल. एवढे सारे असले तरी ते ज्या समाजात, भागात राहतात, तिथे मिसळून जातात.
एवढे मात्र खरे की, या समाजाने शैक्षणिक व सामाजिक विकासाला खूप हातभार लावलेला आहे. मुंबईतील के. सी., जय हिंद, नॅशनलसारख्या 22 शैक्षणिक संस्थांना सिंधी समाजाचे साहाय्य आहे. जसलोक, नॅशनल, हिंदुजा हॉस्पिटल यासारख्या मोठ्या योजनेतही त्यांचा समाज आघाडीवर आहे. तसेच मुंबईतल्या प्रत्येक उपनगरातून धर्मशाळा आहेत.
बदनाम का म्हणून?
पूर्वी अमेरिकेचा माल दर्जेदार मानला जात असे. मध्ये काही काळ जपानचे नाव होते. या धर्तीवर उल्हासनगर सिंधी असोसिएशनने म्हणजे यूएसए असा शिक्का मारून सिंधी मंडळीही डुप्लिकेट माल विकतात. असा एक समज रूढ झाला होता. पण हे खरे नाही, असे तिथली जाणकार मंडळी सांगतात. या दृष्टीने उल्हासनगर मॅन्यू.
असोसिएशन म्हणजे युएमए ही संस्था काम करीत आहे. त्यांचे म्हणणे असे की, ज्याप्रमाणे प्रत्येक समाजात काही बरी-वाईट माणसे असतात, तशी आमच्या समाजातही असू शकतील. झटपट यशासाठी अशाप्रकारे यूएसएचा उपयोग करतात.
याचा फायदा इतर समाज घेऊन आमच्या समाजाची बदनामी करीत आहे. निर्वासीत म्हणून येऊन त्यांनी जे व्यापार केले उद्योगात यश मिळवले ते कदाचित इतर पारंपारिक व्यापार उद्योग करणार्या समाजाला मानवले नसेल. तेव्हा आमची ही बदनामी समजून घेतली पाहिजे उगीचच एखाद्या समाजाला वेठीस धरू नये, असे त्यांचे सांगणे पटण्यासारखेच नाही का!
असा ही उद्यमशील सिंधी समाज आज देशभर पसरलेला आहे. बहुतांश देशांतील कापड बाजारावर त्यांनी आपली छाप सोडलेली आहे. इतर समाजात समरसून जाण्याची त्यांची एक विशेषता आहे. गडबड, दंगल, जाळपोळ अशा कट-कारस्थानात ते कधीच सहभागी होताना दिसत नाहीत.
वित्तहानी करू देत नाहीत, करीत नाहीत. आपला व्यापार-उद्योग हेच त्यांचे लक्ष्य असते. म्हणून तर आजचा सिंधी समाज संपत्ती निर्माण करण्यात आघाडीवर दिसतो. अशा कार्यमग्नतेमुळे इतर अल्पसंख्याप्रमाणे ते कधी भांडताना दिसत नाहीत किंवा मागण्या करीत नाहीत. निर्वासित म्हणून आलेला सिंधी समाज आज स्थानिक झाला आहे.
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.