Advertisement
उद्योजकता विकास

करा कौशल्य आधारित उद्योग

फक्त रु. ५०० मध्ये 'स्मार्ट उद्योजक' प्रिंट मासिक घरपोच मिळवा.

Book Now: https://imjo.in/Xx7Uq6

Print this Page

आपल्याकडे ‘कोणता व्यवसाय करू?’ हा प्रश्न विचारणाऱ्यांची कमतरता नाही; पण ‘मी काय करू शकतो’, हा स्वतःलाच प्रश्न विचारणारे शोधूनही लवकर सापडत नाहीत. खरं तर व्यवसाय सुरू करण्याचा विचार जेव्हा मनात येतो तेव्हा पहिला प्रश्न हाच असायला हवा की, मी काय करू शकतो? माझ्याकडे काय कौशल्य आहे ज्याचा वापर करून मी व्यवसाय उभा करू शकतो?

कौशल्य… स्किल…. जमाना स्किलचा आहे. आजच्या जगात स्किलला जेवढी किंमत मिळते तेवढी कशालाच मिळत नाही. किंमत आणि मूल्य यांचे निकष बदलत आहेत. कामाला किंमत मिळत आहे, तर कौशल्याला मूल्य मिळत आहे. नुसता पैसा, भव्य प्रेझेन्टेशन, अवाढव्य पसारा या गोष्टी आता लोकांना आकर्षित करत नाहीत. आता तुमच्या कौशल्याला महत्त्व मिळत आहे. तुमचं भवितव्य काय असेल हे आता तुमच्याकडे कशा प्रकारचे कौशल्य आहे याच निकषावर ठरणार आहे….. स्किल असेल तर तुम्ही कधीही अपयशी ठरू शकत नाही.

हे कौशल्य कोणतेही असू शकते. पेंटिंग, सुतारकाम, डिझाइनिंग, बागकाम, वेल्डिंग, नक्षीकाम, कोरीवकाम, शिवणकाम, भाषांतर कला, टाइपिंग… ते प्रत्येक काम जे तुम्ही स्वतःचे ज्ञान, अभ्यास वापरून करता ते सर्व काही कौशल्य याच संज्ञेत मोडतं… या कौशल्याला मार्केटमध्ये नेहमीच मागणी असते; परंतु आपण अजूनही या कौशल्याचा वापर चांगली नोकरी किंवा काही तरी लहानसा रोजगार मिळविण्यासाठीच करतो आहोत. हे कौशल्य व्यवसायाच्या दृष्टीने किती महत्त्वाचे आहे हे अजूनही आपण लक्षात घेतलेले नाही.


Paytm वापरकर्त्यांसाठी बंपर ऑफर

'स्मार्ट उद्योजक' मासिकाची वार्षिक डिजिटल वर्गणी

Paytm वर मिळवा आता फक्त ₹५० मध्ये.


मार्केटची नजर बदलत आहे. कौशल्याधारित कामांची प्रतिमा दिवसागणिक वाढत आहे. कौशल्याधारित कामांची मागणी मार्केटमध्ये वाढत आहे. थोडक्यात कौशल्याधारित व्यवसायाच्या संधी वाढत आहेत.

काय आहेत या संधी? थोडक्यात पाहू या…

तुम्ही पेंटिंग करत असाल तर स्वतःच्याच ब्रॅण्डने चांगल्या चांगल्या पेंटिंग्ज मार्केटमध्ये विकू शकता. तुम्ही चांगले ड्रेस डिझायनर असाल तर आता कुणाकडे नोकरी करण्यापेक्षा स्वतःचाच लहानसा व्यवसाय सुरू करून ड्रेस डिझायनिंग क्षेत्रात नाव कमावू शकता.

हँडक्राफ्ट्स ही संज्ञा मागील काही वर्षांपासून मार्केटमध्ये चांगली रुजली आहे. हाताने बनवलेल्या शोभेच्या वस्तू, भेटवस्तू किंवा इतर कोणत्याही हस्तकलेच्या व्याख्येत बसणार्‍या वस्तू हँडक्राफ्ट्स समजल्या जातात. यात अगदी पेपर क्राफ्ट्स, वूडन क्राफ्ट्स, ग्लास आर्ट, स्टोन आर्ट, लेटर प्रॉडक्ट्स अशा किती तरी वस्तू येतात. या सर्व वस्तू मशीनरींच्या साहाय्याने न बनवता आपल्या कौशल्याचा वापर करून बनवलेल्या असतात.

तुम्ही सुतारकामात निष्णात असाल तर स्वतःचाच फर्निचर व्यवसाय सुरू करू शकता. यात शोभेच्या वस्तूंपासून घरातील आवश्यक वस्तूंपर्यंत सर्वांना चांगली मागणी मिळते. तुमचा भाषा अभ्यास चांगला असेल तर भाषांतरतज्ज्ञ म्हणून नाव कमावू शकता. तुम्ही टायपिंग चांगले करत असाल तर टायपिस्ट म्हणून चांगला व्यवसाय करू शकता.

तुमच्याकडे एखादे चांगले ज्ञान, कला असेल तर त्याचे क्लासेस घेऊ शकता, मार्गदर्शन कार्यक्रम घेऊ शकता, कन्सल्टन्ट म्हणून आपला ब्रॅण्ड तयार करू शकता.

फुलांचे बुके (पुष्पगुच्छ) बनवणे हे कौशल्यच आहे. या कौशल्याच्या बळावर किती तरी चांगले ब्रॅण्ड मार्केटमध्ये तयार झाले आहेत. रांगोळी काढणे हेही एक कौशल्य आहे. कार्यक्रमात रांगोळी काढणे हा आता एक मोठा व्यवसाय म्हणून पुढे येत आहे. हातावर मेहंदी काढणे हाही व्यवसाय अशाच पद्धतीने जम बसवत आहे. बागकाम, माळीकाम यांचेही मार्केट दिवसेंदिवस वाढत आहे.लाकडावर, दगडावर केले जाणारे कोरीवकाम याचे मार्केट तर प्रचंड मोठे होत आहे. पैठणीवर केली जाणारी कलाकुसर तर आपल्याला माहीतच आहे. वूलन क्राफ्ट्सचे मार्केट मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

मातीचे भांडे, त्यावर केली जाणारी कलाकुसर मोठमोठ्या घरांमधे शोपीस म्हणून ठेवली जातात. अगदी बांबूच्या काट्यांपासून टोपली बनवण्याचा व्यवसायसुद्धा मागील काही वर्षांपासून जोर धरू लागला आहे…

थोडक्यात तुमच्या स्किलला आता खरी प्रतिष्ठा मिळायला लागली आहे. तुम्ही स्वतःचे कौशल्य वापरून जे जे काही करू शकता ते प्रत्येक काम आता व्यावसायिक दृष्टीने महत्त्वाचे बनत आहे.

यासोबतच लोकांची स्वतः काही करण्याची, शिकण्याची ईच्छा कमी होत आहे.

कौशल्याधारित व्यवसाय सुरू करणेही अवघड नाही. एखादे कौशल्य तुमच्याकडे सरावाने, घरगुती परंपरेने आले असेल तर उत्तमच किंवा तुम्ही ते शिकूनही घेऊ शकता आणि त्यानंतर त्याचे व्यवसायात रूपांतर करू शकता; पण यात तुम्ही स्वतःवर बळजबरी करू शकत नाही. एखादे कौशल्य आत्मसात करण्यासाठी त्यात आवड असणे आवश्यक असते, कारण इथे कोणत्याही ठोकताळे पद्धतीने काम चालत नाही, तर तुमचा मेंदू, हात, डोळे यांचा संगम इथे काम करत असतो.

एखादी कला तुम्हाला जेवढी चांगली पद्धतीने अवगत असेल तेवढ्या चांगल्या प्रकारे तुम्ही त्यात काम करू शकता आणि ती कला चांगल्या पद्धतीने अवगत होण्यासाठी तुम्ही त्यात मनाने गुंतलेले असणे आवश्यक असते. म्हणून आधी तुम्हाला काय आवडतं, कोणत्या क्षेत्रात काम करायला आवडेल याचे स्वपरीक्षण करा आणि त्यानंतरच व्यवसायाच्या दृष्टीने विचार करा.

कौशल्य आत्मसात करण्यासाठी, शिकण्यासाठी वेळ द्या. घाई गडबड करू नका. परफेक्शन हे कौशल्याधारित व्यवसायाचे गमक आहे. त्यावर काम करा. ज्या वेळी तुम्हाला स्वतःला वाटेल की, तुम्ही आता निवडलेल्या कलेत परफेक्ट झाला आहेत त्या वेळी त्या कौशल्याचे रूपांतर व्यवसायात करा.

कौशल्याधारित व्यवसायांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे अगदी कमी गुंतवणुकीत सुरू करता येतात. इथे लागणारी मुख्य गुंतवणूक तुमचे कौशल्य आहे. याव्यतिरिक्त इतर कोणताही मोठा खर्च तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी करावा लागत नाही. अगदी घरातूनही व्यवसाय सुरू करू शकता किंवा एखाद्या छोट्याशा जागेतूनही व्यवसाय सुरू करू शकता.

तुमच्याकडे काय कौशल्य आहे याचा अभ्यास करायला सुरुवात करा. प्रत्येकाकडे काही तरी कला, कौशल्य असतेच… त्याचा व्यवसायाच्या दृष्टीने कसा वापर करता येईल याचा विचार करा. या क्षेत्रात सेट व्हायला थोडा वेळ लागतो, पण एकदा जम बसल्यानंतर तुमचा ब्रॅण्ड मार्केटमध्ये पसरायला वेळ लागत नाही. संधी चांगली असली तरी व्यवसायाचे मूलभूत नियम इथेही लागू होतातच, त्यामुळे वेळ लागणार, त्रास होणार, कष्ट करावे लागणार या गोष्टी गृहीत धरूनच या क्षेत्रात प्रवेश करा.

तर मग करा सुरुवात… स्वतःला प्रश्न विचारा… तुमच्याकडे असे काय कौशल्य आहे ज्याचा वापर तुम्ही व्यवसायासाठी करू शकता, ज्याची मार्केटला गरज आहे. त्यावर काम करा, परफेक्शनच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करा, थोडक्यात सुरुवात करा, योग्य नियोजन करा, चांगला ब्रॅण्ड तयार करा, मोठे स्वप्न पहा आणि त्या दृष्टीने प्रत्येक पाऊल टाका.

– श्रीकांत आव्हाड
संपर्क :  9764070746

FREE NEWSLETTER ON WHATSAPP

व्यवसाय आणि उद्योजकतेविषयी माहिती व घडामोडी आपल्या WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ या क्रमांकावर आपले नाव सध्या राहत असलेला जिल्हा व तालुका WhatsApp करा.

Help-Desk
%d bloggers like this: