परिस्थिती कधीही कशीही बदलू शकते. विशेषत: कौटुंबिक समस्या, कोरोना असे सगळे एकत्र आल्यावर. त्या वेळी केवळ जगण्यासाठी संघर्ष कसा करावा एवढेच लक्ष्य असते. तो कठीण काळ मागे टाकून स्वत:ला सिद्ध करणार्या ‘काव्या एंटरप्राईसेस’च्या स्मिता गिरी खूप शिकवून जातात.
स्मिता लहानपणापासून ठाण्यात वाढली. बालपण शिक्षण ठाण्यात झालं. बी.एस्सी. पदवी झाल्यावर तिने शिक्षकीपेशा निवडला. लहानपणापासूनच तिला चित्रकला, ‘आर्ट आणि क्राफ्ट’ची आवड होती.
लग्नानंतर २०१४ साली मलेशियात गेली. तिथे असताना एकदा थर्माकोलची प्लेट बनवून छान सजवली आणि ‘पूजा थाळी’ बनवली. ती कलाकृती खूप छान जमून आली. तिथल्या मैत्रिणींना तिचे हे काम आवडले. या मैत्रिणींनी तिला प्रोत्साहन दिले. त्यातूनच तिने सीडीपासून मेणबत्ती स्टँड बनवला.
एका मैत्रिणीने ११ पिस ऑर्डर देऊन बनवून घेतले. ही तिची खरी पहिली ऑर्डर, पण हा केवळ एक छंद होता. व्यावसायिक गांभीर्य काही नव्हते. ‘आकार क्रिएशन’ असे नाव देऊन ती हे करत होती.
कौटुंबिक समस्या वाढल्या आणि पुढे परिस्थिती बदलली. स्मिता २०१६ साली कायमसाठी भारतात परत आली. ठाण्यात दोन मुलींसोबत राहू लागली. काळ खूप कठीण होता. घरची परिस्थिती बिकट होती त्यावेळी तिला उपजीविकेसाठी काही ना काही करणे भाग होते.
इथे तिला तिच्यातल्या आवडीने, कलेने साथ दिली. स्मिताने स्टॉल्स, ऑनलाइन प्रमोशन करत या व्यवसायाला सुरुवात केली. स्मिता सांगते, मी टीचर कोऑर्डीनेटर म्हणून जॉबही करत होते सोबत ऑर्डर घेत हा व्यवसायसुद्धा सुरू केला. अनेक वेळा रात्र रात्र जागून ऑर्डर्स पूर्ण केल्या. जॉब आणि ऑर्डर्स अशी तारेवरची कसरत चालू होती.
पुढे कोविड आला आणि जॉब बंद झाला. हा खूप मोठा धक्का होता, पण जगण्यासाठी धडपड करायलाच हवी होती. त्यामुळे काही ना काही शोध सुरू झाला. मी पंजाबी प्री-मिक्सेस बनवायला शिकले होते. त्याचा मला इथे उपयोग झाला. शिक्षण कधीही वाया जात नाही, हे इथे जाणवते.
‘बुडत्याला काठीचा आधार’ असे म्हणतात. मला या कठीण काळात प्री-मिक्सेसनी सावरले. काटेकोर निर्बंध होते, पण मी आणि माझी मुलगी आम्ही त्या सगळ्यांचे पालन करून प्री-मिक्सेस साहित्य आणायला रेल्वे प्रवास करत होतो. काळ कठीण होता, भयावह होता पण जगण्यासाठी हे करणे भाग होते.
या सगळ्याचा परिणाम म्हणजे आमच्या प्री-मिक्सेसला खूप चांगला रिस्पॉन्स आला आणि मग ‘काव्या स्पाईसेस’ सुरू झाले. व्हेज-नॉनव्हेज, पनीर टिक्का मसाला, बटर चिकन, कढई पनीर, पालक पनीर, दम आलू असे अनेक प्रकारचे प्री-मिक्सेस बनवायला मी सुरुवात केली. आज व्हेज नॉनव्हेज अशी वीसेक प्री-मिक्सेस आहेत. जैन प्रीमिक्सेससुद्धा मी बनवते.
ऑनलाईन विक्री चालू होती. खूप चांगला प्रतिसाद होता. यासोबत मी आजीकडून शिकलेले मसाले बनवायला सुरुवात केली. अशाप्रकारे मसाले उद्योग सुरू झाला. सोबत थालीपीठ भाजणी, वडे पीठ, विविध मसाले सुरू केले. हे सर्व घरगुती पद्धतीने बनवत होते त्यामुळे लोकांना ताज्या वस्तू मिळत होत्या.
हा सगळा काळ कोरोनाचा होता त्यामुळे जगण्यासाठी जे जे पर्याय शक्य आहेत, ते आजमावले जात होते. यातूनच मग हर्बल साबण, चंदन, मोगरा, नीम, तुलसी असे जवळपास तेरा प्रकारचे साबण मी बनवू लागले. हेअर पॅक, हर्बल वॅक्ससुद्धा बनवू लागले. काय, कसे चालेल हे मलाही ठाऊक नव्हते, पण सगळ्याला चांगला प्रतिसाद मिळत गेला.
आता हे सगळे एकाच आस्थापनाअंतर्गत आणणे गरजेचे होते त्यामुळे यातूनच जन्म झाला ‘काव्या इंटरप्रायझेस’चा. विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्म, फेसबुक, इंस्टाग्राम, विविध ग्रुप प्रदर्शन, यासोबत माऊथ-टू-माऊथ पब्लिसिटीसुद्धा खूप होते.
जी मुले परदेशात राहतात अशा मुलांचे पालक इथून तिथे प्री-मिक्सेस पाठवतात. यातूनच परदेशी ग्राहक वाढले. संपूर्ण देशभर ‘काव्या इंटरप्राईसेस’चे प्रॉडक्ट जातात. स्मिताने विविध ऑफर देत आपला ग्राहकवर्ग वाढवला.
आपल्या प्रॉडक्टमध्ये काही कमी आहे तर त्याचा अभ्यास करून ती बदल करत राहते. यातून प्रॉडक्ट जास्तीत जास्त चांगले होण्यास मदत होते. काळानुसार, बाजारमागणीनुसार स्वत:ला ती बदलत ठेवते. स्मिताने येत्या काळात नाश्त्याच्या प्री-मिक्सेस सुरू करण्याचा मानस बोलून दाखवला.
स्मिता म्हणते, या संघर्ष काळात मुलींची मोलाची साथ दिली. मुलींच्या पाठिंब्याने मी आज इथपर्यंत पोहचू शकले. आईवडील, भाऊबहिण सगळे सोबत होते. यासोबत मदनभाऊंनीसुद्धा खूप पाठिंबा दिला. वेळोवेळी प्रोत्साहन दिले. माझ्या आस्थापनाला खूप मोठं करायचंय. माझ्यासोबत इतरांनासुद्धा कायमस्वरुपी रोजगार देऊ शकले तर मला आवडेल. यासाठी मी मेहनत घेतेय.
माझ्या या कामाची पोचपावती म्हणजे राज्य मनुष्यबळ अकादमी, भारतज्योती प्रतिभा सन्मान पुरस्कार, नारायणी रत्न पुरस्कार असे काही पुरस्कारही प्राप्त झालेत. स्मिता गिरीसारख्या अनेक सख्या आज स्वत:साठी, कुटुंबासाठी जिद्दीने काम करत आहेत. स्वत:ची स्वप्न साकार करण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहेत. त्यांच्या या वाटचालीला खूप शुभेच्छा.
स्मिता गिरी – 8433635020
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.