Advertisement
कथा उद्योजकांच्या

‘चिमणी वाचवा’ या सामाजिक बांधिलकीतून निर्माण झाला हा स्टार्टअप

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


‘छंद लावी जिवा पिसे’ या उक्तीप्रमाणे व्यवसायातून रोजीरोटी जोपासत इतरांसाठीही जगले पाहिजे, असाच काहीसा संदेश देणारे लोक समाजात कार्यरत असतात. आजच्या युगात चिवचिवाट करणार्‍या चिमण्या शहरातच काय ग्रामीण भागातही दिसेनाशा झाल्या आहेत. अशा स्थितीत संवेदनशील मन स्वस्थ बसू शकत नाही.

सृष्टीतील प्रत्येक जीवाचे अस्तित्व हे पर्यावरणाच्या दृष्टीने अतिआवश्यक आहे. चिमण्यांच्या घटत्या संख्येचा विचार करून नाशिकमधील खुंटेवाडी गावात राहणार्‍या विजय जाधव या उद्योजकाने एक कल्पक प्रयोग केला आहे. त्याने ‘ना नफा-ना तोटा’ या तत्त्वावर पर्यावरणपूरक साधनांचा वापर करून अवघ्या दोनशे रुपयांत उपलब्ध होईल असे चिमण्यांचे घरटे तयार केले आहे.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

चिमण्या कधीच झाडावर घरटे करत नाहीत; त्या नेहमी एखाद्या मोठ्या छिद्रात, बाल्कनीत, पोटमाळ्यावर एखाद्या कोपर्‍यात, दोन भिंतींमधल्या बोळात स्वत:चं घर करतात. मात्र दिवसेंदिवस वाढलेल्या सिमेंटच्या जंगलात चिमण्यांना घरटी बांधायला जागाच शिल्लक राहिली नाही आणि हेच चिमण्यांची संख्या घटण्यामागचं मुख्य कारण ठरलं आहे. हे हेरून विजय जाधव यांनी कृत्रिम घरटी बनवून ती जागोजागी लावण्यासाठी लोकांना प्रवृत्त करण्याचा निर्णय घेतला.

सहवासाच्या वातावरणात एकरूप होणार्‍या या पक्ष्यांची साधी दखलसुद्धा आपण घेत नाही. चिवचिव करत टाहो फोडणार्‍या चिमणीकडे सध्या सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. विज्ञान शाखेत शिक्षण घेतलेल्या विजय जाधव यांनी चिमणीच्या घरट्याचा अभ्यास केला, परंतु समाधानकारक तोडगा न मिळाल्याने त्यांनी अधिक मेहनत घेतली आणि प्राणिशास्त्राच्या अभ्यासकांच्या मदतीने संशोधनाद्वारे शास्त्रशुद्ध पद्धतीने चिमणीचे घरटे तयार केले.

विजय जाधव यांना पर्यावरणाची आवड आहे. गावागावांत जाऊन ‘चिमणी वाचवा’ अभियान ते राबवतात. नाशिक, पुणे, सातारा व मुंबई शहरांत या घरट्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. जाधव यांनी ‘फीडर’ही तयार करून त्याच ठिकाणी चिमणीच्या खाद्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे चिमण्यांना भटकंती करावी लागणार नाही. घरटी बसवतानासुद्धा काळजीपूर्वक बसवावी लागतात. विशेषत: तिथे ऊन किंवा पाऊस येणार नाही, घरटे कावळे किंवा घारीच्या नजरेस पडणार नाही हे पाहूनच घरटे बसवावे लागते.

‘महाराष्ट्र चेंबर आँफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’चे माजी अध्यक्ष शंतनू भडकमकर यांना चिमणीचे घरटे भेट देताना विजय जाधव

गेल्या चार वर्षांच्या कालावधीत सुमारे चार हजार लोकांपर्यंत त्यांर्नी कृत्रिम घरटी पोहोचवली आहेत. आत्तापर्यंत बसवलेल्या घरट्यांपैकी ९९ टक्के घरट्यांमध्ये चिमण्यांनी घर केले आहे. चिमण्या वर्षातून दोन वेळा प्रत्येकी तीन अंडी घालतात. यानुसार ढोबळ गणित मांडल्यास आत्तापर्यंत जवळपास २४ हजार पिल्लांनी या घरट्यांमध्ये जन्म घेतला आहे, असं म्हणता येईल.

विजय जाधव यांच्या खुंटेवाडी स्थित वर्कशॉपमध्ये विविध साइज आणि डिझाईनमध्ये ही घरटी उपलब्ध आहेत, तर मोठ्या घरट्यांमध्ये २-३ चिमण्यांची कुटुंबे राहण्यासाठी जागा असते. काही केवळ फीडर आहेत, जिथे पक्ष्यांना केवळ दाणे खाण्यासाठी, बसण्यासाठी सोय असते.

चिमण्यांबरोबरच या घरट्यांमध्ये छोटे पक्षीही अंडी घालत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या पक्ष्यांचेही संरक्षण-संवर्धन होत. या उपक्रमामुळे चिमण्यांची संख्या वाढत असली तरी नष्ट होणार्‍या चिमण्यांच्या तुलनेत नव्याने जन्माला येणार्‍या पिल्लांचं प्रमाण फारच कमी आहे.

चिमण्यांप्रमाणे इतर छोट्या पक्ष्यांचं प्रमाणही कमी होत आहे. त्यामुळे या छोट्या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न व्हायला पाहिजेत. हेच काम आज विजय जाधव करत आहेत. चिमण्यांच्या संरक्षण आणि संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी ‘चिमणी वाचवा’ नावाची संस्था स्थापन करण्याचा त्यांचा मानस आहे.

विजय जाधव यांची पार्श्‍वभूमी पत्रकारितेची असून त्यांनी दहा वर्षे ‘ दै. सकाळ’, ‘सार्वमत’मध्ये पत्रकारिता केली आहे. विजय जाधव यांच्या विलास क्रिएशनमध्ये पक्ष्यांच्या घरट्यांसह लाकडापासून तयार केलेल्या टिकाऊ वस्तू, विविध खेळणी, चॉवी हँगर, फ्रुट बास्केट, नेमप्लेट, पेनस्टँड, लाकडी मुळाक्षरे विविध प्रकारचे शोपीस इ. गोष्टीही तयार केल्या जातात. हल्ली अनेक गावखेड्यांतून नामशेष झालेली लाकडी बैलगाडीची (बुलककार्ट) प्रतिकृती खास आकर्षण ठरत आहे.

गावोगावी भटकंती करून चिमणीचे घरटे व लाकडी वस्तूंचो स्टॉल लावतात. शेजारील गुजरात राज्यातही त्यांचा ग्राहकवर्ग मोठा आहे. या व्यवसायातून कलात्मक व चोखंदळ ग्राहकवर्ग जोपासला जातो. नाशिकमधील एका खेड्यातून हा व्यवसाय होत असला तरी तुम्ही देशाच्या कोणत्याही कोपर्‍यातून ऑनलाइन ऑर्डर नोंदवू शकता.

संपर्क : विजय जाधव – 8698786854


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!