सेवाभावनेतून सुरू करू शकता ‘सामाजिक पर्यटन’


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


समूहभावनेतूनच मग बाबा आमटेंचे ‘आनंदवन’, भीमराव गस्तींचे ‘उत्थान’, गिरीश प्रभुणेंचे ‘समरसता गुरुकुल’, अभय बंग यांचे ‘शोधग्राम’ उभे राहते. या व्यक्ती स्वत:ला विसरून समाजासाठी जगतात.

लौकिकदृष्ट्या हा वेड्यांचा बाजार असतो, पण समूहवेदना त्यांना कळलेली असते. तिची ठसठसही ‘मी’च्या वेदनेपेक्षा खूप मोठी असते. हे त्यांना कळते म्हणूनच ते झोकून देऊन सामाजिक स्वास्थ्य ठीक करण्याचा प्रयत्न करत असतात, आपल्या प्रयत्नातून सेवाकेंद्रे उभी करतात.

पर्यटन हा विषय भारतीय जनमानसाला नवा नाही. ‘पर्यटन’ ही संज्ञा जरी अलीकडची आहे असं आपण मानलं तरी परंपरा मात्र खूपच प्राचीन आहे. या परंपरेची मुळं आपल्या संस्कृतीशी, धर्माशी जोडलेली आहेत हेही नाकारता येणार नाही. पूर्वीच्या काळी शिक्षणासाठी गुरुगृही जाणे येथपासून ते थकल्या वयात वानप्रस्थाश्रमात जाणे या सार्‍या घटना ‘पर्यटन’ या संज्ञेशी जोडता येतात.

भारतीय परंपरेत तीर्थयात्रा हाही एक मोठा भाग आहे, जो प्रादेशिक, भाषिक बंधनाच्या पलीकडे नेऊन प्रवास करण्यास भाग पाडतो. ‘नित्य वदावे, काशीस जावे’, असा परवचा लहानपणी ऐकला होता. त्याला सांस्कृतिक-धार्मिक अंग आहेच त्याचबरोबर काही क्षेत्री प्रवास करण्याची मनीषा जोपासता तो परवचा आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

तीर्थयात्रा म्हणजे केवळ पवित्र स्थळी जाऊन स्नानसंध्या करणे आणि आराध्यदेवतेची आराधना करणे एवढा मर्यादित विषय नाही, तर या यात्रेच्या काळात मनाने सात्त्विक होण्याबरोबर प्रवासात येणारे अनुभव, माणसं, भाषा, परिसर यांचा सूक्ष्म अभ्यास करणे होय.

पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनीं भटके-विमुक्त समाजातील मुलांसाठी सुरू केलेले ‘पुनरुत्थान समरसता गुरुकुल’

भारतीय समाजाचा आणि संस्कृतीचा सूक्ष्म अभ्यास करण्यासाठी अनेक परदेशी प्रवासी भारतात येऊन गेले आहेत. त्यांनी इथल्या परंपरा, सण, उत्सव आणि समाजजीवन यांचा अभ्यास केला. आपल्या परंपरेतील तीर्थयात्रांचा उद्देशही अभ्यास हाच होता. नित्यनूतन विचार आणि आचार यांचा संचय करून, आत्मसात करून आपले जगणे समृद्ध करणे, हाच या तीर्थयात्रेचा उद्देश होता. आधुनिक काळात ‘पर्यटन’ हा शब्द विकसित झाला तशी पर्यटन केंद्रेही विकसित झाली.

‘पाश्‍चात्त्य विचारांचा प्रचंड प्रभाव घेऊन आधुनिक काळात पर्यटन बहरले. ‘स्वान्त सुखाय’ जगण्यासाठी आणि एकांत मिळवण्यासाठी पर्यटनासारखी दुसरी गोष्ट नाही हे जाणीवपूर्वक समाजजीवनात बिंबवले गेले. समूहापासून अलिप्त राहून काही काळ स्वत:पुरते स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी जगण्याची पद्धती रूढ झाली.

यातूनच अनेक थंड हवेची ठिकाणे ही पर्यटन केंद्रे झाली. परंपरेने चालत आलेले नदीचे घाट आणि मठ-मंदिरांची आवारे यांना थंड हवेच्या ठिकाणांनी पर्याय उभा केला आणि दिवसेंदिवस हा पर्याय अधिक सशक्त झाला. ‘मी’ची जोपासना अधिक होऊ लागली.

‘समूह’पेक्षा ‘मी’ महत्त्वाचा झाला. आधी ज्या ‘मी’मध्ये क्षमता आहे तो ‘थंड हवेच्या ठिकाणी’ राहू लागला, पर्यटनाचा आस्वाद घेऊ लागला. आधुनिकीकरण, औद्योगिकीकरण यांच्या रगाड्यात ‘मी’ला शोधण्याचा, सांभाळण्याचा आणि जोपासण्याचा पर्यटन उद्योग चालू झाला. पर्यटन हा आनंदाचा विषय आहे, ज्ञानाचा विषय आहे, संस्कृती संवर्धनाचा विषय आहे; पण त्याचबरोबर आत्मकोशाला घट्ट करणाराही विषय आहे.

हा आनंद, आस्वाद केवळ स्वत:पुरता असतो. त्याला समूहभानही नसते आणि समूहवेदनाही नसते. जागतिकीकरणानंतर आपल्या सर्वांच्याच जीवनशैलीत आमूलाग्र बदल झालेला आहे. ‘मी’ पराकोटीवर पोहोचला आहे. त्याचप्रमाणे ‘मी’चे मन:स्वास्थही विचलित झाले आहे.

वाढत्या जबाबदार्‍या, आर्थिक प्रश्‍न, कौटुंबिक प्रश्‍न, सामाजिक, राजकीय प्रश्‍न यामुळे ‘मी’चे मन:स्वास्थ्य बिघडू लागले आहे. अशा वेळी पुन्हा ‘मी’ एकटेपणाचा अनुभव घेण्यासाठी सभोवतालच्या वास्तवाच्या कल्लोळातून दूर जाण्यासाठी पर्यटनाचा मार्ग स्वीकारताना दिसतो आहे.

गेल्या दहा-बारा वर्षांतील पर्यटन क्षेत्रातील आर्थिक घडामोडी पाहिल्यानंतर आपल्याला याचा नक्कीच अंदाज येईल. परंपरेने चालत आलेले कौटुंबिक पर्यटनदेखील आहेच, पण एकएकट्याने प्रवासाला जाणारे, पर्यटनाला जाणारे खूप असतात, कारण ते अस्वस्थ असतात. त्यांना शांती, समाधानाची गरज असते.

आपले मन मोकळे करण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी, कमीत कमी मनमोकळं रडण्यासाठी जागा हवी असते. ती जागा अशा पर्यटनातून मिळते आणि म्हणूनच गोंधळलेल्या, भांबावलेल्या, अस्वस्थ असणार्‍या ‘मी’ला पर्यटनाची गरज भासते.

आपल्या शक्तीनुसार तो ती गरज पूर्ण करून घेतो. स्वत:च्या समस्येचे उत्तर शोधतो. जशा व्यक्तीच्या समस्या असतात तशा समाजाच्याही समस्या असतात. समाजस्वास्थ्य ठीक राहावे म्हणून काही जण स्वत:तील ‘मी’चा विषय करतात आणि ते समूहभावनेत येऊन काम करतात. यातूनच मग बाबा आमटेंचे ‘आनंदवन’, भीमराव गस्तींचे ‘उत्थान’, गिरीश प्रभुणेंचे ‘समरसता गुरुकुल’, अभय बंग यांचे ‘शोधग्राम’ उभे राहते. या व्यक्ती स्वत:ला विसरून समाजासाठी जगतात.

पाबळ येथील ‘विज्ञान आश्रम’

लौकिकदृष्ट्या हा वेड्यांचा बाजार असतो, पण समूहवेदना त्यांना कळलेली असते. तिची ठसठसही ‘मी’च्या वेदनेपेक्षा खूप मोठी असते. हे त्यांना कळते म्हणूनच ते झोकून देऊन सामाजिक स्वास्थ्य ठीक करण्याचा प्रयत्न करत असतात, आपल्या प्रयत्नातून सेवाकेंद्रे उभी करतात.

महाराष्ट्रात अशी लहानमोठी हजारो सेवाकेंद्रे आहेत आणि वैयक्तिक व सामाजिक जीवनात जे काही प्रश्‍न आहेत ते सारे प्रश्‍न कमीअधिक प्रमाणात या सेवाकेंद्रांनी सोडवले आहेत.

वैयक्तिक जीवनात ‘मतिमंद अपत्य’ ही समस्या असू शकते. ‘अमेय पालक संघटना’ या समस्येचे उत्तर आहे. सामाजिक जीवनात वेश्या व्यवसाय करणार्‍या स्त्रिया आणि त्यांची अपत्ये ही समस्या आहे. नगर येथील स्नेहालय ही संस्था या समस्येचे उत्तर आहे.

पर्यावरणाचा र्‍हास आणि समस्या राक्षसी स्वरूपात पुढे येत आहेत. त्याला ‘पर्यावरण दक्षता मंच’ उत्तर देतो आहे. ही झाली वानगीदाखल काही नावे. समाजजीवनाच्या सर्व आयामांना स्पर्श करणारी सेवाकेंद्रे महाराष्ट्रात कार्यरत आहेत.

सेवाकार्य म्हटले की ‘आनंदवन’ एवढ्यापुरता हा विषय आता सीमित राहिलेला नाही. या छोट्या-मोठ्या सेवाकेंद्रांनी स्वत:ची ओळख विकसित केली आहे, व्यवस्था निर्माण केली आहे. वसा घेतल्यासारखे एकच एक विषय घेऊन त्या अहोरात्र काम करत आहेत. या सेवाकेंद्रांतून हजारो कार्यकर्ते कोणताही सन्मान, धन, पुरस्कार यांची अपेक्षा न करता अंधारात राहून प्रकाशदूताचे काम करत आहेत.

यांची एकच अपेक्षा असते- समाजाने आमच्या प्रकल्पात यावे, प्रकल्प पहावा. यांना तुमच्या सहवेदनेची, सहवासाची भूक असते. सहवेदना, संवेदना, संवाद यातूनच बरेचसे प्रश्‍न निकालात निघतात, असा या मंडळींचा अनुभव असतो. मग समस्याग्रस्त असलेला ‘मी’ या ठिकाणी गेला तर काय होईल? ‘मी’ स्वत:चे ‘मन:स्वास्थ्य’ सांभाळण्यासाठी नानाविध उपाय शोधतो आहे.

पर्यटन हा त्यातील एक उपाय. बिरबलाच्या गोष्टीप्रमाणे मन:स्वास्थ्य जपण्यासाठी ‘समाजस्वास्थ्य’ समजून घेतले तर? छोटे दु:ख विसरण्यासाठी मोठे दु:ख कसे दूर केले जाते हे पाहिले तर? ‘स्व’चा आत्मकोश फोडून ‘आम्ही’चे पंख लावले तर? जगणे किती सुंदर होईल नाही? आपल्या महाराष्ट्रात अनेक सेवाप्रकल्प कार्यान्वित आहेत. अशा प्रकल्पांना भेटी देणे हा एक स्वजागृतीचा, समाजजाणिवा जागृत होण्याचा मार्ग आहे. ‘मी’ एकटा असतो तेव्हा त्याला कुणाची तरी सोबत लागते.

अशा प्रकल्पातून ही सोबत नक्कीच मिळेल, कारण इथले ‘आम्ही’ ‘मी’ची सहवेदना, आपुलकी यांचे भुकेलेले असतात. त्यांना ‘मी’कडून केवळ प्रेमळ व्यवहाराची अपेक्षा असते आणि प्रेमाचा झरा तर प्रत्येकाच्या हृदयात असतो, मात्र व्यक्तीनुसार त्यांचा खळाळ कमीअधिक असतो. नैराश्य, मानसिक ताण, एकटेपणाची भावना यांचे शेवाळ या झर्‍यात साचलेले असते आणि झरा आटून जातो. अशा प्रकल्पभेटीच्या निमित्ताने साचलेले शेवाळ दूर करण्यास फुरसत नक्कीच मिळेल.

स्वत:तील ‘मी’ विसरून ‘आम्ही’च्या भावनेत जाण्यास मदत होईल. सुख, मन:शांतीसाठीच जर पर्यटनाचा अट्टहास करायचा असेल तर ‘सामाजिक पर्यटन’ ही नवी संकल्पना आपल्याला जोरदारपणे रुजवावीच लागेल. त्याशिवाय आपली ‘मी’च्या दुखण्यातून सुटका होणार नाही. पर्यटन करताना आपण जेथे जाऊ त्याच्या आसपास एखादा सेवा प्रकल्प असेल तर त्याला नक्की भेट दिली पाहिजे.

त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीची केंद्रे असणारी ठिकाणे, महापुरुषांची जन्मस्थाने, स्मारके, विविध जातींचा इतिहास दर्शवणारी स्थाने इत्यादी गोष्टींकडे सामाजिक पर्यटन केंद्र म्हणून पाहाणे गरजेचे आहे, कारण या सर्वच गोष्टींना इतिहासात खूप महत्त्व आहे आणि आपला इतिहास आपल्याला कशासाठी जगायचे हे नेहमीच शिकवत आला आहे.

आपला गौरवशाली इतिहास हा नेहमी समूहाचा इतिहास राहिला आहे. समूहशक्ती आणि समूहभक्ती यांचे पोवाडे इतिहास गात असतो हे ध्यानात घेऊन आधुनिक जीवनशैलीमुळे कोशात गुरफटलेला ‘मी’ आता सामाजिक पर्यटनाच्या माध्यमातून ‘आम्ही’मध्ये परावर्तित करावा लागेल. सामाजिक पर्यटन हा व्यवसाय असणार नाही. ती असेल जाणीव आणि उतराईपणाची भावना. स्वत:च स्वत:चा घेतलेला शोध.

आपणच आपली पाळेमुळे शोधावीत आणि ज्या जीवनरसाच्या बळावर आपण तगलो, जगलो, वाढलो तो जीवनरस पुन्हा नव्याने समजून घ्यावा, हीच प्रक्रिया असेल सामाजिक पर्यटनाची. सामाजिक भान उन्नत करत सहवेदना जागवत सामाजिक पर्यटन पुढील काळात अधिक विकसित करावे लागेल. केवळ आनंदासाठी पर्यटन नसून जगण्याची प्रेरणा मिळवण्यासाठी करण्याचे पर्यटन म्हणजे सामाजिक पर्यटन हे आता आपण ध्यानात घ्यायला हवे.

– रवींद्र गोळे

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?