Advertisement
सोयाबीनवर आधारित प्रक्रिया उद्योग
उद्योगसंधी

सोयाबीनवर आधारित प्रक्रिया उद्योग

'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v

सोयाबीन हे एक आश्चर्यकारक डाळवर्गीय धान्य आहे. हे धान्य मूळचे चीनमधले. भारतात 1970 पासून म्हणजे गेली 30-40 वर्षे सोयाबीनची शेती चालू आहे.

आपण आपल्या मोबाइलच्या बाबतीत, हा मोबाइल ‘चायना मेड’ आहे म्हणून मला वापरता येत नाही, असे कधीही म्हणत नाही. सोयाबीनच्या बाबतीत मात्र खुद्द शेतकर्‍यांनाही सोयाबीन कसे खावे हे माहीत नाही. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे ‘मोबाइल’ वापरण्यास सोपा करून दिलेला असतो.


फक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा!

या वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak

शेतातला सोयाबीन खाण्यापूर्वी त्यावर उष्णतेच्या प्रक्रिया करून अपायकारक घटक नष्ट करावे लागतात. ही माहिती खेड्यापर्यंत पोहोचलेली नाही. शहरांमध्ये हळूहळू सोयाबीन खाण्याविषयी जागृती होत आहे; पण हे आरोग्यदायक अन्न आहे आणि आपण तर चवदार अन्नपेयांचे ग्राहक आहोत. त्यामुळे अजून तरी सोयाबीनचे प्रक्रिया केलेले पदार्थ मुख्यत: व्यायामशाळांमध्ये-जिममध्ये व्यायाम करणार्‍या थोड्याशा लोकांपुरतेच मर्यादित आहेत.

लघुउद्योगात 5-7 लाखांच्या गुंतवणुकीत एका खोलीत सोयाबीनचे दूध व पनीर यांचे उत्पादन करण्याविषयी सरकारी सोयाबीन संशोधन केंद्र प्रशिक्षणाचे कार्यक्रम राबवत असते. अनेक उद्योजक होऊ इच्छिणार्‍यांनी मोठ्या उत्साहाने प्रशिक्षण घेतलेले असते, एवढेच नव्हे तर प्रशिक्षण घेतल्यानंतर अनेकांनी उद्योगही उभारलेले असतात, अगदी कर्ज काढूनसुद्धा. मात्र त्यापैकी यशस्वी झालेल्या प्रकल्पांची संख्या एका हाताच्या बोटावर मोजता येईल. असे का होते?

अपयशाला बाप नसतो. जर आपण यंत्रनिर्मात्यांना विचारले तर ते आपणास त्यांच्या छान छान चांगल्या यंत्रांवर यशस्वी झालेल्या एकाही उद्योगाचे नाव सांगू शकत नाहीत. देशात सोयाबीनचे दूध व पनीरची यंत्रे तयार करणारे डझनाहूनही जास्त मॅन्युफॅक्‍चरर आहेत. 1 किलो सोयाबीनपासून (ज्याची हल्लीची पुण्या-मुंबईतील किरकोळीची किंमत 60 रु. प्रति किलो असते. त्यापासून 8-10 लिटर पर्यायी दूध (म्हणजे झाले 400 रुपये) किंवा दीड किलो टोफू (सोया-पनीर) (म्हणजे झाले 350/- रुपये) तयार होत असताना पुण्या-मुंबईत यशस्वी झालेले 2-4 च प्रकल्प पाहावयास मिळतात.

त्यामुळे खूप वेळा या देशातील जनतेला सोयाबीनची चव आवडत नाही, असा गैरसमज पसरलेला आहे. मुंबईमध्ये सोयफिट, सोयाफिट, विशाल व आई (आई हा जपानी शब्द आहे) हे सोयाबीनच्या दूध व पनीरचे ब्रॅन्ड यशस्वी ठरलेले आहेत. पुण्यात स्पायसर कॉलेज गेली अनेक वर्षे सोया दूध, पनीर व सोयाबीनचे अनेक गोड पदार्थ विकत आहेत. तसेच चेतरानचे श्रीखंड, लस्सी वगैरे उत्पादने लोकप्रिय आहेत. त्यांच्या यशाचे रहस्य काय?

हेच नव्हेत, तर जगातला कोणताही उद्योग चालण्याचे एकच रहस्य असते. त्यांनी ग्राहकांची नस ओळखलेली असते. संशोधन केंद्रांनी लिहून दिलेल्या, यंत्रनिर्मात्यांनी ‘ठोकून’ दिलेल्या पाकक्रियांमध्ये आपणास बदल करावे लागतात.

कर्ज काढून यंत्रे घेणार्‍या उद्योजकांसाठी हे बदल करण्यासाठी आणि मार्केटिंगसाठी खर्चाला पैसे उरत नाहीत. बँका, यंत्रे, तज्ज्ञ आपणास ‘यश’ देत नाहीत. यश ग्राहक देतो, म्हणून आपण ग्राहकाचा विश्‍वास संपादन केला पाहिजे.

यश मिळवणार्‍या उद्योगांनी प्रथम लहान प्रमाणावर उद्योग सुरू केलेला असतो. आपण शक्यतो प्रथम गृहोद्योग म्हणून सोया दूध व पनीरचा उद्योग सुरू करावा.

त्यासाठी स्वयंपाकघरातील उपकरणे पुरेशी होतात. सोया संघ पुणे ह्या ‘ना नफा ना तोटा’ संस्थेच्या माध्यमातून आम्ही पुण्यात ह्याचे एक-दोन दिवसांचे प्रशिक्षण देतो. प्रथम आपण स्वत: केलेले सोया दूध प्यावे. तसेच पनीर खावे. मित्रांना खिलवावे व मग यंत्रे खरेदी करावीत. खरे तर तेव्हा आपल्या लक्षात येईल की, खास यंत्रांची गरज नाही. इतरही काही चांगल्या कल्पना आहेतच. आताच्या काळात स्मार्टफोनच्या साहाय्याने आपण अनेक ग्राहकांपर्यंत सहज पोहोचू शकता.

सोयाबीनचे पौष्टिक मूल्य – आपण ग्राहकांना सोयाबीनचे फायदे समजावून दिले पाहिजेत. सोयाबीन कांतिवर्धक आहे. सोयाबीन मलवाहक आहे. सोयाबीनमध्ये फायबरचे प्रमाण चांगले आहे. त्यात लोह व कॅल्शियम चांगल्या प्रमाणात असते. सोयाबीनमध्ये कोलेस्ट्रोल नसते. सोयाबीनमध्ये प्रोटीन मोठ्या प्रमाणात असतात. दूध किंवा मटणाइतकी आणि मटणासारखीच असणारी ही प्रथिने पचण्यासाठी मटणसारख्याच पाकक्रिया केल्या पाहिजेत.

सोयाबीन रक्तदाब नियंत्रित करते. मांसपेशी मजबूत करते. पेशी निर्माण करण्याचे कार्य करते. ते रक्तातील साखर नियंत्रित करते. कोलेस्ट्रोलची पातळी कमी करते. मलाची मात्रा वाढवते. ते कोलनच्या कॅन्सरला, ब्रेस्ट कॅन्सरला प्रतिबंध करते व पचनसंस्था स्वच्छ ठेवण्यास मदत करते.

सोयाबीनपासून दूध व दुधाचे पदार्थ, ब्रेड, बिस्किटे व इतर बेकरी उत्पादने करता येतात. सोयाबीन ही डाळ आहे आणि देशात डाळींचा सातत्याने तुटवडा असतो. देशात दरसाल 1 कोटी 25 लाख टन सोयाबीनचे उत्पादन होते. हे सर्व सोयाबीन तेलगिरण्यांना तेल काढण्यासाठी पुरवले जाते. तेथे तेल व पेंड मिळते. पेंड कोंबड्यांना, डुकरांना खाऊ घातली जाते.

हे ई-बुक खरेदी करण्यासाठी जाहिरातीवर क्लिक करा.

एकीकडे एकशेवीस कोटी जनतेला प्रथिने पुरवणारे पदार्थ म्हणजे दूध, अंडी, मांस, मासे, अंडी महाग असल्यामुळे परवडत नाहीत, तर दुसरीकडे आपण चीन, जपानमधले लोक जे सोयाबीन रोजच्या आहारात वापरतात, ते सोयाबीन आपण कोंबड्यांना, गुरांना आणि डुकरांना खाऊ घालतो. सर्वसामान्य उद्योजक हे चित्र बदलू शकतात.

1) आपण आपला नोकरी, धंदा चालू ठेवून घरातून सोयाबीनचे पदार्थ बनवून छोट्या प्रमाणावर उद्योग सुरू करावा व वाढवावा. जे उद्योजक कल्पनाची गुंतवणूक करतात ते यशस्वी होतात.

कुणाल घेडामल यांनी गृहोद्योगात सोयाबीनचे दूध बनवायला सुरुवात केली. ते जवळच्या पार्कमध्ये सकाळी व्यायाम करणार्‍यांना सोया दूध विकतात. त्यात यशस्वी झाल्यावर त्यांनी सोयाबीनचे आइस्क्रीम करून शेजारच्या हॉटेलातून विकायला सुरुवात केली. नुकत्याच पार पडलेल्या दिवाळीत त्यांनी दिवाळीच्या फराळाच्या पदार्थांत सोयाबीन वापरून केलेला फराळ विकला.

सोया नट्स-soya nuts, इन्स्टंट ढोकळा, सोया उत्तपम्, क्‍विक सोया डोसा, सोया खाकरे, सोया इन्स्टंट उपमा, कटलेट्स, इन्स्टंट इडली, सोया पकोडा, शुगर फ्री बिस्कीट, सोया स्टिक्स अशी अनेक उत्पादने पुणे-मुंबईच्या बाजारात पाहावयास मिळतात. मात्र ही या उद्योगाची सुरुवात आहे. आम जनतेपर्यंत अजून सोयाबीन रोजचे अन्न म्हणून पुढे आलेले नाही.

नुकत्याच झालेल्या दिवाळीत तुरीची डाळ भाव खाऊन गेली. यापुढच्या काळात अशा वावटळी डाळींच्या बाबतीत येतच राहतील. सोयाबीनच्या डाळीचा वापर करून पर्यायी डाळ बनवता येते. असे उद्योग आता नुकतेच सुरू होत आहेत. आंध्र प्रदेशात राजमुंद्री येथे असा पहिला प्रकल्प सुरू झाला आहे. पुढील 2-4 वर्षांत एक-दीड कोटीच्या यंत्रांनी अशी उत्पादने सर्रास केली जातील.

– पद्माकर देशपांडे
9325006291
soyasangh@gmail.com


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

error: Content is protected !!