स्टार्टअप्स : संपूर्ण जगासाठी आशेचा किरण


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


तसं पाहायला गेलं तर गेली पन्नास-साठ वर्षे आपल्याकडे उद्योगांना प्रोत्साहन देण्याच्या योजना राबवल्या जात आहेत. अनेक लहानमोठे उद्योग चालू आहेत. अनेक प्रकारचे उद्योग त्यांच्या क्षेत्रात कौतुकास्पद कार्यही करत आहेत. मग आताच एवढं स्टार्ट अप्चे कौतुक कशासाठी? पहिलाच महत्त्वाचा प्रश्न. स्टार्टअप म्हणजे काय?

कोणत्या उद्योगांना ‘स्टार्टअप’ म्हणावे? स्टार्टअप् म्हणजे नवकल्पना आणि नवतंत्रज्ञानावर आधारित असा, ‘पायोनीअर’ उद्योग ज्याची कार्यपद्धती नावीन्यपूर्ण असते. स्टार्टअपमुळे आता सगळ्यांच्याच आशा पल्लवित झाल्या आहेत. बदलत्या काळात नवे रोजगार नवीन उद्योगातूनच निर्माण होऊ शकतील. स्टार्टअप ही गोष्ट काही फक्त माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची ‘मोनोपोली’ नाही.

हे सारे काही अभूतपूर्व आहे. असे उद्योगाला प्रोत्साहन देणारे वातावरण यापूर्वी कधी पाहिले नव्हते, ऐकले नव्हते. जे काही ऐकले होते ते अमेरिका, जपान, कोरिया, सिंगापूर, इस्राएल यांच्या बाबतीत होते, मात्र आता उद्योग जगतात पूर्वी कधी नव्हे एवढी उत्साहाची लाट आली आहे. जणू काही आपण भारतीय उद्योजक जगाच्या रणांगणामध्ये यशस्वी होण्यासाठी कूच करत आहोत.

पारंपरिक उद्योगांचे सर्व मार्ग हाताळून झाल्यावर जवळजवळ सर्वच जगामध्ये स्टार्टअप्चे युग सुरू झाले आहे. अर्थातच स्टार्टअपची मक्का/काशी म्हणजे सिलिकॉन व्हॅली, अर्थात अमेरिका. त्यापाठोपाठ स्टार्टअप्च्या बाबतीत क्रमांक लागतो तो इस्राएलचा आणि स्टार्टअप्च्या बाबतीत मेक्सिकोने तर कमालच केली आहे.

त्यांनी स्टार्टअप उद्योग उभारण्यासाठी मेक्सिकोत येऊ इच्छिणार्‍या परदेशी व्यक्तींसाठी जणू काही पायघड्या घातल्या आहेत. स्टार्टअप्ची कल्पना घेऊन येणार्‍या परदेशी व्यक्तीलासुद्धा ते साधारणपणे ४०,००० डॉलर्सची मदत करत आहेत. इतर प्रोत्साहने आहेतच.

भारतातच नव्हे तर सार्‍या जगभर तरुणांची संख्या वाढलेली, पण हाताला काम नाही अशी परिस्थिती. अर्थातच जो रोजगार निर्माण करू शकेल त्याचे स्वागत करायला सर्व जण उत्सुक आहेत. असो. आपल्याकडे तर रोजगाराच्या संधी इतक्या कमी झाल्या आहेत की, परिस्थिती गंभीर होऊन गेल्याला अनेक वर्षे झाली आहेत. एखाद्या शिपायाच्या नोकरीसाठी लाख लाख अर्ज येत आहेत, अगदी Ph.D. झालेल्यांचेसुद्धा.

स्टार्टअप्मुळे आता सगळ्यांच्याच आशा पल्लवित झाल्या आहेत. बदलत्या काळात नवे रोजगार नवीन उद्योगातूनच निर्माण होऊ शकतील. आता केंद्र सरकारने, महाराष्ट्र सरकारने उद्योजकांच्या मार्गातले काटे दूर करायला सुरुवात केली आहे. अजून खूप काही अपेक्षित आहे, पण ही सुरुवातसुद्धा ‘थोड्या वेळात अंधार संपेल. पहाट होईल’ सांगत येत आहे.

आता कोणत्याही वस्तूच्या खरेदीसाठी आपल्या डोळ्यांसमोर नाव येते ते फ्लिपकार्ट किंवा स्नॅपडीलचे आणि जर आपण एखाद्या आजारासाठी एखादा डॉक्टर शोधत असाल तर आपल्या मदतीला येते प्रॅक्टोसारखे अ‍ॅप, सिनेमाची तिकिटे बुक करायला एक अ‍ॅप आहे. हॉटेल बुक करणे, रिक्षा-टॅक्सी बुक करणे अशा अनेक बाबी आता पूर्वीपेक्षा सुखद अनुभव देणार्‍या झाल्या आहेत.

अशा स्टार्टअप्ची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यांची उलाढाल वाढत आहे. विश्वास ठेवा अगर ठेवू नका, पण भारतात यशस्वी ठरलेले स्टार्टअप्चे फौंडर भारत सोडून अमेरिकेत स्थायिक होऊ लागले आहेत आणि ह्या बाबीची चिंता सरकारला पडली आहे. हे सारेच नवीन आहे, अभूतपूर्व आहे, आशादायक आहे, प्रेरणा देणारे आहे. जणू काही खूप दिवसांचे स्वप्न आपल्या डोळ्यांसमोर साकार होत आहे.

पंखात बळ असणार्‍या, हृदयात उमेद असणार्‍या, उत्कर्षाची स्वप्ने प्रत्यक्षात आणू इच्छिणार्‍या युवा वर्गासाठी आशेची नवीन पोतडीच यंदाच्या बजेटने नवउद्योजकांना गिफ्ट दिली आहे. अंगातल्या ऊर्जेला, डोक्यातल्या नवकल्पनेला आधार मिळाला आहे. सर्वच उद्योगांप्रमाणे स्टार्टअप्चे गाडेसुद्धा ‘पैशाचे काय?’ येथे अडणारच, पण त्यावर उत्तरे आहेत. एवढं खरे की, जर तुमची कल्पना व्यवहार्य असेल तर आता तुमची कल्पना हेच तारण समजून भांडवल पुरवले जाईल.

खरे तर उद्योगासाठी पैसा उभा करणे हे उद्योजकाचे कामच नाही. किंबहुना पैशाची तजवीज करणे यातच उद्योजकाची दमछाक होते आणि महत्त्वाचे म्हणजे ‘फोकस’ चुकतो. आपली व्यवहार्य कल्पना साकार करणे, हेच उद्योजकाचे काम. ग्राहकाची ‘गरज’ कशी भागवायची एवढाच उद्योजकाचा फोकस असावा.

जर तुमची उद्योगाची संकल्पना आश्वासक असेल तर यापुढे पैसा तुमचा पाठलाग करेल. मी हे पाहात आहे. मात्र महत्त्वाची बाब आहे ‘आश्वासक वाटली पाहिजे’. सुखासुखी कोण आपले पैसे पाण्यात टाकेल.

आता विचार करायचा संधी किती? धोका तर प्रत्येक उद्योगात असतोच, पण संधी किती आणि धोका किती यांचे प्रमाण पाहायचे. आपण अपयशाला घाबरतो; पण यश-अपयश आपल्या हातात नसते. आपण प्रयत्न करायचे आणि हो, प्रयत्न वाया जात नाहीत. प्रत्येक अपयश त्याच्याबरोबर नव्या यशाचे बीज घेऊन येते.

एखाद्या स्टार्टअप्चे व्हॅल्युएशन १ अब्ज डॉलर झाले की त्याला युनिकॉर्न म्हणतात. मात्र ज्यांचे मूल्य १० अब्ज डॉलर झाले आहे म्हणजे जे डेकॉकार्न आहेत अशा स्टार्टअप्च्या यशोगाथा गेल्या काही वर्षांपासून जग पाहात आले आहे. या रस्त्यावर सगळे काही गुलाबी आहे असे मला म्हणायचे नाही. येथे अनेक स्टार्टअप्चे बालमृत्यूही होतात. आपण त्याची कारणे पुढील लेखांमध्ये पाहूयात.

स्टार्टअप् ही गोष्ट काही फक्त माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची ‘मोनोपोली’ नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ते अगोदरच स्पष्ट केले आहे. अनेक अन्नप्रक्रिया उद्योग, कृषिमाल साठवणे, वाहतूक करणे, विक्री करणे यात नावीन्यपूर्ण बदल करणार्‍या कंपन्या आपण पाहू शकतो.

प्रश्न व्यवहार्य कल्पनेचा आणि ती राबवण्याचा आहे. अगदी आय.टी.मधली कल्पना असली तरी ती आपण यशस्वी करू शकतो, कारण आपण त्यासाठी ते तंत्रज्ञान असणार्‍या व्यक्तींना कामावर घेऊ शकतो, भागीदार करून घेऊ शकतो.

आता बस चुकू द्यायची नाही. लहान गुंतवणुकीने सुरुवात करायची. लहान गुंतवणूक जर अल्प कालावधीत ‘पैसा वसूल’ करू शकत असेल, तर आपणास आता बँका, व्हेंचर कॅपिटल कंपन्या, क्राऊड फंडिंग वगैरेंमधून भांडवल मिळेल. या देशातल्या स्टार्टअप्ना पैसा पुरवण्यासाठी परदेशी भांडवलही आले आहे, येत आहे.

– पद्माकर देशपांडे
9325006291
soyasangh@gmail.com

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?