उद्योग करेन की नाही याबद्दल कोणतीच खात्री नव्हती; पण कलेशी निगडित नक्की काही तरी करेन याबद्दल विश्वास होता. शिक्षण तसं चौकटीतलं होतं पण रंगावरचं प्रेम स्वस्थ बसू देत नव्हतं. विषय आवडता ‘कला’. शिक्षण एम.कॉम. कोणताच ताळमेळ नाही.
एम.कॉम केलं, पण नोकरी करायची नव्हती. कागद मोजायचे नव्हते. पुन्हा रंग आठवले. म्हटलं करू काही तरी. असा विचार करून आवडत्या विषयाचा क्लास लावला. तो पूर्ण करून पहिली नोकरी मिळवली, जे. आर. ग्राफिक डिझायनर ऍट ताज फ्रोझन फूड्स मुंबई. एक समाधान होतं काही तरी केल्याचं, काही तरी मिळवल्याचं. रोज नवीन काही तरी…
रोज एक नवीन आव्हान. श्रमाचं बीज इथे पेरलं गेलं. पुढे लवकरच एक नवीन संधी चालून आली. जे. आर ग्राफिक डिझायनर ऍट डिजिकॅबल नेटवर्क इं. प्रा. लि., इथे पूर्ण काम वेगळं होतं. आधी म्हटल्याप्रमाणे एक नवीन संधी. क्रिएटिव्ह डिझायनर ते टेक्निकल डिझायनर असा बदल झाला. पुढे टिव्ही चॅनेलसाठी इनहाऊस काम करण्याची संधीसुद्धा मिळाली. हे काम मी पाच वर्षे केलं.
अशातच आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा पार पडला. मी आई झाले. मुलीसाठी वेळ देणं जास्त महत्त्वाचं ठरत होतं. अर्धवेळ नोकरी मिळणं शक्य नव्हतं. वेळेचा, कामाचा आणि पैशाचा योग्य समन्वय राखताही येत नव्हता. मग एक दिवस ठरवलं सुरुवात करू. पुन्हा कलेला वाव देऊ, छोट्या छोट्या कामांनी सुरुवात करू. रु. ३००, रु. ५०० अशी हळूहळू सुरुवात झाली.
लोकांना काम आवडत होतं. पोचपावती मिळायला लागली. पर्यायाने आत्मविश्वास वाढला. ‘आर्टलाइन’ या नावाने मी सप्टेंबर २०१५ सोल प्रोप्रायटर म्हणून व्यवसाय नोंदवला. पूर्णवेळ आर्टलाइनचं काम सुरू झालं. ‘आर्टलाईन’कडे आता वेगवेगळ्या क्षेत्रातली कामं येत आहेत. व्यवसायाची नोंदणी केली असल्यामुळे आता केवळ एक डिझायनर म्हणून काम न करता इतर अनेक गोष्टी पाहाव्या लागतात.
त्या वेगवेगळ्या स्कील डेव्हलप होतायत. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या उद्योजकांना त्यांच्या उद्योग वाढीसाठी माझ्या कलेचा उपयोग होतोय यांचा आनंद आहे. कामामध्ये वेगवेगळ्या लोकांबरोबर काम करताना चांगले-वाईट अनुभव येत आहेत. त्यातूनच उद्योगजगताचे रोज नवनवीन पैलू शिकायला मिळत आहेत.
एकीकडे मुलीचं संगोपन आणि ‘आर्टलाइन’ म्हणजे ‘स्वप्नातलं मूल’ अशी दुहेरी जबाबदारी सांभाळताना माझी तारेवरची कसरत होते खरी, पण या सगळ्या वाटचालीत माझे पती व कुटुंब यांची मला मोलाची साथ मिळत आहे. स्टार्टअप आंत्रप्रेनर म्हणून ‘आर्टलाईन’ची पहिली पायरी तर चढले आहे. भविष्यात वेगवेगळ्या कल्पनेच्या खूप पायर्या अजून चढायच्या आहेत. त्यासाठी मी प्रयत्न करेनच. महिला उद्योजक म्हणून होतकरू महिलांना एक सांगावंसं वाटतंय, “मैत्रिणींनो स्वप्न बघा, जगा आणि ती स्वप्न खूप मोठी करा.”
– विद्या गोगटे
(९९२०४९९९५३)
‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.