प्राॅपर्टी क्षेत्रातली भारतातला पहिला युनिकॉर्न स्टार्टअप

मुंबईत सगळं काही सहज मिळतं, पण घर नाही. एक तरुण मुंबईत घर शोधण्याचा प्रयत्न करत होता. त्याने इंटरनेटवर अनेक ठिकाणी शोध घेतला. शेवटी एकदाचं त्याला घर मिळालं, पण त्यासाठी त्याला खूप मोठी ब्रोकरेज फी भरावी लागली.

पुढील वर्षी जेव्हा त्याच घरमालकाशी तो कराराचे नूतनीकरण करत होता, तेव्हा त्याला धक्काच बसला; तो ब्रोकर परत आला आणि त्याने पुन्हा ब्रोकरेजची मागणी केली. स्वत:सोबत घडत असलेल्या या घटनाक्रमातून या तरुणाला जाणवलं की ही एक मोठी समस्या आहे, जिचा भारतात लाखो लोकांना सामना करावा लागत असणार.

तो त्याच्या मित्रांशी या संदर्भात बोलला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की त्यांनादेखील अशाच समस्यांना तोंड द्यावं लागलं होतं. या समस्येवर समाधान काढण्याच्या हेतूने जन्म झाला प्राॅपर्टी क्षेत्रातल्या भारतातल्या पहिल्या युनिकॉर्न स्टार्टअपचा म्हणजेच ‘नोब्रोकर’चा.

‘नोब्रोकर’चे सहसंस्थापक अखिल गुप्ता, अमित कुमार अग्रवाल आणि सौरभ गर्ग यांनी २०१३ मध्ये तंत्रज्ञान-आधारित ब्रोकरेजमुक्त रिअल इस्टेट प्लॅटफॉर्म सुरू करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा १ अब्ज अमेरिकन डॉलर्सचे मूल्यांकन साध्य करणे हे एक अशक्य वाटेल असे स्वप्न होते.

म्हणूनच जेव्हा या स्टार्टअपला नोव्हेंबर २०२१ मध्ये पहिला प्राॅपर्टी युनिकॉर्न बनण्यासाठी २१० दशलक्ष अमेरिकन डॉलरचा फंड मिळाला, तेव्हा स्वतः ‘नोब्रोकर’च्या संस्थापकांना आश्चर्य वाटलं. हेतू योग्य असला तरी त्यांचा पुढचा मार्ग मात्र सोपा नव्हता. “आम्हाला वाटले की आम्ही एक खराखुरा प्रश्न सोडवत आहोत, त्यामुळे कोणत्याही नवोदित उद्योजकाप्रमाणे आम्ही आमचा प्रवास सुरू केला”, अखिल गुप्ता त्यांच्या प्रवासाबद्दल सांगत होते.

“आम्ही एका छोट्या बंगल्यात एक कार्यालय भाड्याने घेतले, जिथे मुख्य रस्त्यावरून थेट प्रवेश करता येत असे. पण ही कंपनी स्थापन करून आम्ही प्रत्यक्षात एक प्रकारचा व्यत्यय आणत होतो हे आमच्या लक्षात येत नव्हतं. एक दिवस अचानक काही दलाल आमच्या कार्यालयात घुसले आणि फर्निचरची तोडफोड करू लागले. त्यावेळी आमच्याकडे सुरक्षा रक्षक किंवा सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता.”

या घटनेमुळे ‘नोब्रोकर’च्या संस्थापकांना ते योग्य दिशेने काम करत आहेत याबद्दल आत्मविश्वास वाटू लागला. तोडफोड करणाऱ्या दलालांना ‘नोब्रोकर’कडून धोका निर्माण झाला होता आणि त्यांना मिळणाऱ्या कमिशनवर गदा आली होती, त्यामुळे ते चिडले होते.

आम्हाला विश्वास वाटतो की ज्या समस्येचे निराकरण करण्यासाठी आम्ही ‘नोब्रोकर’ची स्थापना केली, ती समस्या सोडवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.

आम्हाला खात्री आहे की हे एक अतिशय महत्त्वाचे बिझनेस मॉडेल आहे. मी माझ्या टीमला एक गोष्ट नेहमी सांगतो की तुम्ही एखादी चूक केली तर त्यात काही अडचण नाही, गुप्ता म्हणाले. तुम्ही चुका केल्या पाहिजेत, पण त्या चुकांमधून शिकून घ्या आणि पुन्हा तीच चूक करू नका.

ब्रोकरचे खूपच जास्त कमिशन आणि डुप्लिकेट सूची या मालक आणि घर शोधणार्‍यांसाठी सर्वात जास्त त्रासदायक बाबी आहेत. डुप्लिकेट सूची म्हणजे एकसारखी माहिती अनेक ठिकाणी येत राहते. काही दलाल १० महिन्यांचे भाडे किंवा मालमत्ता विक्रीच्या ६% ब्रोकर शुल्क आकारतात.

‘नोब्रोकर’ ॲपचा वापर करून ग्राहक ब्रोकरचे कमिशन वाचवतात. सहा वर्षांत आपलं स्थान पक्कं केल्यानंतर ‘नोब्रोकर’ने आता नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून सेवा सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

‘नोब्रोकर’ आता आधुनिक स्वरुपात मालक आणि ग्राहक दोघांच्याही गरजा पूर्ण करणार आहेत. तंत्रज्ञानाचा वापर करून स्मार्ट रेकमेंडेशन म्हणजेच ग्राहकांना राहण्यासाठी त्यांचे आदर्श ठिकाण शोधण्यात मदत करेल. ‘नोब्रोकर’ गुगल मॅप प्लॅटफॉर्मचा वापर करून स्थानिक सुविधा, लिव्हेबिलिटी स्कोअर आणि ट्रान्झिट स्कोअर काढते.

अशी माहिती मालकांच्या मालमत्तेच्या तपशीलांना पूरक ठरते आणि खरेदीदार आणि भाडेकरूंना प्रत्येक मालमत्तेबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करते. ‘नोब्रोकर’वर ८५ टक्के व्यवहार भाड्याच्या जागांचे होतात आणि गुगल क्लाउडवर चालणाऱ्या रेंट-ओ-मीटरमुळे मालमत्तेच्या मालकांना आणि भाडेकरूंना भाड्याच्या किमतींचा अंदाज लावण्यात मदत मिळते.

‘नोब्रोकर’ने टचलेस एंट्री नावाचे वैशिष्ट्यदेखील विकसित केले आहे, जे घरातील कर्मचार्‍यांसह मालमत्तेतील रहिवाशांना शोधण्यासाठी फेशियल रेकग्निशनचा उपयोग करते, ज्यामुळे चेहऱ्याद्वारे व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी फक्त २०० मिलीसेकंद इतका वेळ लागतो.

कोविड-१९ मुळे भारत लॉकडाऊनमध्ये गेल्यावर अवघ्या तीन आठवड्यांत हे लाॅंच करण्यात आले आणि पृष्ठभागांशी शारीरिक संपर्क कमी करण्यात मदत करून त्यांचे संरक्षण करणे शक्य झाले. “आमचा स्टार्टअप युनिकॉर्न श्रेणीमध्ये आल्यामुळे आम्हाला नक्कीच आनंद झाला आहे. आम्ही जे काही करत आहोत ते गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहे आणि ग्राहकदेखील आमच्यावर विश्वास ठेवत आहेत.

आम्ही सिद्ध करून दाखवले आहे की तुम्ही फक्त ग्राहकांच्या समस्येवर वर्षानुवर्षे लक्ष केंद्रित केले तरच तुमची प्रगती होऊ शकते,” ‘नोब्रोकर’चे सह-संस्थापक आणि सीईओ अमित अग्रवाल म्हणाले. आज ‘नोब्रोकर’च्या सहाय्याने लाखो ग्राहक आपल्या जागांचे व्यवहार कोणत्याही अडचणीशिवाय करत आहेत, तेही ब्रोकरेज न देता. हेच ‘नोब्रोकर’चे यश आहे.

– चंद्रशेखर मराठे

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद व्हा आणि अनेक लाभ मिळवा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?