उद्योजकाचा प्रवास कसा असावा? सुरुवात ते यशस्वी उद्योजक…


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


कल्पनेवर विश्वास ठेवून आपल्या व्यवसायाची सुरुवात करतो. नवउद्योजकांमध्ये सुरुवातीच्या काळात कंपनी नोंदवण्यापासून ग्राहकभेटी, प्रेझेन्टेशन्स या सर्व गोष्टी अगदी जोशात होतात. एखादी नवीन गोष्ट करतानाचा असलेला उत्साह, ऊर्जा वाखाणण्याजोगा असतो.

व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय हा बरेचदा जवळच्यांना म्हणजेच आईवडील, नातेवाईक, मित्रमंडळी यांना पचेल-रुचेल असा नसतो; किंबहुना बर्‍याच विरोधानंतरही ही व्यक्ती व्यवसाय सुरू करून स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असते.

स्वत:ला सिद्ध करण्याच्या या प्रक्रियेमध्ये व्यावसायिक यश-अपयशाची चवसुद्धा चाखतो. यश मिळाल्यानंतरचा आनंद, अपयशाच्या चटक्यांवर फुंकर घालतो. अशा अनेकांच्या कथा आपल्या आजूबाजूला आपण पाहिल्या असतीलच.

नवउद्योजकांवर केलेल्या एका अभ्यासाचा निष्कर्ष असा आहे की, हजारांतील फक्त चार ते सहा व्यवसाय हे तीन वर्षांनंतर टिकतात. बाकीचे दूरदृष्टीपणाचा अभाव, चुकीचे निर्णय, व्यवसायातील अपुरे ज्ञान अशा अनेक कारणांमुळे बंद होतात.

या नवउद्योजकांचे काय चुकले, यावर विचार नक्कीच करायला हवा, पण त्याचबरोबरीने या चुका सुधारण्याच्या आणि यशाच्या मार्गावर परत येण्याच्या प्रक्रियेवर अधिक लक्ष दिले गेले पाहिजे. प्रत्येक उद्योजकाने पुढील गोष्टींवर तत्परतेने लक्ष दिल्यास, व्यवसायात असलेली अमुकएक व्यक्तीपासून व्यवसायातील एक प्रभावी आणि आदर्श व्यक्तीपर्यंतचा प्रवास यशस्वीपणे करता येऊ शकतो.

आपला व्यवसाय गांभीर्याने घेणे :

तीच व्यक्ती प्रभावी आणि यशस्वी उद्योजक म्हणून गणली जाते ज्याची त्याच्या व्यवसायावर पूर्ण श्रद्धा असते आणि त्या उद्योजकाचा आपल्या उत्पादनांवर आणि सेवांवर विश्वास असतो.

बरेचसे लघुउद्योजक, व्यवसाय सुरू केल्यानंतर व्यवसायातील लहान पैलूंबाबत जसे की, ग्राहकभेटी, पेमेंट follow-ups, मालाची योग्य वेळेत डिलिव्हरी इ.बाबत उत्साही व सतर्क न राहता बिनधास्तपणाचा आव आणतात आणि इथूनच अपयशाच्या धक्क्यांची सुरुवात होते.

व्यवसाय हा विषयच मुळी सहजपणे घेण्याचा नाही. इथे उद्योजकाने सतत दक्ष राहिले पाहिजे. बर्‍याचशा व्यवसायांची सुरुवात घरातून होते. त्यात गैर काही नाही, पण कालांतराने व्यवसाय हा एखाद्या कार्यालय किंवा फॅक्टरीमध्ये स्थलांतरित होणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास उद्योजकाचा वेळ कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींमध्ये जाण्याची शक्यता असते. शिवाय इतरांचा त्या व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही ‘not so professionals’ असा होऊ शकतो.

प्रत्येक कामाचे नियोजन :

कामाचे नियोजन हे फक्त महत्त्वाचे नसून प्रत्येक उद्योजकाने त्याची सवय करून घेणे हे गरजेचे आहे. त्यासाठी त्याच्या व्यवसायाचे अंतिम ध्येय निश्‍चित असणे गरजेचे आहे. या ध्येयाला अनुसरून उद्योजकाला त्याच्या वार्षिक, तिमाही, मासिक, साप्ताहिक आणि अनुषंगाने दैनिक कामांचे नियोजन करणे सोयीस्कर होऊ शकते.

कामांचे नियोजन लिखित स्वरूपात करून ठेवावे. त्यात त्याने आपल्या आठवड्याच्या कामांचे नियोजन करून अतिमहत्त्वाची, महत्त्वाची आणि नियमित कामे यांची मांडणी करून ठेवल्यास कामे व्यवस्थित आणि शिस्तीने करायची सवय लागेल.

पैशाचा योग्य वापर :

ज्या उद्योजकाला उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ घालता येतो तो व्यावसायिक त्याच्या व्यवसायाचे आयुष्य वाढवून व्यवसायाला स्थिरता मिळवून देतो. Cash Flow (रोख प्रवाह) बाबत सतर्क राहणे ही प्रत्येक व्यावसायिकाची सर्वात महत्त्वाची भूमिका आहे.

प्रत्येक व्यवसायामध्ये वस्तूंची खरेदी, घेतलेल्या आणि दिलेल्या वस्तू व सेवांचे पेमेंट्स, पगार, इतर मेन्टेनन्स सांभाळताना पैशाचा वापर योग्य पद्धतीने होतोय का यावर विशेष लक्ष दिले गेले पाहिजे. उद्योजकाने पैसे कमवण्याबरोबर पैसे वाचविण्यावर लक्ष दिल्यास नफा पातळी वाढण्यास मदत होते.

विक्रीबाबत तत्पर :

उद्योजकाचे व्यवसाय सुरू करण्याचे कारण काहीही असो, पण सुरू केलेल्या व्यवसायातून नफा मिळवणे हे उद्दिष्ट प्रत्येक उद्योजकाचे असते. आता जास्त नफा कमावण्यासाठी, अधिक विक्री हे अनुषंगाने आलेच. विक्री करताना कोणत्या गोष्टी केल्या जातात?

मार्केटिंग, प्रमोशन आणि जाहिरात; पण या सर्व गोष्टी करताना त्या किती हुशारीने, खर्चाचे प्रमाण बांधून आणि त्या आपल्या संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचल्या जात आहेत का याचा विचार करून केल्या गेल्या तरच त्या उपयोगाच्या आहेत.

विक्रीबाबत तत्पर राहणे म्हणजेच आपल्या अधिकाधिक संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणे. यामध्ये व्यावसायिकाने केलेल्या कामाचे नियोजन नक्की कामी येऊ शकेल. आपल्या कार्यरत क्षेत्रातील वस्तू आणून सेवा घेणार्‍या खरेदीदार व्यक्तींची आणि कंपन्यांची यादी बनवल्यास येथूनच विक्रीबाबतच्या नियोजनाची सुरुवात होईल.

त्यानंतर उद्योजकाने आपल्यामध्ये असलेले विक्री कौशल्य वापरून, खरेदीदाराची गरज समजून, वेळोवेळी आपल्या विक्रीपद्धतीमध्ये योग्य तो बदल करून खरेदीदाराला आपल्या वस्तू आणि सेवांची संपूर्ण माहिती दिल्यास विक्री ही प्रक्रिया सोपी होऊ शकते.

सर्व काही ग्राहकांसाठी :

व्यवसाय हा फक्त वस्तू आणि सेवांपुरता मर्यादित नसतो, ना की त्यासाठी ठरवलेला दर किवा इतर स्पर्धकांहून दिलेल्या अधिक ऑफर्स. व्यवसाय हा पूर्णपणे त्याच्या ग्राहकांसाठी कसा बनवला आहे यावर त्या व्यवसायाची विश्वासाहर्ता ठरते. ग्राहकांची स्वीकृती व्यवसायाचे यश किंवा अपयश ठरवते. व्यवसायात घेतलेला प्रत्येक निर्णय, केलेली प्रत्येक कृती ही ग्राहकांना अनुसरून व अभ्यासून घेतली गेली पाहिजे.

मग त्या कंपनीसाठी बनवलेली धोरणे, पेमेंट्सचे पर्याय, कामाची वेळ, वस्तूंची पॅकिंग, जाहिरात, कंपनीची टॅगलाइन हीसुद्धा ग्राहकांचा विचार करून बनवली गेली पाहिजे. प्रत्येक व्यवसायाचे उद्दिष्ट ग्राहक मिळवणे असते, त्यामुळे व्यवसायातील प्रत्येक निर्णय ग्राहकांना विचारात ठेवून घेतल्यास हेच ग्राहक व्यवसायाला यशस्वी बनवतात.

व्यवसायाचे सकारात्मक चित्र :

सकारात्मक आणि आशावादी दृष्टिकोन हा व्यवसाय यशस्वी करण्यास पूरक ठरतो. उद्योजकाचा सकारात्मक दृष्टिकोन त्याच्या ग्राहकांना आणि सहकार्‍यांना त्याच्याबरोबर काम करण्यास प्रेरित करतो. या उद्योजकाचे आजूबाजूला असणेच इतरांसाठी प्रेरणादायी अनुभव असतो. उद्योजकाची निर्णयक्षमता, त्याची कामाबद्दलची निष्ठा आणि ज्ञान याद्वारे तो आपल्या व्यवसायाचे सकारात्मक चित्र निर्माण करू शकतो.

येथे खास करून लघुउद्योजक ज्याचे स्वत:चे ऑफिस नसल्यास तो त्याच्या कल्पनाशक्ती, क्रिएटिव्हिटी आणि व्यवसायाबद्दल असलेल्या स्पष्टतेने ग्राहकांसमोर आपल्या व्यवसायाचे परिणामकारक आणि स्पष्ट चित्र निर्माण करू शकतो, त्याजोगे ग्राहक आणि त्याचे सहकारी त्याच्या व्यवसायाबद्दलची खात्री अनुभवू शकतात.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर :

सध्याच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक व्यावसायिकाने त्याला आणि व्यवसायाला तंत्रज्ञानाचा वापर करून अप-टु-डेट ठेवणे क्रमप्राप्त आहे. इंटरनेट, मोबाइल, सोशल मीडियाच्या वापरामुळे जग अगदी जवळ आले आहे. उद्योजकाने तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर केल्यास वस्तुविक्री, व्यवसायाबद्दल संशोधन, स्पर्धकांच्या योजना, बदलणारे ट्रेंड्स, सरकारची बदलती धोरणे इ.चा अभ्यास ऑफिसमध्ये बसून करता येऊ शकतो.

आपली वेबसाइट व विविध शॉपिंग पोर्टल्सद्वारे वस्तूची विक्री सातासमुद्रापलीकडे करणे अगदी सहज शक्य झाले आहे. बदलत्या तंत्रज्ञानाचा पाठपुरावा करून आपल्या व्यवसायाला योग्य दिशा दिली जाऊ शकते. आता या तंत्रज्ञानाचा वापर न करता रूढी, परंपरागत व्यवसाय करणार्‍यांची परिस्थिती काय होणार याबाबत वाच्यता न केलेली बरी.

व्यवसाय एकट्याने चालवला आणि वाढवला जाऊ शकत नाही :

व्यवसाय एकट्याने चालू करता नक्कीच येतो, पण तो यशस्वी चालविण्यासाठी आणि बरोबरीने वाढविण्यासाठी टीमची गरज असते जी व्यावसायिकाप्रमाणेच सकारात्मक आणि परिणामकारक विचार करणारी हवी. आता अशी टीम तर काही रेडीमेड मिळत नाही. एकेक माणूस निवडून, त्याला शिकवून, कामासाठी प्रेरित करून, व्यवसायासाठी समर्पित माणसांची टीम बनवावी लागते.

यातच व्यावसायिकाचे खरे कसब लागते, कारण विविध विचारांची, शैक्षणिक पात्रतेची, अनुभवाची माणसे घेऊन त्यांना व्यवसायाच्या एका छत्राखाली आणून त्यांच्यामध्ये कंपनीचे ध्येय गाठण्याची विश्वासनिर्मिती करण्यास वेळ नक्कीच लागेल, पण त्याचे काही कालावधीनंतरचे परिणाम व्यवसायासाठी उपयुक्त असतील.

सहकार्‍यांबरोबरीने कंपनीचे असोसिएट्स, कंत्राटदार, सप्लायर्स यांची वेळोवेळी अपेक्षापूर्ती केल्यास व्यवसायाच्या वाढीस या सर्वांचे योगदान मिळेल आणि या सर्व व्यक्ती आणि संघटना कंपनीचे भविष्य बळकट करतील.

स्वत:ची तुमच्या व्यवसायातील तज्ज्ञ म्हणून ओळख :

एखाद्या व्यक्तीने व्यवसायात येण्यापूर्वी त्या क्षेत्रातील शिक्षण घेतलेले असते किंवा त्या क्षेत्रातील कामाचा अनुभव घेतलेला असतो. त्या क्षेत्रातील सुरुवातीचे मिळवलेले ज्ञान आणि अनुभव हा व्यावसायिकाला नक्कीच कायमचा पुरेसा ठरणार नाही.

व्यवसायनिर्मितीच्या वेळी असलेल्या तांत्रिक ज्ञानाबरोबर या व्यावसायिकाला व्यवस्थापन, विक्री कौशल्य, व्यावसायिक नाते-संबंध जपण्याची कौशल्ये अंगीभूत करावी लागतील. या कौशल्यांच्या योग्य वापराने व्यावसायिकाची त्याच्या क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून ओळख करून घेता येईल.

यशस्वी उद्योजकाबरोबरीने, क्षेत्रातील तज्ज्ञ या ओळखीमुळे विक्रीच्या आणि नवीन ओळखींच्या अनेक संधी उद्योजकाला मिळू शकतात. क्षेत्रातील तज्ज्ञ या ओळखीमुळे अनेक व्यक्ती आणि संस्था या उद्योजकाबरोबर काम करण्यास उत्सुक असतील. तज्ज्ञ अशी ही ओळख मिळविण्यासाठी अभ्यासुवृत्ती, नवीन गोष्टींबाबतची उत्सुकता आणि उत्साह याचा मेळ उद्योजकाला घालता आला पाहिजे.

पाठपुरावा :

व्यवसायात खरेदीदार, कंत्राटदार किंवा सहकारी यांच्याबरोबर केलेला पाठपुरावा कामाबाबतची सतर्कता आणि नियमितता दर्शवतात. नियोजित व्यवसाय आणि विक्रीवाढीसाठी ग्राहकांची यादी बनविल्यानंतर त्याच्याबरोबर केलेला साधारण संपर्क, हा व्यवहाराची फार कमी खात्री देतो.

व्यवसायातील स्पर्धा पाहता उद्योजकाला कामे मिळविण्यासाठी ग्राहक कंपनीबरोबरचा पाठपुरावा हा नियमित आणि नियोजित पद्धतीने करणे गरजेचे आहे. नियमित पाठपुरावा संभाविताना कंपनीचे ग्राहक बनवण्यास मदत करतो.

हे ग्राहकसुद्धा नियमित पाठपुराव्यामुळे आणि मिळालेल्या मदतीमुळे व्यवसायाशी बांधील राहतात आणि आपल्या या व्यवसायाची प्रशंसा इतरांकडेसुद्धा करतात. मालाच्या विक्रीनंतर केलेला पाठपुरावा आणि मदत, ग्राहकाला वैयक्तिक लक्ष दिल्याचा अनुभव देतात. या पाठपुराव्याच्या बरोबरीने व्यवसाय मालक किंवा त्याचे टीमचे सदस्य ग्राहकाला मदत करण्यासाठी उपलब्ध राहिल्यास त्या संस्थेची प्रबळ प्रतिमा बाजारात निर्माण होते.

या सर्व गोष्टींचा नियमिततेने आणि प्रामाणिकपणे पाठपुरावा केल्यास संस्थेची एक विश्वासार्ह आणि व्यावसायिकाची यशस्वी उद्योजक अशी ओळख निर्माण होऊ शकेल.

– अमित आचरेकर
9323505171

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?