उद्योगवार्ता

स्टार्टअप क्रमवारीत गुजरात, कर्नाटक ‘सर्वोत्तम’, तर महाराष्ट्र ‘उत्तम’

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून राज्यांच्या स्टार्टअप क्रमवारी उपक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाच्या क्रमवारीमध्ये गुजरात आणि कर्नाटक ही राज्ये सर्वोत्तम कामगिरी करणारी राज्ये ठरली. तर महाराष्ट्र राज्य ‘उत्तम कामगिरी’ करणाऱ्या राज्यांच्या श्रेणीत आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरले.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी नवी दिल्ली येथे स्टार्टअप परिसंस्थेला पाठबळ पुरवणाऱ्या राज्यांच्या क्रमवारीचा तिसऱ्या वर्षीचा निकाल जाहीर केला. या श्रेणीत दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी परिसराचादेखील समावेश आहे. केंद्रशासित प्रदेश आणि ईशान्येकडील राज्यांच्या विभागात मेघालय राज्याने सर्वोत्तम सन्मान पटकावला आहे.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

देशभरात स्टार्टअप उभारणे सुलभ करण्यासाठी आणि व्यवसाय सुलभता आणण्याच्या दृष्टीने, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग २०१८ पासून राज्यांच्या स्टार्टअप क्रमवारी उपक्रमाचे आयोजन करत आहे. मागील तीन वर्षे हा उपक्रम अधिक परिणामकारक झाला आहे. यंदाच्या पर्वात ३१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा सहभाग असून ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे.

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांची स्टार्टअप परिसंस्था विकसित करण्यासाठी मदत करणे आणि प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सर्वोत्तम पद्धतींमधून शिकणे हे राज्य स्टार्टअप क्रमवारी उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

ही क्रमवारी निश्चित करण्यासाठी देशभरातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची पुढील पाच श्रेणींमध्ये वर्गवारी करण्यात आली; सर्वोत्तम कामगिरी करणारी राज्ये, उत्तम कामगिरी करणारी राज्ये, आघाडीवर असणारी राज्ये, आकांक्षित आघाडीची राज्ये आणि उदयोन्मुख स्टार्टअप परिसंस्था.

या क्रमवारीमध्ये सहभागी झालेल्या राज्यांची संस्थात्मक पाठबळ, अभिनव संशोधन आणि उद्योजकता यांची जोपासना, बाजारापर्यंत सुलभ पोहोच, चिंतनविषयक पाठबळ, आर्थिक मदत, मार्गदर्शनपर सहाय्य ते सक्षम स्टार्टअप्ससाठी क्षमता निर्मिती अशा सात व्यापक सुधारणा क्षेत्रांतील कामगिरी लक्षात घेण्यात आली.

हा उपक्रम, देशातील स्टार्टअप्ससाठी व्यापारी परिसंस्थेचे कार्य अधिक सुलभतेने होण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

वर्ष २०२० च्या क्रमवारीत ‘आघाडीवरील राज्यां’च्या विभागात समावेश झालेल्या महाराष्ट्राने स्वतःच्या स्थानात उत्तम सुधारणा केली असून या वर्षीच्या क्रमवारीत महाराष्ट्राचा समावेश तेलंगणा, केरळ तसेच ओडिशा या राज्यांसह ‘उत्तम कामगिरी’ करणाऱ्या राज्यांच्या यादीत झाला आहे.

सुमारे १२ हजार नोंदणीकृत स्टार्टअप विस्तारासह महाराष्ट्राने स्टार्टअपसाठी अत्यंत सशक्त परिसंस्था निर्माण केली आहे. नवनवी धोरणे लागू करून तसेच विद्यमान धोरणांमध्ये सुधारणा करून महाराष्ट्र राज्य विविध क्षेत्रांतील स्टार्टअप्सच्या वाढीला सक्रियपणे पाठिंबा देत आहे.

२०१८ मध्ये महाराष्ट्र राज्याचे अभिनव स्टार्टअप धोरण आखण्यात आले, ज्यामुळे महाराष्ट्रातील स्टार्टअप परिसंस्थेच्या विकासाला मदत झाली. जैवतंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) आणि स्वच्छ ऊर्जा यांसारख्या नव्या युगातील क्षेत्रांमध्ये नावीन्यपूर्ण संशोधनासाठी उद्योजकांना प्रोत्साहन देऊन आगामी काळात आर्थिक विकास आणि रोजगारनिर्मितीला चालना देणे, हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे. राज्याचे इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२१, हे प्रमुख अभिनव धोरण उपक्रमांपैकी एक मानले जाते.


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!