शून्यातून ‘शेअर मार्केट आयकॉन’ आणि आता भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत ठरला हा उद्योजक

होय, २००० साली शून्यातून सुरू झालेला एक व्यवसाय आज अदानी, बिरलासारख्या दिग्गजांना मागे टाकत आहे. इतकंच नाही तर आज या व्यवसायाची किंमत चाळीस हजार कोटींच्या घरात गेली आहे.

राधाकृष्ण दमानी यांनी सुरू केलेल्या या व्यवसायाचं नाव आहे ‘एवेन्यू सुपरमार्ट लिमिटेड’. तुम्हाला वाटेल कधी नावही ऐकलं नाही या कंपनीचं आणि ती अंबानी-बिर्लांची स्पर्धक बनते आहे, हे कसं काय शक्य आहे. आपण सर्व या कंपनीला ‘डी-मार्ट’ या नावाने ओळखतो.

मुंबईत सुरू होऊन आज भारतातील ७२ शहरांमध्ये पोहचलेलं सुपरमार्केट म्हणजे डी-मार्ट. इतर ठिकाणांपेक्षा स्वस्तात वस्तू मिळण्याचे ठिकाण म्हणून डी-मार्ट प्रसिद्ध आहे. डी-मार्टचं आणखी एक वैशिष्ट्यं म्हणजे प्रत्येक ठिकाणच्या स्टोअरची जागा ही भाड्यावर घेतलेली नसून कंपनीने विकत घेतली आहे. त्यामुळे डी-मार्टमार्फत होणाऱ्या नफ्यासोबत हातात असलेल्या जागासुद्धा एवेन्यू सुपरमार्ट लिमिटेडच्या संपत्तीत भर घालतात.

शेअर मार्केटमध्ये पाहिले पाऊल

एवेन्यू सुपरमार्ट लिमिटेडचे संस्थापक राधाकृष्ण दमानी यांच्या वडिलांचा बियरिंगचा व्यवसाय होता, परंतु वडील गेल्यावर तो व्यवसाय बंद पडला. अशा वेळी भावाची मदत घेऊन दमानी यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली.

सुरुवातीला त्यांना काहीच ज्ञान नव्हतं, पण इतरांकडून शिकून, वेगवेगळे प्रयोग करून त्यांनी शेअर बाजाराच्या व्यवसायावर जम बसवला. कोणती कंपनी लवकरच मोठी होणार, याचा त्यांना अचूक अंदाज त्यांना बांधता येऊ लागला. पाहता पाहता त्यांची ‘शेअर मार्केट आयकॉन’ अशी ओळख निर्माण झाली.

स्वतःचं काहीतरी सुरू करायचं हे त्यांच्या मनात होतंच. तशी योग्य वेळ ओळखून त्यांनी एवेन्यू सुपरमार्ट लिमिटेड २००० साली सुरू केले. आपल्या गुंतवणुकीचा अनुभव त्यांना डी-मार्टला मोठं करण्यात झाला. २०१७ मध्ये त्यांनी आपल्या कंपनीचा बाजारात IPO आणला.

फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार फेब्रुवारी मध्यात रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्यानंतर देशातले दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती झाले आहेत. त्यांची नेट वर्थ १७.८ मिलियन अमेरिकन डॉलर आहे. उत्तम कल्पनेला उद्योजकाच्या कौशल्यांची जोड मिळाल्याने एवेन्यू सुपरमार्ट लिमिटेडने आज गगनभरारी घेतली आहे.

– शैवाली बर्वे

Author

  • शैवाली बर्वे

    शैवाली बर्वे हिने Bachalor of Management Studies पूर्ण केले असून सध्या ती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) अमृतसर येथून Master of Business Administration (MBA) करत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?