लहानपणाची आजीच्या गोधडीची आठवण ही आठवणच बनून राहिली आणि गोधड्या मिळणं अन् शिवणं कठीण झालं. घराघरांमध्ये शिवल्या जाणार्या गोधड्या या घरापर्यंतच मर्यादित राहिल्या. पूर्वी आजी रंगीबेरंगी कापडाचे तुकडे कलात्मक पद्धतीने जोडून गोधडी तयार करीत होती. तीही हातावरची शिवण होती. अशा उबदार गोधड्या आठवण बनून राहू नये यासाठी ‘याद्रा क्विल्ट’ मॅजिकल हॅण्ड्स हा प्रकल्प सुरू केला.
गोधडी हातावरती शिवणं ही कला आहे आणि खेड्यामधल्या अनेक महिलांना ही कला अवगत आहे. अशा अनेक गरजू महिलांना या प्रकल्पाने एकत्र आणलं आहे. सुरुवात झाली २२ जून २०१५ पासून. यामागे एक प्रेरणादायी घटना आहे, ज्यामुळे मी हा प्रकल्प सुरू करू शकले. जेव्हा मी एक आवड म्हणून गोधडी शिवण्याचा निर्धार करून एक गोधडी हातावरती शिवून काढली. रंगसंगतीची समज होतीच.
मी स्वत: कला शिक्षक म्हणून डिप्लोमापर्यंत शिक्षण घेतले आहे व एक आर्टिस्ट म्हणून काम करते. त्यामुळे कामाबद्दल प्रचंड उत्सुकता होती. गोधडी शिवून झाली होती. एके दिवशी ती बॅगेत घेऊन त्याचे रंगसंगतीचे धागे शोधायला पुण्यातील बाजारपेठेत गेले होते. अर्थात कापडाचे तुकडे घेऊन जाऊ शकत होते; पण गोधडी नेल्यामुळे मला दुकानदाराला सांगणं सोप्पं होईल म्हणून घेऊन गेले.
दुकानात गर्दी होती. मी आपलं लवकर सामान घेऊन निघायचं म्हणून पटकन दुकानदार काकांच्या हातात गोधडी दिली आणि मला लवकर धागे शोधून द्या, मला घाई आहे, असं सांगितलं. दुकानदारकाका गोधडी हातात घेऊन धागे बघतच होते, तेवढ्यात माझ्या मागून एक वाक्य ऐकू आलं, “वॉव… किती मस्त क्विल्ट आहे…!” त्या दुकानदारकाकांना विचारत होत्या, कितीची आहे गोधडी.
काका हसले आणि माझ्याकडे पाहत म्हणाले, यांची आहे ही गोधडी. त्या लगेच माझ्याकडे वळल्या आणि म्हणाल्या, तू बनवली आहेस का? मी होकारार्थी मान डोलावली. मन खूश तर होतं, पण आश्चर्यपण वाटत होतं की, चक्क मी हातावर शिवलेली गोधडी कोणाला तरी इतकी आवडली आहे. ती लगेच पुढे म्हणाली, मला ही गोधडी हवी आहे. आता लगेच विकत देशील का?
मी काही बोलण्याच्या अगोदरच तिने खूप विनवणी केली. त्यामुळे हो म्हणाले. पण ती बाई तेवढ्यावर थांबली नाही. तिनं मला वीस गोधड्यांची ऑर्डर दिली. आनंद तर खूप झाला होता, पण गोंधळूनही गेले होते. तिनं मला दोन महिन्यांचा कालावधी दिला, त्यामध्ये तिला त्या गोधड्या शिवून द्यायच्या होत्या.
दरम्यानच्या काळात मी गावी गेले आणि गोधडीचा अजून थोडा अभ्यास करायचा असं ठरवलं. त्यासाठी गावात जिथं कुठं गोधड्या शिवताना कोणी दिसलं की, मी तिथे जाऊन बसत होते. सगळे मला हसत असायचे, पण मला आवडायचं. त्याच वेळी माझ्या मनात हा प्रश्नही होता की, मला मिळालेल्या वीस गोधड्या मी एकटी कशी शिवणार?
काही दिवसांतच याचं उत्तर मिळालं. काही कामानिमित्त मी मैत्रिणीसोबत तिच्या गावी गेले होते. तिथे खूप सार्या महिलांना भेटले आणि त्यातील एक आजी मला म्हणाल्या, “मी गोधड्या शिवती, पण माझ्याकडे गोळ्या-औषधांसाठी पैक न्हायत. मला काय तरी काम बघ पोरी.” हे वाक्य माझं मन हलवून टाकणारं होतं. काय बोलावं तेच कळत नव्हतं. हातात एवढी मोठी कला आणि गोळ्या, औषधांसाठी पैसे मिळत नाहीत
दिवसभर विचार करत राहिले. शेवटी एक ठाम निश्चय केला की, अशा महिलांसाठीच काम करायचं ज्या गरजू आहेत. हातात कला आहे, पण योग्य मोबदला मिळत नाही. दुसर्या दिवशी या सगळ्या महिलांना एकत्र केलं आणि प्रत्येकीची ओळख करून घेतली. वीस गोधड्यांची ऑर्डर लक्षात होती; पण आता याचा सर्व खर्च मीच उचलणार आणि सुरुवात करणार असं ठरवून सुरुवात केली. आठवडाभर एकमेकींसोबत काम केलं. ज्यांना माझ्यासोबत काम करायचं होतं त्या रोज येत होत्या.
‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.
हळूहळू असा दहा जणींचा एक समूह गोधडी प्रकल्पाचं काम करू लागल्या. सुरुवातीला गावातले सगळे लोक खूप हसायचे आणि या महिलांची टर उडवायचे; पण त्यांना मी फक्त एकच वाक्य लक्षात ठेवायला सांगितलं की, ‘जिथं पिकतं तिथं विकत नाही.’ बघता बघता वीस गोधड्या ३५ दिवसांतच पूर्ण झाल्या आणि आमच्या गोधडी प्रकल्पाची पहिली ऑर्डर पूर्ण झाली आणि त्या गोधड्या स्पेनला गेल्या
गोधडी प्रकल्प सुरू तर केला, पण त्यासाठी लागणार्या माहितीचा मी सतत शोध घेत असते, वाचन करत असते. हा प्रकल्प नोंदणीकृत करण्याच्या प्रक्रियेत आहे. लवकरच त्याची नोंदणी होईल. त्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. गोधड्या तयार करणं सुरू झालं; परंतु पुढील योजना ठरवत असतानाच अक्षया बोरकर मॅडमशी फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली. त्या ‘द आर्ट क्राफ्ट गॅलरी’ या ऑनलाइन आर्टिस्ट गॅलरीच्या संस्थापक आहेत.
त्यांनी भेटायला बोलावलं. खूप व्यवस्थित आणि महत्त्वपूर्ण अशी माहिती त्यांनी दिली. त्यांनी गॅलरीच्या माध्यमातून गोधड्यांना मार्केट मिळू शकेल हे पटवून दिलं. मला ही संकल्पना आवडली. म्हणजे गोधडी आता भारताबाहेर जाणार आहे हे कळल्यावर महिला अजून जोमाने काम करू लागल्या. दरम्यान काम वाढलं. आर्थिक अडचणी येणं सुरू झालं. कोणाला यासाठी पैसे मागणं योग्य नव्हतं.
घरी पैसे मागितले तरी मिळणं कठीण झालं होतं, कारण घरचे सतत एकच वाक्य म्हणत होते, ‘इतकं शिकून जर गोधड्याच शिवायच्या होत्या तर शिकायचंस तरी कशाला?’ बँकांकडे लोनसाठी जात होते, पण गोधडीसाठी कर्ज मिळत नाही, असं हसत बोलून सगळे बाहेरचा रस्ता दाखवत होते. चारी बाजूंनी संकट होतं; आर्थिक संकट. मनात एकच वाक्य येत होतं, आपल्या संकटातच आपलं उत्तर असतं जे आपल्याला हवं असतं. मलाही ते उत्तर मिळालं.
माझ्याकडे कला होती. चित्रकलेची कार्यशाळा घेण्यासाठी मी सर्व शाळा फिरले; पण त्या शाळेचे मुख्याध्यापक चक्क आमची शाळाच रंगवून द्या, असं वाक्य बोलून गेले. काम समोरून आलं होतं. नाही म्हणू शकत नव्हते, कारण त्यातून मिळणारे पैसे गोधड्यांसाठी लागणार्या कच्चा मालासाठी हवे होते. ते पैसे त्या महिलांना द्यायचे होते.
मनाशी पक्का निश्चय करून काम सुरू केलं. या कामातून मिळालेल्या अॅाडव्हान्समधून महिलांना कच्चा माल आणून दिला आणि काम सुरू ठेवा, असं सांगून मी वॉल पेंटिंगच्या कामाला गेले. सकाळी ८ ते संध्याकाळी ६.३० पर्यंत काम करत होते. तेव्हापासून एक नियोजन सुरू झालं. या कामातून मिळणारे पैसे मी गोधडी प्रकल्पासाठी खर्च करू लागले.
हे सर्व सुरू असताना पुण्यामध्ये दर ४५ दिवसांनी भरणारे ‘तंबू मार्केट’च्या मालक गायत्री चावरेकर यांनी मला फोन केला आणि पुण्यातील लोकांसाठी ‘तंबू मार्केट’तर्फे वर्कशॉप घेशील का? असा प्रश्न केला. माझ्यात तेवढा आत्मविश्वास नव्हता, पण त्यांनी सतत बोलून बोलून यासाठी मला तयार केलं. त्यासोबत गोधड्यांचे सॅम्पल पीस घेऊन बोलावले. पहिल्या दिवशी खूप टेन्शनमध्ये होते.
कार्यशाळा कशी घेऊ? खूप सारे प्रश्न मनात गोंधळ घालत होते; पण त्याच दिवशी माझ्या आठ कार्यशाळा झाल्या आणि माझा आत्मविश्वास वाढला. मला माझ्या गोधड्यांची माहिती देण्यासाठी एक स्टॉल उपलब्ध करून दिला होता, त्यामुळे खूप सार्या लोकांच्या ओळखी झाल्या. खूप लोकांनी गोधडीच्या ऑर्डर्स दिल्या तसेच अनेकांनी कामाबद्दल माहिती जाणून घेतली. गायत्रीमुळे पुण्यातला पहिला वर्कशॉप स्टॉल खूप छान अनुभव देऊन गेला. त्यामुळे नियोजन सोप्पं झालं.
‘याद्रा क्विल्ट मॅजिकल हँड्स’ नावाने फेसबुक पेज सुरू केलं आहे. खूप छान प्रतिसाद मिळत आहे. सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत नवनवीन काम लोकांसमोर ठेवल्यामुळे चांगला प्रतिसाद मिळत आहे. या प्रकल्पासाठी तंत्रज्ञानाचा भरपूर फायदा होत आहे. या प्रकल्पाबद्दल फक्त एवढंच स्वप्न आहे की, या प्रकल्पामुळे अनेक हातांना काम मिळावं आणि त्यांच्या कलेला न्याय मिळावा.
या प्रकल्पातून बनवली जाणारी एक गोधडी चार महिलांना रोजगार मिळवून देते. त्यामुळे या कामातून मला खूप आनंद मिळतो. भविष्यात गोधडी व त्यापासून बनवलेल्या अनेक वस्तू रजई, पिशव्या, उशांची कव्हर्स इ. या लोकांपर्यंत पोहोचत राहाव्या व गोधडी ही कला आठवणीमध्ये न राहता अस्तित्वात सतत कार्यरत राहावी यासाठी प्रयत्नरत आहोत.
– चंद्रिका किशोर नवगण
७०५७८४६६४५
‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.