‘डीसीएम ग्रुप’ : अनेक चढउतार पाहिलेली आणि टेकओव्हरच्या संकटातून वाचलेली कंपनी

ज्या कंपनीने पिढीजात चालत आलेल्या व्यवसायात यशस्वी भरारी तर घेतलीच, शिवाय इतर क्षेत्रातदेखील आपला ठसा उमटवला. ज्या कंपनीला गिळंकृत करण्यासाठी एका बलाढ्य परदेशी उद्योगपतीने आपली सगळी ताकद पणाला लावली होती आणि ती कंपनी कोसळण्याच्या बेतात होती.

जी कंपनी कायदेशीर आणि आर्थिक आव्हानांचा परिणाम म्हणून अनेक उद्योगांमध्ये विभागली गेली. ज्या कंपनीचा कारखाना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जमीनदोस्त करण्यात आला; तरीदेखील आज दिमाखदार कामगिरी करत आहे.

एकोणिसाव्या शतकात औद्योगिकदृष्ट्या प्रगत इंग्लंडमध्ये मुक्त व्यापाराची भरभराट झाली. त्या काळात भारतात उदयास आलेल्या नव्या सूतगिरण्यांमुळे ब्रिटिशांच्या मुक्त व्यापाराला धोका निर्माण झाला होता. वर्ष होतं १८८९.

पारतंत्र्यातील भारतात ब्रिटिश राजवटीतील व्हाईसरॉय लिटन यांनी भारतीय व्यापाराची भरभराट रोखण्यासाठी कापूस मालावर आयात शुल्क लावले, त्यामुळे भारताच्या आर्थिक स्थितीवर मोठा परिणाम झाला. अशा परिस्थितीत राय बहादूर राम किशन दास गुरवाले यांनी १८८९ मध्ये दिल्लीमध्ये आपली पहिली कापड मिल ‘दिल्ली क्लॉथ अँड जनरल मिल्स’ उघडली.


'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
(वर्षभर महिन्यातून एकदा डिजिटल मासिक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : फक्त ₹२२२ ➡️ SUBSCRIBE
(यापूर्वी प्रसिद्ध झालेले १००+ अंक ई-मेलवर येतील व दर महिन्यातून एकदा ताजा अंक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)

आता ‘डीसीएम ग्रुप’ म्हणून ओळखला जाणारा हा भारतीय कंपनीचा समूह आहे. नंतर कंपनी डीसीएम आणि डीसीएम श्रीराम ग्रुप ब्रॅण्डिंग अंतर्गत ऑटोमोटिव्ह, बायोसीड्स, सिमेंट, रसायने, खते, पीव्हीसी, साखर, कापड अशा अनेक उद्योगांमध्ये विभागली गेली.

राय बहादूर राम किशन दास गुरवाले दिल्लीतील अग्रवाल समाजाचे व्यापारी होते आणि दिल्ली येथील पहिला कारखान्याचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी दोन वर्षे लागली. पहिल्या महायुद्धाच्या वेळी ही गिरणी प्रामुख्याने कापूस आणि साखरेच्या व्यापारात गुंतलेली होती आणि उत्तर भारतातील सर्वोच्च गिरण्यांपैकी एक बनली. नंतर कंपनीने दुसरी कापड गिरणी आणि दोन साखर कारखाने उघडले.

१९४१ मध्ये डीसीएम केमिकल वर्क्स आणि १९४२ मध्ये दौराला डिस्टिलरी सुरू केली तसेच १९४६ मध्ये वनस्पती तुपाचे उत्पादन सुरू केले. कालांतराने कंपनीचा विस्तार झाला आणि उषा इंटरनॅशनल, बेंगॉल पॉटरीज, जय इंजिनियरिंग वर्क्स आणि श्रीराम फर्टिलायझर्स अशा अनेक उपकंपन्या स्थापन करण्यात आल्या.

१९८० च्या दशकात डीसीएम टेक्सटाइल या कंपनीचे अस्तित्व धोक्यात आले होते. झालं असं की, स्टॉक मार्केटमध्ये कुणीतरी कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी करू लागले होते. त्यामुळे कंपनीच्या शेअर्सचा भाव दिवसेंदिवस वाढू लागला आणि डीसीएम टेक्सटाइलचे शेअर्स खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड उडाली.

काही महिन्यांनंतर कुणामुळे शेअर्सचे भाव चढत होते हे कंपनी व्यवस्थापनाच्या लक्षात आलं. अनिवासी गुंतवणुकीबाबत सरकारच्या सुधारित धोरणामुळे सक्रिय होऊन युके मधील एका आघाडीच्या भारतीय व्यावसायिकाने, स्वराज पॉल याने डीसीएम टेक्सटाइलचे दहा टक्क्यांहून अधिक शेअर्स विकत घेतले आणि कंपनीच्या मालकीसाठी दावा दाखल करण्याची योजना आखली.

भारत सरकारच्या राजकीय वर्तुळात असलेल्या ओळखीचा पुरेपूर फायदा घेत स्वराज पॉलने डीसीएम टेक्सटाइल भोवती आपले जाळे विणले होते आणि तो या बलाढ्य कंपनीचा घास घेण्यासाठी सज्ज झाला होता.

त्या वेळी व्यवस्थापनाने कंपनीचे नाव बदलून डीसीएम लिमिटेड असे केले आणि स्वराज पॉलने आखलेल्या योजनेविरुद्ध यशस्वीपणे बचाव केला. अयशस्वी टेकओव्हरचा अंतिम परिणाम म्हणून डीसीएम चार वेगळ्या कंपन्यांमध्ये विभागली गेली. त्या चार कंपन्या होत्या डीसीएम, डीसीएम श्रीराम इंडस्ट्रीज, श्रीराम इंडस्ट्रियल एंटरप्राइजेस आणि डीसीएम श्रीराम कन्सॉलिडेटेड. १९९९ मध्ये कंपनीचे आणखी दोन भाग झाले.

डीसीएम या कंपनीच्या दुर्दैवाचा फेरा थांबण्याची लक्षणे दिसेनात. १९९५ मध्ये टोयोटासोबतची १९८३ पासून असलेली भागीदारी संपुष्टात आली. त्यानंतर डीसीएमने कोरियन ऑटोमोटिव्ह कंपनी देवू मोटर्ससोबत भागीदारी केली, परंतु २००१ मध्ये देवू मोटर्स दिवाळखोर झाली. १९९० च्या उत्तरार्धात डीसीएमवर अनेक आर्थिक चुका आणि खटले दाखल झाले होते.

इतकंच नव्हे तर १९८९ च्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा परिणाम म्हणून कंपनीचा दिल्लीमधील ११६ वर्षे जुना कारखाना पाडण्यात आला. सुप्रीम कोर्टाचा आदेश होता की दिल्ली शहरातील सर्व कारखाने बाहेर हलवण्यात यावेत आणि त्यानुसार डीसीएमचा कापड कारखाना हिसार येथे हलवण्यात आला.

dcm shriram leadership

डीसीएम टेक्सटाईल बीएसई आणि एनएसईवर सूचीबद्ध आहे आणि नवा कारखाना हिसार विमानतळाजवळील कापूस उत्पादक पट्ट्यात आणि हरियाणा राज्यातील दिल्ली बायपासवर आहे. निवासी कॅम्पस आणि ऑफिसर्स क्लबसह ३८० एकरमध्ये असलेल्या या कारखान्यात सुरुवातीला ३३ हजार स्पिंडल्स होते, १९९८ मध्ये ४५ हजार स्पिंडल्सवरून १ लाख १५ हजार स्पिंडल्सपर्यंत विस्तार करणे १९९५ मध्ये आयएसओ ९००१ प्रमाणपत्र, यासारखे अनेक टप्पे गाठले.

डीसीएम टेक्सटाईलची वार्षिक उलाढाल ५.१४ अब्ज आहे आणि २ हजार ५०० एमटी कापूस धाग्याचे उत्पादन करते. हिसार मिल व्यतिरिक्त कंपनीची संपूर्ण भारतात १७ विक्री कार्यालये आहेत, ज्यातून किमान अकरा देशांना निर्यात केली जाते. कंपनीच्या सर्वसमावेशक विकासामध्ये दोन व्यक्तींनी आपला ठसा उमटवला आहे; सर श्रीराम आणि लाला भरतराम.

सर श्रीराम यांचा जन्म २७ एप्रिल १८८४ रोजी झाला. मदन मोहनलाल आणि चांदो देवी यांचा हा पहिला मुलगा. सर श्रीराम यांचे प्राथमिक शिक्षण बाजार सीताराम येथील नगरपालिका प्राथमिक शाळेतून झाले. श्रीराम यांचा जन्म झाला तेव्हा त्यांचे काका, लाला गोपाल राय, काही काळ कापड गिरणीच्या कल्पनेबद्दल विचार करत होते, परंतु ते फक्त एक मुनीम होते.

Sir Shri Ram
सर श्रीराम

श्रीराम पहिल्यांदा १९०५ मध्ये वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांचे काका यांच्यासमवेत वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित होते. त्याच वर्षी काकांचे निधन झाले आणि त्यांच्या जागी श्रीराम यांचे वडील मदन मोहनलाल यांची नियुक्ती झाली.

चार वर्षांनंतर श्रीराम अंतर्गत लेखा विभागात शिकाऊ म्हणून रुजू झाले. त्यानंतर आणखी एक दशक त्यांनी आपल्या वडिलांसोबत कंपनी चालवली, पण नंतर श्रीराम यांनी पूर्णपणे औपचारिक पदभार स्वीकारला. श्रीराम यांनी पहिल्या महायुद्धात ब्रिटीश सैन्यासाठी तंबू पुरवण्याचा मोठा करार करण्यासाठी त्यांच्या वडिलांना राजी केले आणि कमी वेळात खूप पैसे कमावले. त्यातील मोठा हिस्सा डीसीएमचे शेअर्स खरेदी करण्यासाठी वापरण्यात आला.

ही श्रीराम यांची कल्पना होती आणि त्यांनी या पैशाचा वापर करून कंपनीतील त्यांचा हिस्सा पाच टक्क्यांवरून सोळा टक्क्यांपर्यंत वाढवला. दिल्लीत जन्मलेले लाला भरतराम हे श्रीराम यांचे पुत्र होते. भरतराम यांनी मॉडर्न स्कूल नवी दिल्ली येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आणि दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून गणित विषयात पदवी संपादन केली.

१९३५ मध्ये ते दिल्ली क्लॉथ अ‍ॅण्ड जनरल मिल्समध्ये शिकाऊ म्हणून रुजू झाले आणि १९५८ मध्ये चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर या पदापर्यंत पोहोचले.

भरतराम यांनी १९७० मध्ये श्रीराम फायबर्स आणि नंतर श्रीराम फर्टिलायझर्सची स्थापना केली. त्यांनी विविध सरकारी समित्यांवर काम केले आणि दोन पुस्तके लिहिली : औद्योगिक भारताची झलक आणि इस्तंबूल ते व्हिएन्ना. ते इंडियन एअरलाइन्सचे चेअरमनही झाले. १९७२ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

– चंद्रशेखर मराठे

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे वार्षिक वर्गणीदार होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
व्यवसाय वाढवण्यासाठी बिझनेस व्हिसिटिंग कार्डचं महत्त्व उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?