मंगल सुधा; इथे घडते कला आणि कलाकार…


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


मानवी जीवनात कलेला प्रचंड महत्त्व आहे. कला ही आनंद देणारी गोष्ट आहे. कला सादर करणार्‍यालाही आनंद मिळतो व कलेचा आस्वाद घेणार्‍यालाही आनंद मिळतो. भारताला तर कलेची भलीमोठी परंपरा लाभली आहे. प्राचीन कलाकृती पाहिल्या की आपण थक्क होतो. अशा या दिव्य कलेचा वारसा मनीष बुरडकर यांनी जोपासला आहे.

विठ्ठलराव बुरडकर यांनी ५० वर्षांपूर्वी या कार्याला सुरुवात केली. बुरडकरांच्या घरी गोकुळाष्टमी व गणेशोत्सवात गणपती बनवण्याची प्रथा आहे. त्यावेळी मनीष बुरडकर यांचे आजोबा म्हणजेच विठ्ठलराव मातीची मूर्ती तयार करायचे. मनीष यांच्या चुलत्यांना या विषयात रुची निर्माण झाली व पुढे त्यांनी ए.टी.डी. (आर्ट टिचर डिप्लोमा) शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. यवतमाळ येथे आल्यावर त्यांनी मूर्ती बनवणे या सोबत मंडप डेकोरेशनचे काम सुरू केले.

मनीष यांचे वडील सुधाकर बुरडकर त्यांच्या मोठ्या बंधूंसोबत काम करत होते, परंतु सुधाकर यांच्या मोठ्या बंधूंना एका शळेत शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. सुधाकर बुरडकर फार शिकलेले नसल्यामुळे त्यांना हा व्यवसाय करणे भाग होते. या व्यवसायातील शिक्षणही त्यांनी घेतलं नव्हतं. पण मोठ्या बंधूंसोबत काम करताना मिळालेला अनुभव हेच काय ते त्यांचं शिक्षण. अनुभवाच्या बळावर सुधाकर बुरडकर यांनी हा व्यवसाय सुरू केला.

सुधाकर यांचा विवाह मंगला बुरडकर यांच्यासोबत झाला, त्यांनी एम.ए.ची पदवी मिळवली होती. त्यामुळे सौ. बुरडकर यांना फायनान्सचे ज्ञान होते. या व्यवसायात त्यांचा मोलाचा हातभार लाभला. शिर्डी, शेगावच्या संस्थांसाठी त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केला. पण त्यात फारसे यश लाभले नाही. जे काम मिळेल ते काम करायचे त्यांनी ठरवले. गावाकडच्या लोकांसाठी सिमेंटच्या मूर्त्या तयार केल्या.

विदर्भात हागणदारी मुक्त प्रकल्प सुरू झाला. या प्रकल्पासाठी तुकडोजी महाराज व गाडगेबाबांच्या मूर्त्या तयार केल्या. त्यातून व्यवसाय तग धरू लागला. त्यानंतर त्यांना कामं मिळू लागली. आपल्या तालुक्यातून पंढरपूर ते आंध्र प्रदेशपर्यंत त्यांचं नाव होत गेलं.

मनीष बुरडकर यांच्या काकांनी आपल्या मुलाला म्हणजेच पंकज बुरडकर यांना बी.एफ.ए. (बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स) शिक्षण घ्यायला लावले. हे शिक्षण घेऊन पंकज बुरडकर आठ वर्षांपूर्वी पुण्यात आले. तिथे आल्यावर ते कॉंट्रॅक्ट घेऊ लागले. नागपूर एअरपोर्ट, मुंबई सहारामध्ये पेंटिंग्सची कामे घेतली. आता मनीष बुरडकर यांनी त्यांचं इंजिनियरींगचं शिक्षण पूर्ण केलं.

इंजिनियरींगच्या क्षेत्रात त्यांनी कामही केलं. पण कलेचा वारसा लाभलेल्या व बालपणापासून कलेच्या दुनियेत जगत असलेल्या या तरुणाचे मन इंजिनियरींगमध्ये रमले नाही. त्यांनी त्यांच्या वडिलांना हे काम करताना जवळून पाहिले होते. त्या वातावरणात ते घडले होते. त्यामुळे त्यांचा कल आपल्या पारंपारिक व्यवसायाकडेच होता. आता तर त्यांच्याकडे इंजिनियरींगचं ज्ञान असल्यामुळे यात ते नाविन्य आणू शकत होते. या व्यवसायात मनीष यांनी प्रवेश केला व पहिल्या वर्षी त्यांनी शंभर मातीच्या गणपती मूर्तीची रस्त्यावर विक्री केली.

लहानपणीही त्यांनी वडीलांसाठी रस्त्यावर गणपती मूर्तीची विक्री केली होती. हा अनुभव मनीष यांच्या पाठीशी होता. २०१७ मध्ये ऍप आणि वेबसाईट या माध्यमातून त्यांनी व्यवसाय वृद्धींगत केला. या वर्षी दोनशेपेक्षा अधिक गणपतीची मूर्तींची विक्री केली. याची दखल वृत्तवाहिन्यांनी घेतली.

आता या व्यवसायाला मनीष यांच्या आधुनिक वृत्तीमुळे नवे वळण येऊ लागले. मनीष यांच्याकडे असलेल्या नाविन्यपूर्ण वृत्तीचे दर्शन आपल्याला त्यांच्या ‘बिजनेस नेम’मधूनच घडते. मनीष यांच्या आईचे नाव मंगला आणि वडीलांचे नाव सुधाकर. या दोन नावांना एका समान धागेत गुंफत त्यांनी मंगल-सुधा हे नाव तयार केले आणि थोड्याच काळात मंगल सुधा हे ब्रॅण्डसुद्धा झाले.

आता दुबई आणि मलेशियामध्येसुद्धा मंगल सुधाचे नाव गेले आहे. दुबईतल्या ग्राहकांसाठी त्यांनी भगवान शंकर यांची दोन फुटाची मूर्ती तयार केली आहे. मलेशियाच्या ग्राहकांसाठी त्यांनी पुतळ्यांचे काम केले आहे. मनीष यांचं म्हणणं आहे की मूर्ती तयार करताना ती हुबेहुब असावी व त्यातून ग्राहकाचे समाधानही झाले पाहिजे.

आता मंगल सुधामध्ये मूर्ती, पुतळे, शिल्पे, प्रीकास्ट, भित्तीचित्रे, फाऊंटन डिजाइन, कंटेम्पररी व ऍब्स्ट्रॅक्ट डिजाइन, क्रिएटिव्ह प्लांटर्स, नेमप्लेट, इंटरियर डिजाइन, सेट डिजाइन, मंडप डेकोरेशन अशा प्रकारची कामे केली जातात. इतर व्यवसायांप्रमाणे या व्यवसायातही रिस्क फॅक्टर आहे, असे मनीष म्हणतात.

त्याचं म्हणणं आहे की आपण एखादं नवीन डिजाइन तयार केलं की लगेच बाजारात तशा प्रकारचे डिजाइन निर्माण होतात व यात कॉपीराइट नसते. त्यामुळे कॉपी करणार्‍यांची संख्या जास्त आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ते मातीपासून गणपती तयार करतात. हे पर्यावरणपुरक आहे. कारण माती पाण्यात सहज विरघळते. पण गणपती मूर्तींचा हंगाम हा पावसाळ्यात येतो. त्यामुळे मातीचे गणपती तयार करताना जास्त रिस्क फॅक्टर असते.

पावसामुळे मातीचे गणपती तयार करणे अवघड असते. पाण्यापासून त्या मुर्तींचा बचाव करावा लागतो. हे दोन महत्त्वाचे रिस्क फॅक्टर आहेत. मंगल सुधामध्ये तयार होणार्‍या गणपतीचं एक वैशिष्ट्य असं आहे की गणपती तयार करण्यासाठी ते शाडूची माती वापरत नाहीत. नदीच्या पात्रात साचलेला गाळ असतो. त्याला चिखल म्हणतात.


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


 तो घरी आणायचा, पाण्यात टाकून ठेवायचा, तेव्हा खडक खाली बसतो मध्ये चिखल असतो व वर पाणी साचतं. वरचं पाणी काढून टाकल्यावर बाकीची माती गाळून घ्यायची. त्यानंतर खडक वर येतं आणि बाकीची माती निघून जाते. त्यानंतर ते उन्हाखाली ठेवायचं. तेव्हा बाकीचं पाणी सुकून जातं व आता जी माती राहते त्यापासून मूर्ती तयार करता येते.

गणपती बनवण्याची प्रक्रिया जरी तशी सोपी असती तरी त्याआधीची प्रक्रिया खुप कठीण आणि मोठी आहे. पण जरी कठीण प्रक्रिया असली तरी हे पर्यावरणपूरक आहे. नव्या युगाची दिशा ओळखत मनीष बुरडकर सोशल मीडिया मार्केटिंगवर अधिक लक्ष देत आहेत. फेसबुक ग्रुप्स, फेसबुक पेज, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप या माध्यमांचा उपयोग ते करीत आहेत. गुगल बिजनेसमुळेही त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तसेच इंडियामार्ट, ऑटो रिक्शा मार्केटिंग अशा अनेक पर्यायांचा ते उपयोग करीत आहेत.

ग्राहक व कलाप्रेमी या सर्व माध्यमांचा उपयोगातून मंगल सुधाच्या सेवेचा लाभ घेत आहेत. मंगल सुधामध्ये मनीष बुरडकर हे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून काम सांभाळतात. बिजनेस डेव्हेलपमेंट व फायनान्स ही जबाबदारी ते बघत आहेत. त्याचं इंजिनियरींगचं कौशल्य वापरून एक नवी दिशा ते व्यवसायाला प्रदान करत आहेत. त्यांच्याकडे क्रिएटिव्ह गणेश हे अद्वितीय उत्पाद तयार होतं.

याला बाजारात पुष्कळ मागणी आहे. तसेच शिवाजी महाराजांचे पुतळे तयार करण्यात त्याचं नैपूण्य आहे. शिवरायांचा पुतळा तयार करताना ते शिवरायच वाटले पाहिजेत. त्यांचे डोळे, नाक या सर्वांवर अभ्यास करावा लागतो असं त्यांचं म्हणणं आहे. कोणताही पुतळा तयार करताना नखापासून केसापर्यंत अभ्यास करणे गरजेचे असते. तसेच अंजीठा-वेरुळचं कॉम्बिनेशन म्हणजे घटनाचित्र आणि शिवकाल उभा करावा लागतो.

भक्ती शक्ती संगम, बेटी बचाव बेटी पढाव अशा विविध कलाकृती त्यांनी तयार केल्या आहेत व बाजारात त्यास मागणी आहे. त्यांनी नागपूर एअरर्पोर्ट येथे रिसेप्शनचे सुशोभीकरण, पुण्यातील डिएसके बंगल्याचे इंटिरियर व एक्टेरियर, ली मेरिडियन आणि शेराटोन ग्रॅंड येथे त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे.

व्यवसायासोबत त्यांनी सामाजिक वारसासुद्धा जपला आहे. तरुणांना रोजगार देण्यासाठी आणि तरुणांची कला लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांनी मंगल सुधा फाऊंडेशनची स्थापना केली आहे. या फाऊंडेशनच्या निमित्ताने २५ ते ३० माणसं जोडली गेली आहेत. हे फाईन आर्टिस्ट आहेत. त्यांचं काम अत्यंत रेखीव आहे. त्यांच्या प्रत्येक कलेत एक प्रकारचा जीवंतपणा आहे.

मंगल सुधा फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांना एक इंस्टिट्यूट तयार करायची आहे. जिथे तरुण शिकतील आणि त्या माध्यमातूनच त्यांना रोजगार मिळेल. या विषयी बोलताना मनीष बुरडकर अगदी भारावून जातात. ते म्हणतात, “मला एक आर्ट व्हिलेज बनवायचं आहे. कलेचं गाव. हे माझं स्वप्न आहे. तिथे फोटोग्राफी पॉइंट असेल, कलाकार कला सादर करू शकतील, पर्यटक कलेचा आस्वाद घेऊ शकतील, इंस्टिट्यूट असेल, त्यातून अनेकांच्या कलागुणांना वाव मिळेल, रोजगार मिळेल, समजा १०० विद्यार्थी इंस्टिट्यूटमध्ये शिकत आहेत.

तर प्रत्येक विद्यार्थ्याने महिन्याला एक कलाकृती निर्माण झाली तर बारा महिन्यात बाराशे कलाकृती निर्माण होतील. तसेच भारतातल्या स्त्रिया कलेच्याबाबतीत खूप उत्सुक असतात. त्या प्रत्येक गोष्ट कलात्मकतेने करतात. अगदी जेवण वाढतानासुद्धा रेखीव पद्धतीने वाढतात. त्यामुळे स्त्रियांच्या कलागुणांना गती देऊन मोठे काम करता येईल.” याबरोबर त्यांना वेस्टमधून बेस्ट तयार करायचे आहे.

प्रत्येक कलाकाराने याबद्दल विचार करायला हवा, असं मनीष यांना वाटतं. कलाकाराला टाकावू गोष्टीतसुद्धा कला दिसली पाहिजे. यामुळे पर्यावरणाला खूप मोठा फायदा होणार आहे. कलेचा वारसा जोपासणार्‍या या सृजनशील तरुणाला विनायराव करमरकर आदर्श वाटतात. ते भारावून करमरकरांचा किस्सा सांगतात, “तुम्ही कलेची किंमत कशी ठरवता असा प्रश्न करमरकरांना विचारल्यावर ते मातीची व इतर सर्व वस्तूची किंमत सांगतात आणि शेवटी म्हणतात की बाकीची जी किंमत आहे ती मी माझ्या आयुष्याची जी मी माती केलीय त्याची किंमत आहे.”

करमरकर यांच्यासोबत भगवान रामपुरे, सागर रामपुरे, प्रमोद कांबळे या कलावंतांना ते आदर्श मानतात. तरुणांना संदेश देताना ते म्हणतात की तरुण कलावंतांनी कॉपी करू नये. कॉपी करुन एकवेळ पैसे मिळतील पण समाधान मिळणार नाही. म्हणून कलाकरांना सृजनशील असले पाहिजे.

आपल्याकडे काय आहे याचा विचार केला पहिजे. तसेच आताच्या ट्रेंडनुसार कलाकृती निर्माण केली पाहिजे. लोकांना काय आवडतं हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं. मंगल सुधाचा कारभार सांभाळताना त्यांच्या गाठीशी ५० वर्षांचा अनुभव आहे. मंगल सुधामध्ये प्रत्येक गोष्ट प्रामाणिकपणे तयार केली जाते.

मूर्ती किंवा पुतळे बनवताना ते भावनेने, कल्पकतेने व जीव ओतून बनवतात. त्यामुळे त्यांच्या मुर्त्या जीवंत वाटतात. गुणवत्ता आणि ग्राहकांचे समाधान ही महत्वाची बाब आहे असे ते मानतात. तसेच मुर्ती ग्राहकाला आवडली नाही तरी After Delivery Services देऊन ग्राहकाला मूर्ती हवी तशी पुन्हा तयार करुन देतात.

या सर्व वेगळ्या आणि सृजनशील गुणांमुळे ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचत आहेत व लोकांनाही त्यांची कलाकृती आवडत आहे. आपणही त्यांच्या वेबसाईट्सवर जाऊन त्यांची कलाकृती पाहावी व पाहताच क्षणी तुम्हाला ती विकत घेण्याची इच्छा नक्कीच निर्माण होईल. मंगल सुधाचे मनीष बुरडकर कला, व्यवसाय, शैक्षणिक आणि सामाजिक अशा अनेक आघाड्यांवर काम करत आहेत.

कोणतेही काम लोक सहभागाशिवाय पूर्ण होत नाही. लोक त्यांच्याशी जोडले जात आहेत. “स्मार्ट उद्योजक”ला खात्री आहे की हा लेख वाचून अनेक लोक त्यांना जोडले जातील. मनीष बुरडकर आणि मंगल सुधाच्या सर्व टीमचे स्मार्ट उद्योजकतर्फे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.

संपर्क : मनीष बुरडकर – ७७०९६७७०८६ / ८२७५३०१८१२


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.