१९०२ मध्ये जन्मलेला रे क्रॉक कागदी कप विकून आपला उदरनिर्वाह करत असे. हाच रे एक दिवस अमेरिकेतल्या सर्वात प्रसिद्ध ब्रॅण्डचा संस्थापक होईल असे कुणाला वाटले नव्हते.
१९५५ मध्ये जेव्हा रे ५४ वर्षांचा होता, तेव्हा तो प्रिंस कॅसल नावाच्या कंपनीचे मिक्सर विकण्यासाठी दारोदार फिरत असे. एक दिवस तो सॅन बरनार्डीनो, कॅलिफोर्निया येथील रिचार्ड आणि मॉरिस मॅकडोनाल्ड या दोन भावांच्या छोट्याशा हॉटेलमध्ये आला.
त्या हॉटेलमध्ये त्यांनी फक्त बर्गर्स, फ्रेंच फ्राईज, कोल्ड्रिंक आणि मिल्कशेक्स विकायला ठेवली होती. रेला या व्यवसायाने आकर्षिले. एवढे कमी पदार्थ असूनही या छोट्याशा हॉटेलला मिक्सर्सची भरपूर गरज भासत होती. त्यामुळे ते रेचे चांगले ग्राहक झाले होते.
एवढ्याशा हॉटेलला इतके मिक्सर्स कसे काय लागतात?
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : ₹१,०२५ ➡️ SUBSCRIBE

हा प्रश्न मात्र रेच्या मनात घिरट्या घालत होता. त्यामुळे त्याने हॉटेलचे नीट परीक्षण केले. तेव्हा त्याला असे समजले की बहुतांश अमेरिकन लोकांना जी चव आवडते, तीच चव हे छोटेसे हॉटेल देत होती. त्यामुळे त्या हॉटेलची ग्राहकसंख्या मोठी होती.
रेने रिचार्ड आणि मॉरिस यांना विचारले, की तुम्ही हे हॉटेल आणखी वाढवत का नाही? तर त्यांनी रेकडूनच हे रेस्टॉरंट वाढवण्यासाठी सल्ला घेतला आणि तेव्हापासून रे क्रॉक ‘मॅकडोनाल्ड’चा आंतरराष्ट्रीय विक्रेता झाला.
रे क्रॉकने त्या व्यवसायाचा नीट अभ्यास केला, तेव्हा त्याला लक्षात आलं की काही विशिष्ट पद्धती वापरून मॅकडोनाल्ड बंधूंनी प्रत्येक पदार्थ बनवण्याची किंमत इतरांपेक्षा अर्धी केली आहे. बर्गर्स आधीच तयार करून ते हिटिंग लॅम्पच्या खाली ठेवल्याने ग्राहकांना त्यांची ऑर्डर लगेच मिळत होती.
डायनिंगऐवजी सेल्फ सर्व्हिस ठेवल्यामुळे वेटर्सचा खर्च नव्हता. लोकांना ऑर्डर केल्यावर लगेच हातात पदार्थ मिळत असल्याने दर दिवशी इतरांपेक्षा जास्त ग्राहकांना ते सेवा पुरवू शकत होते. या व्यवसायात प्रचंड यश मिळवण्याची ताकद आहे, हे रेने तेव्हाच ओळखलं आणि मॅकडोनाल्ड ब्रदर्सचं फ्रँचायझी मॉडेल उभं करण्याचं काम रेने स्वतः हाती घेतलं.
१५ एप्रिल १९५५ रोजी मॅकडोनाल्डची पहिली शाखा इलिनोईस येथे सुरू झाली. त्याच वर्षी मॅकडोनाल्ड ब्रॅदर्सचे ‘मॅकडोनाल्ड कॉर्पोरेशन’मध्ये रूपांतर झाले आणि १९६१ मध्ये रेने मॅकडोनाल्ड बंधूंकडून हा व्यवसाय पूर्णपणे विकत घेतला. आपल्या सर्वांनाच माहीत असलेला मॅकडोनाल्डचा लोगो १९६२ मध्ये तयार झाला.
यानंतर १९६३ मध्ये रोनाल्ड मॅकडोनाल्ड नावाने एका विदूषकाचे स्वरूप तयार करून मॅकडोनाल्डचा सार्वजनिक चेहरा (पब्लिक फेस) म्हणून वापरण्यात आला. आज बहुतांश मॅकडोनाल्डच्या बाहेर आपण याला बाकावर बसलेला पाहतो.
‘मॅकडोनाल्ड’च्या प्रमोशनची सुरुवात
त्या दशकात मॅकडोनाल्डच्या वेगवेगळ्या ठिकाणी १ हजारहून अधिक शाखा सुरू झाल्या. त्यानंतर मॅकडोनाल्डच्या प्रगतीचा वेग आजतागायत वाढतच गेला आहे. १९८८ च्या अखेरपर्यंत मॅकडोनाल्डने १० हजार शाखांचा टप्पा पार केला.
एकविसाव्या शतकात पदार्पण करताना मॅकडोनाल्ड शंभरहून अधिक देशांमध्ये पोहचले होते आणि ३५ हजारहून अधिक शाखा सुरू झाल्या होत्या. १९९० च्या दशकात मॅकडोनाल्डसची प्रगती इतक्या वेगाने होत होती की, जगभरात दर पाच तासांला मॅकडोनाल्डची नवी शाखा उभी राहत होती.
कमीतकमी किंमतीत लहानांपासून मोठ्यांच्या आवडीची चव मॅकडोनाल्ड देत असल्यामुळे ते जलद गतीने प्रसिद्ध झाले आहे. त्या त्या देशातील चवीनुसार मॅकडोनाल्डने बर्गर बनवले आहेत. जसे भारतात आलू टिक्की, महाराजा मॅक, मॅक व्हेजी असे बर्गर्स काढले आहेत.
यापुढे केवळ बर्गर्सवर न थांबता अनेक वेगवेगळे पदार्थ बनवणेसुद्धा मॅकडोनाल्डने सुरू केले आहे. मॅकडोनाल्डचे वैशिष्ट्य म्हणजे आज कोणत्याही शाखेतील एखादा बर्गर इतर शाखांमध्ये मिळणाऱ्या बर्गसशी चवीने तंतोतंत सारखाच आहे. प्रत्येक शाखेला दिली जाणारी यंत्रे, कच्चा माल व पदार्थ बनवण्याची पद्धत एकसमान असल्यामुळे हे शक्य झाले आहे.
मॅकडोनाल्ड हे इतर सर्वांपेक्षा वेगळे आहे, कारण, मॅकडोनाल्डची प्रत्येक शाखा ही विकत घेतलेल्या जमिनीवर उभारली आहे. अर्थात ज्याला शाखा घ्यायची असेल त्याच्या नावावरच ती जागा असणे अनिवार्य आहे. यामुळे जगभरातील मोक्याच्या ठिकाणच्या बहुतांश जागा आज मॅकडोनाल्डच्या हातात आहेत. याशिवाय बर्गर्सना लागणाऱ्या बटाट्यांची शेतीसुद्धा अनेक देशांत मॅकडोनाल्ड स्वतः करते.
आगळीवेगळी चव, लोकांना आवडणारे पदार्थ, कमीत कमी किंमत, कमीत कमी वेळात मिळणारी सेवा अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे मॅकडोनाल्डने आज यशाचे शिखर गाठले आहे.
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.