जन्म आहे म्हटल्यावर मूत्यु हा अटळ असतो. जिवंत असताना माणूस स्वतःची हरतर्हेने काळजी घेतो. पण मरणानंतर आपल्यावर काळजीपूर्वक अंत्यसंस्कार होतील याची त्याला खात्री नसते. मुंबईसारख्या मोठ्या शहरात वाढत चाललेली फ्लॅटसंस्कृती, र्हास होत चाललेली एकत्रित कुटुंबपद्धती, आत्मकेंद्रितपणाच्या जगात हरवत चाललेले नातेवाईक, अंत्यसंस्काराच्या वेळी दोन हात दूरच राहणारी नवीन पिढी, समाजाची तुटत चाललेली नाळ आणि मृत्यूनंतरही संबंधित व्यक्तींचा आदर व आत्मसन्मान कायम राहावा या पार्श्वभूमीवर अंत्यसंस्काराच्या सर्व जबाबदारीला खांदा देण्यासाठी ‘सुखांत अंतिम संस्कार व्यवस्थापन’ कंपनी मे २०१४ मध्ये आकारात आली.
यासाठी सुखांतने ‘मोक्ष’ नावाचा प्री-प्लॅन आणला आहे. मोक्ष प्लॅनमध्ये व्यक्तीच्या इच्छेनुसार अंत्यसंस्कार होतात. हा प्लॅन घेतल्यानंतर प्लॅनधारकाचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस तसेच त्याच्या आयुष्यातील सुवर्णक्षण सुखांतकडून साजरे केले जातात. त्याचबरोबर त्याच्या आयुष्यभरातील मित्र, नातेवाईक तसेच इतर लोकांचा डेटा जतन करून ठेवणे व त्यांना प्लॅनधारकाच्या सुख:दु:खाच्या क्षणी बोलावण्यात येते.
अंतिम संस्कारासाठी लागणारी सर्व साधनसामग्री, मनुष्यबळ आणि शववाहिनी याची पूर्तता होते. एखाद्याने मृत्यूपूर्वी देह, नेत्र किंवा अवयवदानाची इच्छा व्यक्त केली असेल तर ती कार्यवाही केली जाते. स्मशानातील नोंदणी ते अस्थिविसर्जन, महापालिकेचा मृत्यू दाखला याबाबतची सर्व मदत पुरवली जाते. विशेष म्हणजे मोक्षधाममध्ये श्रद्धांजली सभेत मृत व्यक्तीच्या आयुष्यावर केलेल्या चित्रफीतच्या माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधेल.
पुढील पिढीसाठी काही संदेश देऊन जगाचा निरोप घेते. त्यानंतर प्लॅनधारकाच्या पसंतीची फोटो फ्रेम त्याच्या कुटुंबीयांना दिली जातो. तसेच ती व्यक्ती त्याच्या कुटुंबीयांमध्ये व नातेवाईकांमध्ये कायम स्मरणात राहावी यासाठी पुढील तीन वर्षे त्यांची जयंती-पुण्यतिथी सोशल मीडियाद्वारे केली जाते. अशा प्रकारचा हा मोक्ष प्री-प्लॅन आहे.
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : ₹१,०२५ ➡️ SUBSCRIBE
सुखांतचा ‘मोक्ष’ प्लॅन कोणासाठी? ज्यांना आपल्या मृत्यूनंतर अंतिमसंस्कार स्वतःच्या इच्छेप्रमाणे व कुटुंबियांना कोणताही त्रास न होता आदर आणि आत्मसन्मानाने व्हावा असे वाटते त्यांच्यासाठी. जे पन्नास वर्षांवरील व्यक्ती आहेत. ज्यांची मुले परदेशात स्थायिक झालेली आहेत. ज्यांना अपत्यच नाही. जे एकटेच असतात. ज्यांची सुस्थिती आहे, परंतु त्यांच्या मुलांनाही विधी कशी करायचे हे माहीत नाही.
जे आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीचे नियोजन करत असतात. ज्यांच्याकडे पैसा आहे, त्यामुळे इतर सेवांप्रमाणे ही सेवाही घ्यायला आवडेल. जे स्वतःच्या आयुष्यात कोणाचे उपकार न घेता आत्मसन्मानाने जगले आहेत, तो आत्मसम्मान ते त्यांच्या मृत्यूनंतर कायम ठेवू इच्छितात. तीस वर्षांवरील तरुण वर्ग स्वतःसाठी नसेल तरी आपल्या आजी, आजोबा, आई, वडील यांच्यासाठी प्लॅन करू शकते.
‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.

‘सुखांत’चे संस्थापक संचालक संजय रामगुडे हे मुळात सिनेमॅटोग्राफर, वाराणसीला एका डॉक्युमेंटरीसाठी गेले असताना तिथल्या प्रसिद्ध गंगाघाटावर अनेक मृतदेहांवर ज्या पद्धतीने अंत्यसंस्कार होतात, ते पाहून त्यांचं मन हेलावून गेलं. तेव्हापासून त्यांच्या मनात ही योजना घोळत होती. पुढे त्यांनी त्यांच्या मित्रांच्या सहभागाने हा व्यवसाय म्हणून पुढे आणायचं ठरवलं.
त्याचा सखोल अभ्यास केला, सर्वेक्षण केलं. अंत्यसंस्कार करण्यासाठी एखादी कंपनी असेल, असा विचारही आपल्या देशातील कोणाच्या मनात आला नसेल, तेव्हा म्हणजे दोनशे वर्षांपूर्वीच पाश्चात्त्य देशामध्ये अशाप्रकारच्या फ्युनरल सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्या सुरू झाल्या आहेत. या कंपन्या कशा चालतात याचा अभ्यास सुखांतच्या टीमने केला. दोन कंपन्यांनी २,७५० लोकांशी बोलून सर्वेक्षण केलं.
तेव्हा अशा प्रकारची सेवा आपल्याकडे असावी, अशी इच्छा अनेकांनी बोलूनही दाखवली. लोकांची मानसिकता समजून घेताना ही सेवा पुरवताना नेमक्या कोणत्या सेवासुविधा पुरवाव्यात याचा अभ्यास संजय रामगुडे आणि त्यांच्या सहकार्यांनी केल्यानंतर भारतातील पहिली ‘पूर्वनियोजित अंतिम संस्कार व्यवस्थापन’ करणारी कंपनी सुरू झाली.
सध्या मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या क्षेत्रांपुरते सुखांतचे काम मर्यादित असले तरी लवकरच १५० कर्मचार्यांची भरती करून राज्यभरात आणि पुढे देशभरात सुखांतच्या अंतिम संस्कार सेवेचे जाळे पसरण्याची योजना आहे.

सुखांत ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असून संजय रामगुडे हे संस्थापक आहेत. याशिवाय पुंडलिक लोकरे व भारती चव्हाण याही संचालक पदावर आहेत. तंत्रज्ञानाच्या बाबतीत आम्ही सोशल मीडिया व मोबाइल मेसेंजर्सचा प्रचारासाठी वापर करतो. लवकरच सुखांतचा अॅप तयार करण्यात येणार आहे. सुखांत फंडिंगसाठी एन्जेल इन्व्हेस्टर किंवा व्हेंचर कॅपिटलचा विचार करते आहे. भविष्यात शेअर बाजारात नोंदणीकृत करण्याचाही विचार आहे.
Email: sukhantfuneral@gmail.com
‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.