रात्रीच जेवण करण्यासाठी राहत्या जागेपासून हॉटेलपर्यंत जाण्यासाठी आम्ही उबर बुक केली होती, ती तिच्या ठरलेल्या वेळेवर येऊन पोहोचली. गाडीत बसतानाच पहिलं लक्ष नीटनेटकेपणा, स्वच्छता यांनी वेधलं. ते न्याहाळत गाडीत बसतो ना बसतो तोच ड्रायव्हरच्या सीटवरून एकदम फर्मास इंग्रजीमध्ये अदबीने प्रश्न आला.
सर, तुम्हाला GPS ने जायला आवडेल का? तुम्हाला हॉटेलला जायचा एखादा शॉर्टकट माहीत आहे?
इंग्रजीचे उच्चार आणि अदब पाहून अचंबित होऊन समोर सरकून सीटवर कोण आहे ते पाहिलं तर तो भारतीयच होता साधारण ३०-३२ वयातला नंतर काही जुजबी प्रश्नोत्तरांची देवाणघेवाण झाली आणि आमची गाडी निघाली.
गाडीचा टापटीपपणा, त्याच अस्खलित इंग्लिश बोलण्याची पद्धत हे सगळं पाहून कितीही नाही म्हटलं तरी कुतूहलापोटी त्याला प्रश्न विचारायची इच्छा होत होती. मग संवाद सुरू करायचा म्हणून उगाच गाडीच कौतुक करून बोलायला सुरुवात केली अन् मग नंतरच्या १५-२० मिनिटांच्या बोलण्यात त्याने असे असे बॉम्ब टाकले की, त्या रात्रीचं जेवण आणि पुढचे दोन दिवस आमच्या बोलण्याचा विषय फक्त तोच होता.
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : ₹१,०२५ ➡️ SUBSCRIBE
त्याच्यात आणि आमच्यात झालेला संवाद
आम्ही : गाडी खूप छान मेंटेन केलीये तुम्ही, अगदी नवीन वाटतीये. दिवसभरातून २-३ वेळा तरी पुसावं लागत असेल?
तो : नाही सर, संध्याकाळी निघताना फक्त एकदा पुसतो. मी cab पार्ट टाइम म्हणून चालवतो?
आम्ही : पार्ट टाइम. अच्छा! मग पूर्ण वेळ काय करता? (याच्या उत्तरात पहिला बॉम्ब)
तो : माझी स्वतःची कंपनी आहे, आम्ही solar system घरांमध्ये बसवण्याचं काम करतो. अजून नवीन आहे कंपनी म्हणून हवा तेवढा नफा त्यातून मिळत नाही आणि वरकमाईसाठी असं पार्ट टाइम cab चालवायची सवय मला ऑस्ट्रेलियामध्ये असल्यापासून आहे.
आम्ही : ऑस्ट्रेलिया.. तिथे कधी होता तुम्ही? (इथे दुसरा बॉम्ब)
तो : सर, मी माझं MS ऑस्ट्रेलियामध्ये केलं आहे. नंतर काही महिने तिकडेच एका कंपनीत कामही केलं. तेव्हा तिथे विद्यार्थिदशेत असताना वरकमाईसाठी cab चालवली आहे. (या उत्तरानंतर हा माणूस म्हणजे काही तरी अजब रसायन आहे याची जाणीव आम्हाला झाली. इतका वेळ सीटला मागे रेलून निवांत बसलेलो आम्ही समोर होऊन बसलो आणि त्याच्याकडून अजून ऐकण्यासाठी आतुर झालो होतो.)
आम्ही : MS, चांगल्या पगाराची ऑस्ट्रेलियामधील नोकरी सगळं सोडून एकदम स्वतःची कंपनी आणि पार्ट टाइम cab ड्रायव्हर, हे कसं काय झालं?
तो : माझी ऑस्ट्रेलियामधली जी कंपनी होती ती ही solar panels वरच काम करायची आणि मोठंमोठ्या कंपन्या, व्यापारी संकुल यांना solar system बनवून द्यायचं काम करायची. ते काम पाहून, शिकून असं वाटलं की हेच जर आपण छोट्या प्रमाणात बनवून भारतातल्या सामान्य लोकांना त्यांच्या घरात वापरता येऊ शकेल असं बनवू शकलो तर त्यातून पैसाही कमवता येईल आणि ऊर्जेचा प्रश्नही सोडवता येईल.
गुज्जू असल्याने नोकरीपेक्षा धंदा आम्हाला नेहमी सोयीस्कर वाटतो म्हणून मग एक दिवस ठरवून तिथलं सगळं सोडून इथे येऊन स्वतःची कंपनी टाकायची ठरवली.
आम्ही : वा.. भारीच.. मग कसा प्रतिसाद आहे आता आणि काय असतं त्यात नेमकं? महिन्याला किती कमावतात?
तो : सध्या ३ महिन्यांत ५ लाखांपर्यंत कमाई होतीये, हळूहळू वाढत जाईल. आमच्याकडे एका घराला १ kw वीज देऊ शकेल अशी solar सिस्टम्स आहेत ती बसवण्याची कामं आम्ही करतो, याला साधारण खर्च ७० हजारांपर्यंत येतो, पण त्यावर सरकारकडून सबसिडीही भेटते, जर तुम्हाला १ kw वीज लागत नसेल तर तुम्ही ती विकूपण शकता. (अशा बर्याच त्यांच्या कामातल्या गोष्टी त्याने आम्हाला सांगितल्या.)
आम्ही : तुमच्या घरच्यांचा या सगळ्याला पाठिंबा नाही का? मग अस पार्ट टाइम काम करण्याची काय गरज आहे ना? (एकंदर पेहरावावरून चांगल्या घरातला वाटत होता.) आज ना उद्या मोठी होईलच की कंपनी अन् तसंही गुजराती लोक धंद्याला नेहमी पाठिंबा देतातच. (सगळ्यात मोठा बॉम्ब या प्रश्नाच्या उत्तरात आहे.)
तो : घरच्यांचा पूर्ण पाठिंबा आहे, पण मला कंपनी ही स्वतःच्या बळावर उभी करायची आहे, मी कोणाला सांगत नाही इतकं, पण तुम्हाला म्हणून सांगतो माझी आई अहमदाबाद शहराची माजी महापौर आहे, मोदी मुख्यमंत्री असताना ८१ महापौरांपैकी त्यांच्यासोबत चीनला जाणारी एकटी महिला महापौर होती ती.
घरचं वातावरण हे सगळं राजकारणच आहे. मला हवी ती आणि हवी तशी मदत सहज उपलब्ध होऊ शकते, पण मला माझं स्वतःच्या हिमतीवर काही तरी निर्माण करायचं आहे म्हणून मी असं पार्ट टाइम Cab चालवतो वरखर्च भागवण्यासाठी… हे उत्तर ऐकून आम्ही थोडा वेळ शांतच होतो.
एखाद्या सिनेमाची गोष्ट ऐकतोय की काय असंच वाटत होतं. इतकं सगळं बोलणं होईपर्यंत आमचं हॉटेल आलेलं. मग आम्ही त्याला जेवायला यायचं आमंत्रण दिलं, पण माझ्या बायकोचा फोन येतोय, मला जावं लागेल. नंतर कधी नक्की जेवूयात. असं सांगून तो निघून गेला, पण आम्ही मात्र त्याच्याच विचारात होतो.
उच्च शिक्षण, मोठ्या पगाराची नोकरी सगळं सोडून तो स्वतःची कंपनी टाकण्यासाठी आला होता आणि स्वतःच्या बळावर काही तरी निर्माण करण्यासाठी मोठ्या राजकारणी घरातला असूनदेखील कॅब ड्रायव्हरसारखं काम करण्यात त्याला कमीपणा वाटत नव्हता.
मराठी लोकांमध्ये १०-६ नोकरीला जे ग्लॅमर आहे ते धंदा किंवा व्यवसाय करण्याला नाही म्हणून मराठी लोक मागे राहतात आणि ‘आपण बरं आणि आपली नोकरी बरी’ असा विचार करतात, त्याउलट धंदा हा गुजराती माणसाच्या रक्तातच असतो.
– अभिजीत भालेराव
८९५६७२२८८०
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.