उद्योगोपयोगी

स्ट्रॅटेजी, ध्येय, उद्दिष्ट आणि ऍक्शन प्लॅन

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


ह्या आधीच्या दोन लेखात आपण व्हिजन आणि मिशनबद्दल माहिती घेतली आहे. ह्या तिसऱ्या लेखात आपण स्ट्रॅटेजी, ध्येय, उद्दिष्ट आणि ऍक्शन प्लॅनबद्दल माहिती घेणार आहोत.

व्हिजन

या आधी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक कंपनीने प्रथम व्हिजन आणि मिशन स्टेटमेंट लिहायला पाहिजे. व्हिजन म्हणजे कंपनीला काय करायचे आहे आणि मिशन हे कंपनीचे मूळ कारण आहे. एकदा का तुम्ही व्हिजन आणि मिशन ठरवले की मग ते मिशन सुरू करण्यासाठी आणि व्हिजन साध्य करण्यासाठी स्ट्रॅटेजी, ध्येय, उद्दिष्ट आणि ऍक्शन प्लॅन ठरवता येतात.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

स्ट्रॅटेजी म्हणजे काय?

मिशन प्रत्यक्ष वापरून व्हिजन साध्य करून घेण्याचे एक किंवा अधिक मार्ग म्हणजे स्ट्रॅटेजी. स्ट्रॅटेजी हा असा मार्ग आहे की त्याद्वारे आपण लक्ष्य गाठू शकतो. स्ट्रॅटेजीमध्ये लहान आणि मोठ्या कालावधींची ध्येय असली पाहिजेत आणि ती ध्येय कशी साध्य होतील हे विषद केले पाहिजे. सध्या चालू असलेले काम आणि मिशन साध्य करण्यासाठी आवश्यक असणारे आउटकमवर स्ट्रॅटेजी भर देते.

ध्येय म्हणजे काय?

स्ट्रॅटेजी अंमलात आणण्यासाठी आवश्यक असणारे उच्च आणि सर्वसाधारण माइलस्टोन्स म्हणजे ध्येय. ध्येय म्हणजे प्रयत्नांची अचूक किल्ली, जी उद्योगासाठी अत्यंत आवश्यक असते; जिच्यामुळे कामाचे पूर्ण वर्णन, उत्पादन व माहिती मिळते. उदा. नफ्यात ठराविक टक्के वाढ, मार्केट शेअरमध्ये वाढ, वगैरे.

उद्दिष्ट म्हणजे काय?

ध्येयानंतर उद्दिष्ट येतात. ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी ठरवली जाणारी माइलस्टोन्स म्हणजे उद्दिष्ट. ध्येय साध्य करण्यासाठी छोट्या छोट्या पायऱ्या, कृती आणि जास्त सुस्पष्ट टप्पे म्हणजे उद्दिष्ट. जास्त सखोल आणि मोजता येणारे माइलस्टोन्स म्हणजे उद्दिष्ट. उदा. पुढच्या दोन वर्षात नफ्यात वीस टक्के वाढ किंवा मार्केट शेअरमध्ये तीन वर्षात पन्नास टक्के वाढ, वगैरे.

ऍक्शन प्लॅन्स म्हणजे काय?

उद्दिष्टांनंतर ऍक्शन प्लॅन्स येतात. ऍक्शन प्लॅन्स म्हणजे ठराविक कृतीच्या योजना ज्या पूर्ण केल्यावर तुम्ही उद्दिष्ट गाठू शकता.

व्हिजन, मिशन, स्ट्रॅटेजी, ध्येय, उद्दिष्ट आणि ऍक्शन प्लॅन हे सर्व एकमेकांशी असे निगडीत व्हायला हवेत म्हणजे कंपनीमधील सगळ्यांना नक्की समजेल की आपल्याला काय आणि कसं साध्य करायचे आहे. याचा सार म्हणजे “keeping everyone on the same page” अर्थात एका वेळी प्रत्येकजण सारख्याच गोष्टीसाठी कार्यरत असणे. त्यामुळे सर्वजण एकाच दिशेने चालतील.

एक उदाहरण बघूया.

अबक नावाची एक कंपनी आहे.

१) तिचे व्हिजन पुढील पाच वर्षात देशातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक्स ट्रेडिंग कंपनी व्हायचे आहे.

२) ह्या व्हिजनसाठी त्यांनी मिशन स्टेटमेंट असे लिहिले की, नवीन ब्रॅण्ड्स आणणे आणि चालू ब्रॅण्ड्स एकत्रित करणे.

३) स्ट्रॅटेजी :

– देशात वेगवेगळ्या राज्यात विक्री करण्यामध्ये नैपुण्य असणाऱ्या मॅनेजर्सची टीम तयार करणे.
– वेगवेगळ्या राज्यातील मॅनेजर्सना मदत करण्यासाठी कंसल्टंट्स किंवा मार्गदर्शक नेमणे.
– मार्केटमधील घडामोडींवर लक्ष्य ठेवणे.

४) ध्येय :

– विक्रीकौशल्य असलेले नवीन मॅनेजर्स नेमणे किंवा सध्या असलेल्या मॅनेजर्समध्ये ते कौशल्य निर्माण करणे.
– अनुभवी कंसल्टंट्स निवडणे.
– मार्केटमधील संधींचा शोध घेणे, माहीत करणे.

५) उद्दिष्ट यापुढे :

– पुढच्या महिन्याच्या २५ तारखेपर्यंत देशातील प्रत्येक राज्यात सेल्स मॅनेजर्सचा संघ निर्माण करणे.
– पुढच्या महिन्याच्या १५ तारखेपर्यंत अकाउंटिंग, लीगल आणि मार्केटिंग कंसल्टंट्स नेमणे.
– पुढच्या तीन महिन्यात सहा संधींबद्दल माहिती करून घेणे.

६) ऍक्शन प्लॅन :

– पुढच्या महिन्याच्या २५ तारखेपर्यंत टप्प्याटप्प्याने एच.आर. डिपार्टमेंटला नवीन पदांचा तपशील तयार करायला सांगणे, रिक्त पदांसाठी जाहिरात देणे, पदांवर लोकांची नेमणूक करणे.

– पुढच्या महिन्याच्या १५ तारखेपर्यंत टप्प्याटप्प्याने कंसल्टंट्सचे करार पत्र तयार करणे, कंसल्टंट्सना शॉर्टलिस्ट करणे आणि नंतर नेमणूक करणे.

– एक कॉर्पोरेट टीम बनवणे, जे मार्केटमधील नवनवीन संधी शोधतील.

आपल्या काही सूचना, प्रश्न, शंका असतील किंवा अभिप्राय असतील तर अवश्य संपर्क साधा :

सी.ए. जयदीप बर्वे
9820588298
cajaideepbarve@gmail.com


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!