यशाचा मूलमंत्र सोपा की अवघड?


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


आपल्याला जे हवे आहे ते मिळवण्याचा मूलमंत्र मुळीच गोपनीय नाही. मात्र तो गोपनीय नसल्यामुळेच आपल्या लक्षात येत नाही. बर्‍याचदा असे होते की, सोपी गोष्ट तिच्या सोपेपणामुळे आपल्या लक्षात येत नाही. नाही ना विश्‍वास बसत! मग एक रूपककथा सांगतो.

एका गावात दुष्काळ पडलेला असतो. तेव्हा पर्जन्ययाग केल्याने पाऊस पडेल असे कळल्यामुळे सर्व गावकरी गावच्या देवळात याग करण्याचे ठरवतात. सकाळी सर्व जण गडबडीने देवळाकडे निघतात. तेव्हा एक लहान मुलगा सोबत छत्री घेऊन देवळाकडे निघालेला त्यांना दिसतो. ते त्या मुलाला मूर्खात काढतात, “अरे, आकाशात ना ऊन ना ढग. मग मूर्खासारखा छत्री घेऊन सकाळी सकाळी निघालायस कुणीकडे?”

तो मुलगा निरागसपणे म्हणतो, “देवळात पर्जन्ययागासाठी जातोय.” लोक म्हणतात, “मग छत्री कशाला?” तो मुलगा पुन्हा सांगतो, “अहो, याग केल्यावर पाऊस पडणार ना. मग घरी परतताना छत्री लागणार नाही का?” हे ऐकून हसणारी मंडळी चिडीचूप होतात.

कथेचे तात्पर्य असे आहे की, सर्व गावकरी पर्जन्ययाग करून पाऊस पडण्याची इच्छा करीत होती; पण पर्जन्ययागाने पाऊस पडेल अशी केवळ त्या लहान मुलाचीच श्रद्धा होती. आपल्याला जर काही हवे असेल तर आपण ते अवश्य मिळवू शकतो, या विचारावर आपली पूर्ण श्रद्धा हवी; अन्यथा ते आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही.

भगवान श्रीकृष्णाने “श्रद्धावान लभते ज्ञानम्।”असे गीतेत सांगितले आहे. या श्रद्धेला बलवत्तर बनवणारे आचरण आपण सतत करायला हवे. समजा, एखाद्याला डॉक्टर बनायचे आहे तर त्याने सतत अ‍ॅप्रन घालून वावरण्याची गरज नाही. त्याने त्या अ‍ॅप्रनच्या आत असणार्‍या माणसाला जाणून घेतले पाहिजे व समजून घेतले पाहिजे.

डॉक्टर म्हणजे काय? याचा सतत शोध घेत राहिले पाहिजे. हा शोध जेव्हा आत्मशोधात रूपांतरित होतो तेव्हा आपण अंतर्बाह्य डॉक्टर बनतो.

आपल्याला त्या पैशाबद्दल सर्व आवश्यक माहिती गोळा केली पाहिजे. डॉक्टर बनण्यासाठी नेमके काय करावे लागते? डॉक्टरांचे जीवन कसे असते? या व्यवसायात कोणकोणती मूल्ये जपावी लागतात? अशी एक ना अनेक प्रश्‍नांची उत्तरे शोधायला लागतात. तसेच समोर एक आदर्श म्हणून कोणाची तरी निवड करावी लागते. आपण मोठे होऊन असे डॉक्टर होणार आहोत असे आपल्या मनाला बजावावे लागते.

यात डॉक्टर हा पेशा केवळ उदाहरणादाखल घेतला आहे, हे लक्षात घ्यावे. आपल्या उत्कट श्रद्धेच्या बळावर चमत्कार घडू शकतात. लोकांना ते चमत्कार वाटत असले तरी ते निश्‍चित प्रक्रियेला आलेले फळ असते. आपण स्वत:बद्दल एक उत्कट प्रतिमा निश्‍चित करतो तेव्हा ते गुण आपल्याकडे आपोआप आकर्षित होतात. ‘भित्यापोटी ब्रह्मराक्षस’ ही म्हण आपल्याला ठाऊक आहेच.

आपला स्वभाव लहानसहान अडचणी व संकटांना घाबरून जाणार असेल तर मोठी संकटेही आपला पत्ता विचारात हमखास येणार; पण आपण जर स्वत:चा आत्मविश्‍वास वाढवण्याचा सतत प्रयास केला तर आलेल्या अडचणीला यशस्वीपणे तोंड देता येईल व तसे ते देऊन अडचणींतून मार्ग काढला तर आत्मविश्‍वासात सतत भर पडत जाईल.

निसर्गाचा नियम असा आहे की, एखाद्या माणसाचा जसा विश्‍वास असेल तशी परिस्थिती आणि त्या परिस्थितीला पोषक स्वभावाची माणसेही तो मनुष्य आकर्षित करीत असतो. आपण पाहतो की, एखाद्या माणसाला सतत यशच लाभत जाते आणि दुसर्‍या माणसाला सतत अपयशाला सामोरे जावे लागते. यात भाग्याची बाब फार मोठी नसते. तर पहिल्या माणसाला यशाची व दुसर्‍या माणसाला एखाद्या बाबतीत चुकून अपयश आले तरी त्यात त्याला यशाचे पुसटसे चिन्ह दिसू शकते.

याच्या उलट दुसर्‍या माणसाला एखादे यशही लाभले तरी त्या यशाचा उत्कट आनंद त्याला भोगता येत नाही; दुसर्‍या माणसाला मिळालेले अधिक यश त्याला जास्त खुपते. असे यश एक दिवस आपल्यालाही मिळेल असा विचार तो करीत नाही. त्या माणसाचा आनंद पाहून त्याचा हेवा करण्यापेक्षा त्याच्या आनंदाने आनंदित होऊन असाच आनंद एक दिवस आपणही उपभोगू असा विचार त्याच्या मनात येत नाही. यालाच खरेच दुर्भाग्य म्हणता येईल.

कर्तृत्ववान माणसे म्हणजे कोण असतात? त्यांनाही दु:ख, अपयश, आजार, अपमान, निराशा यांना सामोरे जावे लागते; पण ती माणसे त्यापाशी खिळून राहत नाही. ती पुढे जाण्याची आशा व उमेद बाळगतात.

काही मंडळी मुलाखत देण्याच्या कल्पनेनेच घाबरून जातात. मन लावून केलेले पाठांतरही त्यांच्या मदतीला आयत्या वेळी येत नाही. खरे म्हणजे त्यांनी पाठांतर करण्यात जितका वेळ घालवला असतो त्यातलाच थोडा वेळ आपण ही मुलाखत अगदी आत्मविश्‍वासपूर्वक आणि यशस्वीपणे देत आहोत.

आपल्याला सर्व प्रश्‍नांची उत्तरे आठवत आहेत व आपण दिलेली उत्तरे ऐकून मुलाखत घेणारे आनंदाने माना डोलवत आहेत, आपण अगदी आरामात त्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे देत आहोत, मुलाखत संपल्यावर ते आपले अभिनंदन करीत आहेत, अशा प्रकारचे मानसचित्र रेखाटण्यासाठी वापरला तर याचा अत्यंत चांगला परिणाम दिसून येऊ शकतो; पण बहुतांश लोक याच्या विरोधातच मानसचित्र रंगवीत असतात.

हा स्वभावदोष आहे. आपण दुसर्‍याचा स्वभाव पालटू शकत नाही, पण आपला स्वभाव अवश्य पालटू शकतो. तेव्हा चांगल्या आणि सकारात्मक गोष्टीचेच चिंतन करावे; नकारात्मक विचारांना आपल्या आसपास फिरकूसुद्धा देऊ नये. आपले एकट्याचे बळ अपुरे वाटत असेल तर एखाद्या बाह्य वस्तूचे अथवा व्यक्तीची आधारासाठी साहाय्य घ्यायलाही हरकत नसते.

ही व्यक्ती आपले मार्गदर्शक अथवा गुरूसुद्धा असू शकते. त्यांच्यावर विसंबून राहिल्यामुळे आपला मानसिक ताण नाहीसा होत असेल तर तसे करण्यातही गैर नसते.

एक भक्त लॉटरी लागावी म्हणून रोज देवाची आळवणी करायचा, पण त्याला कधीच लॉटरी लागली नाही. त्यामुळे रागावून त्याने देवाची मूर्ती नदीत विसर्जित करून टाकली. देवाने त्याला स्वप्नात जाऊन सांगितले, ‘अरे, तुला लॉटरी कधीच लागली असती, पण तू कधी तिकीटच घेतले नाहीस. मग मी तरी काय करू?’

यातील विनोद बाजूला ठेवा; पण अंधश्रद्धा कशी असते याचे हे उत्तम उदाहरण आहे. आपली श्रद्धा तिचे काम अवश्य करील, पण त्यातील आपली जबाबदारीही आपण प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे, तरच आपण यशाची वा सफलतेची अपेक्षा करू शकतो. नुसती वांझ आशा काही कामाची नसते.

यासाठी आपण आपले वातावरण चांगले निवडले पाहिजे अथवा प्रतिकूल वातावरणातही चांगला व्हावा म्हणून एका मुलाची आई त्याला हुशार मुलांच्यात खेळायला जाण्यास सांगायची; पण तो वाईट मुलांच्या संगतीतच रमायचा. आई रागावून म्हणाली, ‘अरे, एवढं सांगूनसुद्धा तू चांगल्या मुलांच्यात खेळायला का जात नाहीस?’

तो मुलगा लागलीच म्हणाला, ‘काय करणार? चांगल्या मुलांच्या आया मला त्यांच्या मुलांशी खेळू देत नाही ना!’ आपल्याला चांगल्या वातावरणात जायचे आहे तर आपली गुणवत्ता कशी वाढत जाईल याचा आपण सतत ध्यास घेतला पाहिजे. आपल्या प्रयत्नांना आज ना उद्या यश येतेच येते!

आपल्याला एखादे पद अथवा प्रतिष्ठेचे स्थान मिळविण्याची हौस असते; पण त्यासोबत मोठी जबाबदरी येत असते आणि ती पार पाडावी लागणार असते हे आपण मनातून नाकारत असतो. त्यामुळे “ना नौ मन तेल होगा, ना राधा नाचेगी।” असेच घडत असते. नऊ मण तेल गोळा व्हावे असे सर्वांना राधेचा नाच पाहण्यासाठी अवश्य वाटत असते, पण राधेला प्रत्यक्षात नाच येत असतो का? हे कोणी समजून घेत नाही.

“छोटे मन से कोई बडा नही होता. टूटे मन से कोई खडा नही होता” ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आपण शरीर निरोगी राहावे म्हणून बरीच काळजी घेत असतो, पण निरोगी मनाचे महत्त्व आपल्याला पटलेले असते का? आपण आपले मन निरोगी राहावे म्हणून काही व्यायाम करतो का?

त्याबाबत मार्गदर्शन अथवा समुपदेशन घेतो का? आपल्याला या गोष्टी अनावश्यक वाटतात का? यात बरेच काही दडलेले आहे. भक्कम शरीरालाही झेपेल तितकेच वजन उचलता येते; पण भक्कम मन मात्र इकडची दुनिया तिकडे करण्याची इच्छा बाळगून ती गोष्ट साध्यही करू शकते.

असे मनाचे ‘कंडिशनिंग’ करण्याचे तंत्र आपल्याला जमायला हवे. आपल्या पूर्वजांनी योग आणि अध्यात्म यांच्या माध्यमातून असे तंत्र विकसित केले होते; पण आज बर्‍याच प्रमाणात यातील तत्त्व व सत्त्व विसरले गेले आहे. केवळ त्या तंत्राचा बाह्य ढाचा शिल्लक राहिलेला आहे.

उदाहरणच सांगायचे तर, कदाचित वृक्षांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी वटसावित्रीसारखे व्रत आपल्या पूर्वजांनी सुरू केले असावे. आज मात्र त्याच वृक्षाची या दिवशी मोठ्या प्रमाणावर तोड होऊन त्या फांद्यांची पूजा करण्यात महिला धन्यता मानतात, ही विकृतीच म्हणावी लागेल. त्यामुळे बाह्य उपचारांपेक्षा त्याचे तत्त्व जाणून घेण्यावर भर असावा.

“मूकं करोति वाचालं, पंगुं लंघयते गिरिम्।” असे म्हटले जाते. तसे पहायला गेले तर मुका बोलणार कसा आणि पंगू मनुष्य चालणार कसा? तर त्याचा लाक्षणिक अर्थ असा घेतला पाहिजे की, या शक्तींचा अभाव असलेला मनुष्यही या शक्तींनी युक्त असा होऊ शकतो. मात्र त्यासाठी त्याने आपली अंतर्मनाची शक्ती वाढविली पाहिजे.

“सत्य संकल्पाचा दाता नारायण। सर्व करी पूर्ण मनोरथ।” असे म्हटले जाते. त्यामुळे नेहमी चांगला संकल्प करावा लागतो. साधी पूजा करतानाही सर्व घरादाराच्या कल्याणाचा शुभ संकल्प केला जातो. म्हटले तर पूजा केल्याने कल्याण होते आणि म्हटले तर आपल्या संकल्पशक्तीवर असलेल्या विश्‍वासामुळे कल्याण होते; पण या सत्यसंकल्पावर आपला पूर्ण विश्‍वास असतो का? की केवळ परंपरा म्हणून आपण ही प्रथा साजरी करीत असतो? त्यामुळे यातील तत्त्व लक्षात घेऊन निरोगी मनाचे व निरोगी आयुष्याचे संकल्प नियमितपणे करत जावे हे आवश्यक असते.

एखादा संकल्प केला आणि त्याचे नित्य स्मरण ठेवले तर तो वास्तवात आणण्यासाठी काय करावे लागेल याचे अंतर्मनातही सतत चिंतन सुरू होते. तो संकल्प साकारण्यासाठी थोडीशी परिस्थिती जरी निर्माण झाली की तो संकल्प लगेच मूर्त रूप धारण करण्याच्या तयारीला लागतो आणि तो साकारही होतो.

बर्‍याचदा आपण केवळ इच्छा व्यक्त करून ती विसरूनही जातो, मग तिची पूर्ती आपोआप कशी होणार? जगात आपोआप काही होत नाही, प्रत्येक गोष्टीला कार्यकारणभाव असतो हे लक्षात घेतले पाहिजे आणि तो कार्यकारणभाव जाणून घेतला पाहिजे. त्याचे गणित जमले की आयुष्याचे गणितही जमलेच समजा!

वाचकांना वाटेल की या लेखात हमखास यशाचे एखादे सूत्र दिले असेल आणि त्याने यशप्राप्ती होईल. ते सूत्र ज्याचे त्याने शोधायचे असते, पण ते कसे शोधता येईल यासाठी या लेखातून आपणास अवश्य मार्गदर्शन होईल असे वाटते.

– दीपक जेवणे

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?