दहावीच्या परीक्षेनंतर अनेक विद्यार्थी अभियांत्रिकी, वैद्यकीय अशा वाटा निवडतात, पण सातार्याच्या रेश्मा जाधव यांची वाटचाल वेगळी ठरली. शाळेत नेहमीच हुशार असलेल्या रेश्माच्या वडिलांचा व्यवसाय, आर्थिक निर्णयांतील फसगत आणि अनिश्चित नियोजनामुळे बंद पडला. त्या काळात कुटुंबाने आर्थिक चढउतार जवळून अनुभवले आणि हाच अनुभव पुढे तिच्या व्यावसायिक दृष्टिकोनाचा पाया ठरला.
रेश्मा सांगतात, वडिलांच्या व्यवसायातील कडवट अनुभवांनी मला एक अमूल्य धडा दिला. कॅश फ्लो मॅनॅजमेंट, फायनान्स म्हणजे केवळ हिशेब किंवा कायद्याचं पालन नव्हे, तर ते व्यवसायाला दिशा आणि दृष्टिकोन देणारं शक्तिशाली साधन आहे. व्यवसायात आर्थिक निर्णय चुकले तर त्याची झळ केवळ व्यवसायाच्या मालकालाच नव्हे, तर कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबियांनादेखील सोसावी लागते म्हणून योग्य निर्णय घेणं अत्यंत आवश्यक असतं.
याच जाणीवेतून जन्म झाला ‘चार्टर्ड अकाउंटंट रेश्मा आर. जाधव अँड कंपनी’ या फर्मचा; जी केवळ आकडे मोजत नाही, तर कित्येक व्यवसायांना योग्य दिशा आणि प्रगतीचे पंख देते. रेश्मा या जवाहर नवोदय विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी. शैक्षणिक आव्हानांना तोंड देत त्यांनी स्वत:च आपला मार्ग तयार केला.
२०१७ साली चार्टर्ड अकाउंटंटची पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुंबई व हैदराबादमध्ये अनेक प्रतिष्ठित कॉर्पोरेट क्लायंट्ससोबत काम केलं. कंपनी फायनान्स, फंड मॅनेजमेंट आणि स्ट्रॅटेजिक ग्रोथ या क्षेत्रात त्यांनी घडवलेली कौशल्ये आज त्यांच्या सल्लागार कार्याची ओळख बनली आहेत.
आपल्या कॉर्पोरेट अनुभवातून त्यांनी पाहिलं की योग्य फायनान्शियल स्ट्रॅटेजी आणि निर्णयक्षमता हेच व्यवसायवाढीचं खर्या अर्थानं इंजिन आहे. म्हणूनच त्यांनी इन्कम टॅक्स आणि जीएसटीच्या पलीकडे जाऊन बिझनेस स्ट्रॅटेजी, फायनान्शियल प्लॅनिंग आणि ऑटोमेशन सल्लामसलत यावर भर दिला. आज त्यांच्या फर्मचे क्लायंट्स देशभर आहेत आणि बहुतांश सेवा त्या ऑनलाइन पद्धतीने देतात.
फायनान्स म्हणजे आत्मविश्वासाने निर्णय घेण्याची कला
रेश्मा सांगतात, अनेक उद्योजकांना आपल्या क्षेत्राचं तांत्रिक ज्ञान उत्तम असतं, पण फायनान्शियल निर्णय घेताना आत्मविश्वास नसतो. त्यांच्या सल्ल्यामुळे कोरोना काळात अनेक व्यवसाय पुन्हा उभे राहिले, कारण त्यांनी फक्त आकडे नाही, तर त्यामागचं विचारमूल्य समजावून दिलं.
आजही अनेक उद्योजक अकाउंटिंग यालाच फायनान्स समजतात. आपण व्यवसायातील व्यवहारांचे टिपण करतो. त्यावर आर्थिक पत्रके, प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार होते, हा झाला अकाउंटचा पार्ट, यानंतर खरी सुरुवात होते फायनान्स आणि स्ट्रॅटेजिक डिसिजनला आणि इथेच सुरू होते व्यवसायाची खरी प्रगती!
तुमचा दृष्टिकोन बदलला, की व्यवसायाची दिशा आपोआप बदलते.रेश्मा यांच्या फर्मचं काम केवळ कन्सल्टिंग नाही, तर फायनान्सविषयक विचारांची पुनर्रचना करणं हे आहे. त्यांचा ठाम विश्वास आहे की कोणत्याही समस्येला एकच उत्तर योग्य नसतं; योग्य दृष्टिकोन शोधणं हेच खर्या अर्थानं नेतृत्वाचं लक्षण आहे.
त्यांच्या फर्ममध्ये प्रत्येक व्यवसायासाठी बिझनेस हेल्थ चेकअप केलं जातं. दर तीन महिन्यांनी फायनान्शियल रिव्ह्यू, डॅशबोर्ड विश्लेषण, प्रॉडक्ट प्रॉफिटॅबिलिटी आणि सुधारणा यावर सखोल चर्चा होते.
कोणता क्लायंट फायदेशीर आहे, कोणत्या प्रॉडक्टला जास्त मार्जिन आहे, कुठे खर्च कमी करता येतो, असे स्ट्रॅटेजिक निर्णय घ्यायला त्या मदत करतात; जे व्यवसायाला नव्या उंचीवर नेण्यास फायदेशीर ठरतात. रेश्मा म्हणतात, छोटे छोटे बदलसुद्धा व्यवसायाच्या वाढीचा प्रवाह बदलू शकतात.
स्टार्टअप्सना त्या स्ट्रॅटेजिक कन्सल्टिंग देतात. त्यांनी एक उदाहरण सांगितलं. एका क्लायंटला व्हेंचर फंडिंग हवं होतं, पण आम्ही त्याला फ्रेंचायझी मॉडेल सुचवलं. परिणामी त्याने सस्टेनेबल सेल्स सिस्टीम उभी केली आणि रोजगारनिर्मितीही वाढवली. हा दृष्टिकोनाचा फरक होता.
📘 ‘स्मार्ट उद्योजक’ मासिकाचे वर्गणीदार व्हा
उद्योजकता, व्यवसाय मार्गदर्शन आणि लोकोपयोगी माहिती — थेट घरपोच मिळवा.
६ महिने : ₹४०० । १ वर्ष : ₹८०० । ३ वर्षे : ₹२,०००
👉 आजच वर्गणीदार व्हा!
लघुउद्योग क्षेत्रात काम करताना त्यांना जाणवलं की आर्थिक अनभिज्ञता ही सर्वात मोठी समस्या आहे. अनेकजण बॅलन्सशीट समजून घेत नाहीत. आकडे लपवतात आणि फायनान्स म्हणजे फक्त टॅक्स भरणं असं गृहीत धरतात.
रेश्मा म्हणतात, आपल्या अकाउंट बुकमध्येच आपल्या व्यवसायाचं भविष्य दडलं आहे. त्याचं वाचन शिकायला हवं. त्यांच्या निरीक्षणानुसार, टिअर-टू, टिअर-थ्री शहरांतील अनेक व्यावसायिक अजूनही बँकेशी संवाद साधायला घाबरतात. तंत्रज्ञानापासून दुर राहतात. त्या सांगतात, फायनान्शियल लिव्हरेजचा वापर अजूनही कमी आहे. पैसा ‘खेळवता’ आला पाहिजे. जोखीम घेणं आणि कमाईची लाज न बाळगणं, हाच व्यवसायवाढीचा खरा मंत्र आहे.
कुटुंब – यशाचं पहिलं भांडवल
मुलगी शिकवून काय होणार? असे प्रश्न विचारणार्या समाजात माझ्या आई-वडिलांचा शिक्षणाला ठाम पाठिंबा होता, तसंच लग्नानंतर सासरकडच्यांनी माझ्या कामावर विश्वास ठेवला, हेच माझं सर्वात मोठं भांडवल आहे, असं रेश्मा अभिमानाने सांगतात. रेश्मा जाधव यांचं यश म्हणजे एका कुटुंबाची जिद्द आणि एका पिढीचा दृष्टिकोन बदलण्याची कहाणी आहे.
आकड्यांच्या पलीकडचं गणित
रेश्मा यांच्या सल्ल्यामुळे आज अनेक छोटे व्यावसायिक मोठे उद्योजक बनले आहेत. पहिला क्लायंट जेव्हा दोन लाखांच्या कर्जासाठी सल्ला घ्यायला आला होता, तेव्हा त्याच्याकडे आत्मविश्वास नव्हता, पण योग्य मार्गदर्शनानंतर त्याचा टर्नओव्हर कोटींमध्ये आहे.
रेश्मा म्हणतात, कधी कधी वाटतं माझ्या वडिलांना त्यांच्या काळात असा सल्लागार भेटला असता, तर आमचं आयुष्य वेगळं असतं. म्हणूनच आता प्रत्येक उद्योजकाचं स्वप्न पूर्ण करणं हेच माझं ध्येय आहे.
आज देशाची अर्थव्यवस्था वेगाने बदलतेय, टेक्नॉलॉजी आणि एआय नव्या संधी निर्माण करत आहेत. रेश्मा यांच्या मते, आजचं युग म्हणजे संधींचा समुद्र आहे. फक्त योग्य दृष्टिकोन आणि आर्थिक स्पष्टता असेल तर कोणताही व्यवसाय उभा राहू शकतो. कारण फायनान्स फक्त आकड्यांचं गणित नाही, तो विचारांचा दृष्टिकोन आहे.
संपर्क : 8177922977



