Advertisement
उद्योग कथा

पत्रकारितेच्या माध्यमातून उद्योगाकडे वाटचाल करीत असलेले गौतम गवई

‘स्मार्ट उद्योजक’ WhatsApp आवृत्ती शुभारंभ ऑफर
WhatsApp द्वारे संपूर्ण ‘स्मार्ट उद्योजक’ मासिक वर्षभर मिळवा फक्त रु. ६० मध्ये : http://imojo.in/2eucnd

घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती, मोलमजुरी करून खायचे, अशा स्थितीत रोजचे काम मिळाले तर सोन्याहून पिवळे झाल्यासारखे वाटायचे. अशा त्या परिस्थितीत लहान वयात वडिलांसोबत खदानावर काम करून गौतमने बीएपर्यंत शिक्षण घेतले. शिक्षण घेता घेता सामाजिक विषमतेमुळे जीवनात कसे संघर्ष करावे लागतात, चटके बसलेल्या समाजाला जागृत करायचं असेल, त्यांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर प्रसार माध्यमांचा आधार घेतला पाहिजे, हे ओळखून गौतम गवई यांनी पत्रकारितेची निवड केली. २००१ पासून विदर्भातील अग्रेसर दैनिक म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘देशोन्नती’, ‘जनमाध्यम’ या नामांकित दैनिकांमधून मुक्त पत्रकार म्हणून पत्रकारितेला सुरुवात केली. दरम्यान दैनिक ‘सम्राट’ मधून भंडारा जिल्ह्यातील खैरलांजीमधील अमानुष हत्याकांडाचे वृत्तांकन केल्यानंतर त्यांनी विदर्भातील अनेक प्रश्नांना वाचा फोडायचे काम या माध्यमातून केले.

मुंबईत पदार्पण केल्यानंतर गवई यांनी मुंबईतील ‘महानायक’ या दैनिकासाठी मंत्रालय विधिमंडळ प्रतिनिधी म्हणून काम करायला सुरुवात केली. हे करीत असताना मागासवर्गीयांना उद्योजक बनविण्याच्या शासकीय योजना आल्यानंतर त्या योजनांचा अभ्यास करून मागास प्रवर्गाच्या उन्नतीच्या योजनांचे प्रकल्प हाती घेऊन आपणही उद्योजक बनावे, असे स्वप्न त्यांनी उराशी बागळून तशी पावले उचलण्यास सुरुवात केली. या योजना काय आहेत, त्याचा लाभ कसा घेता येईल, याचा साकल्याने विचार करून गौतम गवई यांनी मंगला मागासवर्गीय औद्योगिक संस्था मर्यादित खामगाव, जिल्हा बुलढाणा या संस्थेची नोंदणी केली. संस्थेच्या वतीने शुद्ध पेय जलनिर्मिती उद्योग उभारणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आणि शासनमान्यता मिळवून प्रकल्प सुरू केला.

‘स्मार्ट उद्योजक’चे सर्व अंक (एकूण ३४ अंक) डाउनलोड करा फक्त रु. ३०० मध्ये : http://imojo.in/ei26fd

अनेक मित्रांच्या लाख मोलाच्या सहकार्याने अथक प्रवास करीत तो टप्पा पार केल्यानंतर गवई यांनी खामगावसारख्या छोट्या शहरात कोट्यवधी रुपयांचा बिलोवी पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर प्रकल्प उभा केला. आज बुलढाणा, अकोला आणि आजूबाजूच्या शहरांत बिलोवी या पेय जलास मोठ्या ब्रॅण्डेड कंपन्या बाजारात असताना मोठा प्रतिसाद मिळतो आहे. दर्जा सिद्ध करून बिलोवी पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर ग्राहकांच्या पसंतीस उतरल्याचे गौतम गवई अभिमानाने सांगतात. लवकरच हा ब्रॅण्ड राज्यभर नावारूपाला येईल, असा विश्वासही ते व्यक्त करतात. याकरिता आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असल्याचे ते सांगतात.

Smart Udyojak | e-Magazines | All Issues

गवई या एकाच व्यवसायावर समाधान मानत बसले नाहीत. पहिला उद्योग सुरू झाल्यानंतर तो यशस्वी झाल्यानंतर त्यांनी जैविक कोळसा उत्पादनावर भर देऊन तोही प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पामुळे या परिसरातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळाला. तर यामधून शेतकरी बांधवांना दिलासा देणारा हा प्रकल्प आहे. कमी सिंचन क्षमता व पर्जन्यमान असलेल्या भागातील पीक काढल्यानंतर जो नको असलेला भाग तुरट्या परट्या कुटान असा रॉ, वेस्ट कचरा शेतकरी शेतातच जाळून टाकतात, त्याचा काही फायदा शेतकर्‍याला होत नाही.

असा कचरा खरेदी करून त्यापासून जैविक कोळसा निर्माण करणारा प्रकल्प गवई यांनी सुरू केला. हा जैविक कोळसा औद्योगिक बाजारात ब्रिक्वेट म्हणून ओळखला जातो. दगडी कोळशाला पर्याय म्हणून ब्रिक्वेट बॉयलर कारखान्यात जळाऊ म्हणून वापरला जातो. याचा उपयोग ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी गृहिणी वापरतात. या कोळशामुळे पर्यावरणाची हानी होत नाही. तसेच शेतकर्‍यालाही आर्थिक फायदा होतो. राज्यात हजारो कोटी रुपयांची उलाढाल असलेला हा व्यवसाय आहे. या क्षेत्रात नुकतेच गवई यांच्या संस्थेने आपले स्थान पक्के केले आहे.

अशा प्रकारे गौतम गवई पत्रकारितेच्या माध्यमातून उद्योगाकडे वाटचाल करीत आहेत. समाजातील उपेक्षित वर्गासाठी अजून बरंच काही करायचेय असा आशावाद गौतम गवई यांनी व्यक्त केला. अशा होतकरू युवकाच्या पुढील वाटचालीस हार्दिक सदिच्छा.

– संजय बोपेगावकर
(सौजन्य : महान्यूज)

आपण उद्योजक असाल तर 'उद्योजक सूची'मध्ये आपली नोंद करण्यासाठी येथे क्लिक करा.

Optimization WordPress Plugins & Solutions by W3 EDGE
Help-Desk
%d bloggers like this: