'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची मुलाखत प्रसिद्ध करायची असल्यास, या लिंकवर क्लिक करा 👉 https://wa.link/p11pqe

कोरोना काळात अनेकांच्या आयुष्यात मोठे बदल झाले. जागतिक महामारीत अनेकांनी आपला रोजगार गमावला व काहींनी आपले आप्तजन गमावले. पुण्यातील लोहगाव येथील कविता वीर या शिक्षिका. वीस वर्षे नोकरी केली आणि कोरोना काळात अचानक नोकरी गेली.
तीन मुले, त्यांचे शिक्षण, भविष्य सगळेच आता फक्त त्यांच्या नवर्याच्या एकट्याच्या खांद्यावर आले. एकाच्या नोकरीवर घर चालवणे म्हणजे तारेवरची कसरत. पण म्हणतात ना संकटात संधी दडलेली असते. ती ओळखावी लागते. कविता यांनीही ती ओळखली आणि उभा केला ‘कविप्रभा’ हा मसाल्याचा ब्रँड.
अचानक नोकरी गेली त्यामुळे खूप मोठ आव्हान उभे ठाकले होते. मग आता करायचे काय या विवंचनेत असताना असेच एकदा एक नातेवाईक घरी आले. मुंबईहून आलेल्या शामल माने यांना कविताताईंच्या हातचे जेवण आवडले. भाजीची चव अप्रतिम आहे मग बनवण्याची पद्धत, मसाले याविषयी गप्पा झाल्या.
स्वयंपाकात वापरलेला मसाला कविताताईंनी स्वतः बनवलाय हे कळल्यावर त्यांनी मलाही मसाला बनवून द्याल का अशी विचारणा केली. ताईंनी मग लगेच त्यांना मसाला बनवून दिला. या मसाल्यात बनवलेल्या भाज्या मुंबईतील नातेवाईकांच्या ऑफिसमधील सहकार्यांनाही आवडल्या. मग काय ताईंना ऑर्डर्स आल्या.
त्या वेळी त्यांना फक्त एकच प्रकारचा सोलापूरी काळा मसाला बनवता यायचा. लोकांना तो आवडला मग मात्र आपण मसाले व्यवसाय करूया असे कविता यांनी पक्के केले. असा सुरू झाला मसाला व्यवसाय.
सुरुवातीला सगळेच विस्कळीत होते. आव्हाने बरीच होती, कारण एखादा मसाला बनवणे आणि व्यवसाय करणे यात खूप फरक होता. कारण मराठी माणूस आणि मानसिकता यांचा व्यवसायाबद्दलचा दृष्टिकोन, पण एकदा मनाशी निर्धार पक्का केला.
शिक्षकी अंगात भिनलेल्या कविताताईंनी नव्या जोमाने नवीन गोष्टी शिकायला सुरुवात केली. विविध मसाले बनवणे, त्याचे पॅकेजिंग, फूड टेस्टिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग हे सारे हळूहळू त्यांनी आत्मसात केले. काळा मसाला, कांदा लसूण मसाला, बिर्याणी मसाला, पावभाजी मसाला, चहा मसाला असे आता एकोणीस प्रकारचे मसाले कविताताई बनवतात.
एका मसाल्यापासून १९ मसाल्यापर्यंतची ही झेप अवघ्या तीन वर्षांतली आहे. ‘कविप्रभा’चा चहा मसाला खूप जास्त मागणी असलेला मसाला आहे. कोरोना काळात आणि आजही या मसाल्याला चांगली मागणी आहे. मसाले उद्योग म्हटल्यावर उत्पादन आले. त्यासाठी जागा हवी. मग कविताताईंनी घरातूनच या व्यवसायाची सुरुवात केली.
घरातील जागेचा सुयोग्य वापर आपल्या कामासाठी करून त्यासाठी गच्चीमध्ये शेड तयार केली. घरातील एक खोली ही स्टोअर रूम म्हणून स्वतंत्रपणे वापरली जाते. सध्या त्यांच्याकडे चार मशिनरी आहेत. चांगल्या प्रतीचा माल, गरम मसाला मार्केटमधून त्या खरेदी करतात मग त्याची पुढची प्रक्रिया जसे मिरच्यांना उन्हे दाखवणे, निवडणे, गरम मसाले निवडणे, हे सारे त्या जातीने पाहतात.
अगदी मसाला किती आणि कसा भाजतो यावरही मसाल्याची चव ठरते. सध्या त्यांच्यासोबत एक मैत्रीणवजा मदतनीसवजा ताई आहेत. याशिवाय संपूर्ण कुटुंब म्हणजे मुले, पती हे त्यांना जमेल तशी मदत करतात. सुरुवातीला पॉलिथिनच्या छोट्या पिशव्यांमधून मसाले विकायला सुरुवात केली.
मग हळूहळू, स्टँडी पाउच आणि आता बॉक्स पॅकेजिंग केले जाते. याव्यतिरिक्त पुण्यातील दोराबजी मॉल, डी-मार्ट, अमेझॉन अशा प्लॅटफॉर्मवर ‘कविप्रभा’ मसाले उपलब्ध आहेत. याशिवाय माऊथ पब्लिसिटीनेसुद्धा ग्राहक जोडलेला आहे. त्या प्रदर्शनांमध्येसुद्धा भाग घेतात.
व्यवसाय करताना दररोज नव्या आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यातील एक आहे गुंतवणूक. पण आज व्यवसायातला पैसा परत त्यातच गुंतवून व्यवसाय अजून बळकट करण्यावर त्यांचा भर आहे. यासाठी लागणारी सारी सर्टिफिकेशन, जीएसटी, एफएसएसएआय, बारकोड, एक्सपोर्ट-इम्पोर्ट लायसेन्स अशा सगळ्या आवश्यक बाबी पूर्ण केलेल्या आहेत. ट्रेडमार्क रजिस्टर केलेला आहे जेणेकरून मोठी झेप घेताना कोणताही अडथळा येऊ नये.
प्रत्येक उद्योजक असायलाच हवा 'स्मार्ट उद्योजक - प्राईम मेंबर'!
‘कविप्रभा’चे एक वैशिष्ट्य म्हणजे यात कोणतेही प्रीझर्वेटिव्ह वापरले जात नाहीत. आजच्या काळात केवळ मालाची उत्कृष्ट गुणवत्ताच नाही तर त्याचे पॅकेजिंगसुद्धा अत्यंत गरजेचे आहे तसे असेल तरच ग्राहक ओढला जातो. याशिवाय सोशल मीडियाचासुद्धा चांगला वापर त्या उद्योगवाढीसाठी करतात.
भविष्यात कविता यांना ‘कविप्रभा’ मसाले जगभरात पोहचवायचे आहेत. त्यातच मसाल्यांच्या गुणवत्तेने प्रभावित होऊन कल्याण, मुंबई येथील रेखा बाविस्कर यांच्या ‘करिअर लाईट हाऊस’ संस्थेने एकत्र व्यवसाय करण्याची इच्छा व्यक्त केली आणि पूर्णत्वास नेली. आज ही नारीशक्ती एकत्रितपणे या व्यवसायात अग्रेसर होताना दिसत आहे.
सध्या रेखा यांच्या माध्यमातून मुंबईला साडेतीनशे किलो दर महिन्याला ऑर्डर मिळाली आहे. आता मुंबई, महाबळेश्वर, पुणे इथून मोठ्या ऑर्डर चालू आहेत. शिवाय अमेझॉनसारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्ममुळे जगभराची कवाडे ‘कविप्रभा’साठी उघडली आहेत. संकटात संधी शोधून कष्टाच्या जोरावर एक ब्रँड उभारणार्या या नारीशक्तीला ‘स्मार्ट उद्योजक’कडून भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा.
संपर्क : 9822966398

