एक रिक्षावाला आज करतोय शंभर कोटींची उलाढाल

तुझ्या हाती सुवर्णाचे चढावे मोल मातीला, हिर्‍याचे तेजही तैसे चढावे गारगोटीला ।
विषारी तीक्ष्ण काट्यांची तुझ्या स्पर्शे फुले होती, ग्रहांचे साह्य शूराला यशश्री पायीची दासी ॥

अशी कवी यशवंत यांची एक कविता आहे. काही उद्योजकांच्या मुलाखती घेताना ती कविता जणू मूर्तीमंत स्वरूप घेऊन साकार झालेली दिसते. बोरीवलीच्या ‘भागिरथी ट्रान्स कॉर्पो’चे संस्थापक संचालक मनोहर गोविंद सकपाळ हे अशाच विरळा उद्योजकांपैकी एक.

ज्या परिस्थितीतून त्यांनी आपल्या उद्योगगंगोत्रीची सुरुवात केली आणि आज तिने धारण केलेले विशाल स्वरुप पाहून आश्चर्याने थक्‍क व्हायला होते. या विस्तारामागे उभ्या असलेल्या मनोहर सकपाळ या भगीरथाविषयी जाणून घ्यायला मन उत्सुक होते.

वास्तविक उद्योग-व्यवसायाची कोणतीही पार्श्वभूमी मनोहर यांना लाभलेली नाही. त्यांचे वडील गोविंद हे मराठा रेजिमेंटमध्ये सैनिक होते. दुसर्‍या महायुद्धातील कामगिरीबद्दल ब्रिटीश सरकारने त्यांचा गौरव केला होता. निवृत्तीनंतर त्यांनी बोरीवलीतील केबल कॉर्पोरेशनमध्ये सुरक्षारक्षकाची नोकरी पत्करली.

१६ मार्च १९६५ रोजी मनोहर यांचा जन्म झाला. पाच भावंडांच्या कुटुंबात परिस्थितीचे चटके त्यांना सोसावे लागले. मुंबई महापालिकेच्या शाळेत ते शिकले. तेव्हा करिअरचे फारसे ऑप्शन्स नव्हते. बारावीनंतर आयटीआयमधून बॉयलर अटेंडंटचा कोर्स केला. हा कोर्स करीत असतानाच घराला आधार देण्यासाठी ते पार्ट टाईम दुसर्‍याची रिक्षा चालवायचे. येथेच त्यांच्या मनात व्यवसायाचे बीज रुजले.

त्यांनी स्वत:ची रिक्षा घेतली. पुढे अजून एक रिक्षा घेतली. मालवाहू टेंपोही घेतला. ते रोज मुंबई-गोवा अशी मालवाहतूक करू लागले. पुढे एका टेंपोचे त्यांनी दोन टेंपो केले. नंतर प्रवासी बस घेतली व मुंबई-चिपळूण डेली बससेवा सुरू केली. तिला उत्तम प्रतिसाद मिळू लागला. दरम्यान त्यांचे लग्‍न झाले.

मराठी मानसिकतेनुसार घरच्यांच्या आग्रहाखातर त्यांनी केबल कॉर्पोरेशनमध्ये तेरा वर्षे नोकरी केली. तेव्हा ते सुटीच्या दिवशी बस चालवायचेच. एक दिवस नोकरीला रामराम ठोकून ते पूर्णवेळ व्यवसायात उतरले. प्रवासी वाहतूक, बससेवा या व्यवसायाचा त्यांना चांगलाच अनुभव त्यांच्या गाठीशी जमा झाला होता. त्या ज्ञानाच्या व अनुभवाच्या आधारेच त्यांनी आपल्या उद्योगविश्वाचा विस्तार केला.

कोकण रेल्वे सुरू झाल्यावर त्यांच्या प्रवासी बससेवेच्या व्यवसायात मंदी आली. या संकटाला संधी समजून त्यांनी आपल्या उद्योगाचा रोख बदलला. त्याच दरम्यान बीपीओ, कॉल सेंटर्सचे पर्व सुरू झाले होते. शासकीय नियमांनुसार बीपीओंना आपल्या कर्मचार्‍यांना बसने नेण्या-आणण्याची सोय करावी लागते. २००१ च्या दरम्यान त्यांनी या नव्या व्यावसायिक दालनात पाऊल टाकले.


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्यायची या त्यांच्या धोरणानुसार त्यांनी ‘भगिरथी ट्रान्स कॉर्पो प्रा. लि.’ या नावाने असंख्य कॉल सेंटर्सना बस आणि कार सेवा देण्यास सुरुवात केली. नंतर त्यांनी कधी मागे वळून बघितलेच नाही. आजमितीला त्यांच्याकडे सहाशेहून अधिक बसेस व ३५० पेक्षा जास्त कार्स आहेत.

निरनिराळ्या महापालिका आपल्या नागरिकांना बससेवा पुरवतात. मात्र त्या महापालिकेतर्फेच चालवल्या जातात. २०१२ साली वसई-विरार या महापालिकेने अशा तर्‍हेची सेवा खाजगी कंत्राटदारामार्फत सुरू करण्याचा निर्णय घेतला. अशा तर्‍हेचा प्रयोग करणारी ती देशातील पहिली महापालिका होती व वर्षभराच्या कडक छाननीनंतर हे काम ‘भगिरथी ट्रान्सकॉर्पो’ला मिळाले.

आजमितीला ‘भगिरथी ट्रान्स कॉर्पो’च्या तिथे १५० बसेस चालतात व १ लाख प्रवासी त्याचा लाभ घेतात. ‘भगिरथी’तर्फे प्रवाशांना मोफत वाय-फाय, एफएम, डायलिसीसच्या रुग्णांसाठी सवलत वगैरे अनेक सुविधा पुरवल्या जातात. याच्याही पुढे महाराष्ट्र शासनाच्या शिवशाही बसेसदेखील भगिरथीतर्फे चालवल्या जातात. आज भगिरथीचा टर्नओव्हर १०० कोटींच्या पुढे आहे.

मनोहर सकपाळ हे सामाजिक जाणीव जपणारे उद्योजक आहेत. आपले मूळ गाव रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील साखर येथे त्यांनी ग्रामविकासाची खूप कामे केली आहेत. बंधारे, शेततळी बांधली आहेत. शेवगा लागवड, जलशिवार योजनेअंतर्गत गावात आता रोजगार निर्माण होऊन गावातून बाहेर गेलेले तरुण आता गावाकडे परतू लागलेत. ‘वसिष्ठ अ‍ॅग्रो न्युट्री प्रॉडक्टस् प्रा. लि.’ ही कंपनी स्थापन करून त्यांनी ग्रामोन्नतीच्या विविध योजना आखल्या आहेत.

मनोहर सकपाळ यांनी कोणतीही पार्श्वभूमी नसताना शुन्यातून विश्व निर्माण केले. त्यात त्यांच्या पत्नी मनाली यांचा मोलाची साथ आहे. त्यांची पुढली पिढीही आता उद्योजक झाली आहे. पुत्र सागर वेलिंगकर इन्स्टूटुटमधून फॅमिली बिझनेस या विषयात पीजी डिप्‍लोमा करून व मुलगी सायली सकपाळ ‘भगिरथी’ची धुरा सांभाळत आहे.

फिशरीज क्षेत्रातील तज्ज्ञ असलेला त्यांचा पुतण्या रुपेश याने ‘भगिरथी’च्या कार्यालयाशेजारी टनेल इफेक्ट सीफूड स्पेशल रेस्टॉरंट सुरू केले आहे. या सगळ्या विस्तारामागे मनोहर यांची व्यावसायिक दृष्टी आणि प्रेरणा आहे.

संपर्क : मनोहर सकपाळ
9004608401, 022-28979898


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?