तळागाळातून काम करून उच्चपदी गेलेल्या मान्यवरांचा उल्लेख करताना त्यांनी ग्रासरुटवर काम केलं असं म्हटलं जातं. ज्यांनी ग्रास म्हणजे शब्दश: गवत कापून विकले, भाजी विकली आणि मेहनतीने सरपंच व ‘श्री संत नागेबाबा मल्टिस्टेट को. ऑप. सोसायटी’चे संस्थापक झाले, त्या कडुभाऊ छगन काळे यांची जीवनकथाही रोमहर्षक आहे.
कडूभाऊ काळेंची कर्मभूमी आहे अहमदनगर जिल्ह्यातील भेंडे बुद्रुक गाव. कडुभाऊंचा जन्म १९६९ साली याच गावी झाला. भेंडे गावात नागेबाबा म्हणून संत होऊन गेलेले. माऊलींमुळे घरात सगळे भक्तिमार्गी, वारकरी संप्रदायातले. थोडक्यात वडील, आजी सर्व सरळमार्गी संस्कारी. वडील शेती करायचे. धान्य आणि घास, गवत, भाजी बाजारात नेऊन विकायचे. बालपण सामान्य स्थितीत गेले.
आजीची त्यांच्यावर माया होती. आजीबरोबर भाजी, गवत विकायला जायचे. आजी घेणार्यापेक्षा देणार्या पंथातली होती. मेथीची गड्डीसुद्धा मोठी बांधायची. गिर्हाईकाला अजून काय मिरच्या, कडीपत्ता देता येईल ते बघायची. मागू नये देत जावं म्हणायची. एक दाणा पेरला तर तो हजार दाण्याच कणीस देतो म्हणायची. हीच शिकवण कडुभाऊनी आचरणात आणली.
आजीबरोबर बाजारात भाजी, गवत विकण्याबरोबरच कडुभाऊ वडिलांना शेतामध्ये अंग मेहनत करायला मदत करायचे. ते नांगरणी, कोळपणी अशी सर्व कामे करायचे. म्हणजेच ग्राउंड लेव्हलवर राहून नंतर प्रगतीपथावर जाण्याची ही पूर्वतयारी होती.
भविष्यात ते विविध पदांवर काम करत असले तरी आजही त्यांचे पाय जमिनीवरच आहेत. वडील शेतकरी असले तरी मुलांच्या शिक्षणाबाबत मात्र आग्रही होते तसेच त्यांच्या आजींचाही मुलांच्या शिक्षणाला पाठिंबाच होता. त्यामुळे कडुभाऊंचे प्राथमिक शिक्षण व दहावीपर्यंतचे शिक्षण भेंडे बुद्रुक येथील शाळेत झाले.
त्यानंतर त्यांनी आयटीआयचा वायरमनचा कोर्स केला. गावामध्ये कारखाना असल्याने त्या ठिकाणी इलेक्ट्रिशियनची नोकरी मिळेल या आशेने त्यांनी तो कोर्स केला होता. प्रत्यक्षात कारखान्यात वारंवार चकरा मारूनदेखील तिथे नोकरी मिळाली नाही.
शेवटी वॉचमनची मिळाली तरी चालेल पण कारखान्यात नोकरी द्या अशा विनवण्या केल्या तरी काही उपयोग झाला नाही. त्यानंतर औरंगाबाद, जालना, बीड अशी कुठे कुठे भ्रमंती केली, परंतु जो कोर्स झाला त्याची तर राहोच दुसरी कुठलीच नोकरी मिळेना.
फिरत फिरत पुण्याला पवनानगर जवळ आले. तिथे एका पोल्ट्री फार्ममध्ये इलेक्ट्रिशियनची नोकरी मिळाली. फार्ममध्ये लाईटची व्यवस्था त्यांना बघायची होती. मात्र वेगळ्याच कारणामुळे ती नोकरी सोडावी लागली. हे कारण म्हणजे घरी वारकरी सांप्रदाय आणि माळकरी असल्यामुळे घरात कुठल्याही प्रकारे मास, मटन, कोंबडी, अंडी काही शिजलेलं नव्हतं सर्वजण शाकाहारी होते.
मांसाहारी वस्तू यांनी दुरूनसुद्धा पाहिल्या नव्हत्या त्यामुळे पोल्ट्री फार्मवर सतत कोंबड्यांचा वास यायचा तो वास काही कडुभाऊंना सहन झाला नाही. त्यांना उलट्या होऊ लागल्या. नको त्या कोंबड्या आणि नको ती नोकरी असं म्हणून पंधरा दिवसांत ते माघारी आले. घरची शेती असल्यामुळे त्यात काम करत असल्याने बेकार बसायचा प्रश्न नव्हता.
एका माणसाने शेतातली लाईट बिघडली म्हणून बोलावलं. लाईट चालू केली. त्यानं दहा रुपये दिले. ती नोट ही पहिली कमाई. ती हातात घेताना स्वकमाईच समाधान होतं. पुढे याच हाताच्या स्पर्शाने दहापासून दोन हजार कोटींचा प्रवास होणार होता. बाकी काही नाही तरी त्या दहा रुपयांनी कडुभाऊंना स्वतंत्रपणे धंदा करायची स्फूर्ती दिली. अर्थात नुसती स्फुर्ती येऊन काही उपयोग नसतो. त्याला आर्थिक पाठबळ लागतंच.
त्याचवेळी प्रधानमंत्री सुशिक्षित बेकार कर्ज योजना आलेली होती. त्या योजनेअंतर्गत कडुभाऊ आणि त्यांच्या काही मित्रांनी कर्जासाठी अर्ज केला. तो अर्ज मंजूर होऊन बँक ऑफ बडोदाकडून त्यांना २५ हजार रुपयांचं कर्ज मंजूर झालं. आता कर्ज मंजूर झालं तरी स्वत:ची काही रक्कम एक चतुर्थांश ज्याला चौथाई म्हणतात, ती भरावी लागते.
ती भरण्यासाठी कडुभाऊंना अनेक मदतीचे हात पुढे आले. त्यात त्यांचे चुलत बंधू होते. सगळ्यांनी मिळून कडुभाऊंचा शेअर भरला आणि २५ हजार कर्ज हातात आलं. हा धंदा होता मंडप कॉन्ट्रॅक्टरचा. म्हणजे लग्नकार्य वास्तुशांती याच्यासाठी मंडप उभारून द्यायचा.
त्याच्या आतलं लाईट, पंखे, स्पीकरचं फिटिंग करून द्यायचं असा दुहेरी धंदा होता. सुदैवानं लगेचच त्यांना त्यांच्याच एका शेजार्यांने वास्तुशांतीच कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि व्यवसायाचा श्री गणेशा झाला. डिसेंबर १९८९ मध्ये हा व्यवसाय सुरू झाला. गावात जागरण, गोंधळ असायचा, तिथे स्पीकर लावण्याची कामं, मंडपाची कामं असं काहीकाही करत राहिले, परंतु हे सगळं शेती सांभाळून केलं जात असे.
त्यामुळे काम मिळवण्यासाठी जे फिक्स ठिकाण लागतं ते कडुभाऊंकडे नव्हतं. आता त्यांनी धंद्यासाठी फिक्स जागा मिळवायची ठरवलं. आता एकतर दुकान बांधणे किंवा भाड्याने घेणे, पैशा अभावी हे शक्य नव्हतं. आधीच कर्ज असताना नवीन कोण देणार.
शेवटी कडुभाऊंनी डेअरिंग केलं आणि रस्त्याच्याकडेला बिनधास्त टपरी उभी केली. काय होईल ते होईल. हे दुकान त्यांनी श्रीकृष्ण मंडप आणि इलेक्ट्रिकल या नावाने चालू केलं ते वर्ष होतं १९९२. त्यावेळीसुद्धा अनेक मित्रांनी मदत केली. लग्नासाठी मंडप भाड्याने देताना ते मुलीच्या आई-वडिलांची तारांबळ बघायचे.
लग्नसमारंभाच्या आनंदापेक्षा मुलीच्या वडिलांच्या चेहर्यावर खर्चाची चिंता जास्त दिसायची. त्यांच्या चेहर्यावरचे भाव ओळखून कडुभाऊ कितीतरी वेळेला स्वत:च्या बिलामध्ये अॅडजेस्टमेंट करायचे. द्या परवडतील तेवढे. हा चांगुलपणा त्यांना पुढे उपयोगी पडला.
माणूस चांगला आहे. प्रामाणिक आहे. हे गुडविल तयार झालं. हे भांडवल पैशापेक्षा मोठं असतं. टपरीच्या दुकानात कामं येवू लागली. कुठं ट्युबलाईट बसव. चॉक बसव. बॅटरीची रिपेअरिंग अशी काम मिळायची.
दरम्यान लग्न झालं होतं. अशातच नागेबाबाची यात्रा आली. भेंडे बुद्रुकमधे श्रावणात नागेबाबाची यात्रा असते. यात्रेचं मंडपाचं काम कडुभाऊ करत असत. एका वर्षी १९९४ ला कमिटी म्हणाली कडुभाऊ यंदा तू कॅशीअर. त्या काळी ५ हजार रुपये वर्गणी जमायची. त्यात पूर्ण यात्रा व्हायची.
कडुभाऊंनी त्या दिवशी कॅश ताब्यात घेतली. आपल्या एका मित्राकडे ठेवली आणि वस्तीवर आले. त्यांची वस्ती जरा तुटक लांब होती. नेमका त्या दिवशी वस्तीवर दरोडा पडला. आजूबाजूच्या सर्व दारांना कड्या लावलेल्या. लाईट घालवलेली. घरं सगळी मातीची त्यामुळे त्यांनी सरळ भिंत फोडून भोक पाडलं आजूबाजूच्या माणसांना जाग आली.
थोडीफार पळापळ झाली त्यात कडुभाऊ बाहेर आले आणि नेमके दरोडेखोरांच्या हाती लागले त्यांनी कडुभाऊंना चांगलंच जायबंदी केलं पोटावर वार झाले. आतडी बाहेर आली. अशा स्थितीत त्यांना श्रीरामपूरला रुग्णालयात भरती केलं डॉक्टर म्हणाले मला तर परिस्थिती चिंताजनक दिसते तरीपण; मी प्रयत्न करतो.
नागेबाबाच्या कृपेने कडुभाऊ बरे झाले आणि यात्रेतसुद्धा सहभागी झाले. ते या प्रसंगाला पुनर्जन्मच समजतात. कडुभाऊंना रुग्णालयात भेटायला येणार्यांची गर्दी अलोट होती. दररोज झुंडीन माणसं यायची. संकटात संधी दडलेली असते ती अशी. या गर्दीचा फायदा लवकरच कडूभाऊंना होणार होता.
कडूभाऊंनी रस्त्यावर अतिक्रमण करून जी टपरी बांधली होती, तशाच बाकीच्यांनी बांधल्या होत्या. काही दिवसांनी ही फाईल शासनाने उघडली. त्या वेळेला कडुभाऊंनी सामुदायिक प्रयत्न करून सर्व टपर्या वाचवल्या. चार-दोन फूट मागे गेल्या, पण एकही टपरी उचलली नाही. तेव्हाच सर्वजण कडुभाऊंना गळ घालू लागले की आपल्याला फंड्स नाहीत. भिशीतले पळून जातात. एक आर्थिक किल्ला उभा करा.
एका हाकेवर ३२० जणांचे बत्तीस हजार रुपये जमले आणि नागेबाबा सहकारी पतसंस्थेचा मुहूर्त झाला. गाव तिथे दोन पाटर्या असतातच तसंच इथेही दुसरी पतसंस्था होती. त्यांचे आक्षेप असणारच होते. हे सगळं निवारण झाल्यावर सहा महिन्यानी रजिस्ट्रेशन झालं आणि संस्था अधिकृतरित्या अस्तित्वात आली.
एका दहा बाय दहाच्या खोलीत टेबल, खुर्ची टाकून तिचं कामकाज सुरू झालं. त्याचवेळी कडुभाऊंनी दुकानासाठी स्वतंत्र जागा घेऊन त्या ठिकाणी बांधकामसुद्धा सुरू केलं. त्यामुळे काही लोकांनी हा संस्थेचे पैसे बांधकामाला वापरेल असा प्रचार सुरू केला, परंतु लोकांनी त्याकडे विशेष लक्ष दिलं नाही.
उलट त्यांना सांगितलं की याच माणसानी आमच्या टपर्या वाचवलेल्या आहेत. पतपेढीच्या कामकाजात कोणत्याच प्रकारचा अडथळा आला नाही व सभासद संख्या उत्तरोत्तर वाढत गेली. सुरुवातीला डेली कलेक्शन २ हजार रुपये होतं. आता एक कोटीचा आकडा ओलांडला आहे.
एक संस्था हातात आली आणि ती सुरळीत चालू आहे हे पाहिल्यावर कडुभाऊंबद्दल ग्रामस्थांच्या अपेक्षा वाढू लागल्या. आता ते म्हणू लागले की संस्था तुम्ही उत्तम चालवता तर गावसुद्धा चालवू शकाल. त्यामुळे आता आपण गावगाडा हाकावा, म्हणजेच गावची जबाबदारी घ्यावी. तुम्ही सरपंच व्हा!
राजकारण करायचं नाही असं कडुभाऊंनी ठरवलेलं होतं. परंतु आग्रहापुढे इलाज नव्हता. ग्रामपंचायतीची निवडणूक ही फारच चुरशीची असते हाणामार्या पळवापळवी, किडनॅपिंग, वाटप सर्वकाही चालू असतं. भेंडे गावात सतरा वॉर्डपैकी तेरा वॉर्ड बिनविरोध झाले, मात्र कडुभाऊंचा वॉर्ड बिनविरोध होईना. त्यानंतर गावकर्यांनी हातापाया पडून, समजावून सांगून उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावले आणि कडुभाऊ बिनविरोध निवडून येऊन सरपंच झाले.
गावचा कारभार हातात आला तशीच गावच्या स्वच्छतेची जबाबदारीसुद्धा आली. त्याच वेळेला ‘संत गाडगेबाबा निर्मल ग्राम हागणदारीमुक्त गाव’ अशी स्पर्धा जाहीर झाली. कडुभाऊंनी निर्धार केला की आपलं गाव हागणदारीमुक्त तर झालंच पाहिजे सोबत निर्मल ग्राम स्पर्धेतसुद्धा नंबर मिळाला पाहिजे.
त्या दृष्टीने सर्वांनी अथक प्रयत्न केले. हागणदारीमुक्त गाव याचा अर्थ गावात शंभर टक्के शौचालय बांधणे आणि गावकर्यांना उघड्यावर संडासला जाऊ न देणे या दुहेरी आघाडीवर लढायचं होतं. शौचालय बांधण्यासाठी ग्रामपंचायतीकडून तसेच सोसायटीकडून अनुदानं देण्यात आली.
ज्या कारखान्यात इलेक्ट्रीशियन, वॉचमनच्या नोकरीसाठी खेटे घातले; त्या कारखान्याने आता सरपंच कडुभाऊंना सहकार्य केलं. उघड्या माळावर जाऊ नये यासाठी प्रबोधन, प्रचार याबरोबरच शाळेतील मुलांना सांगून घरातील डबे-बाटल्या सर्व गायब केले.
त्यामुळे नियम मोडून संडासला जाणार्या गावकर्यांना डबे-बाटल्याच मिळेनात. कडूभाऊ रात्री गस्त घालायचे. शिवाय पहाटे उठून पहारे ठेवायचे. साम, दंड, वाद सगळं व्हायचं पण चोरून संडासला जाण्याच प्रमाण शुन्यावर आलं. यथावकाश निर्णय जाहीर झाला. कष्ट फळाला आले. निर्मलग्राम म्हणून भेंडेगावाची निवड झाली. राष्ट्रपतीं अब्दुल कलाम यांचे हस्ते गौरव झाला.
या उत्कर्ष बिंदुवर असतानाचा वाजत गाजत मिरवणुकीने ग्रामसभेत आले. तोफा, बँजो, फेटे बांधण्याचा कार्यक्रम करून आता गाव तुम्ही सांभाळा. मला संस्थेकडे परत जावू द्या असं सांगून सरपंचपद सोडून दिले. ग्रामस्थांनीही हा निर्णय स्वीकारला.
सरपंचपद सोडल्यावर पतसंस्थेची जबाबदारी होतीच. शाखांची संख्या लिमीट ओलांडून गेली. नवीन शाखा काढायला त्यांना परवानगी मिळेना. आता आहे त्यात खेळा. हे म्हणजे पंख बांधल्यासारखं झालं. त्यांचे जाणकार अभ्यासू मित्र होते. ते म्हणाले मल्टीस्टेट करा. शाखा वाढतात.
मल्टीस्टेटच रजिस्ट्रेशन केलं. आता नवीन नावानं कारभार होणार होता, ते नाव होत ‘श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लिमिटेड अहमदनगर’.
संस्थेच्या शाखा नगर, बीड, संभाजीनगर, पुणे येथे विस्तारल्या आहेत. एक शाखा गुजरातमध्ये आहे. पर्यायाने कडुभाऊ मल्टीस्टेट चेअरमन आहेत. ठेवी आणि कर्जवाटपाबाहेर जावून संस्था वृक्षलागवडीसाठी बिनव्याजी ठेवी घेते आणि व्याजातून झाडे लावते.
अन्नदान योजनेतून गरजूंना मोफत भोजन देण्यात येते. त्यासाठी बिनव्याजी ठेवी घेवून व्याजातून भोजन खर्च केला जातो. मुदत संपली की ठेव परत केली जाते. गोशाळेसाठी मदत केली जाते. श्री संत नागेबाबा मल्टिस्टेट को. ऑप. सोसायटीला आजपर्यंत मिळालेल्या पुरस्कारांची यादी मोठी आहे.
त्यातील झी २४ तास, उडान पुरस्कार, जाणीव पुरस्कार, सह्याद्री कोंदण पुरस्कार, सर्वोत्कृष्ट वित्तीय संस्था हे उल्लेखनीय पुरस्कार आहेत. नुकताच वर्ल्ड रेकॉर्डस् इंडिया व जिनियस फाऊंडेशन यांचे वतीने सहकार क्षेत्रात सन २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये संपूर्ण देशभरात ५७ शाखांद्वारे, वर्षाचे ३६५ दिवस, एका वर्षात ४,३८० तास कार्य करत 6 लाख ग्राहकांना सेवा पुरवून संस्थेची विश्वविक्रमी नोंद करून सन्मानित करण्यात आले आहे.
या सर्व पुरस्कारांपेक्षा आज मितीस अध्यक्षपदापेक्षा ५० लाख समाधानी सभासदांच्या परिवाराचे प्रमुख म्हणवून घेण्यातच कडुभाऊंचा गौरव आहे.
संपर्क : 9552554055
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.