कथा उद्योजकांच्या

आदिवासी क्षेत्रातली ही महिला झाली स्पा इंडस्ट्रीत एक यशस्वी उद्योजिका

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


आयुष्यात विशिष्ट लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवणे व दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर अविरत प्रयत्न करून ते लक्ष्य साध्य करणे, यासाठी ती व्यक्ती मोठ्या शहरातील श्रीमंत, नामवंत व सुशिक्षित घराण्यातील व त्यातही पुरुषच असली पाहिजे, असे नाही, तर ती व्यक्ती एक स्त्रीपण असू शकते.

महाराष्ट्रातील, प्रामुख्याने आदिवासी लोकवस्तीच्या तुलनेने मागास असणार्‍या नंदुरबारमध्ये जन्मलेल्या रेखा चौधरीने आपल्या प्रचंड मेहनतीने, दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर हे आक्रीत करून दाखवले. रेखाने आपले निवडलेले लक्ष्य नुसतेच साध्य केले नाही, तर तिने निवडलेल्या क्षेत्रात यशाचे उत्तुंग शिखर पादाक्रांत केले.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी लग्‍न होऊन सिरपूर नावाच्या गावात स्थायिक झालेल्या रेखाला सासरी आल्यावरही गप्प बसवत नव्हते. जरी प्रारंभीच्या काळात तिच्या उद्योगांना सासरच्या मंडळींचा तितकासा पाठिंबा नव्हता, तरी तिने आपल्या राहत्या घरात विविध छंदवर्ग सुरू केले.

अगदी लोणची, पापड, कुरडया बनवण्यापासून गावातील स्त्रियांना एकत्र आणून गरबा नृत्याचे सामूहिक आयोजन करणे इत्यादी वैविध्यपूर्ण उद्योगांमध्ये स्वत:ला गुंतवून घेतले; नव्हे तर यातूनही वेळ काढून रेखाने धुळे येथून सौंदर्यसाधिकेचा (Beautician) एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला.

या कालावधीमध्ये रेखा दोन कन्यकांची आई झाली; परंतु तिने आपले लक्ष्य व घरच्या जबाबदार्‍या यांचा उत्कृष्ट समतोल राखला व आपल्या दोन्ही मुलींचे संगोपनही आईच्या मायेने केले. सिरपूर येथे सासरी राहत असतानाच रेखाने सौंदर्य प्रसाधने बनवण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता.

मात्र घरच्यांचा पाठिंबा न मिळाल्याने सातत्य राखता आले नव्हते. सौंदर्यसाधिकेचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर तिने आपल्या घरीच सौंदर्य प्रसाधनालय (Beauty Parlour) सुरू केले. या दोन्ही गोष्टींच्या भरभक्कम पायावर रेखाने आपल्या आयुष्याचे लक्ष्य निश्‍चित केले. स्वत:तील सर्जनशीलतेमुळे नुसते सौंदर्य आणि सौंदर्य प्रसाधनांची निर्मिती यावर सीमित न राहता, तिने या दोन्ही गोष्टींना उत्तम प्रकृती राखण्याची जोड दिली.

रेखाला आपल्या दोन्ही मुलींना चांगले शिक्षण मिळावे, असे मनोमन वाटत होते. त्या सिरपूर या छोट्या गावात ते सहजशक्य नव्हते; तसेच तिच्या लक्ष्याबाबतच्या महत्त्वाकांक्षादेखील सिरपूरमध्ये कोंडल्या गेल्या होत्या. त्यात त्यांच्या दोन्ही मुली नीलांबरी व अपर्णा अभ्यासात हुशार होत्या. अखेरीस रेखाने आपले पती अरुण यांना व घरच्यांना पटवून देऊन, मुलींच्या शिक्षणासाठी व आपल्या लक्ष्यांचा पाठपुरावा करण्यासाठी सिरपूरवरून नव्या मुंबईमध्ये आपले बिर्‍हाड हलवले.

रेखाच्या तीर्थरूपांनी, त्यांच्या गावच्या परिसरातील पुढील शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी नव्या मुंबईत सानपाडा येथे घर घेतले होते. त्याच घरामध्ये आपल्या मुली व भावाची मुले यांच्या शिक्षणासाठी २००० साली स्थायिक झाली. त्यानंतर मात्र या जिद्दी रेखाने मागे वळून बघितले नाही.

नव्या मुंबईतील नव्या घरात स्थिरस्थावर झाल्यावर, मुलींच्या शिक्षणाची सोय लागताच वेळ न घालवता रेखाने आपले संपूर्ण लक्ष व क्रियाशीलता आपले स्वप्नवत भासणारे लक्ष्य साध्य करण्यावर केंद्रित केले; कारण तिचे क्षितीज आता विशाल झाले होते. मार्ग खडतर होता. ग्रामीण पार्श्‍वभूमीवरून शहरी संस्कृतीमध्ये स्थित्यंतर करणे अजिबात सोपे नसते.

ग्रामीण भागात जन्मलेल्या व वाढलेल्या रेखाला इंग्रजी भाषेचे वावडे होतेच, पण तिला संगणक कसा वापरायचा याचेही ज्ञान नव्हते. मराठमोळ्या साध्या रेखाला शहरी झकपक कपडे व दिखावू शिष्टाचार माहीत नव्हते; पण ज्ञानपिपासू रेखा शांत बसली नाही. आपले राहणीमान बदलता बदलता प्रसंगी तिने संगणकाचे धडे आपल्या मुलींकडून घेतले आणि हे धडे घेता घेता तिने इंटरनेटवर प्रावीण्य मिळवले.

तिने स्वीकारलेला व्यवसाय, ज्यामध्ये आधुनिक सौंदर्यशास्त्र, सौंदर्य प्रसाधनांचे उत्पादन, प्रकृतीची उत्तम निगा, यामध्ये आधुनिक संपर्क प्रणाली अवगत असणे, ही एक मूलभूत गरज आहे. जगात या क्षेत्रात होणारे संशोधन, तंत्रज्ञान तसेच जागतिक सर्व संस्थांशी जनसंपर्क निर्माण होणे, या गोष्टीपण या क्षेत्रात प्रगती साधण्यासाठी अंतर्भूत आहेत. रेखाने अल्पावधीमध्ये स्वत:त आमूलाग्र सकारात्मक बदल घडवून आणला.

सौंदर्यशास्त्र व सौंदर्य प्रसाधनेसंबंधित सर्व क्षेत्रांमध्ये आपले डोळे दिपून जातील, असा झगमगाट असतो. आपण सुंदर दिसावे अशी प्रत्येक स्त्रीची जशी इच्छा असते, तसेच आपण मर्दानी, देखणे दिसावे, असे प्रत्येक पुरुषालापण वाटत असते आणि सौंदर्य व देखणेपणाबरोबरच उत्तम सुदृढ प्रकृतीदेखील आवश्यक असते.

यासाठी लागणारी विविध सौंदर्य प्रसाधने, औषधे, व्यायाम व व्यायामांची साधने तसेच या गोष्टी बनवणारे उत्पादक, या गोष्टी वापरणारे व या गोष्टी कशा वापरायच्या याबद्दल मार्गदर्शन करणारे सल्‍लागार व तज्ज्ञ असे हे पूर्णत: विकसित झालेले आधुनिक काळातील, प्रचंड आर्थिक गुंतवणूक असणारे हे व्यापारविश्‍व आहे.

अशा या झगमगत्या व्यापारविश्‍वामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवर सर्वच देशांमध्ये स्त्रियांसाठी सौंदर्यस्पर्धा आणि स्त्री-पुरुषांसाठी सौष्ठवस्पर्धा यांचे आयोजन केले जाते. यामुळे सांस्कृतिक आदानप्रदान होते, तसेच जागतिक पर्यटनास चालना मिळते. या स्पर्धा जिंकणार्‍या स्त्री-पुरुषांना जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळतेच, पण त्याचबरोबर चित्रपटसृष्टीमध्ये त्यांना वाव मिळतो.

विशेषत: सुंदर स्त्रियांचा व देखण्या पुरुषांचा वापर उत्पादनांची विक्री वाढवण्यासाठी केला जातो. बरीच उत्पादने त्यांच्या प्रदर्शक प्रतिनिधींमुळे (Brand Ambassador) जास्त ओळखली जातात. क्रीडा क्षेत्रात मान्यवर असणार्‍या क्रीडापटूंचापण प्रदर्शक प्रतिनिधी म्हणून क्रीडाविषयक उत्पादनाची विक्री करण्यासाठी उपयोग केला जातो.

अशा या झगमगत्या चंदेरी जगतामध्ये रेखा चौधरीने सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करून प्रवेश केला, कारण सौंदर्यशास्त्र, सौंदर्य प्रसाधनांचे उत्पादन आणि उत्तम प्रकृतीची जोपासना हेच तिचे लक्ष्य होते.

सानपाड्यात स्थिरस्थावर झाल्यावर २००४ सालापासून रेखाने बाजारात मोठे नाव असणार्‍या सौंदर्य प्रसाधनांच्या उत्पादकांशी संपर्क साधायला प्रारंभ केला व त्या सौंदर्य प्रसाधनांच्या उत्पादकांचे वितरण हक्क घ्यायला सुरुवात केली. सौंदर्य प्रसाधनांच्या एका आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये तिचा जगप्रसिद्ध फे्ंरच सौंदर्य प्रसाधने उत्पादक ‘रेम्युलिए’ यांच्याशी संपर्क प्रस्थापित झाला व तिचा जागतिक बाजारपेठेत प्रवेश झाला.


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


नेदरलॅण्डसमध्ये स्थायिक असणारे अनिवासी भारतीय जे. सी. कपूर यांची नजर या गुणी रेखावर पडली. सौंदर्य प्रसाधनांच्या व आरोग्याची उत्तम निगा घेणार्‍या आरोग्यधामांच्या (Spa) व्यवसायात कपूर यांचे खूप मोठे नाव होते. रेखा व जे. सी. कपूर यांनी एकत्र येऊन २००७ सालाच्या सुमारास दोघांनी JCKRC Spa Destination या नावाने भागीदारीत आरोग्यधामविषयक संस्था सुरू केली.

सौंदर्यविषयक व सुदृढ प्रकृतीविषयक आरोग्यधाम विकसित करणे, त्यावर संशोधन व गुंतवणुकीचे सल्‍ले देण्याचे काम ही संस्था करते. सांप्रत ही संस्था रेखा आपल्या मुलींच्या मदतीने स्वत:च चालवते. पंचतारांकित हॉटेल्स, मोठी हॉस्पिटल्स यांच्यामध्ये किंवा यांच्याशी संलग्‍न असणारी आरोग्यधामे (Spa) उभी करण्यात रेखाच्या या संस्थेचा खूपच मोठा वाटा आहे. तसेच ही संस्था उच्च दर्जाची सौंदर्य प्रसाधने विविध देशांतून आयात करून भारतात वितरित करण्याचेदेखील काम करते.

आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने व जगातील नवनवीन तंत्रज्ञान आपल्या देशात आणण्यासाठी रेखाने फ्रान्स, नेदरलॅण्डस, जर्मनी, इटली, युनायटेड स्टेटस आदी इतर अनेक देशांना वारंवार भेटी दिल्या आहेत. आज रेखा लक्ष्यप्राप्तीच्या समाधानात यशाच्या अत्युच्च शिखरावर पोचली आहे. तिचा व्यवसाय आर्थिक दृष्टीनेपण यशस्वी आहे.

खरे म्हटले तर ती शांतपणे आपले जीवन व्यतीत करू शकेल; पण ग्रामीण भागातून आलेली रेखा आपली सामाजिक बांधीलकी विसरली नाही. ग्रामीण भागातील मुलींना मानाने जगण्यासाठी, आपल्या पायावर उभे करण्यासाठी रेखाची संस्था एक अत्यंत भव्य, महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभा करत आहे. या प्रकल्पाचे नाव ‘झेप’ असे असणार आहे.

आजमितिला महाराष्ट्रात रेखाने आपल्या व्यवसायाचे जाळे विणायला प्रारंभ केला आहे. या संस्थेतर्फे शिकाऊ मुलींना सौंदर्यसाधिका (Beautician) बनवण्याचे अभ्यासवर्ग सुरू झाले आहेत. तसेच नजीकच्या भविष्यकाळात सुरू होणार्‍या ‘झेप’ प्रकल्पाच्या विद्यमाने या शिकाऊ मुलींना सार्वजनिक स्वच्छता राखण्याचेही प्रशिक्षण दिले जाणार आहे, असे कळते.

विशेषत: किशोरवयीन तरुणींचे वैयक्तिक आरोग्य राखण्यावरही भर दिला जाणार आहे. ही कल्पना ‘स्वच्छ भारत’ या संकल्पनेपासून रेखाला सुचली आहे. या उपक्रमाचे फलित म्हणजे लाखो स्त्रियांसाठी रोजगारनिर्मिती होणार आहे. रेखाच्या संस्थेतून अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या मुलींना १०० टक्के नोकरी मिळते, हे रेखाच्या संस्थेचे वैशिष्ट्य आहे.

आज सौंदर्य व उत्तम आरोग्य जपणारी आरोग्यधामे (Spa) या व्यवसायाची रेखा चौधरी अनभिषिक्त महाराणी आहे व संपूर्ण जगामध्ये या विशिष्ट व्यवसायाची भारताची राजदूत आहे. यशाच्या शिखरावर पोचूनही रेखाने जमिनीची नाळ सोडलेली नाही. आजही ती आहे ग्रामीण, आदिवासी तसेच सर्वसामान्य स्त्रियांना सकारात्मक प्रेरणा देणारी एक अखंड ऊर्जा आहे.

महाराष्ट्र राज्य शासनाचे मुख्य सचिव सुमित मलिक यांच्या हस्ते ‘ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री’ या संस्थेचा २०१६-२०१७ सालचा ‘द पिलर ऑफ हिंदुस्तानी सोसायटी’ हा पुरस्कार रेखाला देण्यात आला.

– संजय भिडे
(लेखक ‘ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स’चे संस्थापक आहेत.)


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!