'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची मुलाखत प्रसिद्ध करायची असल्यास, या लिंकवर क्लिक करा 👉 https://wa.link/p11pqe
‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’, या ओळीचा अर्थ काय तर अशक्यप्राय वाटणारी गोष्टही प्रयत्नाने साध्य करता येते. पुण्यात शंकर किरगुटे यांनी स्वत:चे तीन मजली घर बांधले, फ्लॅट घेतला, करोडोंची गुंतवणूक करून आज स्वत:च्या मालकीचे शॉप खरेदी केले ते फुलांच्या व्यवसायातून.
एकूणच त्यांच्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळवून दिले ते फुलांनी. पुण्यात सेनापती बापट रोडला चतुर्श्रुंगी मंदिराजवळ त्यांचे ‘शिवम फ्लॉवर शॉप’ हे फुलांचे दुकान आहे. मूळ गाव सोलापूर. सातवीपर्यंत शिक्षण झाल्यावर शंकर पुण्याला बहिणीकडे आले आणि ते कायमचे पुण्यातच राहिले.
कुटुंबात वडील एकटेच कमावणारे होते आणि खाणारी तोंडे जास्त होती. त्यामुळे खूप लवकर परिस्थितीची जाणीव झाली आणि आपणही वडिलांना कामात हातभार लावायला हवा म्हणून अर्थार्जन सुरू करायचे ठरवले. पुण्यात आले खरे, पण हाताला काम नव्हते. मग एके ठिकाणी फुलांच्या दुकानात बहिणीच्या नवर्याने कामाला लावले. पगार होता सातशे रुपये.
शिक्षण कमी त्यामुळे इतर कोणत्या क्षेत्रात जाण्याचे मनात आले नाही. सुरुवातीची दहा ते बारा वर्ष त्यांनी फुलांच्या दुकानात नोकरी केली. या काळात फुलांच्या व्यवसायातील बारकावे शिकून घेतले. यातच आवड निर्माण झाली. ज्या दुकानात काम करायचे तिथल्या मालकाचा विश्वास त्यांनी आपल्या कामाने संपादन केला. चांगला अनुभव गाठीशी आला.
आता मात्र स्वत:चे दुकान सुरू करावे हा विश्वास निर्माण झाला होता. २००१ साली त्यांनी स्वत:च्या व्यवसायाची सुरुवात केली. सुरुवातीला अर्धवेळ नोकरी करत व्यवसाय सुरू केला. जसजसे ग्राहक वाढले तसतसे मग नोकरी सोडली आणि पूर्णवेळ व्यवसायात स्वत:ला झोकून दिले.
शंकर हे एकत्र कुटुंबात वाढलेले. आजही ते एकत्र कुटुंबात आहेत. त्यांनी आपल्या भाऊ महादेव (राजू) शंकर किरगुटे यांना काही काळ इतरत्र नोकरीतून अनुभव घ्यायला लावला त्यानंतर व्यवसायामध्ये सहभागी करून घेतले. या काळात त्यांना वडील नागनाथ शंकर किरगुटे यांची खूप साथ मिळाली.
हळूहळू कामगार ठेवायला सुरुवात केली आणि बघता बघता सात ते आठ कामगार सोबत काम करू लागले. ‘शिवम फ्लॉवर शॉप’ची खासियत म्हणजे विविध प्रकारच्या फुलांचे विविध बुके व गिफ्टिंगसाठी वापरली जाणारी फुले येथे वाजवी दरात मिळतात आणि आपल्या पसंतीने हव्या त्या फुलांचे बुके बनवून मिळतात.
लिली, गुलाब, ट्युलिप यासारख्या बर्याच फुलांचे बुके असतात. ही फुले बंगलोर, उटी अशा विविध ठिकाणाहून मागवली जातात. सध्याच्या काळात बुकेंमधे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. जी फुले आपल्याकडे मिळत नाहीत ती फुलेदेखील ऑर्डरप्रमाणे मागवून दिली जातात.
आजच्या डिजिटल काळात व्हॉट्सअॅपवर ऑर्डर नोंदवता येते. आपल्याला हवा त्या पद्धतीचा बुकेचा फोटो निवडून ऑनलाइन पेमेंट केले की ऑर्डर तयार केली जाते. ग्राहकाला फोन नंबर, लोकेशन, क्युआर कोड आणि बुकेची डिटेल्स पाठवल्या की कस्टमर पेमेंट करतात कोणता बुके हवा आहे ते सांगतात आणि येऊन घेऊन पण जातात.
स्विगी, झोमॅटोसारख्या प्लॅटफॉर्ममुळे डिलिव्हरी सोपी झालीय. संपूर्ण पुण्यातून कुठूनही आलेली ऑर्डर ‘शिवम फ्लॉवर शॉप’ डिलिव्हर करते. दररोज साधारण वीस ते तीस प्रकारची फुले दुकानात स्वच्छ करून ठेवलेली असतात. या फुलांना वेगवेगळ्या बकेटमध्ये सजवून ठेवावे लागते; जेणेकरून फुले घेताना किंवा त्यांचा बुके बनवताना त्रास होवू नये.
याशिवाय चाळीस ते पन्नास बुके रोज तयार ठेवावे लागतात. दीडशे ते दोनशे रुपयांपासून ते ५ हजारपर्यंतचे बुके तयार करून ठेवावे लागतात. फुले ही नाशवंत असतात त्यामुळे कधी माल विकला गेला नाही तर ते नुकसान सहन करावे लागते. ‘शिवम फ्लॉवर शॉप’चे एक वेगळेपण म्हणजे पॅकेजिंग.
वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून पॅकिंग करून द्यायला त्यांना आवडते त्यासाठी ते जास्त खर्च करतात. एकूणच प्रेझेंटेशनवर त्यांचा भर आहे. फुलांची कॉलिटी आणि नावीन्यपूर्ण प्रकारची फुले ते मागवतात. त्यांची गुणवत्ता टिकावी यासाठी योग्य निगा राखली जाते आणि याचसाठी चांगला अनुभवी स्टाफ सोबतीला आहे. त्यांना शंकर वेळोवेळी योग्य ते प्रशिक्षण देतात.
चांगल्या गुणवत्तेची फुले घेतली तर ती आठ ते दहा दिवस टिकतात तर साधी फुल तीन ते चार दिवस टिकतात. पण असे असले तरी दररोज नवीन माल हा मागवला जातोच, कारण फुलांच्या गुणवत्तेबद्दल कोणतीही तडजोड नाही. शिवाय कारागीर दुकानात असल्याने एकाच वेळी सहा-सात ग्राहक आले तरी त्यांना त्वरीत त्यांच्या पसंतीने काही वेळातच बुके बनवून मिळतात. छोटा बुके बनवण्यासाठी पाच मिनिटे लागतात. मोठा बुके बनवायचा असेल तर मात्र तास ते दीड तास लागतो.
प्रत्येक उद्योजक असायलाच हवा 'स्मार्ट उद्योजक - प्राईम मेंबर'!
हा संपूर्ण प्रवास म्हणजे धैर्य, सातत्य आणि प्रयत्नांचा सुंदर मिलाप. या प्रवासात आपल्याला येणारी ही कला त्यांनी इतरांनाही शिकवली. आज शंकर यांच्याकडे शिकून अनेकांनी स्वत:चा फुलांचा व्यवसाय सुरू केलाय व तेसुद्धा आपल्या व्यवसायात चांगला जम बसवून आहेत.
संपर्क : 9767270909

