एक वर्षतरी गारमेंट उद्योगात टिकून दाखवा असे एका अमराठी गारमेंट उद्योजकाने दिलेले चॅलेंज स्वीकारत काळे कुटुंबाने गारमेंट क्षेत्रात स्वत:ला झोकून दिले. आज अठरा वर्षे या क्षेत्रात आपली पाळंमुळं घट्ट करून ‘एस. जी. शेड्स’ या ब्रॅण्डच्या नावाने देशभरात आपला व्यवसाय वाढवत आहेत. महेश आणि राजेश या दोन भावांनी वडील शिवदास काळे यांच्यासोबत सुरू केलेल्या ‘सिद्धीविनायक गारमेंट्स’चा हा प्रेरणादायी प्रवास…
अन्न, वस्त्र, निवारा. मनूष्याच्या मुलभूत गरजा आहेत. त्यामुळे या क्षेत्रात उद्योग करणार्याच्या उद्योगाला मरण नाही. दीड कोटींची उलाढाल असलेल्या ‘सिद्धीविनायक गारमेंट्स’चा ‘एस. जी. शेड्स’ हा मराठी ब्रँड आज मार्केटमध्ये स्वत:चे पाय भक्कमपणे रोवत आहे.
‘वी मेक बॉडी कुलिंग शर्ट्स’ अशी टॅगलाईन असलेल्या १०० टक्के कॉटन शर्ट्सचा हा ब्रँड आहे. आपली व्यावसायिक पार्श्वभूमी सांगताना महेश काळे म्हणतात, व्यावसायिक बाळकडू आम्हाला बालपणातच मिळालं. घरात दोन पिढ्या आधीपासूनच उद्योजकीय गुण रुजलेले होते.
आजोबांचा फुलांच्या हाराचा धंदा होता. वडिलांची मिलची नोकरी होती, परंतु १९८४ ला मिलमध्ये संप झाला आणि संसाराची जबाबदारी सांभाळताना वडिलांनी त्याकाळात अनेक प्रकारचे उद्योग केले. वडापावची गाडी टाकली. काही काळ गारमेंटमध्येही काम केले.
कालांतराने मिल संप मिटला आणि पुन्हा नोकरी करत घरचा फुलांच्या हाराच्या धंद्यात वडिलांनी स्वत:ला गुंतवले. आजोबा आणि वडील हार बनवून ठेवायचे. आम्ही शाळेतून आलो की घरोघरी फिरून हार टाकत असू. पुढे आजोबांचे वाढते वय आणि वडिलांची नोकरी यामुळे काही काळाने आम्ही हा धंदा बंद केला.
महेश आणि राजेश काळे यांचे शालेय शिक्षण संपले आणि त्याचदरम्यान त्यांच्या वडिलांना गारमेंटमध्ये एक संधी चालून आली. त्यांच्या वडिलांनी गारमेंटमध्ये काही काळ काम केलेले असल्यामुळे त्यांना यातील माहिती होती. त्या अनुभवाच्या जोरावर शिवदास काळे यांनी भागीदारीमध्ये या व्यवसायात उडी घेतली.
या काळात राजेश काळेंनी वडिलांच्या या उद्योगात लक्ष द्यायला सुरुवात केली. दरम्यान महेश काळेंचे डिप्लोमाचं शिक्षण सुरू होतं. १९९८ साली शिवदास काळेंनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. त्याचवेळी एक वर्ष तरी या क्षेत्रात टिकून दाखवा असे एका अमराठी व्यक्तीने शिवदास काळेंना चॅलेंज दिले.
ही गोष्ट काळे कुटुंबाने मनावर घेतली. आपण तिघांनी या उद्योगात उतरूयात असे शिवदास काळे यांनी मुलांना सुचवले. महेश सांगतात, आम्हालाही ते पटलं आणि आम्ही एकत्रित या उद्योगात उतरलो. वडिलांच्या भागीदारीमध्ये पटत नव्हतं. त्यामुळे वडिलांनी त्या भागीदाराला सांगितलं की एकतर तू उद्योगातून बाजूला हो किंवा आम्ही तरी होतो. व्यवसायात गुंतवणूक वडिलांचीच जास्त होती, त्यामुळे तो भागीदार वेगळा झाला आणि आम्ही तिघांनी नवीन सुरुवात केली.
सुरुवातीला १५० स्वे फीटच्या भाड्याच्या जागेत तेरा शिलाईयंत्र भाड्याने घेऊन ‘सिद्धीविनायक गारमेंट’ची सुरुवात झाली. सुरुवातीला एक मास्टर आणि वडिलांसोबत महेश व राजेश अशी टीम झाली. पुढे एक वर्षात स्वत:चा गाळा घेतला आणि बारा शिलाई मशिन विकत घेतल्या, परंतु तरीही सेटअप पूर्ण नव्हता त्यामुळे एक्स्पोर्ट क्वालिटिच्या मालाचे कटिंग आणून काम करू लागलो.
राजेश सांगतात, “कामाची गुणवत्ता चांगली असल्यामुळे हे काम बाहेरून करून घेतलंय असे कोणालाच ओळखता येत नसे. दरम्यानच्या काळात आम्ही बाजूचाच गाळा विकत घेतला आणि आमची जागा वाढवली. त्यामुळे आम्हाला स्वत:चं कटिंगचं युनिट टाकता आलं.
आमच्या कामातील सफाई, क्वालिटीपाहून पार्टीने स्वत:हून बाबांना तुम्हीच कपडा घेऊन संपूर्ण काम एकाच छताखाली पूर्ण करून द्यायला सुरुवात करा असे सूचवले. आम्हालाही ते पटले आणि मग आम्ही त्या क्वालिटीचे काम देता यावे यासाठी तेरा ज्यूकी मशिन विकत घेतल्या. अशाप्रकारे आमची ताकद वाढली आणि आम्ही रँगलर, डिझेल, क्रोकोडाईल, ऑपेरा अशा मोठ्या ब्रॅण्ससाठी काम करू लागलो.”
या मोठ्या ब्रांडसोबत काम करताना आम्ही खूप गोष्टी शिकलो. तो अनुभव आमच्यासाठी खूप मोठी शिदोरी ठरला. त्याच्यातूनच आम्ही आमच्या मालाच्या गुणवत्तेवर जास्त चांगल्याप्रकारे लक्ष देऊ लागलो.
कापड कसे आहे, शिलाई टाके कसे आहेत, धागा कटिंग कसा आहे अशा बारीक बारीक गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात त्या आमच्या कामात उतरत गेल्या आणि आम्ही अजून चांगले काम करण्यास तयार झालो. हळूहळू ‘सिद्धीविनायक गारमेंट’चे नाव गारमेंट क्षेत्रात लोकांना माहीत होऊ लागलं. एक ओळख निर्माण झाली.
१५० क्वे फीटच्या भाड्याच्या गाळ्यापासून सुरुवात केली आता स्वत:चे एकूण चार गाळे आहेत, जिथून ‘सिद्धीविनायक गारमेंट’चे काम जोमाने सुरू आहे. धंद्यातला पैसा धंद्यातच फिरवत नेला आणि काम वाढवलं. अनेक कारागिरांना काम मिळाले.
एक शर्ट बनवण्यासाठी लागणार्या छोट्या-छोट्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं. प्रेसिंग युनिट, पॅकिंग युनिट, चेकिंग युनिट, काजबटणचं वेगळं युनिट टाकलं आणि एकाच छताखाली माल बनवून देऊ लागले. पार्टीचा विश्वासही वाढत होता त्यामुळे काम वाढत होतं आणि अनेकांना रोजगार मिळत होता.
महेश सांगतात, “६० मशिनवर रोज काम काढत होतो. स्वत:च्या ४० मशिन व्यतिरिक्त आम्ही बाहेर मशिनसाठी काम देऊ लागलो. दिवसरात्र आम्ही काम करायचो. महिन्याला २५ हजार पिसचं आमचं प्रोडक्शन असायचं. एवढं काम आमच्याकडे येत होतं. त्याला कारण एकच होतं आमच्या मालाची क्वालिटी.
२००८ मध्ये गारमेंट इंडस्ट्री धोरणात बदल झाला. त्यामुळे एक्स्पोर्टचे काम इतर राज्यांनाही मिळू लागल्यामुळे मुंबईत येणारं काम कमी झालं. त्याचदरम्यान जागतिक मंदीची लाट आली आणि व्यवसायावर त्याचाही परिणाम झाला. त्यामुळे एक्स्पोर्टचं काम कमी झालं.”
या काळात दोघे भाऊ जोमाने कामाला लागले. ‘सिद्धीविनायक गारमेंट’ने लोकल ब्रॅण्ड्ससोबत कामाला सुरुवात केली. पँटालून, स्पायकर, कॉपर स्टोन वगैरे. साधारणत: दोन ते तीन वर्ष हे काम केलं. या काळात अजून अॅडव्हान्स मशिन आल्या त्यामुळे हे काम अजून चांगल्या गुणवत्तेचे करता येऊ लागलं.
या ब्रॅण्डचे डिझायनर शर्ट्स होते. त्यामुळे त्यासाठी वेगळ्या मशिन्स लागत. काळाची गरज ओळखून नवीन टेक्नॉलॉजी अवलंबत काळेंनी नव्या मशिन घेतल्या. २००८ च्या मंदीच्या काळात कसोटीचा काळ होता. या काळात अनेकांना त्यांचे गारमेंट उद्योग बंद करावे लागले, पण ‘सिद्धीविनायक गारमेंट’ या काळात टिकून राहिले.
याची कारण सांगताना काळे सांगतात आमची कामाची क्वालिटी, घरातील सपोर्ट आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमच्यासोबत काम करणारे कारागिर यांच्याकडून मिळालेला भक्कम पाठिंबा. कोलकत्ता येथे एक हिप्सवेअर हा ब्रॅण्ड आहे. जिन्सचा हा ब्रॅण्ड आहे. त्यांचे मोठे मार्केट आहे.
ते शर्टचा स्वत:चा ब्रॅण्ड तयार करण्यास उत्सुक होते, त्यामुळे ते चांगल्या दर्जाचे शर्ट्स बनवणार्यांच्या शोधात होते. त्यावेळी त्यांना ‘सिद्धीविनायक गारमेंट’चे नाव सुचवले गेले. तिथून ‘सिद्धीविनायक गारमेंट’ने ब्रॅण्डसाठी काम करायला सुरुवात केली. त्यांच्या ब्रॅण्डचे काम करता करता मार्केटमधल्या अजून नवीन गोष्टी काळे बंधूंनी शिकून घेतल्या.
शून्यातून स्वत:ला कसं उभं करावं. स्वत:चा ब्रॅण्ड कसा तयार करावा हे खर्या अर्थाने हे काम करताना त्यांना शिकता आले. स्वत:च्या शेड्स या ब्रॅण्डच्या जन्माविषयी काळे सांगतात की, आपल्याकडे या क्षेत्रातलं संपूर्ण ज्ञान आहे. आवश्यक युनिट आहे. नवीन नवीन कल्पना आहेत. मग आपणही आपला ब्रॅण्ड का तयार करू नये?
असा विचार आला आणि आम्ही दोघा भावांनी यावर विचार करून निर्णय पक्का झाला. इतर ब्रॅण्डसोबत काम करताना आम्ही आमच्या ब्रॅण्डचा नेहमी विचार करायचो, पण २०१२ पासून आम्ही जोमाने कामाला लागलो.
२०१२ साली लोगे रजिस्ट्रेशन, ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन झाले आणि एस. जी. शेड्स हा ब्रॅण्ड तयार झाला. दरम्यानच्या काळात भरपूर चढ-उतार आले. पूर्वीपासूनच क्वालिटीच्याबाबत कोणतीही तडजोड केली नव्हती. कपडा चांगल्या प्रतीचा वापरलेला असायचा, परंतु मार्केटमध्ये मालाची किंमत इतर ब्रॅण्डच्या तुलनेत जास्त वाटायची.
काळे म्हणतात, आम्ही आमच्यापरीने त्यांना ही किंमत योग्य कशी आहे हे पटवून द्यायचा प्रयत्न करायचो. हळूहळू आम्हाला लक्षात येऊ लागलं की आपल्याला स्वत:च यावर काम करायला हवं आणि आम्ही होलसेल ऐवजी रिटेलरवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली.
त्यासाठी आम्ही एक सेल्समन कामाला ठेवला त्याच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या रिटेल शॉप्सवर आमचा माल पाठवू लागलो. सुरुवातीला खूप चांगला खप होऊ लागला. दीड वर्षे आम्ही अशाप्रकारे काम केले. हा व्यवहार मुख्यत्वे कॅशमध्ये होत असे त्यामुळे दिवाळीनंतर काही लोक पेमेंट्स काढायचे, परंतु दरम्यानच्या काळात नोटबंदी आली आणि आम्हाला त्याचा फटका पडला.
काही लोकांनी दुकानं बंद केली. कॅश-फ्लो कमी झाला. चेकच्या व्यवहाराने काम करणे बर्याच रिटेलर्सना मान्य नव्हतं त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत काम करणं बंद केलं. आमच्या अटींवर काम करणं ज्यांना जमत होतं त्यांच्याशीच व्यवहार सुरू ठेवला.
शंभर टक्के कॉटन शर्ट्स हा या उद्योगाच युएसपी आहे. वुई मेक बॉडी कुलिंग शर्ट्स अशीच त्यांची टॅगलाईन आहे. फॅब्रिक, स्टिचींग, मेजरमेंट, पॅकिंग याबाबत कोणतीही तडजोड नाही. सध्या ते कॅज्युअल वेअर, पार्टी वेअर, क्लब वेअर, सेमी कॅज्युअल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शर्ट्सचे डिझाइन्स बनवतात. ट्रेंडनुसार डिझाइन्स देतात. आज होलसेल मार्केटवर त्यांनी लक्ष केंद्रित केलंय.
वेगवेगळ्या नेटवर्किंग क्लबमध्ये काळेंनी जायला सुरुवात केली. या माध्यमातून उद्योगाला नवीन आयाम द्यायला सुरुवात केली. फेसबुक मार्केटिंग, व्हॉट्सअप मार्केटिंग, अशा अनेक प्रकारच्या संकल्पना इथे पहिल्यांदा कळल्या. याचा वापर आपल्या उद्योगवाढीसाठी त्यांनी सुरू केलाय. लवकरच आम्ही ई-कॉमर्स वेबसाईट सुरू करतोय, असे काळे म्हणतात.
भविष्यात २०२० पर्यंत स्वत:ची मोठी कंपनी उभी करणं आणि स्वत:चे कंपनी आऊटलेट उभारणं हे ध्येय घेऊन आज काळे बंधू काम करत आहेत. सध्या त्यांनी प्रोडक्शनवर लक्ष केंद्रित केलंय. व्यावसायिक स्ट्रेटिजीवरही काम चालू आहे. वार्षिक दीड कोटींची उलाढाल आज आहे.
गारमेंट क्षेत्रात मराठी टक्का फार कमी आहे. या उद्योगात येऊ इच्छिणार्या नव्या पिढीला मदत करण्यासाठी आम्ही नेहमीच तयार आहोत. चांगल्या संधी इथे उपलब्ध आहेत. नीट अभ्यास करून, मेहनतीची तयारी असलेल्याला या क्षेत्रात नक्कीच खूप पुढे जाता येईल. या क्षेत्राकडे जरुर वळावे.
मराठी तरुणांनी या उद्योगात यावे आणि एक साखळी तयार करून एकमेकांना उद्योगात मदत करत खंभीरपणे उभे राहायला हवे. असे काळे बंधू आवर्जून सांगतात.
महेश काळे – ९९२०७७५०९६
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.