Advertisement
उद्योग कथा

अंधारल्या झोपडीत उजाडले ‘स्वप्न प्रकाशाचे’ महागावच्या 'स्त्री शक्ती'चे एलईडी दिव्यांचे उत्पादन सुरू


दरमहा संपूर्ण ‘स्मार्ट उद्योजक’ मासिक मिळवा तुमच्या WhatsApp वर । वार्षिक वर्गणी फक्त रु. ८०

आजच वर्गणीदार व्हा : https://imjo.in/YSMSQK


‘ती’ आणि ‘तिच्यासारख्या’ अनेकींची जिद्द, चिकाटी आणि प्रयत्नांना शासनाने पाठबळ दिले आणि महागावच्या ‘स्त्री शक्ती’ बचतगटाच्या महिलांनी एलईडी दिव्यांचे उत्पादन सुरु केले. एका दुर्गम खेड्यात, अंधारल्या झोपडीत हे उत्पादन सुरू होऊन प्रकाशाचे स्वप्न उजाडले आहे. ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानाच्या पाठबळातून रायगड जिल्ह्याला अभिमान वाटावा असे हे परिवर्तन घडले आहे.

जिल्ह्यातील ५६ गावांचा समावेश

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियान राबविले जात आहे. रायगड जिल्ह्यातही २२ ग्रामपंचायतींमधल्या ५६ गावांमध्ये या अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे. या अभियानात समावेश असलेली राज्यात सर्वाधिक गावे रायगड जिल्ह्यातली आहेत हे विशेष. त्यातलीच एक ग्रामपंचायत महागाव. सुधागड तालुक्यातल्या दुर्गम डोंगराळ भागात १२ वाड्यांनी बनलेली ही ग्रामपंचायत आणि लोकवस्ती १८०० जणांची. अशा या लहानशा आणि टुमदार गावाला दुर्गमतेचा शाप आणि निसर्गाचं वरदानही लाभलेलं. विकासाचे अनेक प्रश्न येथे आहेत. म्हणुनच ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानात या गावाची निवड झाली.

थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडून आढावा

जी जी गावे ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानात निवडण्यात आली आहेत, त्या प्रत्येक गावात एक प्रशिक्षित सामाजिक कार्यकर्ता नियुक्त करण्यात आला असून या कार्यकर्त्यामार्फत गाव विकास आराखडा तयार करुन गावातील विकास योजनांच्या अंमलबजावणीचे काम होत आहे. त्यातही शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या तीन घटकांना केंद्रीभूत मानून विकास आराखडा तयार करण्यात येतो. या आराखड्याला ग्रामसभेची मान्यता घेण्यात येते. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय जिल्हा अभियान समितीचे त्यावर नियंत्रण असते. या समितीचे नोडल अधिकारी जिल्हा नियोजन अधिकारी असतात आणि थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडून दर महिन्याला या कामांचा आढावा घेतला जातो.

महागाव येथेही हे काम सुरू आहे. त्यातूनच महागाव परिसरात केवळ शेती हाच एकमेव उद्योग असल्याने चार महिन्यानंतर लोकांना काम नसते. त्यामुळे बरेच जण मोठ्या शहरांकडे स्थलांतरीत होण्याची जणू येथे परंपराच आहे. त्यामुळेही अनेक सामाजिक प्रश्न गावात निर्माण होत होते. ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानात महागाव मधील महिलांना रोजगाराची आणि त्याला जोडून येणारी हंगामी स्थलांतराची समस्या भेडसावत होती.

जिद्दीने साकारले स्वप्न

या गावातील ग्राम समाज परिवर्तक विनोद तिकोणे यांनी महिलांचे संघटन करुन त्यांचा स्त्री शक्ति नावाचा बचत गट तयार केला. या महिलांना पारंपरिक व्यवसाय देण्यापेक्षा आधुनिक व्यवसाय देण्यासाठी त्यांनी एलईडी बल्ब उत्पादन हा व्यवसाय निवडला. समस्या होती, महिलांच्या कौशल्याची. परंतू ध्येय ठरल्यावर जिद्द बळावली. वर्धा येथील शक्ती इलेक्ट्रिकल या संस्थेने या महिलांना प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शविली. वर्ध्याचे हे पथक गेल्या काही दिवसांपासून महागाव मध्ये दाखल झाले असून या महिलांचे रितसर प्रशिक्षण सुरु झाले आणि बघता बघता या महिला त्यात पारंगत झाल्या. वायरला साधी पिनही जोडू न शकणाऱ्या महिला आज अगदी सफाईदारपणे सर्किटचे सोल्डरिंग, बल्बच्या कॅपचे पंचिंग करतात. सर्किटमध्ये डायोड-कॅपॅसिटर्स जोडतात आणि अकरा महिलांचे हे २२ हात अवघ्या सात ते आठ मिनीटांत एक एलईडी बल्ब तयार करतात. एलईडी बल्ब तयार करण्याच्या प्रक्रियेतला शेवटचा टप्पा टेस्टिंग युनिटच्या बल्ब होल्डरवर तयार झालेला बल्ब प्रकाशतो तेव्हा त्यासोबत या महिलांचे चेहरेही अनोख्या तेजाने उजळतात.

असे साकारले युनिट

एलईडी बल्ब उत्पादनाचे युनिट साकारण्यासाठी सुमारे ६५ हजार रुपयांचा खर्च आहे. त्यात एलईडी प्लेट्स, पीसीबी प्लेट, कॅपॅसिटर, कॅप, बॉडी, मास्क पंचिंग मशिन, सोल्डर मशिन, हिटसिंक प्रेसिंग युनिट, टेस्टिंग आणि कंट्रोल युनिट या सोबत इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल टूल बॉक्स यांचा समावेश आहे. या युनिटमधून ३० हजार रुपयांचे बल्ब पहिल्या टप्प्यात तयार केले जातील. त्यासाठी १५ हजार रुपयांचे खेळते भांडवल ठेवण्यात आले आहे. प्रशिक्षण, कच्चा माल पुरवठा ते उत्पादन या अशा टप्प्यासाठी शक्ती इलेक्ट्रीकल वर्धा या संस्थेसोबत ग्रामपंचायतीने करार केला आहे. पहिल्या टप्प्यात केवळ बल्बचे असेम्ब्लिंग असले तरी दुसऱ्या टप्प्यात पीसीबी प्लेटसुद्धा या महिलाच तयार करतील. या शिवाय सोलर पॅनल व कुलर निर्मितीचे प्रशिक्षणही या महिलांना दिले जाणार आहे, अशी माहिती ग्रामीण सामाजिक परिवर्तक तिकोणे यांनी दिली.

एलईडी बल्ब निर्मिती प्रक्रिया

एलईडी (लाईट एमिटींग डिव्हाईस) बल्ब निर्मिती प्रक्रियेत कच्चा माल म्हणून मिळणारे एलईडी युनिटसने बनलेली पीसीबी प्लेट या प्लेटनुसारच बल्बची क्षमता ठरते. प्लेटच्या क्षमतेनुसार किती वॅटचा बल्ब तयार करता येईल ते ठरवता येते. साधारणपणे ३ वॅट ते १०० वॅटपर्यंत बल्ब निर्मिती करता येते. या प्लेटला कॅपॅसिटर व सीबीबी युनिट जोडून प्लेटची चाचणी होते. त्यानंतर बी २० कॅप ला पंचिंग करुन त्याच्या वायरी प्लेटला सोल्डर करुन जोडल्या जातात. बल्बच्या बॉडीत ही प्लेट बसवली जाते आणि वरुन कॅप बसवली की बल्ब तयार होतो.

Smart Udyojak | e-Magazines | All Issues

सर्किटची जोडणी आणि कॅपॅसिटरनुसार बल्बचा दर्जा ठरतो. त्यानुसार उत्पादक हे विना वॉरंटी, एक वर्ष वॉरंटी आणि दोन वर्षे वॉरंटी असे तीन प्रकारचे बल्ब तयार करतात. अर्थात या तिनही प्रकारांच्या किमतीत फरक असतो. या किमती बल्बच्या वॅट नुसार आणि प्रकारानुसार बदलतात. साधारण २० रुपयांपासून ते ५ हजार रुपयांपर्यंत विविध क्षमतेचे आणि प्रकारांचे बल्ब तयार होतात. स्ट्रीट लाईट म्हणून वापरावयाचे दिवेही महागाव मध्ये तयार होतात. या महिला आता सज्ज झाल्या आहेतच. आता गरज आहे समाजाने त्यांना प्रोत्साहन देण्याची. एक नवा आदर्श घालून देण्याची.

महागावमधील सामाजिक परिवर्तनाची कामे

ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानात समावेश झाल्यापासून या गावाचा २ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या सर्व प्रक्रियेवर जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा अभियान समितीचे नियंत्रण असते. गाव विकासआराखड्यात लहान लहान बाबींचा समावेश करण्यात आला आहे. अंगणवाडीत बोलक्या भिंती साकारुन बालकांचा शिक्षणाची गोडी निर्माण करणे, गावात आरोग्य उपकेंद्र सुरु करणे, गावातील बारा वाड्या मिळून असणाऱ्या शाळांना पोषण आहारासाठी गॅस सिलेंडर व शेगड्या पुरविणे अशा लहान लहान कामांचा समावेश आहे.

गावाचा समावेश जलयुक्त शिवार अभियानातही करण्यात आला असून त्यामाध्यमातून बंधाऱ्यांमधील गाळ काढणे, बांध बंदिस्ती करणे यासारख्या मृदा व जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. शेती दुबार करणे यासाठीही प्रयत्न होत आहेत. शिवाय गावाची पिण्याच्या पाण्याची समस्या सुटावी यासाठी कोंडप आदिवासी वाडी नळ पाणी पुरवठा योजना दिड लाख रुपये, गोमाची वाडी येथे नळ पाणी पुरवठा योजना ९० हजार रुपये, गावाच्या निसर्ग सौंदर्याला पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यासाठी २ लक्ष रुपये अशी कामे प्रगतीपथावर आहेत. याच कामात महिलांना एलईडी बल्ब तयार करण्याचे प्रशिक्षण देणे या कामाचाही समावेश आहे.

– डॉ. मिलिंद दुसाने
(लेखक रायगड जिल्ह्याचे प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी आहेत.)
सौजन्य : महान्युज

Subscribe ‘Smart Udyojak’ Magazine


FREE NEWSLETTER ON WHATSAPP

व्यवसाय आणि उद्योजकतेविषयी माहिती व घडामोडी आपल्या WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ या क्रमांकावर आपले नाव सध्या राहत असलेला जिल्हा व तालुका WhatsApp करा.

Help-Desk
%d bloggers like this: