Advertisement
उद्योग कथा

वर्धा जिल्ह्यातील झाडगाव ठरतेय आदर्श

यावर्षी बोंडअळी आणि नंतर गारपिटीने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला. मात्र एका गावातील शेतकऱ्यांना या अस्मानी आणि सुलतानी संकटाचा फटका बसला नाही. कारण केवळ कापसावर अवलंबून न राहता या शेतकऱ्यांनी तुतीची लागवड करून रेशीम शेतीच्या जोरावर आर्थिक संपन्नता मिळवली आहे. रेशमाच्या तलम स्पर्शाने गाव बदलत आहे. शिवाय आजुबाजूच्या गावातील आणि इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आयुष्यातही हा रेशमी स्पर्श व्हावा म्हणून हे गाव मास्टर ट्रेनर म्हणूनही काम करतेय.

तुमच्याकडे शेतीमध्ये सिंचनाची व्यवस्था असेल आणि तुम्हाला ५० हजार रुपये महिना कमवायचे असतील तर रेशीम शेती हा अतिशय उत्तम पर्याय ठरू शकतो. एकदा लागवड केली की १२ वर्ष दरमहा उत्पन्न देणारे पीक म्हणून याकडे पाहिले जाते. वर्धा जिल्ह्यातील झाडगावच्या वीस शेतकऱ्यांनी हा पर्याय निवडला आहे. झाडगाव आता रेशीम शेतीचे गाव म्हणून जिल्ह्यातच नव्हे तर इतरत्रही नावारूपास आले आहे.


मनाची मशागत करून त्यात उद्योजकीय संस्काराचे बीज पेरणारे नितीन साळकर यांचे 'उद्योजकीय मानसिकता' हे सदर वाचा 'स्मार्ट उद्योजक' मासिकात. मासिकाचे वर्गणीदार होण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://goo.gl/D3CmYr (Advt)

वर्धा शहरापासून २५ किलोमीटर अंतरावर असणारे हे रेशीम गाव म्हणजे झाडगाव. अडीच हजार लोकसंख्येचे हे गाव काही वर्षांपूर्वी इतर गावांसारखेच एक सर्वसामान्य गाव होते. येथील शेतकरीसुद्धा कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा हीच पारंपरिक पिके घ्यायचे.. नैसर्गिक आपत्ती आली की मग नैराश्यग्रस्त होत.

भोजराज भांगडे यांनी दाखवला मार्ग

गावातीलच भोजराज भांगडे यांनी गावात पहिल्यांदा बारा वर्षांपूर्वी एक एकरमध्ये रेशीम शेतीचा प्रयोग केला. रेशीम कार्यालयातून त्यांनी याविषयी माहिती घेतली. गावातील इतर शेतकऱ्यांनी भांगडे यांना त्यावेळी वेड्यात काढले होते. पण त्यांनी लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता आपले काम चालू ठेवले. सहा महिन्यातच त्यांना दरमहा उत्पन्नाचा कायम स्वरूपी स्त्रोत निर्माण झाला. एक एकरमध्ये उत्पादित केलेले कोष त्यांनी कर्नाटक, आंध्रप्रदेशमध्ये जाऊन विकले. यातून त्यांना फायदा दिसू लागल्यावर त्यांनी हळूहळू लागवड क्षेत्र वाढवले.

एक वर्षात १४ लक्ष रुपयांचे उत्पन्न

भांगडे यांची आता साडेचार एकरमध्ये तुतीची लागवड आहे. आज त्यांच्या साडेचार एकर शेतीतून ते आठ वेळा रेशीम कोष उत्पादन घेतात. एकावेळी ५०० अंडीपुंज पासून सरासरी ३.५० क्विंटल उत्पादन एक महिन्यात होते. एक क्विंटलला साधारणपणे ५० हजार रुपये भाव मिळतो. म्हणजे एक महिन्यात ते सुमारे १ लक्ष ७५ हजार रुपये उत्पन्न घेतात आणि वर्षाला १४ लक्ष रुपये कमावतात.

पाणी विकत घेऊन उन्हाळ्यात शेती

उन्हाळ्यात त्यांना पिकासाठी विहिरींचे पाणी पुरेसे नसते. त्यामुळे शेजारच्या शेतकऱ्याकडून ते १० हजार रुपयांचे पाणी विकत घेऊन रेशीम कोषाचे उत्पादन घेतात. या मिळणाऱ्या उत्पन्नातून भांगडे यांनी घर बांधले, चारचाकी गाडी घेतली. विशेष म्हणजे त्यांची दोन्ही मुले अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहेत. हा सर्व खर्च ते रेशीम शेतीतून भागवतात. एखाद्या अधिकाऱ्यासारखी माझी जीवन शैली झाली आहे असे भांगडे अभिमानाने सांगतात. या रेशीम शेतीसाठी त्यांना रेशीम मित्र पुरस्कार मिळाला असून सह्याद्री वाहिनीने सुद्धा त्यांचा पुरस्काराने गौरव केला आहे.

गावातील २० शेतकरी करतात रेशीम शेती

भांगडे यांची दिवसेंदिवस होत असलेली प्रगती पाहून झाडगावातील इतर शेतकऱ्यांनी हळूहळू तुती लागवडीकडे आपला मोर्चा वळवला. एकाचे दोन, दोनाचे चार असे करता करता गावातील २० शेतकरी आज रेशीम शेती करायला लागले आहेत. कर्नाटक मधील रामनगर येथे एकत्रितपणे कोष विक्रीसाठी पाठवतात. तर कधी व्यापारी गावात येऊन कोष खरेदी करतात. यामुळे गावात ७५ लक्ष ते १ कोटी रुपयांची उलाढाल होते.

गावातील ५ ते १० लोक आता मास्टर ट्रेनर म्हणून काम करतात. इतर जिल्ह्यात जाऊन तेथील शेतकऱ्यांना तुतीच्या लागवडीपासून कोष निर्मिती पर्यंतचे प्रशिक्षण देतात. यासाठी रेशीम कार्यालय त्यांना मानधन आणि प्रवास भत्ता देते.

तुती लागवड अशी ठरते फायदेशीर

तुती लागवड करण्यासाठी सिंचन व्यवस्था असणे आवश्यक आहे. एकदा तुती लागवड केली की १२ ते १५ वर्ष यापासून उत्पन्न मिळू शकते. पुन्हा लागवड करण्याची गरज नाही. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून यासाठी अनुदान सुद्धा मिळते. तीन वर्षात २ लाख ९० हजार रुपये प्रती एकर अनुदान दिले जाते. यामध्ये शेड बांधकाम व इतर साहित्य खरेदी आणि तुतीची बेणे दिली जातात. याशिवाय प्रत्येक पिकासाठी लागणारे अँडीपुंज खरेदी करण्यासाठी रेशीम विकास अधिकारी कार्यालयामार्फत १७५ रुपये १०० अंडीपूज प्रमाणे अनुदान दिले जाते.

तुतीच्या वाढीसाठी सेंद्रिय खताशिवाय कोणतेही रासायनिक खत, फवारे देण्याची गरज नाही. लागवड खर्च, खते, फवारणी या खर्चातून सुटका. दुसरे म्हणजे मजुरांचा खर्च एकदम कमी. महिन्यातून आठ दिवस एक मजूर पुरेसा आहे. कोष उत्पादन शेड मध्येच होत असल्यामुळे घरातील स्त्रियासुद्धा हे काम करू शकतात. तुतीला कोणतेही जनावर खात नाही. विदर्भात उन्हाळ्याच्या कालावधीत तापमान जास्त असल्यामुळे एप्रिल, मे महिन्यात कोष उत्पादन करणे शक्य नाही. पण उर्वरित दहा महिने हे पीक चालू राहते. अळ्यांची विष्ठा खत म्हणून शेतात वापरता येते. शिवाय तुतीच्या काड्या जनावरे खातात. त्यामुळे दूध उत्पादनातसुद्धा वाढ होते आणि या काड्यांचा कंपोस्ट खतासाठी चांगला उपयोग होतो.

स्रोत : महान्युज

Optimization WordPress Plugins & Solutions by W3 EDGE
Help-Desk
%d bloggers like this: