SWOT म्हणजे तुमच्या उद्योगाची कुंडली

उद्योगशील नगरात सर्वच उद्योग सुस्थितीत चालले होते. सर्वच उद्योग भरभराटीस होते. यापैकी काही उद्योजक पंचक्रोशीत नामांकित होते. दूर देशात काहींची ख्याती पसरलेली होती. उद्योग दिवसेंदिवस वाढत असतानाच अचानक ‌बर्‍याचशा उद्योगांना उतरती कळा लागली.

गंगारामपंत पण त्यांच्यापैकीच एक. साधारण वीस-बावीस वर्षांपूर्वी त्यांनी नगराची अचूक गरज ओळखून एक कारखाना उभारला होता. त्यावेळी ते एक यशस्वी उद्योजक म्हणून ख्यातनाम होते. गेल्या बावीस वर्षांत त्यांनी उद्योगजगतात भरपूर प्रगती साधली होती.

मात्र आज ते हतबल, निराश होते. ‘तत् किम्?’ हा प्रश्‍न त्यांना भेडसावत होता. बरेच दिवस निघून गेल्यानंतरही त्यांना उत्तर मिळत नव्हते. शेवटी नगरातील एका विद्वान व्यक्तीकडे जावे असा निर्णय त्याने घेतला. हा विद्वान व्यक्ती म्हणजे प्रत्येक अडचणीवर मात करणारा अशी जनमानसात धारणा होती.

गंगारामपंतांनी विद्वानाला आपली अडचण कथन केली. विद्वान व्यक्तीने पंतांना सोबत घेऊन त्यांच्या व्यवसायाची कुंडली तयार केली. म्हणजे त्याने काय केले तर पंतांना ते गेली वीस-बावीस वर्ष तुम्ही इतके यशस्वी का झालात, तुमच्याकडे असे काय होते की ज्यामुळे ग्राहक नेहमी तुम्हालाच पहिली पसंती द्यायचे याचा विचार करून लिहून काढायला सांगितले.

दुसरीकडे त्यांच्या अशा काय कमतरता आहेत, ज्यामुळे त्यांच्या व्यवसायाची आज ही अवस्था झाली याचाही विचार करायला भाग पाडले. तास, दोन तास असा बराच वेळ विचार करून त्या विद्वानाने गंगारामपंतांच्या व्यवसायाची कुंडली तयार करून त्यांच्या हातात दिली. ती कुंडली पाहून पंतांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला.

त्यांना हे नेमकं लक्षात आलं की आपलं कुठे चुकलं आणि आपल्या व्यवसायाची ही अवस्था का झाली. त्यावरून त्यांना विद्वानाच्या मार्गदर्शनाखाली अशी योजनाही तयार करता आली की जेणेकरून त्यांना त्यांचा व्यवसायाला पुन्हा होता त्या शिखरावर घेऊन जाता येईल.

विद्वानाने गंगारामपंतांसोबत बसून, त्यांचा आणि त्यांच्या व्यवसायाचा अभ्यास करून तयार केलेल्या या प्रक्रियेलाच म्हणतात S-W-O-T (स्वॉट) Analysis.

आपल्या उद्योगाचे स्वॉट परीक्षण करण्यामागचा हेतू तुम्हाला तुमचे उद्योजकीय धोरण निश्‍चित करता यावे हा आहे. आजच्या या अत्याधुनिक युगात ‘धोरण’ हा शब्द प्रत्येक व्यवसायाशी निगडित आहे. आजच्या या कॉर्पोरेट युगात ‘धोरण’ ही उद्योगाची अशी एक बाजू आहे की, याशिवाय प्रगतीची कास धरता येणे शक्य नाही.

प्रत्येक उद्योजकाने याबद्दल प्रामुख्याने विचार करायला हवा. उद्योगधंद्यामधील स्पर्धा पाहता उद्योजक या  स्पर्धेकडे कोणत्या दृष्टीने पाहतो आहे हेही तितकेच महत्त्वाचे असते.

कंपनीचे धोरण ठरवताना स्वॉट परीक्षणात प्रमुख स्रोत मानला जातो. S-W-O-T स्वॉट म्हणजे S = Strength, W = Weakness, O = Opportunities, T = Threats.

तुमची Strength म्हणजे तुमची शक्तिस्थानं ज्यात तुमची व्यावसायिक क्षमता; तुमच्या व्यवसायाची जमेची बाजू; व्यवसायाशी संलग्नित संसाधने; व्यवसायाची संपत्ती, भांडवल, ग्राहक, तंत्रज्ञान, पेटंट, व्यवसायातील स्पर्धेशी तुमच्याकडील फायदे; R & D,  गुणवत्ता; मनुष्यबळ आदी गोष्टी येतात.

Weakness (कमतरता) : व्यवसायाशी निगडित दोष, दुर्बल घटक ज्यामुळे तुमचा व्यवसाय स्पर्धेत मागे पडत आहे; कुठल्या घटकामुळे व्यवसाय स्पर्धेत टिकू शकत नाही; कुठल्या घटकात सुधारणा करता येऊ शकते की, ज्यामुळे तुमच्या व्यवसायातील स्पर्धक पुढे आहेत; कुठे काय टाळता येऊ शकेल. इत्यादी गोष्टी येतात.

Opportunities (संधी) : तुमच्या व्यवसायास पूरक (Extra Factors) आहेत; व्यवसायाशी निगडित कोणत्या संधी बाजारात आहेत. उदा. जर तुम्ही एखादी वस्तू उत्पादन करत असलात, तर त्याच्याशी निगडित काही नवीन उत्पादन करता येऊ शकेल का? नवीन ट्रेंड Capture करता येईल? नवी बाजारपेठ हस्तगत करता येईल का? प्रासंगिक मागणीचा लाभ घेता येऊ शकेल का? या सर्व गोष्टी येतात.

बाजारपेठेत संधी ही नेहमीच उपलब्ध असते. संधी ही विविध कारणांमुळे उपलब्ध होऊ शकते. जसे की, बाजारपेठेतील बदल, ग्राहकांच्या बदलत्या गरजा, तंत्रज्ञानातील बदल, नवीन उत्पादन पद्धती. व्यवसायवाढीची संधी ही तुमच्या दुर्बल घटकांवर केलेल्या उपायांमुळेही उपलब्ध होऊ शकते.

Threats (धोका) : धोका ही व्यवसायातील लंगडी बाजू बनू शकते. Threats वर तुमचा फार कमी किंवा शक्यतो कमी ताबा असू शकेल, पण तुम्ही आपल्या व्यवसायातील संभाव्य धोके नक्कीच ओळखून त्यावर आपत्कालीन नियोजन करू शकता. स्पर्धेमुळे वस्तुदर कमी होणे, तंत्रज्ञान कालबाह्य होणे, ग्राहकांच्या गरजा बदलणे आदी एक ना अनेक प्रकारचे धोके उद्योगात येऊ शकतात.

SWOT Analysis ही तुमची व्यावसायिक गरज आहे. SWOT Analysis म्हणजे तुमच्या किंवा तुमच्या व्यवसायाची बलस्थाने आणि कमतरता यांचे परीक्षण तसेच आपल्या व्यवसायातील नवनवीन संधी आणि संभाव्य धोके यांचे परीक्षण.

– दत्तात्रय काळे
९५४५२१९७२७

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?